दोष कसे निवारावेत? (श्रीरंग गोखले)

दोष कसे निवारावेत? (श्रीरंग गोखले)

कल्पकता वापरून व बाजारपेठेचा विचार करून वस्तूची निर्मिती केली, तरी ती दोषमुक्त असणं गरजेचं असते. त्याचबरोबर अचूक निर्णय घेणेही महत्त्वाचं असतं. त्यासाठी कोणती कोणती साधनं, कोणते कोणते मार्ग वापरले जाऊ शकतात, ते पाहूया...

१) निर्णय घेण्याची प्रक्रिया ः
विचारमंथनातून (ब्रेन स्टॉर्मिंग) आलेल्या किंवा वैयक्तिक अभ्यासातून निष्पन्न झालेल्या पर्यायांमधून योग्य निवड करणं हे एक शास्त्र आहे. पूर्वानुभव किंवा उत्स्फूर्तता यातून बहुधा निवड केली जाते; पण यात तर्क किंवा कसोटी असतेच असं नाही. या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी मला अनुभवाला आलेलं एक उदाहरण घेतो. आम्हाला छोट्या छोट्या स्प्रिंगा लागत. चालू पुरवठादाराची गुणवत्ता खालावत चालली होती व तो किमतीवरही अडून बसला होता. कंपनीच्या दृष्टीनं तो दोन कारणांसाठी आम्हाला फायदेशीर होता. एक म्हणजे अंतराच्या दृष्टीनं तो जवळ होता आणि माल तो कंपनीत आणून पोचवत असे. आम्ही आणखी दोन जण शोधले होते. दुसरा नवीन व किफायतशीर किंमत देत होता; पण गुणवत्तेसंदर्भात त्याच्याकडं काही पुरावा नव्हता. तिसरा खूप पूर्वी आमचा सप्लायर होता. नंतर त्यानं कामात खूप सुधारणा घडवून आणून गुणवत्तेचं प्रमाणपत्र मिळवलं होतं. या पुरवठादारानं सांगितेलली किंमतही आकर्षक नव्हती आणि तो अंतरानं खूप लांब असल्यानं डिलिव्हरीचीही समस्या येऊ शकत होती. या पुरवठादारांचे निकष आधी ठरवले. किंमत, गुणवत्ता, डिलिव्हरी व संपर्क. वर्गवारी करून त्यातले महत्त्वाचे, साधारण व कमी महत्त्वाचे ठरवून ९, ५ व २ असे गुण त्यांना दिले. (९, ५, २ हा संख्याशास्त्रीय संशोधनाचा निष्कर्ष आहे). त्यानंतर प्रत्येक निकष घेऊन त्याची या तीन लोकांशी तुलना करावयाची आहे. १ ते ५ या पातळीत, ५ सर्वोत्तम. (मघाचे ९, ५, २ हे वेगळे होते). सोईसाठी या पुरवठादारांना अनुक्रमे ‘अ’, ‘ब’ व ‘क’ अशी नावं देऊ या. आता गुणवत्ता घेऊ. ‘क’ सर्वोत्तम आहे. ‘क’ याला ५ गुण, ‘ब’ याला ३ गुण व ‘अ’ ला २. किंमत ‘ब’ ची उत्तम आहे. ‘अ’ जवळ असल्यानं डिलिव्हरीत उजवा ठरेल. आता हे सगळं एका कोष्टकात मांडल्यावर स्पष्ट होईल. निकषांचे ‘महत्त्व’ दाखविणारे गुण मध्यभागी आहेत. तुलनात्मक गुण व ‘महत्त्व’ यांचा गुणाकार घ्यायचा आहे.

गुणानुक्रमे तिसरा पुरवठादार सर्वोत्कृष्ट ठरला व अनेक वर्षं तो आमच्याबरोबर राहिला.
आपल्या स्पर्धकांच्या वस्तू (वैशिष्ट्यं, कार्य, आकर्षकता, किंमत), वैयक्तिक पातळीवर फ्रिजची खरेदी (वीजवापर, आतील स्टोअरेजची जागा, रंग-रूप, किंमत), आपल्याला आलेल्या तीन जॉब ऑफरपैकी एक निवडणं (प्रगतीची संधी, पगार, वेळ इत्यादी) अशासारख्या अनेक उदाहरणांमध्ये ही प्रणाली वापरता येते.
आपल्या दृष्टीने ‘महत्त्वाचं’ काय, हे याचा वापर-विश्‍लेषण करताना उपयोगी. त्यामुळं व्यक्तीनुरूप कोष्टक बदलेल.
सुरवातीला गुंतागुंतीचं वाटलं तरी निर्णय घेताना आपली मानसिकता काय होती, याचा तपशील नोंदल्यानं पुढं उपयोगी. विचाराची सक्ती झाल्यानं खरोखरच ‘विचारपूर्वक’ निर्णय.

