नव्या अम्मांचा उदय? (श्रीराम पवार)

shriram pawar's article in saptarang
shriram pawar's article in saptarang

‘अम्मांनंतर कोण?’ यासाठी सध्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमला धडपड करावी लागत आहे. धोरण आणि वैचारिकतेच्या नावानं ठणठणाट असला, की लोकानुनय आणि नेत्याची लोकप्रियता हेच भांडवल उरतं. अम्मांनंतर असं भांडवल शोधणं हे अण्णा द्रमुकपुढचं आव्हान आहे. जयललिता यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर काळजीपूर्वक ‘अम्मा ब्रॅंड’ तयार केला होता. शशिकलाही याच वाटेनं जातील काय? ‘नव्या अम्मा’ किंवा ‘चिन्नम्मा’ म्हणून त्यांची जाहिरातबाजी सुरूही झाली आहे. मात्र, जयललिता यांच्यासारखी पकड मिळवण्याच्या प्रवासात शशिकला यांना अनेक ‘पण’, ‘परंतुं’चा सामना करावा लागणार आहे!

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं पार्थिव त्यांचे गुरू एमजीआर यांच्याप्रमाणंच चेन्नईतल्या राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि देशभरातले नेते त्या पार्थिवाचं दर्शन घेत होते, तेव्हा सातत्यानं चर्चेत असलेला मुद्दा होता ः ‘तमिळनाडूमध्ये किंवा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये आता अम्मांनंतर कोण?’ मोठ्या नेत्यांच्या जाण्यानं पोकळी तयार झाली वगैरे म्हणण्याची प्रथा आहे आणि तशी ती झाली तरी राजकारण कुणासाठी थांबत नाही. अण्णा दुराईंनंतर ते थांबलं नाही. एमजीआर यांच्यानंतरही थांबलं नाही आणि आता जयललिता यांच्यानंतरही ते थांबण्याची शक्‍यता नाही. या सगळ्यांची लोकप्रियता त्याना जिवंतपणी दैवत बनवणारी होती. मात्र, एखाद्या मोठ्या नेत्याच्या निधनानंतर हळूहळू ‘नवा नेता, नवा डाव’ रुजत जातो. अम्मांनंतरच्या अण्णा द्रमुकमध्येही हे घडणं स्वाभाविकच. मुद्दा नायकत्व कुणाकडं असेल हा आहे. अम्मांच्या मागं तमिळनाडूत हात-पाय पसरायचे प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष नक्कीच करतील. अम्मांनी हयातीतच आपल्या वतीनं राज्य कारभारासाठी निवडलेले ओ. पनीरसेल्वम हे अपेक्षेप्रमाणं मुख्यमंत्री झाले तरी पक्षाची धुरा कुणाकडं, हा खरा मुद्दा आहेच. तेच खरं सत्ताकेंद्र बनणार हे जवळपास स्पष्ट आहे. अनेक दशकं एकच नेता आणि त्याच्या प्रकाशात मिळेल ती भूमिका निमूटपणे निभावणारे सहकारी अशी अवस्था असलेल्या पक्षात पोकळी निर्माण झालीच तर ती भरून काढण्यासाठी असंच सगळ्यांहून अधिक उंचीचं, सहजपणे अधिकार गाजवू शकणारं नेतृत्व ही गरज बनते. लोकशाहीप्रक्रिया, धोरणं, वैचारिक स्पष्टता यापेक्षा प्रतिमेचा खेळ हेच राजकारणाचं भाडवल बनलं की जे होतं ते तमिळनाडूत दिसत आहे. या पेचातून तूर्त तरी अम्मांच्या सहकारी शशिकला यांच्या डोक्‍यावर नेतृत्वाचा मुकुट ठेवणं पक्ष पसंत करेल. या घडामोडींतून सुरू झालेली वाटचाल तमीळ राजकारणात नव्या अम्मांचा उदय असणारी ठरेल की ही वाटचाल पक्षातच फूट पाडेल?

