या मानसिक कोंडीचे काय? 

Psychological Stress
Psychological Stress

''मॅडम, मला त्या माणसाबरोबर त्याच्या घरात एक मिनिटसुद्धा राहायचे नाही; पण माझ्या आई- वडिलांचीच मला सपोर्ट करायची इच्छा नाही. मी माहेरी आल्यापासून तेच माझ्याशी इतकं विचित्र वागताहेत, की मलाच कळेनासं झालंय की आता पुढे करू तरी काय? माझ्या मैत्रिणींनी मला तुमचा सल्ला घेण्याविषयी सुचवले म्हणून मी आले आहे. तुम्ही मला गाइड कराल का?'' 

माझ्यासमोर दीपा बसली होती आणि ती अतिशय उद्विग्नतेने बोलत होती. चोवीस-पंचवीस वर्षांची दीपा बी. कॉम. झाल्यानंतर एका डॉक्‍टरांकडे रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करत होती. तिचे वडील रिक्षा ड्रायव्हर, आई दोन-तीन घरांमध्ये स्वयंपाकाचे काम करायची. दीपाला धाकटी दोन भावंडे. बहीण आता बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षाला आहे आणि भाऊ अकरावी कॉमर्सला. दीपाचे चार-पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले. तिच्या मावशीच्या नात्यातले स्थळ. मुलाचे वडील लहानपणीच वारले. आई त्यांच्या जागी जिल्हा परिषदेत नोकरीला लागली. मुलगा इंजिनिअर होऊन एका कंपनीत काम करणारा. स्वतःचा चार खोल्यांचा फ्लॅट. घरात फक्त सासू आणि नवरा. दीपाच्या आई-वडिलांच्या आर्थिक स्थितीच्या मानाने चांगली परिस्थिती. कसलीही जबाबदारी नाही. सासूची अजूनही चार- पाच वर्षे नोकरी. दीपालाही मुलगा पसंत पडला आणि लग्न झाले. आणि आता चार- पाच महिन्यांतच दीपा 'परत सासरी जायचे नाही', असे म्हणत माहेरी परत आलेली. त्यामुळे तिचे आई- वडील कोलमडून गेलेले.

दीपाला मी विचारले, ''हे बघ बाळ, नक्की काय घडलंय हे तू मला जरा डिटेल सांगतेस का?'' 

''मॅडम, असा प्रश्‍न विचारणाऱ्या तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात. कोणीच मला काय वाटते? काय नक्की घडले आहे? हे मला विचारत सुद्धा नाहीत. माझे काहीही ऐकून न घेता मला मूर्ख ठरवून रिकामे होतात. आई तर म्हणते, 'दैव देतं आणि कर्म नेतं' अशी तुझी गत आहे. आपल्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायला निघाली आहे. ''तिच्या दृष्टीने फारसा खर्च न करता माझे लग्न झाले म्हणजे ती तिच्या एका जबाबदारीतून रिकामी झाली. आता परत मी घरी येणे म्हणजे तिच्यासाठी नसती आफत आहे. एक अक्षता काय पडल्या, मी तिच्यासाठी पूर्ण परकी झाले.'' एवढे बोलून दीपा हमसून हमसून रडायला लागली. थोडी शांत झाल्यावर दीपाने सांगायला सुरवात केली. 

''मॅडम, माझ्या माहेरची परिस्थिती बेताची आहे म्हणून मी बारावी झाल्यापासून काही ना काही काम करत होते. बी.कॉम. झाल्यावर नोकरी करत होते. तेव्हाच आईला मी सांगितलं होतं, की मी चा पाच वर्षे नोकरी करते. धाकट्या रूपाचे शिक्षण पूर्ण होऊन ती नोकरीला लागली, की मग माझ्या लग्नाचे बघ. पण मग मावशीने हे स्थळ काढलं. त्यांनी मला पसंत केलं. फारशी काही मागणी केली नाही म्हणून मग मीही लग्नाला तयार झाले. अक्षरशः ठरल्यावर महिन्याभरात माझं लग्न झालं. त्यामुळे त्यांची मला पुरेशी ओळखच नव्हती. आई- बाबांनी फक्त आर्थिक काही प्रॉब्लेम नाही, एवढीच गोष्ट बघितली. 

लग्न झाल्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून माझी तिथे मानसिक कोंडी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी पूजेला मी माझ्या आईने दिलेली साडी नेसले तर ती बदलून सासूने मला दुसरी साडी नेसायला लावली. त्याचा मॅचिंग ब्लाउज सुद्धा नव्हता. पण मी गप्प बसले. नंतर दोघांनी कुठेतरी फिरायला जावं असं मला फार वाटत होतं; पण माझ्या सासूने सगळे देव देव करायचे ठरवले होते. त्यात आठ दिवस गेले. तोवर नवऱ्याची रजा संपली. त्यानंतर आजवर आम्ही दोघे कुठेही गेलेलो नाही. माझ्या आईच्या मते, 'ही काय तक्रार करायची बाब आहे का? आम्ही गेल्या पंचवीस वर्षांत कुठेही गेलेलो नाही.' पण माझ्या मैत्रिणींचे हे सुख बघितले, की मला वाईट वाटते. माझ्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती नसती तर मी गप्प बसले असते; पण तसेही काही नाही आहे. दुसरी गोष्ट तो सगळाच्या सगळा पगार त्याच्या आईच्या हातात देतो. मला खर्चाला पैसे देत नाही. लागेल तसे आईकडून घे म्हणतो. स्वतःसुद्धा स्वतःचेच पैसे आईकडून मागून घेतो. मला नाही आवडत हे! मी लग्नापूर्वी नोकरी करत होते; पण कधीही सगळा पगार आईला दिला नाही. आईच म्हणायची, ''तुझ्या खर्चासाठी तुझ्याजवळ थोडे ठेव आणि उरलेले मला दे.'' हे मी नवऱ्याला सांगितले तर त्याचे म्हणणे, ''माझ्या घरातली शिस्त तुला पाळायला हवी. तुला आई कशालाही नाही म्हणणार नाही.''