२) इशिकावा व पॅरेटो ः
Data (डेटा) याला चपखल मराठी शब्द नाही. मी ‘तपशील’ असा शब्द वापरला आहे. विचारमंथनातून समस्येवर खूप उपाय सुचवले जातात. काही वेळा यामुळं आपण गोंधळून जातो. एक विदेशी व्यवस्थापक मला नेहमी बजावायचा ः ‘तपशिलाची नोंद व व्यवस्थापन नीट करा. तपशीलच आपल्याशी बोलू लागतो, ते ऐका.’ तपशिलाचं वर्गीकरण केलं, की आपण उत्तराच्या जवळ पोचतोच. इशिकावा नावाच्या जपानी विचारवंतानं ही पद्धत शोधली. यालाच ‘माशाच्या सांगाड्यासारखं आलेखन’ (fishbone diagram) असंही म्हणतात. कारणं शिस्तीत लिहून त्यांचं रेखाटन केल्यास आपल्या समस्येचं दृश्‍यरूप तयार होतं. यात वर्गीकरण महत्त्वाचं. वस्तुनिर्मितीच्या प्रक्रियेत बऱ्याच कारणांचं ‘मानवी’, ‘मटेरियल’, ‘मशिन’ व ‘मेथड’ (पद्धत) या चार प्रकारांत वर्गीकरण होई. आमच्या नवीन सेटचं उदाहरण पाहूया. याचं उत्पादन सुरू झाल्यावर सुरवातीला फक्त ७५ टक्के सेट अचूक बनत. कारणांचं वर्गीकरण व रेखाटन असं केलं होतं.

तपशिलाचं वर्गीकरण तर झालं; पण भेडसावणारी समस्या जेवढी लवकर सुटेल, तेवढे आपण कार्यक्षम होत असतो. त्यासाठी इटालियन शास्त्रज्ञ विल्फ्रेड पॅरेटो यांनी विकसित केलेली पद्धत वापरली जाते. त्यांचं तत्त्वज्ञान असं ः ‘८० टक्के परिणाम हे २० टक्के कारणांनी मिळतात.’ म्हणजेच, ‘महत्त्वाचं थोडं व क्षुल्लक अनेक.’ वरील उदाहरणात २५ टक्के प्रमाण कमी करण्यासाठी दिसेल त्या समस्येवर काम करणं सुरू केलं; पण परिणाम दिसेना. एका अनुभवी सुपरवायझरनं या प्रत्येक कारणाची टक्केवारी शोधली. त्यात शॉर्टिंग आणि चुकीची कॉम्पोनंट यांचं प्रमाण सगळ्यात जास्त होतं. त्याचे मूळ कारण शोधून उपाय केल्यावर दोनच दिवसांत प्रमाण पाच टक्‍क्‍यांनी खाली आलं.

समस्या पूर्णपणे दूर होणं हे मूळ कारण सापडल्याचं लक्षण आहे; प्रमाण कमी होणं नव्हे. पूर्वानुभव, प्रयोग, निरीक्षण किंवा तंत्र वापरून मूळ कारण शोधता येतं; पण काही वेळा याला वेळ लागतो. या वेळी तात्पुरता उपाय करावा लागतो. डोकं दुखत आहे म्हणून वेदनाशामक गोळी घेणं म्हणजे मूळ सापडणं नव्हे, तो तात्पुरता उपाय झाला. हे तंत्र फक्त उत्पादनक्षेत्रातच वापरायचं असतं, हा गैरसमज आहे.
वाचकांपैकी काहीजण व्यावसायिक व उत्पादन क्षेत्रातले अनुभवी असतील, तर त्यांना वाटेल की आपण या प्राथमिक तंत्रांची चर्चा का करतो आहोत? पण असं वाटणं तितकंसं योग्य नाही. रोजच्या जीवनात याच मार्गाच्या अनुसरणानं आपली कार्यक्षमता वाढत असते. आपण खूप कष्ट करत आहोत; पण हाती काहीच लागत नाही, ही बोच दूर होते. माझ्या एका मित्रानं पॅराटोचा वापर नुकताच करून त्याचं वीजबिल ३० टक्‍क्‍यांनी खाली आणलं आहे. वजन आटोक्‍यात ठेवणं, परीक्षेत गुण कमी पडणं, आपल्या सेवेची गुणवत्ता, वेळेचं व्यवस्थापन अशा वैयक्तिक कारणांवर या प्रणाली वापरून स्वतःत सुधारणा घडवून आणणारे लोक माझ्या पाहण्यात आहेत.

