लोकसहभाग आणि उद्योजकता (श्रीरंग गोखले)

लोकसहभाग आणि उद्योजकता (श्रीरंग गोखले)

लोकसहभागाचा कल्पक उपयोग करून कुठलाही व्यवसाय वाढवता येऊ शकतो. कल्पकता व संधी यांचाही सुयोग्य मेळ घालता येणं आवश्‍यक असतं. उद्योग-व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्यांनी एखादी संधी हुकली म्हणून निराश होता कामा नये. निराशावादी विचार फार वाईट. यासंदर्भात मला बसचं उदाहरण अतिशय पटतं. बसथांब्यावर बसची वाट पाहत आपण उभे असतो व त्या वेळी आलेली बस कधी कधी न थांबताच निघून जाते. ती बस निघून गेली म्हणून हताश होण्याचं कारण नसतं. कारण, दुसरी बस येणारच असते. संधीचंही असंच असतं!

जा   स्त जास्त कल्पना सुचण्यासाठी जसा समूहाचा फायदा होतो, तसंच त्या कल्पना कृतीत उतरवण्यासाठीही समूह फायदेशीर ठरतो.

आर. बी. लाल हे माझे पहिले बॉस होते. ते स्वतः तहान-भूक विसरून काम करत. नवकल्पना विरून जाऊ नयेत म्हणून त्या एका ‘व्हाइट बुक’मध्ये नोंदवण्याची शक्कल त्यांनी लढवली होती. निवृत्तीनंतर माझा पु. ग. वैद्य सरांशीही संपर्क आला. हे अतिशय कल्पक व्यक्तिमत्त्व. मधल्या सुटीत शाळेची मुलं वडा-पाव खातात, त्याला त्यांना पर्याय हवा होता. कणकेचा पाव व वड्याऐवजी पाटवडी ही माझी कल्पना त्यांना फार आवडली होती. विलास रबडे हा माझा ‘फिलिप्स’मधला हरहुन्नरी सहकारी. हॅम रेडिओ, सायकलिंग, विज्ञानप्रयोग असे त्याचे अनेक उपक्रम. ‘फिलिप्स-कट्टा’ चालवणारी ही उत्सवमूर्ती. काही वर्षांपूर्वी माझी डी. पी. पारखे सरांशी ओळख झाली. गरिबांना परवडतील असे व त्यांचं काम सुलभ होईल असे अनेक शोध त्यांनी लावले आहेत. नव्वदीच्या आसपास पोचूनही त्यांचा इतका उत्साह पाहून थक्क व्हायला होतं. अशोक पानवलकर, नरेंद्र जोग, अरविंद खडके, विश्वास दाते असे मित्र दोन-तीन महिन्यांतून एकदा भेटले तरी त्यांच्या गप्पांमधून खूप ज्ञान मिळतं.

माझ्या दीर्घ कारकीर्दीत कंपनीत मला १० व्यवस्थापक लाभले. त्यातले निम्मेतरी विदेशी होते. १९८९-९० मध्ये आलेले लॅंगेनडाँग व्यवस्थापक हे मला खूप आवडत. ते डच होते. मात्र, त्यांना भारताचं खूप कौतुक. माझं डिझायनरचं करिअर एकसुरी होतं आहे म्हणून काही काळ मला ‘प्रॉडक्‍शन’ची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आलेले विलास दिवाडकर यांची कारकीर्द माझ्या दृष्टीनं सगळ्यात प्रभावशाली ठरली. पुस्तकापेक्षा व्यवस्थापनाची तत्त्वं प्रत्यक्ष आचरणारे, धाडसी व लोकसहभागाचा कल्पक उपयोग करणारे ही त्यांची वैशिष्ट्यं.  
ते आमच्या वेगळ्या बिझिनेस युनिटमधून आले होते; पण आमच्याकडं आल्यावर त्यांनी देशात व परदेशांत वरच्या स्तरांवर चांगलं संपर्कजाळं तयार केलं होतं. इतक्‍या थोडक्‍या वेळात लोकांशी यांची मैत्री कशी होते, याचं मला अप्रूप वाटे.