माझ्या सासूबाईंचं जरा अतिच असतं. त्या लग्नानंतर पंधरा दिवसांनी माझ्यासाठी एकदम पाच-सहा ड्रेस घेऊन आल्या. सगळे भगभगीत रंगाचे, सिंथेटिक, जरीचे. मला असले ड्रेस नाही आवडत. मी साधे कॉटनचे ड्रेस घालते. त्यांच्या मते ''मी माहेरून आणलेले सगळे ड्रेस भिकारड्यासारखे दिसतात.'' मला खूप राग आला. नवरा म्हणतो, ''आईच्या मनाप्रमाणे वागायला तुला काय अडचण आहे?'' प्रत्येक गोष्ट तोही त्याच्या आईच्या मनाप्रमाणे करतो. आणि मी करायलाच हवी. त्याबद्दलची माझी काही तक्रार नाही; पण त्या बाईच्या मनाला कोणतीच गोष्ट बरी वाटत नाही. पावभाजी केली तर म्हणे, 'हे असलं भाज्यांचं पिठलं खाणं बरं नाही.' माझ्या नवऱ्यानं चापून खाल्ली तर त्याला ओरडल्या, 'इतके दिवस मी सात्विक अन्न खायला घालते आहे. तुझी बायको तुझ्या आरोग्याची वाट लावणार.'

माझ्या आईने त्यांना नेसवलेली साडी त्यांनी मोलकरणीला दिली. माझ्या त्या पदोपदी अपमान करतात. माझ्या माहेरच्यांना नावे ठेवतात. माझ्या घरच्यांनी दिलेले एकही भांडे सुद्धा त्यांनी मला काढू दिलेले नाही. मला असला डॉमिनन्स सहन होत नाही. नवऱ्याला आणि मला एकांत फक्त रात्री मिळतो. तेव्हा त्याच्या मागे कटकट करणे मला पटत नाही. 

दर रविवारी सुद्धा सासूबाईंबरोबर कोणा ना कोणा नातेवाइकाकडे जावे लागते. त्यामुळे लग्नानंतर नवऱ्याबरोबर मी एकटी कुठेही फिरायला गेलेली नाही आणि याविषयी माझ्या नवऱ्यालाच काही वाटत नाही. मग मी करू तरी काय? हा एवढा 'मम्माज बॉय' असेल तर त्याचा तो त्याच्या आईबरोबर सुखात राहू दे. मी त्याच्या आयुष्यातून दूर जाते. त्याच्या घरात माझी अक्षरशः घुसमट होते. मला पुन्हा नाही तिथे जायचे. दीपा पुन्हा रडायला लागली.

लग्न या संस्कारानंतर दोन वेगवेगळ्या घरांत लहानाचे मोठे झालेले स्त्री आणि पुरुष एकत्र सहजीवन सुरू करतात. परंपरेप्रमाणे मुलीने मुलग्याच्या घरी राहायला जाणे अपेक्षित असते. मुलीला त्या घरातील वातावरण, माणसे, रीतीरिवाज या सर्व गोष्टींशी जुळवून घेताना अनेक बाबतीत स्वतःमध्ये बदल करावे लागतात आणि त्या मुलीला स्वीकारताना घरातील व्यक्तींनासुद्धा काही गोष्टी विनाशर्त स्वीकाराव्या लागतात. काही स्वतःची मते बोथट ठेवावी लागतात. यामध्ये थोडा जरी कठोरपणा, कोरडेपणा मुलीकडून किंवा सासर घराकडून असेल तर समस्या निर्माण होतात. अशा वेळी मुलीला माहेरचा आधार वाटतो. तिथे मुलीला मन मोकळे करता येते. तिथून चुकीचा सल्ला मिळाला तरी किंवा झिडकारले गेले तरी मुलीची समस्या चिघळत जाते. 

दीपाच्या बाबतीत विचार केला तर तिच्या सासूचा स्वभाव थोडा डॉमिनेटिंग असला तरी त्यांनी नवऱ्याच्या माघारी एकटीने नोकरी करत मुलाला सांभाळले आहे. त्यामुळे त्या आणि त्यांचा मुलगा यांचे नातेसंबंध खूप घट्ट आहेत. दीपाने त्यांच्याशी गोड बोलून, त्यांना मोठेपणा देऊन त्यांची मर्जी संपादन केली तर त्या दीपाचे नक्कीच कोडकौतुक करतील. दीपाला याविषयी समुपदेशन केले. आपल्या वागण्यात- बोलण्यात केलेले छोटे छोटे बदलसुद्धा खूप परिणामकारक कसे ठरतात हे तिला उदाहरणांसहित समजवावे लागले. 

मुळात दीपा कष्टाळू आणि समजूतदार मुलगी असल्याने तिला ते लगेचच पटले. दीपाचा एकटेपणा दूर करण्याची जबाबदारी तिच्या नवऱ्याची आहे. त्याचा सुद्धा मानसिक कोंडमारा होतो आहेच. या दृष्टीने त्याचेही समुपदेशन केले. आईला न डावलता बायकोलाही आधार देणे हे त्याला जमेल; पण त्यासाठी त्यांच्या नात्याला थोडा वेळ द्यावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com