आई, तू का गेलीस ? (श्‍यामला ऐझॅक)

shyamla aaizak write article in saptarang
shyamla aaizak write article in saptarang

आता तू माझ्या लग्नात नसशील...पण आशीर्वाद द्यायला नक्कीच येऊन जाशील याची मला खात्री आहे! पण त्याआधी येणारा "मदर्स डे' मी तुझ्याशिवाय कसा साजरा करू? मी व दादा मिळून प्रत्येक मदर्स डे धूमधडाक्‍यात साजरा करायचो...तुझी उणीव भासणारा हा माझा पहिलाच मदर्स डे असेल... आई, त्या दिवशी तुझी खूप खूप आठवण येईल...

नायजेरियातून भारताकडं येणाऱ्या विमानात मी बसलो. बऱ्याच दिवसांनी घरी परतत होतो म्हणून मन आनंदून गेलं होतं. मातृभूमीकडं परतण्याची ओढ परदेशात असल्यावरच कळते हेच खरं. कितीही मोठ्या पगाराची नोकरी असली, परदेशातल्या सुख-सुविधा मोहवत असल्या तरी माणूस मायदेशी परतायला उत्सुक असतोच. तरी बरं, सहा-सात महिन्यांपूर्वीच मी भारतात येऊन गेलो होतो. त्या वेळी आईच्या अचानक जाण्याची बातमी पपांनी कळवली व चार दिवसांची सुटी घेऊन मी मिळेल त्या विमानातून मायदेशी आलो होतो. माझ्या आधी विश्‍वजितदादा आणि वहिनी पोचल्या होत्या. मी एकटाच एवढ्या लांब असल्यानं माझ्या येण्याच्या प्रतीक्षेत सर्व जण होते. मी पोचताक्षणी पपांना अश्रू अनावर होऊन ते माझ्या गळ्यात पडून रडू लागले होते.

"विश्वाची आणि तिची शेवटची भेट झाली; पण तूच लांब असल्यानं ती तुला भेटू शकली नाही; पण तुझ्या वाटेकडं ती डोळे लावून होती. तुला डोळे भरून पाहायचं होतं तिला. मला सतत खुणा करून तुझ्याविषयी विचारत होती. शेवटीसुद्धा तिनं अस्पष्ट आवाजात "अभिजित' असं म्हटलं नि डोळे मिटले,'' पपांनी मला हे सांगितलं आणि मग माझ्याही मनाचा बांध फुटला. माझे डोळे वाहू लागले.

आईला कुठल्या दुर्धर आजारानं घेरलं होतं हे घरच्यांना शेवटपर्यंत समजलंच नाही; पण छातीच्या दुखण्यासंदर्भात पपा नेहमीच तिला डॉक्‍टरांकडं घेऊन जात असत. आम्ही दोघं भाऊसुद्धा तिच्या प्रकृतीची वारंवार विचारपूस करून लक्ष ठेवून होतो. तिला प्रकृतीविषयी विचारलं, की उसनं हसू आणत ती आम्हालाच धीर द्यायची. म्हणायची ः ""काळजी करण्यासारखं काही नाही रे, बाळांनो ! माझ्या देवाला माझी काळजी आहे...'' आता आजही मला आईच्या आठवणींनी दाटून येऊ लागलं. तिच्या सहवासातले अनेक प्रसंग डोळ्यांपुढं तरळू लागले.
***
दिल्लीच्या पालम विमानतळावर विमान उतरलं. सगळे सोपस्कार उरकून मी टॅक्‍सीनं नोएडा इथल्या आमच्या घराकडं निघालो. नोएडाच्या त्या घरात आम्ही 40-50 वर्षांपासून राहत होतो. माझं आणि दादाचं बालपण तिथंच गेलं. आमचा चार खोल्यांचा प्रशस्त फ्लॅट होता. आई-पपांनी तो कलात्कमरीत्या सजवला होता. त्याची निगा छान राखली गेल्यानं तो 50 वर्षांपूर्वीचा जुना आहे, हे कुणाला सांगूनही खरं वाटत नसे. माझे पपा लष्करात अत्युच्च पदापर्यंत पोचले होते. साहजिकच आमच्या घरातसुद्धा कडक लष्करी शिस्त होती!