लोकांचा कल्पकतेसाठी उपयोग करण्याकरिता ज्ञानाधिष्ठित कौशल्याबरोबरच भावनात्मक विचारसरणीही उपयोगी ठरते. यासाठी काही सुंदर तंत्रं आहेत, जी वापरून विचारांना दिशा मिळते. त्यातलं महत्त्वाचं तत्त्व आहे मास्लोचं (Moslow). एखादी व्यक्ती काम करण्यासाठी उद्युक्त का होते व तिची ही प्रेरणा पुढं का टिकत जाते, याचं छान स्पष्टीकरण मिळतं. रोटी-कपडा या प्राथमिक गरजा भागल्यावर पायरीपायरीनं सुरक्षितता, कामाची आवड, समूहात काम करण्याची इच्छा, सामाजिक स्थान व आत्मसन्मान या गोष्टी कार्यप्रेरणेसाठी उपयुक्त असतात. पैसा हे एकच प्रोत्साहन नेहमी नसतं. SWOT हे तंत्र तर प्रत्येकानं वापरावं असंच. त्रुटींवर मात करून बाह्यजगताला पोषक ठरतील अशी कौशल्यं आत्मसात करणं म्हणजे करिअर.
आपल्या ज्या काही जमेच्या बाजू असतात, त्यांचा सदुपयोग करून घेण्यापेक्षा आपण आपल्या त्रुटींकडंच जास्त लक्ष देत असतो. मात्र, हे टाळायला हवं.

लोकांच्या कामाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आळशी लोक निरुत्साही असतात, ते सबबी देतात व कामं टाळतात. दुसरा प्रकार ‘सांगकाम्यां’चा. ही मंडळी सांगितलेली कामं करतात; पण तेवढंच. कुठलं काम आपलं नाही, याची त्यांना चांगलीच जाणीव असते. तिसरा प्रकार म्हणजे, पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी. हे लोक उत्साही व उत्सुक असतात. हे सांगितलेली कामं तर करतातच; पण न सांगितलेली आनुषंगिक कामंही करून मोकळे होतात. सहसा अशी माणसंच बढतीसाठी निवडली जातात. त्यासाठी वापरलं जाणारं वार्षिक मूल्यमापन (Appraisal) हे अत्यंत उपयोगी तंत्र आहे. प्रेरणा देणं, मानसिकता बदलणं, सत्य परिस्थितीची जाणीव, उद्दिष्टात सहभाग असे मूल्यमापनाचे अनेक फायदे असतात. नोकरी सोडून जाणाऱ्यांचा Exit Interview घ्यायचीही आमच्या कंपनीत पद्धत होती.
* * *
मला अनेक सहकाऱ्यांची उल्लेखनीय साथ मिळाली. लक्ष्मीकांत कुलकर्णी हा खेड्यातून आलेला शेतकरी परिवारातला मुलगा. त्यानं कष्टानं शिक्षण घेतलं. नवीन काही शिकायची त्याची ऊर्मी. इतर सगळ्या न्यूनगंडांवर या ऊर्मीनं मात केली. मेकॅनिकल डिझाइनमधली सर्व कौशल्यं शिकत प्रो. ई. या कॉम्प्युटर डिझाइनच्या प्रणालीत त्यानं प्रगती केली. चंद्रशेखर रांजेकर हाही असाच. त्याच्यातही नवनवं शिकण्याचा उत्साह व CAD मध्ये त्याचं नैपुण्य. पुढं डिझाइनमध्ये संगणकाच्या वापराचं प्रमाण वाढल्यावर संगणकाचा वापर करून डिझाईन तयार करू शकणाऱ्या दोन उच्च पदवीधरांची नियुक्ती आम्ही केली. त्या वेळी ‘आता आपलं काय होणार,’ याची या दोघांना काळजी असायची. ‘तुम्ही तुमचं काम नेहमीप्रमाणे सुरू ठेवा,’ असा दिलासा मी त्यांना देई. पुढं ते ‘पुस्तकी’ पदवीधर लवकरच नोकरी सोडून गेले. कुलकर्णी नंतर व्हिएन्नाला जाऊन तिकडच्या प्रकल्पावर काम करून आला व ‘सेल्फमेड डिझायनर’ असं त्याचं कौतुक झालं. पुढं या दोघांनी प्रकल्पव्यवस्थापन, उद्योगविषयक कौशल्यं, कॉस्टिंग, विपणन आदींमध्ये निपुणता मिळवली व उच्च पदांवर काम केलं. सुनील नाईक हा आमच्या प्रोटोटाईप शॉपचा प्रमुख. आत्मविश्‍वास व नवीन गोष्टी शिकण्याची ऊर्जा यातून त्यानं CNC मशिन, सेमी ऑटोमेशन, ऑटोइन्सर्शन मशिन अशी प्रगती केली. कंपनीनं आपला प्रिंटेड बोर्डचा व्यवसाय ‘जेबिल’ या आंतरराष्ट्रीय कंपनीला विकला. तिथं विभागप्रमुखपदापासून बढती मिळवत तो आज ‘जेबिल’चा भारतातला संचालक झाला आहे. पुरुषोत्तम पिंपळे असाच अप्रगत भागातून आलेला. याची पहिल्यापासूनच उद्योगप्रवृत्ती होती. नोकरीनंतर आता तो समाजकार्य व पर्यावरण या क्षेत्रांत व्यग्र आहे. फक्त ‘उच्च पदवी’ हे यशस्वितेचं गमक नसतंच. या सगळ्यांच्या स्वभावात एक प्रकारची मिळून-मिसळून जाण्याची वृत्ती होती. त्यांचे पाय जमिनीवर होते. अंतःप्रेरणा व नवनवं शिकण्याची ऊर्मी याची त्यांनी त्याला जोड दिली.

