नवनिर्मितीची प्रयोगशाळा..!

नवनिर्मितीची प्रयोगशाळा..!

जगाचा ‘पासवर्ड’ ओळखूनच आता कलापूरची तरुणाई आपल्या करिअरचा विचार करते आहे. त्यामुळेच एखादी कलाकृती साकारली, की ती केवळ कोल्हापूरपुरतीच मर्यादित न ठेवता, ती अधिकाधिक ‘ग्लोबल’ कशी होईल, यासाठी ती जाणीवपूर्वक प्रयत्न करते आहे. दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी शुभम भिकाजी चेचर याच तरुणाईचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्या ‘इरॉटिक आॅरगॅनिझम्‌’ या अमूर्त छायाचित्रांच्या प्रदर्शनाला गुरुवारपासून नवी दिल्लीतील ललित कला अकादमीच्या गॅलरीत प्रारंभ झाला. त्याच्या या नवनिर्मितीच्या प्रयोगशाळेविषयी...

शुभम वडणगे (ता. करवीर) गावचा. कराटे आणि सायकलिंगचा छंद जोपासत त्याचे शिक्षण झाले आणि करिअरच्या मुख्य वळणावर त्याने घरच्यांच्या इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांच्या ऑप्शनला स्पष्टपणे नकार दिला. कारण त्याला नोकरी करायचीच नव्हती. केवळ घरच्यांच्या आग्रहाखातर अखेर ॲप्टिट्यूड टेस्ट दिली आणि त्यात त्याचा स्पष्टपणे कल दिसला तो ललित कलेचा. मुळात या क्षेत्रातील त्याचा इंटरेस्ट तयार झाला होता आणि आपल्या शिक्षणाचा आर्थिक बोजा घरच्यांना नको, ही त्यामागची प्रामाणिक भावना. अर्थातच दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन झाले आणि सध्या तो जीडी आर्टच्या चौथ्या वर्षात शिकतो आहे.

शिक्षण घेत असतानाच त्याने मित्रांसह युनाते क्रिएशन्स ही कलाविषयक सर्व सेवा देणारी संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून विविध संकल्पना पुढे आणल्या. गणेशोत्सव मंडळांनी केवळ मूर्ती आणायची. तीही ‘युनाते’ची टीम सांगेल त्या रूपातील आणि आकाराची. बाकी मंडपाच्या रचनेपासून ते देखाव्याच्या दर्शन रांगेपर्यंतचं सारं काही ही टीम ठरवते. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ही संकल्पना यशस्वी केली. या प्रवासातील आणखी एक अतिशय चांगली गोष्ट घडली ती म्हणजेच त्यांनी नुकतेच साकारलेले अभिजात भारतीय लघुचित्र शैलीतील लोकराजा शाहू छत्रपती प्रदर्शन. करवीर संस्थानचा इतिहास पहिल्यांदाच ‘युनाते’च्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय लघुचित्र शैलीतून पुढे आणला गेला.  

आपले पहिले सोलो प्रदर्शन दिल्लीतच झाले पाहिजे, हा शुभमचा संकल्प. मुळात कला शिक्षण घेत असतानाच वयाच्या तेवीसाव्या वर्षी असा संकल्प करणे आणि तो सिद्धीस नेणे, ही तशी अवघड गोष्ट; पण त्यातही तो यशस्वी झाला आहे. त्यातही अमूर्त छायाचित्रांचा त्याचा प्रयत्न अफलातून. ही छायाचित्रे साकारण्याची प्रक्रियाही खूप रंजक आहे. अशा पद्धतीची छायाचित्रे काढण्यासाठी मायक्रोलेन्स लागते आणि ती मोठी खर्चिक गोष्ट असते. शुभमने त्यावरही मार्ग काढला आणि एका कन्व्हर्टरच्या सहाय्याने कॅमेऱ्याला आणखी एक उलटी लेन्स लावली. तो छायाचित्रे घेऊ लागला. एकेक अमूर्त आकार कॅमेरात बंदिस्त होत गेला आणि तो प्रत्येक आकार एक मूल जन्माला येत असताना शरीरात कोणकोणत्या घडामोडी चालू असतात, या साऱ्या प्रक्रियेशी जुळू लागला. त्यांतील काही निवडक छायाचित्रे त्याने थेट ललित कला अकादमीकडे पाठवली आणि या वेगळ्या प्रयोगाला अकादमीनेही लगेचच पसंती दिली.

पहिल्याच प्रयत्नात नवी दिल्लीतील गॅलरी प्रदर्शनासाठी मिळवण्यात तो यशस्वी झाला; पण प्रदर्शनाच्या खर्चाचे काय? पहिले बजेट काढले गेले ते सत्तर हजारांवर. प्राचार्य अजय दळवी यांनी मग त्याला आणखी मायक्रोप्लॅनिंगचा सल्ला दिला आणि कमीत कमी पंचवीस हजार रुपये बजेटमध्येच प्रदर्शन करण्याचा विचार पक्का झाला. अनेक अडचणींवर मात करत तो दिल्लीत पोचला आणि प्रदर्शनाचा उद्‌घाटन सोहळाही पार पडला. आता बावीस नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन जगभरातील रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

एक सॅक आणि दोन पार्सल...!
नवी दिल्लीत जाऊन प्रदर्शन करणे ही खर्चिक गोष्ट; मात्र त्यावर मार्ग काढताना शुभमने एकट्यानेच दिल्लीला जाऊन प्रदर्शन करून पुन्हा एकट्यानेच रेल्वेने परत येणे, असा निर्णय झाला. दोन्ही हातांत प्रत्येकी नऊ छायाचित्रांचे पार्सल आणि पाठीवरील सॅकमध्ये कपडे व इतर साहित्य घेऊन तो नवी दिल्लीत पोचला. भारत सरकारचे सचिव (एमईए) ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता सोहळा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com