विमानतळावरून घरी पोचायला मला एक तास लागला. मी आमच्या बिल्डिंगसमोर उतरलो. पूर्ण बिल्डिंगकडं अभिमानानं एक दृष्टी टाकली आणि लिफ्टकडं वळलो आणि सातव्या मजल्यावरच्या आमच्या फ्लॅटसमोर उभा राहून दाराजवळची बेल वाजवली. पपांनी लगेचच दार उघडलं. मला हलकंसं आलिंगन देऊन जवळ घेतलं. तेवढ्यात मी पपांचं निरीक्षण करून घेतलं. सहा महिन्यांपूर्वी पाहिलेले पपा आणि आताचे पपा यांच्यात मला खूप फरक जाणवला. घरात आई नव्हती म्हणून पपांनी एक घरगुती खानावळ लावलेली होती; पण ते एकटेच असल्यानं व्यवस्थित जेवतही नसत. आधी त्यांचा ऑर्डर्ली त्यांच्याजवळ होता; पण पपांनीच त्याला त्याच्या गावी पाठवून दिलं होतं. आपल्या एकट्यासाठी एका माणसाला दिवसभर ठेवून घेणं म्हणजे त्याला दिलेली शिक्षाच, असा विचार करून त्यांनी असं केलं होतं. घरकाम करणारी बाईही प्रकृती बरी नसल्यानं गेले काही दिवस येत नव्हती.
आज मी येणार असल्यानं त्यांनी तिला बोलावून घेतलं होतं.

मी पटकन आंघोळ इत्यादी कामं उरकून फ्रेश झालो, तोपर्यंत पपांनी शेजारच्या बेकरीतून ब्रेड-बटर आणून ठेवलं. मी पटकन दोन कप कॉफी केली व आम्ही दोघांनी न्याहारी उरकली. नंतर किचनची साफसफाई करून मी माझ्या खोलीत आलो. खोलीचीही साफसफाई केली. प्रवासाच्या शिणवठ्यामुळं जरा आरामासाठी पलंगावर आडवा झालो. माझ्या पलंगावरून सहज दिसेल असा एक मोठा आईचा हसरा फोटो लावलेला होता. मला क्षणभर असं वाटलं, की ती त्या फोटोतून माझ्याकडं पाहत गोड हसत आहे. मला भरून आलं. डोळ्यात नकळत आसवं दाटून आली. आईच्या एकामागोमाग आठवणी येऊ लागल्या...येत राहिल्या...

पपा लष्करात होते. त्यांना चोवीस तास दक्ष राहावं लागत असे; त्यामुळं घरची सगळी जबाबदारी आईच्या खांद्यावर असायची. आम्हा दोघांना शाळेत नेणं-आणणं, अभ्यासात मार्गदर्शन करणं, आमच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सगळ्या गोष्टींकडं पाहणं हे आईलाच करावं लागे. रात्री झोपताना आई आम्हाला सुंदर सुंदर गोष्टी सांगायची. या सर्व बाबींमुळं आम्ही दोघंही आईच्या खूप जवळ होतो. पपा अधूनमधून सुटीवर यायचे; पण त्यांच्या कडक शिस्तीमुळं त्यांच्यापुढं मोकळ्या मनानं वावरायला आम्ही धजावत नसू.
***
आईनं दादाचा दहावा वाढदिवस खूप उत्साहात साजरा केला होता. त्याच्या सगळ्या मित्रांना जेवायला बोलावलं होतं. आईनं एकटीनंच छान छान चायनीज पदार्थ बनवले. खीर-पुरीही केली. जेवण झाल्यावर सगळ्या बाळगोपाळांना आइस्क्रीमही. मात्र, एका दिवसासाठी रजा न मिळाल्यानं पपा येऊ शकले नव्हते.

आपणही लवकरात लवकर दहा वर्षांचं व्हावं, म्हणजे मग आपलाही वाढदिवस आई असाच साजरा करेल, असं मला त्या वेळी वाटून गेलं! पुढं आईनं खरोखरच माझाही वाढदिवस अगदी तशाच उत्साहानं साजरा केला. त्यानंतरची वर्षं फार भराभर गेली असं वाटलं. आम्ही दोघं भाऊ शालेय जीवनात चांगलीच प्रगती करत गेलो. दादानं सीएची परीक्षा दिली आणि तो फर्स्ट क्‍लासमध्ये उत्तीर्ण झाला, तेव्हासुद्धा आईनं तो सीए झाल्याबद्दल सगळ्या नातलगांना मोठी पार्टी दिली. मी त्या वेळी एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षाला होतो. या पार्टीच्या वेळी मात्र पपा घरी होते.