तमिळनाडू हे देशातलं राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं राज्य आहे. ३९ खासदार देणारं राज्य देशाच्या राजकीय क्षितिजावर प्रभाव टाकू शकतं. तसा तो अनेकदा दिसलाही आहे. पक्षीय स्तरावर ही खासदारांची संख्या ‘नेता कोण’ यावरच बहुधा ठरणार असल्यानंही अम्मांचा वारसदार महत्त्वाचा ठरतो. या राज्यात १९६७ पूर्वी काँग्रसेचं राज्य होतं. त्रिभाषासूत्राला कडाडून विरोध करणाऱ्या द्रविड मुन्नेत्र कळघमनं ते हिसकावून घेतलं. राज्यातून काँग्रेस कायमची सत्तेबाहेर गेली. द्रविडी अस्मिता हा नेहमीचा राजकारणाचा मुद्दा बनून गेला. हिंदीच्या रूपानं उत्तर भारतीय प्रभावाला ठाम नकार देणारा तमिळनाडू (तेव्हाचा मद्रास प्रांत) ५० वर्षांत बराच बदलला. काँग्रेसची सत्ता घालवून मुख्यमंत्री झालेल्या द्रमुकच्या अण्णा दुराईंनी मद्रासचं ‘तमिळनाडू’ असं नामकरण केलं. त्यानंतर या राज्यात सत्ता ही आलटून-पालटून द्रमुक किंवा अण्णा द्रमुक याच द्रविडी पक्षांच्या ताब्यात राहिली. श्रीलंकेतल्या तमीळ वाघांचा मुद्दा असो की कावेरी पाणीवाटपाचा असो, द्रविडी पक्षांसारखा टोकाचा पवित्रा घेता येणं राष्ट्रीय पक्षांना शक्‍य नसतं. नेमका याचाच लाभ तमिळनाडूत प्रादेशिक पक्ष दीर्घकाळ उठवत आले आहेत. द्रमुक-अण्णा द्रमुक या पक्षांचा प्रभाव तर तिथं आहेच; पण अन्य प्रादेशिक पक्षही लक्षणीय आहेत. साहजिकच सातत्यानं वेगळी राजकीय ओळख दाखवणाऱ्या या राज्यात अम्मांच्या निधनानं राष्ट्रीय पक्षांना; खासकरून भाजपला एक संधी दिसत असली, तरी द्रमुक-अण्णा द्रमुक आणि पीएमके, जीएमडीके यांच्यासारखे छोटे प्रादेशिक पक्ष यांच्यापलीकडं राजकीय स्पेस मिळवणं सोपंही नाही.

जयललिता या इच्छा नसताना सिनेक्षेत्रात गेल्या होत्या आणि राजकारणातही. एकदा ही क्षेत्रं स्वीकारल्यानंतर मात्र त्यांनी दोन्ही क्षेत्रांत अपूर्व असं यश मिळवलं. पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवताना आणि राज्यात करुणानिधींसारख्या ज्येष्ठ आणि ताकदीच्या नेत्याशी झुंजताना त्यांनी ‘अम्मा’ असं ब्रॅंडिंग धूर्तपणे स्वीकारलं. दुसरीकडं अत्यंत कठोरपणे पक्षातला विरोध संपवला. एमजीआर यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी झालेला अपमान, पुढं विधानसभेत झालेली अवहेलना यांतून त्या अधिकच कठोर-कणखर बनत गेल्या. हा कणखरणपणा पुढं एकाधिकारशाहीकडं, आढ्यताखोरीकडं, कमालीच्या अहंमन्यतेकडं झुकला. राजकारणात मतं खेचणाऱ्याचे दुर्गुण झाकले जातात. अम्मांच्या बाबतीतही हेच घडत गेलं. त्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या डोक्‍यावरून थेट लोकसमूहाशी संवाद साधू शकत होत्या. तिकीट देईल त्यांच्या पारड्यात मतं पाडू शकत होत्या. त्या बदल्यात कोणताही प्रश्‍न न विचारता संपूर्ण निष्ठेची अपेक्षा होती. ती दाखवणारे त्यांच्यासोबत टिकले. पक्ष आणि सत्तेवर असताना सरकार त्यांनी स्वतःभोवती केंद्रित केलं.

