‘सिक्‍स्थ सेन्स’ कमी पडतोय का?

फादर फ्रान्सिस दिब्रिटो
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

पुरुषाची नजर निर्मळ झाल्याशिवाय स्त्रीच्या दुर्दैवाच्या दशावतारांचा अंत होणार नाही, ही गोष्ट येशू ख्रिस्तांनी तसंच संत तुकाराम महाराजांनी ओळखली होती. संतांनी नाठाळ पुरुषांच्या डोळ्यांत अंजन घालण्याची शिकस्त केली, तरीही स्त्रियांवरच्या अत्याचारांमध्ये वाढच होत आहे. पुरुषाच्या नजरेतलं जहर आणि स्पर्शातला दाह स्त्रियांना ओळखता आलाच पाहिजे...
 

सावध हरिणी सावध गं
करील कुणीतरी पारध गं 

पुरुषाची नजर निर्मळ झाल्याशिवाय स्त्रीच्या दुर्दैवाच्या दशावतारांचा अंत होणार नाही, ही गोष्ट येशू ख्रिस्तांनी तसंच संत तुकाराम महाराजांनी ओळखली होती. संतांनी नाठाळ पुरुषांच्या डोळ्यांत अंजन घालण्याची शिकस्त केली, तरीही स्त्रियांवरच्या अत्याचारांमध्ये वाढच होत आहे. पुरुषाच्या नजरेतलं जहर आणि स्पर्शातला दाह स्त्रियांना ओळखता आलाच पाहिजे...
 

सावध हरिणी सावध गं
करील कुणीतरी पारध गं 

हे गीत खूप वर्षांपूर्वी ऐकलं होतं. वास्तविक, जिची शिकार केली जाते, तिच्या एकटीचाच हा प्रश्‍न नसून, जो शिकार करतो - म्हणजे जो शिकारी आहे - त्या शिकाऱ्याच्या मनोवृत्तीबाबतचा खरा प्रश्‍न आहे. त्या शिकाऱ्याला काही उपदेश करण्याऐवजी हरिणीलाच उपदेशाचे डोस का पाजले जातात, असा प्रश्‍न कुणी का विचारत नाही? हरिणीचं फिरण्या-बागडण्याचं स्वातंत्र्य जे धोक्‍यात आणतात, त्यांना शुद्धीवर कसं आणायचं, हा खरा प्रश्‍न आहे. तसं न करता पुरुषप्रधान, पितृसत्ताक समाजानं नेहमीच स्त्रियांना लक्ष्मणरेषा आखून दिलेल्या आहेत; परंतु पुरुषांच्या शिकारी वृत्तीवर रामबाण उपाय सुचवलेला नाही, ही वस्तुस्थिती असून ‘आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी’ असा हा प्रकार आहे.

काळ गेला... युगं लोटली... मात्र, पुरुषाच्या मानसिकतेत किती फरक पडला, हा अभ्यासाचा विषय आहे. पुराणकाळापासून ते आजपर्यंत ती जशीच्या तशीच आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. इतिहासाचं फार मोठं अवजड आणि विद्रूप ओझं पुरुषजातीच्या खांद्यावर आहे. त्याच्या नजरेतला विखार कमी झालेला नाही. पुरुषाची नजर निर्मळ झाल्याशिवाय स्त्रीच्या दुर्दैवाच्या दशावतारांचा अंत होणार नाही, ही गोष्ट येशू ख्रिस्तांनी ओळखली होती. त्या काळीही समाजात स्त्रीला स्वयंभू मूल्य नव्हतं. ती पुरुषाची मालमत्ता समजली जात असे. प्रभू येशू ख्रिस्त हे थोर आध्यात्मिक गुरू होते; तसंच ते कसलेले मानसशास्त्रज्ञही होते. ते समाजात वावरत असत. मानवी स्वभावाचा त्यांचा सूक्ष्म अभ्यास होता. ‘पर्वतावरील प्रवचन’ या आपल्या शिकवणुकीत त्यांनी श्रोत्यांना सांगितलं ः ‘जो कुणी एखाद्या स्त्रीकडं कामेच्छेनं पाहतो, त्यानं आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापाला प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून टाकून दे... कारण, तुझं संपूर्ण शरीर नरकात टाकलं जाण्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश झालेला परवडला.’’ संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात असाच विचार व्यक्त केला आहे. ते म्हणतात ः ‘‘पापाची वासना । नको दावू डोळा। त्याहुनि आंधळा । बराच मी।।.’’ पुरुषांच्या नाठाळपणामुळं धर्मपुरुषांना असे कठोर उद्गार काढावे लागलेले आहेत.