लोकसहभागात आणखीही काही गोष्टी असते. त्यातली एक असे ‘फॅमिली व्हिजिट.’ एक दिवस कामगारांच्या कुटुंबीयांना फॅक्‍टरीला भेट देता येई. फॅक्‍टरी सुरूच असे आणि त्या दिवशी प्रत्येकाचेच आप्त आल्यानं कामात काहीसा विस्कळितपणाही येई; पण मजासुद्धा असे. मी ‘प्रॉडक्‍शन’ विभागात असताना एक ऑपरेटर आदल्या दिवशी माझ्याकडं आला आणि म्हणाला ः ‘‘सर, उद्या मला ऑफिसातलंच काही काम द्या. माझ्या मुलीसमोर मला पॅकिंग ऑपरेटरचं काम नाही करायचं!’’ दुसरी कल्पना असे ती ‘टाऊन मीटिंग’ची. यात कंपनीचा व्यवस्थापक झाडून सगळ्यांना बोलावून घेऊन व्यवसायाची सद्यस्थिती सोप्या शब्दांत समजावून सांगे. नंतर खुली प्रश्‍नोत्तरं होत. यातूनच ‘आपण’ आणि ‘ते’ यातली दरी कमी होई. तिसरा प्रकार Deployment चा. याला कार्यसाखळी म्हणता येईल. कंपनीचा मुख्याधिकारी दरवर्षी काही ध्येयं, उद्दिष्टं ठरवे. त्यांची फोड करून अशी उतरंड केली जाई, की शेवटच्या कामगारापर्यंत सगळ्यांची वाटचाल उद्दिष्टांच्या दिशेनं होई. याला ‘बॅलन्स्ड्‌ स्कोअरकार्ड’ असं नाव होतं.
* * *

निवृत्तीनंतर मी एका लग्नाच्या स्वागतसमारंभाला गेलो होतो. तिथं ५००-६०० लोकांच्या समूहात माझ्या ओळखीचं कुणीही नव्हतं. कंपनीतलं माझं करिअर हे समाजापासून तोडणारं झालं आहे, याची जाणीव मला तेव्हा झाली. यावर मी दोन उपाय शोधले. पहिला उपाय म्हणजे, ज्ञानदानासाठी माझे आवडते विषय निवडून त्यांची प्रेझेंटेशन्स मी तयार केली. त्यातून मराठा चेंबर, MCED, जिल्हा उद्योग केंद्र, MITCON, Poona Division Productivity Council यांच्यातर्फे प्रशिक्षणाच्या कार्यशाळा घेतल्या. राजीव कोल्हे यांच्या IITD तर्फे सेमिनार घेतानाही खूप काही शिकायला मिळालं. काही कारखान्यांनी मला आमंत्रित केलं. त्यातून लोकांशी संपर्क वाढला व तंत्रज्ञानाची उजळणीही होत राहिली.