आता अम्मांची ‘एक्‍झिट’ झाली आहे. करुणानिधी हे कारकीर्दीच्या अखेरच्या वळणावर आहेत. या दोघांखेरीज तमीळ राजकारणाचं पानही गेली तीन-चार दशकं हलत नाही. या स्थितीत तमिळनाडू राजकीयदृष्ट्या कुठल्या बाजूनं जाणार याला महत्त्व असेल. एमजीआर गेले तेव्हा त्यांनी ‘वारस कोण’ हा प्रश्‍न अर्धवटच सोडला होता. त्यातूनच त्यांचं कुटुंब आणि अम्मा यांच्यातलं महाभारत घडलं. तमीळ राजपाटावरून अस्तंगत होताना अम्माही अशीच निर्नायकी ठेवून गेल्या आहेत. सहकारी-समर्थकापेक्षा भक्तासारखाच व्यवहार असलेले पनीरसेल्वम यांच्याकडं तूर्त मुख्यमंत्रिपदाची सूत्रं आली आहेत. या गृहस्थांचा आत्तापर्यंतचा व्यवहार ‘राजापेक्षा राजनिष्ठ म्हणजे काय’, याचं मूर्तिमंत उदाहरण शोभावं असाच आहे. अम्मा बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपातून शिक्षा भोगायला गेल्या, तेव्हा पनीरसेल्वम यांनी अम्मांच्या खुर्चीवरही न बसता मुख्यमंत्रिपद चालवलं आणि अम्मांची सुटका होताच पद शांतपणे सोडूनही दिलं...अण्णा द्रमुक आणि करुणानिधी यांच्या पाठोपाठ स्टॅलिनचा द्रमुक या तिथल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षाला लोकांचा असलेला पाठिंबा हा प्रामुख्यानं अम्मा आणि करुणानिधी यांच्या लोकप्रियतेचा चमत्कार राहिलेला आहे. प्रदीर्घ काळानं, खरंतर एमजीआर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच, तमिळनाडूत पूर्णतः नव्या समीकरणांची शक्‍यता तयार झाली आहे. जिथं भावनिक राजकारण सहज फोफावतं, तिथं प्रतीकात्मकतेला महत्त्व येतं. जयललितांवर अंत्यसंस्कार शशिकला यांनीच केले. त्या सातत्यानं जयललिता यांच्या पार्थिवाजवळ थांबून होत्या. येणारे सगळे नेते त्यांचं सांत्वन करत होते. या प्रतीकात्मकतेतून अण्णा द्रमुकमधलं सत्ताकेंद्र बनण्याची त्यांची इच्छाच दिसून येत होती.
तमिळनाडूतल्या राजकारणात प्रमुख पक्षात एकच निर्विवाद नेता राहू शकतो. इतरांनी या नेत्यापुढं लोटांगण घालणं आणि नेत्याच्या करिष्म्याचा लाभ घेत निवडणुका जिंकणं, पदं भोगणं एवढंच शिल्लक उरतं. खरंतर या राज्यातल्या राजकारणाला पेरियार रामास्वामींच्या द्रविड चळवळीची पार्श्‍वभूमी आहे. त्यातूनच तमिळनाडूत द्रमुक साकारला. अण्णा दुराई या सर्वमान्य नेत्यानंतर करुणानिधी हे द्रमुकचे प्रमुख बनले आणि त्यांच्याशी बिनसलेले एम. जी. रामचंद्रन म्हणजेच एमजीआर यांनी अण्णा द्रमुकची वेगळी चूल लावली. त्यानंतर व्यक्तिकेंद्रितता, खैरातींचं राजकारण हे क्रमाक्रमानं तमीळ राजकारणाचं वैशिष्ट्य बनलं. एमजीआर यांच्या हयातीत त्यांना विरोध करणारं कुणी पक्षात उभं राहणं शक्‍य नव्हतं. एमजीआर यांच्या पश्‍चात तीच पंरपरा जयललितांनी चालवली. निधनानंतर अम्मांच्या गुणगौरवाचे सोहळे माध्यमांतून कितीही चालवले गेले, तरी त्यांनी लोकशाहीशी विसंगत ‘लोटांगणसंस्कृती’ पक्षात रुजवली, हे नजरेआड करायचं कारण नाही.

