वस्तू-निर्मितीची प्रक्रिया (श्रीरंग गोखले)

श्रीरंग गोखले skg2743@gmail.com
रविवार, 5 मार्च 2017

टूलिंगपूर्वीचा डिझाइनचा कालखंड महत्त्वाचा असतो. जोपर्यंत टूलिंगच्या खर्चाची वेळ येत नाही, तोपर्यंत उत्पादनाचा खर्च मर्यादित राहतो. या काळात लोकांनी सुचवलेल्या गोष्टी अमलात आणणं सुलभ आणि स्वस्ततेचं असतं. मात्र, एकदा का संचाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झालं की बदल अत्यंत त्रासदायक ठरतात. वस्तूच्या किमतीवर डिझाइनचा प्रभाव जास्त असतो. काय जी किंमत कमी करायची असते, ती डिझाइनच्या वेळीच करावी लागते.

टूलिंगपूर्वीचा डिझाइनचा कालखंड महत्त्वाचा असतो. जोपर्यंत टूलिंगच्या खर्चाची वेळ येत नाही, तोपर्यंत उत्पादनाचा खर्च मर्यादित राहतो. या काळात लोकांनी सुचवलेल्या गोष्टी अमलात आणणं सुलभ आणि स्वस्ततेचं असतं. मात्र, एकदा का संचाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झालं की बदल अत्यंत त्रासदायक ठरतात. वस्तूच्या किमतीवर डिझाइनचा प्रभाव जास्त असतो. काय जी किंमत कमी करायची असते, ती डिझाइनच्या वेळीच करावी लागते.

वस्तू निर्माण करण्याची कारणं व बाजारपेठेचे संबंध याविषयी गेल्या लेखात मी लिहिलं. वस्तूच्या प्रत्यक्ष निर्मितीची प्रक्रिया (Product Creation Process) कशी असते, ते या लेखात पाहू या. सर्जनशीलता म्हणजे फक्त कल्पना करण्याची शक्ती नव्हे, तर ती कृतीत उतरवण्याची मानसिकता होय आणि त्यासाठी शिस्त आणि पद्धत लागते. निर्मितीकडं पाहण्याची दृष्टी गेल्या काही दिवसांत बदलत आहे. शोध आणि संशोधन करून तिथंच थांबता येत नाही. ते एखाद्या वस्तूत किंवा व्यवसायात रूपांतरित व्हायला पाहिजे. वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा समूहानं (Team-work) काम करणं जास्त उपयुक्त असतं. सगळ्याच गोष्टी आपण करण्याबरोबरच काही गोष्टी बाहेरून करून घेणंही बऱ्याचदा उचित ठरतं. प्रचलित गोष्टींचा वापर, टप्प्याटप्प्यानं आपली वस्तू प्रस्थापित करणं याला महत्त्व असतं. शास्त्रज्ञ शोध लावतो, तंत्रज्ञ तो शोध मानवोपयोगी ज्ञानात रूपांतरित करतो, तर कल्पक कारखानदार त्यापासून वस्तू बनवतो. ग्राहकाची गरज भागवणं हा वस्तूचा हेतू हवा, तंत्रज्ञांना निर्मितीचा आनंद देणं हा नव्हे!

आमची वस्तू-निर्मितीची प्रक्रिया ही अत्यंत प्रगल्भ, पूर्णपणे निर्दोषीकरण केलेली व आदर्श अशी होती. बहुतांश ग्राहकोपयोगी वस्तू, विजेची उपकरणं, वैद्यकीय उपकरणं, कॉम्पोनंट हे सगळं याच प्रक्रियेवर आधारलेलं होतं. तांत्रिक संशोधनातून या प्रक्रियेची सुरवात होते. नवा शोध एकदम नवीन उत्पादनासाठी न वापरता तो वेगळेपणानं प्रस्थापित केला जाई. एकदा नवीन आयसी आला, स्पीकरमध्ये नवा शोध लागला, एखादी नवी सामग्री आली, की ही अशी विकसनपूर्व प्रक्रिया वेगळेपणानं केली जाई. उपयोजित संशोधन हे जसं तांत्रिक असे, तसं ते बाजारपेठेचं व ग्राहकाचंही असे. यात बाजारपेठेचा कल, प्रतिस्पर्ध्याच्या वस्तूंचा अभ्यास, ग्राहकाचा अभ्यास, आपल्याच वस्तूंवर ग्राहकाच्या आलेल्या प्रतिक्रिया यांचा अभ्यास असे.