दुसरा उपाय म्हणजे, मला उद्योजकता (Entrepreneurship) या विषयात रुची निर्माण झाली. त्यासाठी मी काही क्‍लबचा व संघटनांचा सभासद झालो. पहिला क्‍लब म्हणजे माधवराव भिडे यांनी स्थापन केलेला ‘सॅटर्डे क्‍लब’. याचं मोठं संपर्कजाळं आता महाराष्ट्रात तयार झालं आहे. अद्वैत भट हे त्याची पुण्याची शाखा चालवतात. दुसरा म्हणजे ‘आंत्रप्रिन्युअर क्‍लब.’ याच्या पुण्यात तीन व बारामतीला एक शाखा आहे. यात बहुतांश अभियंते व उत्पादक असल्यानं त्यात एकसंधता आहे. या क्‍लबची स्थापना सुमारे २५ वर्षांपूर्वी झाली. या क्‍लबचं काम अत्यंत सुसूत्रपणे चालतं. उद्योगाविषयी आस्था असणारं कुणीही या क्‍लबचं सदस्य होऊ शकतं. या दोन्ही क्‍लबशिवाय माझा भारतीय युवा शक्ती ट्रस्ट ( BYST) या संस्थेशीही संबंध आला. या संस्थेचा कार्यभार माजी राष्ट्रपती व्यंकटरामन यांची कन्या लक्ष्मी व्यंकटेश या सांभाळतात. राहुल बजाज, अनू आगा व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) हेही संलग्न आहेत. १८ ते ३५ वयाच्या कुणाही व्यावसायिकाला या ट्रस्टतर्फे आर्थिक मदत बॅंकेच्या कर्जाद्वारे (तारण व जामीनदार नसतानाही) दिली जाते. इथलं वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक उद्योजकाला पहिली काही वर्षं एक मार्गदर्शक (Mentor) इथं मिळतो. ट्रस्टच्या कामात सहभागी होताना छोटे छोटे उद्योजक कोणत्या कोणत्या अडचणींमधून मार्ग काढतात, याची फार चांगली जाणीव मला इथं झाली.

तिसरा उपक्रम पराग गोरे यांचा. ते Business Mantra ही संस्था चालवतात. इव्हेंट, शो, मीटिंग यांद्वारे सभासदांना वेगवेगळे अनुभव मिळतात. वैयक्तिक पातळीवर असा क्‍लब चालवणं सोपं नसतं. प्रदीप तुपे यांचा PMA ग्रुप, MEN व YUWA असेही काही गट माझ्या परिचयाचे आहेत. एका वेगळ्या पातळीवर ‘पर्सिस्टंट’नं चालवलेला ‘दे सहारा’ हा उपक्रमही स्तुत्य आहे. छोट्या उद्योजकांनी एकत्र येण्याचे अनेक फायदे असतात. माहितीची देवाण-घेवाण, संपर्कजाळ्याची वृद्धी, संदर्भसंपन्नतेतून  व्यवसायवृद्धी, नवतंत्रज्ञानाची प्राप्ती इत्यादी. गटानं मिळून समस्यांचा केलेला पाठपुरावा जास्त परिणामकारक ठरतो.
* * *

विद्यार्थ्यांशीही काही प्रमाणात माझा संवाद झाला. त्यांना ‘उद्योगप्रवृत्त’ बनवणं महत्त्वाचं असतं. ‘उद्योजक’ हा शब्दप्रयोग मी मुद्दामच वापरत नाही. नोकरी करतानाही ‘उद्योगप्रवृत्ती’ अंगी बाणता येऊ शकते. माझं करिअर नोकरीचं होतं; पण मागं वळून पाहताना जाणवतं, की मीही एक अंतर्गत उद्योजक (Intrapreneur) होतो हे निश्‍चित. ‘उद्योजक व्हायला पैशाचं पाठबळ लागतं, शिक्षण लागतं, घराण्यात उद्योजकता लागते, वशिला लागतो, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आवश्‍यक असतं’ हे सगळे गैरसमज आहेत, हे मी अनुभवलं आहे. उद्योजकाला कोणते गुण हवेत असे विचारलं, तर भलीमोठी यादी समोर येईल; पण माझं वैयक्तिक मत असं आहे, की कष्टाची तयारी, हात काळे करण्याची वृत्ती, जिज्ञासा आणि go-getterness एवढी शिदोरी बस्स आहे!
‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं असंच आहे. कार्व्हरचं त्यातलं एक वाक्‍य म्हणजे तर धडपडणाऱ्यांसाठी मंत्रासमान होय.