येशू ख्रिस्तांनी दूषित नजरेच्या विकृतीवर उपाय सुचवला होता ः ‘डोळा हा शरीराचा दिवा आहे. तुझा डोळा निर्दोष असेल, तर तुझं संपूर्ण शरीर निर्दोष असेल; पण तुझा डोळाच सदोष असेल, तर तुझं संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. तुझ्यातला अंधार थोडा असला तरी तो किती भयकारी असेल?’ डोळे ही मनाची प्रवेशद्वारं आहेत. त्या मार्गानं कामांधतेची श्‍वापदं मनाच्या गुहेत जाऊन तिथं दबा धरून बसतात. आज प्रसारमाध्यमांमधूनही नजरेसाठी खूप ज्वालाग्राही रसद पुरवली जात आहे. माणसाच्या निर्मितीपासून विषयांधता चालत आलेली आहे, हे जरी खरं असलं, तरी आधुनिक तंत्रज्ञानामुळं वासनांधतेला खतपाणी घालणारं रसायन सहज उपलब्ध झालं आहे. प्रसारमाध्यमांवरची सेन्सॉरशिप हा त्यावरचा उपाय नाही. आत्मसंयम हाच खरा त्यावरचा इलाज होय.

संतांनी नाठाळ पुरुषांच्या डोळ्यांत अंजन घालण्याची शिकस्त केली आहे, तरीही स्त्रियांवरच्या अत्याचारांमध्ये वाढच होत आहे. अर्थात, सगळेच पुरुष विकृत, कामांध असतात असं नाही. चारित्र्यसंपन्न जीवन जगणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. तीदेखील एक संपन्न परंपरा आहे. असं असलं तरी माणूस हा प्रमादशील असतो. विचार आणि विकार यांच्या संघर्षात कधी कधी विकाराचा विजय होतो आणि त्या झगड्यात स्त्री हीच प्रामुख्यानं जखमी होत असते. वासनेचं अंगण निसरडं असतं. त्यावरून चालताना पुरुषाप्रमाणं स्त्रीलाही जपावं लागतं.

यासंदर्भात विदर्भातले प्रसिद्ध साहित्यिक वा. म. जोशी यांच्या पुस्तकातली एक गोष्ट आठवते. तिचा आशय असा ः ‘ते दंगलीचे दिवस होते. सांजावलं होतं. एक तरुण मुलगी एकटीच घराकडं परतत होती. वाटेत गुंडांनी तिला गाठलं व तिचा पाठलाग सुरू केला. जिवाच्या आकांतानं ती पळत सुटली. एका तरुणानं ते दृश्‍य पाहिलं व त्यानं मोठ्या शिताफीनं तिला सोडवलं आणि तिच्या घरी पोचवलं. तिच्या घरच्या मंडळींनी त्याचे खूप खूप आभार मानले. हळूहळू त्याचा त्या कुटुंबाबरोबर घरोबा वाढत गेला. दोघांची मैत्री दृढ होत गेली.
एकदा ती त्याला म्हणाली ः ‘‘मला तुझी भीती वाटू लागली आहे...’’
‘‘का?’’ त्यानं आश्‍चर्यचकित होऊन विचारलं.