लहानपणापासून मनाविरुद्ध घेतलेल्या अनुभवांतून जयललिता अशा बनल्याचं निदान अनेकांनी केलं आहे. कारणं काहीही असली तरी त्यांनी ‘नेता मतं मिळवून देईल, त्यानंतर तो जे सांगेल ते ऐका किंवा बाजूला पडा’ असं सूत्रच प्रत्यक्षात आणलं. त्यामुळं ‘अम्मांनंतर कोण?’ या प्रश्‍नासंदर्भातही पक्षाला करिष्मा आणि लोकांना दैवतासमान वाटेल असं नेतृत्व शोधणं यासाठीच धडपड करावी लागत आहे. धोरण आणि वैचारिकतेच्या नावानं ठणठणाट असला की लोकानुनय आणि नेत्याची लोकप्रियता हेच भांडवल उरतं. अम्मांनंतर असं भांडवल शोधणं हे अण्णा द्रमुकपुढचं आव्हान आहे. तातडीचा मार्ग म्हणून अम्मांच्या सहकारी शशिकला यांच्याकडं धुरा दिली जाईल. मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या मंत्रिमंडळानं शशिकला यांची भेट घेणं हे पावलं कुठल्या दिशेनं पडत आहेत, याचंच निदर्शक होतं. पाठोपाठ पक्षाच्या प्रवक्‍त्यानं ‘शशिकलाच सरचिटणीस होतील’ असं सांगूनही टाकलं आहे. शशिकला यांचा करिष्मा अम्मांच्या तोडीचा नाही. जयललिता यांच्या अनेक निर्णयांवर त्यांचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं; किंबहुना जयललितांच्या अनेक अप्रिय निर्णयांसाठी शशिकलांना जबाबदार धरलं गेल्यानं अनेकदा जयललिता या इतरांच्या नजरेत चांगलीच प्रतिमा ठेवून राहिल्या. शशिकला कधीच थेटपणे राजकारणात नव्हत्या. अम्मांच्या निधनानंतर ज्या रीतीनं प्रकाशझोत आपल्यावर राहील याची काळजी त्यांनी घेतली व सोबतच तातडीनं मुख्यमंत्रिपदावर दावा न सांगता पक्ष मागं उभा राहील याची व्यवस्था केली ते पाहता त्या योग्य चाली खेळत आहेत, असंच दिसतं. तमिळ राजकारणातलं जातगणित दुर्लक्ष करण्यासारखं नाही. त्या आणि मुख्यमंत्री एकाच थेवर जातीचं प्रतिनिधित्व करतात. दोन्ही पदांवर एकाच जातीचे प्रतिनिधी अन्य घटकांना दुखावणारे ठरू शकतात. गौंडर आणि वनियार या जाती पक्षासाठी प्रभावशाली आहेत. अन्य जातसमूहांकडून लोकसभेचे उपाध्यक्ष एम. तंबीदुराई किंवा पी. एस. रामचंद्रन यांचा आग्रह धरला जाऊ शकतो. शशिकला सरचिटणीस झाल्या तरी एक मुद्दा त्यांच्यासाठी टांगत्या तलवारीसारखा आहेच व तो म्हणजे त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला बेहिशेबी संपत्तीचा खटला. जयललिता यांची निधनानं सुटका केली तरी शशिकला यांना तो लढावाच लागेल आणि अंतिम निकालावर त्यांचं दीर्घकालीन भवितव्य ठरेल. त्यांची आणखी एक अडचण आहे ती कुटुंबाच्या प्रतिमेची. त्यांचे पती नटराजन आणि अन्य नातेवाइकांनी घातलेला धुमाकूळच अम्मांना काही काळासाठी शशिकला यांना दूर लोटण्यास कारणीभूत ठरला होता. जयललितांच्या निधनानंतर मात्र सगळं कुटुंब पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसू लागलं आहे. या कुटुंबाची प्रतिमा काही बरी नाही. सुब्रमण्यम स्वामींसारखा नेता त्यांना थेटपणे ‘मन्नारगुडीचे माफिया’ असं म्हणतो.

तूर्त तरी आपल्याला वगळून अण्णा द्रमुकचा विचार करता येणार नाही, असं स्थान शशिकला त्यांनी तयार केलं आहे. जयललिता यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर काळजीपूर्वक ‘अम्मा ब्रॅंड’ तयार केला होता. तो त्यांच्या पाठीराख्यांना कायम आश्‍वस्त करत राहिला. एकाधिकारशाही आणि त्यातून विरोधकांमध्ये धाक तयार होणं हा त्या ब्रॅंडिंगचाच एक भाग. शशिकला याच वाटेनं जातील काय? ‘नव्या अम्मा’ किंवा ‘चिन्नम्मा’ म्हणून त्यांची जाहिरातबाजी सुरूही झाली आहे. मात्र, ती पकड मिळवण्यात त्यांच्या वाटेत अनेक ‘पण’ ‘परंतु’ आहेत!

- मुद्दा ‘एकच प्रचंड उंचीचा, प्रतिमेचा नेता आणि बाकी सारे बुटबैंगण’ यातून सुटका होऊन जिथं विचारांची-कल्पनांची-धोरणांची स्पर्धा आहे, असं नवं काही आकाराला येईल का, हा आहे. अम्मांच्या अण्णा द्रमुकमध्ये आणि करुणानिधींच्या द्रमुकमध्ये ते शक्‍य नाही. याच तमिळनाडूनं खरंतर देशाला राजगोपालाचारी तथा राजाजी आणि कामराज यांच्यासारखे देशाच्या राजकीय पटलावर स्पष्ट प्रभाव दाखवणारे नेते दिले आहेत. लोकप्रिय नेता आणि त्याच्या लोकप्रिय कल्पनांना विरोध दाखवण्याचं धाडस महात्मा गांधी आणि नेहरू यांच्यासारख्या नेत्यांबाबत दाखवणाऱ्या राजाजींचा वारसा तमिळनाडूला आहे. भूमिका पटो किंवा न पटो, मान्य होवो अथवा अमान्य, विरोध करण्याचं मोकळेपण हे लोकशाहीचं सूत्र आहे, याचं स्मरण ठेवण्याची गरज तमिळनाडूला आहे तशीच देशालाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com