नंतरच्या दोन वर्षांत आमच्या घरात अनेक महत्त्वाच्या घटना घडत गेल्या. पपा निवृत्त होऊन घरी आले. त्यांचा निरोपसमारंभही चांगला झाला. आई-पपा दोघंच नंतर युरोपच्या ट्रिपला जाऊन आले. त्यांच्या जीवनातली ती एक अविस्मरणीय ट्रिप ठरली. आल्यानंतर दोघंही खूप आनंदात आणि फ्रेश मूडमध्ये होते. दादानं चांगल्या परिसरात जागा घेऊन स्वतःचं ऑफिस थाटलं अन्‌ प्रॅक्‍टिस सुरू केली. मी मेडिकल करून इंटर्नशिपसाठी बंगळूरला गेलो. सगळ्यात मोठी घटना म्हणजे, दादानं आम्हा कुणालाच न सांगता आंतरधर्मीय प्रेमविवाह केला. नोंदणी पद्धतीनं. नंतर कळलं, की त्याला घरात सांगायची भीती वाटली होती. त्यानं आम्हाला न सांगितल्यामुळं आम्हा तिघांनाही मोठाच धक्का बसला. आजच्या या युगात आपले आई-वडील इतक्‍या बुरसटलेल्या विचारांचे असतील, असं त्याला का वाटलं असावं? खरं तर त्यानं आम्हाला विश्वासात घेऊन त्याच्या मनातलं सगळं सांगायला हवं होतं. ""विश्‍वजित... अरे, तुला जी मुलगी पसंत असेल, तीच आम्हालाही पसंत असेल,'' असं सांगत
आई-पपांनी दोघांना घरी बोलावलं. त्यांचं आगतस्वागत केलं.

मात्र, खरंतर आई-पप्पा तसे मनातून कुठंतरी दुखावले गेले होतेच. दादाची ही लपवालपवी त्यांना आवडलेली नव्हती. हा धक्का पचवायला त्यांना बरेच दिवस लागले. 8-15 दिवसांनी आई आजारी पडली. वहिनी ग्रॅज्युएट होती. दिसायलाही छान अन्‌ सुस्वभावी होती. तिनं आजारपणात आईची खूप सेवा केली. ते पाहून पपांचा ग्रह तिच्याबद्दल चांगला झाला. मी तर त्या वेळी बंगळूरमध्ये होतो; पण घरातली सगळी माहिती मला फोनवरून समजत असे. वहिनीनं काळजीपूर्वक देखभाल केल्यानं आई लवकरच बरी झाली.
दादानं त्याच्या लग्नाविषयी असं केल्यानं आई-पपांनी आता माझ्या लग्नाविषयी खूप स्वप्नं पाहिली होती.
""आम्ही तुझ्या पसंतीला प्राधान्य देऊ; पण तू आमच्या परस्पर लग्न करू नकोस. तुला जर कुणी पसंत पडली असेल तर तसं सांगून टाक. नाहीतर आम्ही दोघं वधूसंशोधनाला सुरवात करतो...'' असं दोघांनी मला सांगून ठेवलं. आईच्या सगळ्या अवस्था मी पाहिलेल्या होत्या. त्यामुळं आई-पपा ठरवतील त्याच मुलीशी लग्न करायचं, दादाकडून त्यांचं मन जसं दुखावलं गेलं होतं, तसं आपण वागायचं नाही, असं मी ठरवून टाकलं होतं.
"माझ्यासाठी सुयोग्य मुलगी तुम्हीच पाहा,' असं मी आईला सांगितल्यावर तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली ः ""मी उद्याच एका विवाहमंडळात तुझं नाव नोंदवून येते.''

दरम्यान, आईच्या छातीत दुखणं अधूनमधून सुरूच होतं. मी आणि पपा तिची काळजी घ्यायचो. पपा तिला नियमितपणे लष्कराच्या त्यांच्या दवाखान्यातल्या स्पेशालिस्टना दाखवून आणायचे व त्यानुसार औषधोपचार सुरू होते. तिच्या देखभालीत पपा काहीच उणं ठेवत नव्हते. ते स्वतः तिच्या औषधाच्या वेळा पाळत असत. माझी इंटर्नशिप संपवून मी नायजेरियाला गेलो. आई-पपांपासून दूर जाताना आणि आपलं घर सोडून जाताना माझ्या मनाची घालमेल होत होती; पण भरपूर पगाराच्या नोकरीचाही मला मोह सोडवत नव्हता!