या अभ्यासानंतर ग्राहकाचा प्रतिनिधी हा संकल्पनेचा मसुदा (Concept-brief) तयार करी. आमच्या कारखान्याचा ग्राहक म्हणजे आमचा मार्केटिंग विभाग असे. एखादा अगदी छोटा व्यावसायिक त्याच्या वस्तूसाठी हा मसुदा ग्राहक, दुकानदार व वितरक यांच्या मुलाखतींद्वारे तयार करू शकेल. मी शिकलेल्या प्रक्रियांपैकी सगळ्यात अवघड आणि सगळ्याच महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे हा मसुदा होय. चांगला अभ्यासपूर्ण मसुदा हा चांगल्या वस्तूची हमी देतो, हे मी अनुभवलं आहे. आपल्याला नवीन वस्तू कशी हवी आहे, ते स्पष्ट शब्दांत मांडले जाई. यात अपेक्षित गुणधर्म, वैशिष्ट्यं, आवश्‍यक ती परिमाणं, ढोबळ रूपरेषा असतील, तर संदर्भाच्या उत्पादनाची माहिती, किमतीचा अंदाज व अपेक्षित संख्या हे सगळं येई. एक प्रकारचा अर्ज भरल्यासारखंच ते असे. माहिती लिखित स्वरूपात असल्यानं अभ्यास होई व बांधिलकी असे. इथं भावनांना वाव नसे. काही वेळा बाह्य परिस्थिती व अस्थिरतेमुळं ग्राहकाच्या गरजा लक्षात येत नसत; पण याची चर्चा झाल्यामुळं प्रथमपासूनच काही बदलांची तरतूद करता येई. डिझायनर हा कागदावर किंवा मनःचक्षूपुढं नवं उत्पादन कसं असेल, याचं चित्र उभं करू शकतो; पण ग्राहक किंवा विक्रेती मंडळी यांना ही सवय नसते. संगणकामुळं आभासी प्रतिमा दिसू शकते; पण उत्पादनाचे सगळे पैलू कल्पनेतच आणावे लागतात. वस्तू तयार व्हायची वेळ झाली, की लोक जागे होतात व ‘अरे, हे असं आहे वाटतं’, अशा प्रतिक्रिया द्यायला लागतात. सॉफ्टवेअर तयार करणाऱ्यांना तर हा अनुभव येतच असेल. ज्या वस्तूंच्या निर्मितीसाठी मोल्ड किंवा डाय वापरावे लागतात, तिथं हा मुद्दा महत्त्वाचा असतो. कारण, नंतर बदल करणं अवघड किंवा काही वेळा अशक्‍य असतं.