Start with what you have. Make something out of it. Never be satisfied. व्यवसाय कुठून सुरू करू, असं वाटणाऱ्यांनी हे वाक्‍य ध्यानात घ्यावं. उदाहरणार्थ ः आपल्या स्वतःकडं काही कौशल्य असतं. आपली आई काही पदार्थ छान करते. आपल्या मित्राला काही छंद असतो. अशा सगळ्या गोष्टींचं व्यवसायात रूपांतर करून श्रीगणेशा करता येतो. नोकरी करता करता आपली उद्योगप्रवृत्ती जागी ठेवली, तर अडचणीच्या वेळी व्यवसायात उडी घेता येते. शिक्षण घेता घेताच उद्योगाची सुरवात तर करावी. स्व-उद्योग हा नोकरीपेक्षा केव्हाही चांगला. असं म्हणतात की नवउद्योजकाला सुरवातीला जरा मोठे घास घ्यावे लागतात; पण कालांतरानं ते पचवायची कलाही तो शिकतो. व्यवसायासाठीच्या कितीतरी नवकल्पना आपल्या आजूबाजूलाच दिसतात! एक जरासं वेगळं उदाहरण इथं आठवतं.

एका आजोबांना टीव्हीतल्या कार्यक्रमांबरोबरच जाहिरातीही पाहायची सवय होती. मालिकांदरम्यान लागणारी एका कंपनीची जाहिरात त्यांना दोन-तीन दिवस प्रसारित झालेली दिसली नाही, तेव्हा सहज म्हणून त्यांनी त्या कंपनीला कळवलं. कंपनीनं याची दखल घेतली व कौतुक केलं. काही दिवसांनी कंपनीनं त्यांच्यापुढं एक प्रस्ताव ठेवला ः ‘ठराविक वेळी टीव्हीवर आमच्या कंपनीची जाहिरात दिसते का आणि कितीदा दिसते, यावर त्यांनी लक्ष ठेवावं.’ या कामाचा त्यांना नियमितपणे मेहनतानाही मिळू लागला!

साड्या व कपड्यांवर जर्दोसी काम करणाऱ्या एका महिलेची यशोगाथा मी पाहिली आहे. घरावर संकट आलं म्हणून ही कला शिकून एका बाईंकडं ही महिला काम करू लागली. चिकाटी व कौशल्य यातून तिनं प्रगती केली. पुढं ऑर्डर स्वीकारायला सुरवात केली.  साड्या-जर-टिकल्या यांचे स्रोत तिनं शोधून काढले. मुंबई-सुरतच्या वाऱ्या केल्या. वाढत्या कामासाठी महिला-कामगार ठेवल्या. मागणी वाढत गेली तसा इतरांचा तयार मालही ही महिला विकू लागली. भेटवस्तू, रुखवताच्या वस्तू अशांची जोड या व्यवसायाला तिनं दिली. नंतर जर्दोसी शिकवण्याचे अभ्यासवर्ग काढले. उत्पादन, व्यापार व सेवा असे व्यवसायाचे तिन्ही प्रकार हाताळून उन्नती साधली. कल्पकता व संधी यांचा मेळ घालावाच लागतो. निराशावादी विचार फार वाईट. यासंदर्भात मला बसचं उदाहरण अतिशय पटतं. बसथांब्यावर बसची वाट पाहत आपण उभे असतो व त्या वेळी आलेली बस कधी कधी न थांबताच निघून जाते. ती बस निघून गेली म्हणून हताश होण्याचं कारण नसतं. कारण, दुसरी बस येणारच असते. संधीचंही असंच असतं! उत्पादनक्षेत्राची ओळख, त्यातली तंत्रं सुलभतेनं समजून घेणं व ती वैयक्तिक आयुष्यात जमेल तिथं वापरणं आणि उद्योगप्रवृत्तीचं पोषण अशा काही उद्देशांसाठी गेले सहा महिने ही लेखमाला मी लिहिली. हे उद्देश कितपत साध्य झाले, ते वाचकांनी ठरवायचं आहे. या लेखनातून मला खूप मित्र मिळाले. मला मात्र हा लाभ झाला, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com