"काही कमावण्यासाठी काही गमावावं लागतं,' अशी मनाची समजूत घालत मी नायजेरियाला नोकरीवर रुजू झालो. आता आईला माझी जास्तच काळजी वाटू लागली की काय कोण जाणे...तिनं अंथरूणच धरलं. पपांनी तिला समजावलं ः "आपली पिलं आता दूर दूर जाणारच. कारण, त्यांच्या भविष्याचाही विचार त्यांनी केला पाहिजे ना? आपण बांधलेल्या घरट्यात आता ते राहणार नाहीत...' पण आईच ती! तिच्या मनाला कोण आणि कसं समजावणार? फोनवरून ती माझ्याशी खूप वेळ बोलायची. त्या वेळी ती मला भरपूर सूचनाही करायची. आईचा फोन आल्यावर मलाही साहजिकच खूप बरं वाटायचं. आईनं विवाहमंडळात जाऊन माझ्यासाठी एक डॉक्‍टर मुलगी पसंत केली होती. तिचा फोटो तिनं मला नायजेरियाला पाठवून दिला होता. फोटोवरून मलासुद्धा मुलगी आवडली होती. आईला मी तसं सांगितलंसुद्धा. मग मी त्या मुलीशी फोनवरून एकदा-दोनदा बोललो. लग्नात काय काय करायचं, याची तिनं भलीमोठी यादी करून ठेवली होती...
***
आई, तू माझं लग्न न पाहताच निघून गेलीस. तुला देवाघरचं बोलावणं आलं. तुला तर तुझ्या लाडक्‍याच्या लग्नात वरमाई म्हणून मिरवायचं होतं. लग्नानंतर आम्ही दोघांनी कुठं फिरायला जावं, त्या ठिकाणाविषयीही तू पपांना सांगितल्याचं त्यांनी मला सांगितलं...आमच्या संसाराचं सुंदर चित्र तू रंगवलंस...पण ते पूर्ण व्हायच्याआधीच या घरातलं तुझंच वास्तव्य संपलं... आई, तू अचानकच गेल्यानं मी आणि पपासुद्धा खूप एकटे पडलो आहोत...मघाशी न्याहारीच्या वेळी पपांनी सांगितलं की तू आणि वहिनीनं मिळून लग्नासाठी लागणाऱ्या दागिन्यांचीही खरेदी केली आहे. नवऱ्यामुलीचे कपडे, मेकअप्‌चं सामान, इतकंच नव्हे तर, दादा, मी आणि पपांसाठी तुझ्या आवडीचे दोन दोन ड्रेसही तू घेऊन ठेवलेस. तुझ्यासाठी पैठणी, वहिनीसाठी पैठणीही तू घेतलीस...लग्नाच्या 15 दिवस आधी घराला छान रंग द्यायचा, असं तू ठरवलं होतंस... मी घरी आल्यापासून पपांनी मला हे सगळं सगळं सांगितलंय, आई...तू किती केलंस आम्हा सगळ्यांसाठी...आणि अत्यानंदाच्या या प्रसंगी मात्र आता तूच नाहीस!

स्वयंपाक झाला की तू मला बोलवायला यायचीस..."अभि, चल रे गरम गरम जेवून घे...' आत्तासुद्धा तुझा आवाज माझ्या कानावर येतोय...! आई, तू नाहीस तर या घराची रयाच गेली आहे...तू गेलीस अन्‌ या घराचं घरपणच हरवल्यासारखं झालं आहे...
आता तू माझ्या लग्नात नसशील...पण आशीर्वाद द्यायला नक्कीच येऊन जाशील याची मला खात्री आहे! पण त्याआधी येणारा "मदर्स डे' मी तुझ्याशिवाय कसा साजरा करू? मी व दादा मिळून प्रत्येक मदर्स डे धूमधडाक्‍यात साजरा करायचो...तुझी उणीव भासणारा हा माझा पहिलाच मदर्स डे असेल...आई, त्या दिवशी तुझी खूप खूप आठवण येईल...
आईच्या आठवणींत बुडालेला मी दारावरच्या टकटकीनं भानावर आलो...माझी वाग्दत्त वधू दारात उभी राहून माझ्याकडं पाहत स्मितहास्य करत होती...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com