हा मसुदा आल्यावर डिझायनर वस्तूचा ढोबळ आराखडा तयार करे. वापरल्या जाणाऱ्या मुख्य भागांची - उदाहरणार्थ - प्रिंटेड बोर्ड, स्पीकर, बॅटरी, टेपडेक वगैरे- मांडणी करून हा आराखडा तयार होई व पुढं इंडस्ट्रीअल डिझायनरला तो दिला जाई. इंडस्ट्रीअल डिझायनर हा आर्टिस्ट इंजिनिअर असतो. तो वस्तूचं बाह्यरूप तयार करतो. आमचं उत्पादन हे करमणूकप्रधान ग्राहकाचं असल्यानं वस्तूच्या कामगिरीबरोबरच त्या उत्पादनाचं देखणेपणही महत्त्वाचं असे. इंडस्ट्रीअल डिझायनर त्याचं कौशल्य व प्रचलित फॅशन, जीवनशैलीतले बदल, इतर तत्सम उत्पादनं व त्यांचा कल यांचा अभ्यास करून तीन किंवा चार प्रस्ताव तयार करी. ही कागदावर काढलेली रंगीत स्केचेस किंवा संगणकाधारित चित्रं असत. सर्वांनुमते यातलं एक निश्‍चित केलं जाई. आतला जुना मसाला तोच असला तरी, वस्तूला एकदम नवं रूप देण्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं असतं. या टप्प्यावर तांत्रिक डिझाइन सुरू होई. इथं उत्पादनाला एक दिशा मिळे म्हणून आम्ही त्याला ‘झीरो डेट’ म्हणत असू. या वेळी आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेऊन किमतीची फेरतपासणी केली जाई व पुढच्या वाटचालीसाठी डिझायनरबरोबर उत्पादन, पर्चेस, गुणवत्ता यांची या विभागांमधल्यांचा मिळून एक प्रकल्पविषयक चमू (Project-team) तयार केला जाई. दर १५ दिवसांनी ही चमू आढावा घेई. या टप्प्यानंतर तपशीलवार डिझाइन बने, सुट्या भागांची ड्राइंग बनवली जात. प्रिंटेड बोर्डची असेंब्ली सुरू होई. मेजरमेंट बनत. हे घडत असतानाच समांतरपणे आमच्या उत्पादन-विकास विभागाला जोडलेल्या मॉडेल शॉपमध्ये ड्रॉइंगबरहुकूम मॉडेल बने. हे ‘वर्किंग मॉडेल’ असल्यानं ते हाताळता येई, आवाज ऐकता येई व बाकी सगळ्या गोष्टी संकल्पनेच्या मसुद्याप्रमाणे झाल्या आहेत की नाहीत, हे तपासलं जाई. त्रुटी दूर होत. या वेळी सर्व निर्णयांवर एकमत होऊन ‘टूलिंग’चा निर्णय होई. इथपर्यंत प्रकल्पाचा खर्च मर्यादित असल्यानं, यापुढच्या टूल व डायच्या मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीचा निर्णय होई. ‘कन्सॉलिडेशन’ असं याचं नाव असे. ड्रॉइंग, बिल ऑफ मटेरिअल (म्हणजे सगळ्या भागांची यादी) व मेजरमेंट रिपोर्ट उपलब्ध केले जात.

आमच्या उत्पादनात प्लॅस्टिकचा वापर जास्त असल्यानं कॅबिनेट व इतर टूलमधून निघालेले (First of tool) सुटे भाग आल्यावर त्यापासून आम्ही तातडीनं पाच-दहा संच बनवत असू. हातानं केलेलं मॉडेल व हे off-tool सुटे भाग यात खूप फरक पडे. माझ्या कारकिर्दीत शेवटी Rapid prototyping आलं; पण आता ३D printing आल्यानं ही मॉडेलमेकिंगची प्रक्रिया क्रांतिकारक झाली आहे. ही मॉडेल पॅकिंग टेस्टसाठी व गुणवत्तेच्या इतर परीक्षणासाठी उपयोगी पडत. उत्पादनपूर्व विभागातले कर्मचारी आणि प्रकल्पविषयकच चमू यातली मंडळी हे संच बनवत असत. त्यामुळं सगळ्यांच्या सहभागाचा फायदा होई.FOTs यामध्ये सुधारणा करून, मोल्ड दुरुस्त करून आणखी ५०-१०० संच बनत व हे संच शेवटी उत्पादन करणारे ऑपरेटर बनवत. हे संच वितरक, मार्केटिंगमधली मंडळी यांना दाखवून त्यांची नीट परीक्षा करून, त्यात सुधारणा करून मग सुटे भाग येत व मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची निर्मिती सुरू होई.