३) संभाव्य दोषांचं निराकरण ः
आपण निर्माण करत असलेली नववस्तू किंवा प्रकल्प यांतला संभाव्य बिघाड किंवा उणीव यांचा पूर्वलक्ष्यी पद्धतीनं वेध घेणं हे FMEA (Failure mode and effect analysis) या तंत्राचं वैशिष्ट्य आहे. हे बिघाड डिझाइनमुळं किंवा तयार करण्याच्या प्रक्रियेमुळं येऊ शकतात. निर्मिती सुरू असतानाच, तंत्रज्ञानाचा एक गट वस्तूत किंवा प्रक्रियेत काय संभाव्य दोष उत्पन्न होऊ शकतात, यावर विचारमंथन करून एक यादी तयार करत असे. हे बिघाड होण्याची शक्‍यता किती (P), तो ग्राहकासाठी किंवा पर्यावरणासाठी कितपत धोकादायक आहे (S) आणि तो होण्यापासून रोखण्यासाठी काही तपासणी होते का (D) हे तिन्ही मुद्दे प्रत्येकी १ ते १० या गुणपातळीवर मोजले जात. तिन्ही अंकांचा गुणाकार होऊन यादीतल्या प्रत्येक गोष्टीला एक अंक मिळे. त्यामुळं या सगळ्यासंदर्भातल्या पुढच्या कार्यवाहीचा एक अग्रक्रम ठरवता येई. याच्या सतत वापरानं व प्रचलित घटकच (Standard Parts) वापरण्याच्या आमच्या धोरणामुळं निर्दोषतेची खात्री वाढत गेली. पूर्वीच्या वस्तूत राहून गेलेल्या दोषांची यादी व त्यांच्या निराकरणाचे उपाय हे नवीन वस्तू निर्माण करताना लक्षात घेतले जात. यातून वस्तूच्या वापरातून ग्राहकाला घातक ठरेल, असा एकही अपघात माझ्या कारकिर्दीत झाला नाही. वाहनउद्योगात ही प्रणाली प्रकर्षानं वापरली जाते. मागीलप्रमाणे फक्त उत्पादकांनीच वापरण्याचं हे तंत्र नाही, तर आपण एखाद्या मोठ्या प्रवासाला जात आहोत, मोठा समारंभ किंवा इव्हेंट आयोजित करायचा आहे, बांधकामासारखा प्रकल्प आपल्यापुढं आहे... अशा वेळी आधीच विचार केल्यानं धोके टाळता येतातच व पर्यायी विचारही करून ठेवता येतो. प्रथमच याचा वापर करताना ‘प्रत्येक घटकच बिघडू शकतो’ असा निराशावादी सूर येण्याची शक्‍यता असते; पण पूर्वानुभव, सल्ला-मसलत, तर्क यातून व्यवहार्य मार्ग काढावा लागतो.

४) सर्वेक्षण ः
सर्वेक्षण (Market Research) हे खूप खर्चिक, वेळखाऊ व तज्ज्ञांचं काम आहे, असा आपला समज असतो; पण अगदी प्राथमिक अवस्थेत वापरण्यासाठी आमच्याकडं एक छोटेखानी तंत्र आलं होतं.

यातल्या प्रत्येक स्तंभातला एकेक शब्द घेऊन ३०-३५ वाक्‍यरूपी प्रश्‍न तयार होतात. उदाहरणार्थ ः आपल्या वस्तू कुणाकडून विकल्या जातात? प्रतिस्पर्ध्याच्या वस्तू केव्हा विकत घेतल्या जातात? या सगळ्याची अभ्यासपूर्वक उत्तरं शोधून ती एकत्र केल्यावर एक छानसा अहवाल तयार होतो. वर्षअखेरीला चेन्नईमध्ये एक सेलचा धमाका असतो. त्याची कल्पना आम्हाला या प्रणालीतूनच आली होती व त्यात भाग घेऊन आम्ही विक्री वाढवली होती.

५) मेट्रिक्‍स ः
दोन परस्परविरुद्ध किंवा एकमेकांवर प्रभाव पाडणाऱ्या विचारांमधून मार्ग काढताना मेट्रिक्‍स पद्धतीची मांडणी स्पष्टतेच्या दृष्टीनं उपयोगी पडते. उदाहरण पाहूया. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांची प्रेरणा आणि कौशल्य या गुणांवर विभागणी करता येते.

उभ्या अक्षावर प्रेरणा घेतली तर स्वप्रेरित आणि निष्क्रिय किंवा निराश अशा दोन वृत्ती आढळतात. आडव्या अक्षावर कुशल व अकुशल.

१) या चौकोनात प्रेरित, सकारात्मक विचारसरणीचे; पण अकुशल लोक येतात. त्यांना प्रशिक्षण देऊन, कौशल्य वाढवून, त्यांचा उपयोग होतो.
२) या चौकोनात कुशल आणि स्वप्रेरित लोक येतात. ही आपली संपत्ती असते. त्यांना आव्हानात्मक कामे देऊन सजग ठेवावं लागतं.
३) यात निष्क्रिय, निराशावादी व अकुशल लोक येतात. हे निरुपयोगीच असतात.
४) यात निराशावादी; पण कुशल लोक येतात. त्यांचं समुपदेशन करून, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना प्रेरित करावं लागतं. लोकांना प्रशिक्षण देताना, वार्षिक मूल्यमापनाच्या वेळी, प्रमोशन देताना किंवा पुनर्रचना करताना या तंत्राचा वापर आम्ही करत असू. अशीच मेट्रिक्‍स वेळेचं व्यवस्थापन करताना कामांची ‘तातडीची’ व ‘महत्त्वाची‘ अशी विभागणी करताना उपयोगी पडते. SWOT प्रणालीत अशीच मेट्रिक्‍स वापरलेली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com