टूलिंगपूर्वीचा डिझाइनचा कालखंड महत्त्वाचा असतो. जोपर्यंत टूलिंगच्या खर्चाची वेळ येत नाही, तोपर्यंत उत्पादनाचा खर्च मर्यादित राहतो. या काळात लोकांनी सुचवलेल्या गोष्टी अमलात आणणं सुलभ आणि स्वस्ततेचं असतं. मात्र, एकदा का संचाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झालं की बदल अत्यंत त्रासदायक ठरतात. वस्तूच्या किमतीवर डिझाइनचा प्रभाव जास्त असतो. जी काय किंमत कमी करायची असते, ती डिझाइनच्या वेळीच करावी लागते.

डिझाइन, पर्चेस व उत्पादन यांचा प्रभाव() व योगदान()या प्रमाणे असते.
डिझाइन     पर्चेस     प्रॉडक्‍शन
कुठल्याही पद्धतशीर प्रक्रियेचा फायदा असा असतो, की तुम्ही इतरांच्या प्रतिक्रिया खूप आधीपासून घेऊ शकता. असेंब्लीला पूरक डिझाइन करणं, वेळ वाचवणं, FMEA (संभाव्य दोष दूर करणं) अशी सर्व तंत्रं टूलिंगच्या आधीच वापरता येतात व वेळच्या वेळी सुधारणा करून किंमत, गुणवत्ता सुधारता येऊ शकते. प्रोटोटाइप किंवा मॉडेल करणं अतिमहत्त्वाचं असते. अगदी संगणकावर ३D चित्र आलं, तरीही मॉडेल हाताळून आणि वापरून अनेक त्रुटी कळतात व सगळ्या प्रकारच्या लोकांची मदत घेता येते. वास्तुविशारद घराचं मॉडेल तयार करतातच; पण हल्ली ‘सॅम्पल फ्लॅट’ची प्रथा आली आहे. मॉडेल करणं, ते दाखवून प्रतिक्रिया घेणं वगैरे टप्पे गाळल्यामुळं एका जपानी कंपनीला भारतात पाठवलेल्या सर्व गणेशमूर्ती माघारी घ्याव्या लागल्या होत्या. कारण, त्या सगळ्या गणेशमूर्ती उजव्या सोंडेच्या होत्या. आम्हीसुद्धा मॉडेल पाहिल्यावर एवढी खात्री न वाटल्यानं काही उत्पादनं मागं घेतली होती. संकल्पना-मसुद्यापासून उत्पादन बाजारात नेण्यापर्यंतचा काळ आम्ही घटवत आणला तो या प्रणालीच्या व्यवस्थित मांडणीमुळं. समांतर काम, टूलिंगचा वेळ कमी करणं, एखादी ॲक्‍टिव्हिटी लवकरात लवकर करणं यांद्वारे आम्ही १९९० च्या दशकात सुरवातीला असलेला ४८ आठवड्यांचा कालावधी पुढं आम्ही ३६ आठवड्यांवर आणला. ही प्रक्रिया इतर उत्पादनांसदर्भातही कमी-अधिक प्रमाणात लागू होऊ शकते. कपडे, औषधं आदी टूलिंग नसलेलीही काही उत्पादनं असतात. अगदी कमी टूलिंग असतं ज्वेलरीमध्ये, म्हणून त्यांच्या निर्मितीप्रक्रियेची मांडणी वेगळी होईल. मात्र, सिनेमा हे ‘उत्पादन’ घेतलं तर त्याची ‘गोष्ट’ म्हणजे संकल्पना-मसुदा होय. पटकथा हे ‘डिझाइन’, तर शूटिंग हे ‘टूलिंग’ असेल. ग्राहकाला काय भावेल, याचा विचार करून उत्पादन विकसित करण्याच्या प्रक्रियेला सुरवात होते व त्यातल्या समस्या नंतर सुटतात. स्वप्न सत्यात उतरवणारी ही प्रणाली म्हणून महत्त्वाची आहे.

Web Title: shrirang gokhale's article in saptarang