‘‘दंगलीच्या वेळी तू मला त्या गुंडांपासून वाचवलंस. त्या वेळी मी खूप भ्यायले होते; पण खूप सावधही होते... आता तू माझ्यावर इतकी माया करतोस की... तू माझ्याकडं काहीही मागितलंस तर मी तुला ‘नाही’ म्हणू शकणार नाही... त्यामुळं मला तुझी भीती वाटते...’’ तो चिंताक्रांत झाला. दोघं शांत झाले. शांततेचा भंग करत ती पुढं म्हणाली ः ‘‘खरं म्हणजे मला माझीच भीती वाटते...!’’
किती सुज्ञपणाचे बोल होते त्या मुलीचे! आपलं मन अनेकदा दुर्बल होत असतं. वेळीच त्याची चाल ओळखावी लागते. जोखीम पत्करून, कड्याच्या टोकाशी गेल्यानंतर कपाळमोक्ष होण्याचे प्रकार उद्‌भवू शकतात.

अनेकदा माणसाला जास्त धोका हा शत्रूपेक्षा त्याच्या मित्रांकडूनच असतो. माणूस शत्रूपासून सावध असतो; परंतु मित्रावर त्याचा विश्‍वास असतो आणि ज्याच्यावर विश्‍वास असतो, तोच विश्‍वासघात करू शकतो. उर्दू शायरीत म्हटलेलं आहे ः ‘धोखा वही देता है, जिस पे जादा भरोसा होता है।’ गेल्या काही काळात मुलींच्या-महिलांच्या बाबतीत समाजात ज्या दुर्दैवी, दुःखद घटना झाल्या आहेत, त्यांचं अवलोकन केलं, तर असं जाणवतं, की शत्रूपेक्षा मित्रांनीच अधिक मोठा घात केलेला आहे.

मुंबईतल्या एका नामांकित संशोधन केंद्रातली एक घटना. ती परदेशी मुलगी सोबतच्या मित्रांबरोबर रात्री एका रिसॉर्टमध्ये गेली. ते सर्व तिच्या परिचयाचे होते. त्यांनी एकमेकांचे वाढदिवस एकत्र साजरे केलेले होते. तिचा त्यांच्यावर पूर्ण भरवसा होता. पार्टीच्या वेळी त्यांनी तिच्या नकळत तिच्या पेयामध्ये अमली पदार्थ मिसळले. ती बेशुद्ध झाल्यावर त्यांनी तिच्यावर सामुदायिक बलात्कार केला. या अत्याचारामुळं तर ती कोसळलीच; पण आपल्या मित्रांनी केलेल्या विश्‍वासघातामुळं ती खोलवर जखमी झाली.

दुसरी घटना तीन वर्षांपूर्वीची. ते दोघं एकमेकांचे फेसबुक मित्र-मैत्रीण. तो नाशिकला राहणारा, ती मुंबईची. त्यानं तिला नाशिकला बोलावलं. तिला एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. किती भयानक प्रकार. मात्र, ती स्वतःच्याच पायांनी या दुःखाकडं चालत गेली होती, हेही अमान्य करता येत नाही. आपल्या कितीही जिव्हाळ्याचा मित्र असला, तरी त्याच्याकडं एकांतात जाणं धोकादायक आहे, याची जाणीव तरुण स्त्रीला नसते का? अनेकदा नाव प्रेमाचं असतं; परंतु गाव वासनेचं असतं. लॅटिनमध्ये एक म्हण आहेः Solus cum sola non dicunt Ave Maria. या म्हणीचा अर्थ असा ः ‘तो’ आणि ‘ती’ एकांतात असताना ती दोघं नामस्मरणाचा का जप करत असतात?
तिसरी घटना अलीकडंच पालघर जिल्ह्यात घडलेली. आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन तो ट्रेकिंगला गेला. त्या दोघांत काय घडलं हे स्पष्ट नाही; परंतु त्याच्या म्हणण्यानुसार ती बेशुद्ध होऊन वाहत्या ओढ्यात ‘पडली’. त्यानं मदतीसाठी हाका दिल्या. चार-सहा जणांनी तिला बाहेर काढलं. त्यानं रिक्षा मागवली व तशा अवस्थेत त्यानं तिला अडगळीच्या जागेत नेलं आणि तिच्या मृतदेहावर अत्याचार केले. त्यानं तिला प्रीतीचं वचन दिलं होतं, परंतु तो निघाला अत्याचारी. तिच्या पालकांनी तिला त्याच्याबरोबर पाठवलं, की ती त्यांना न सांगताच स्वतःहून त्याच्याबरोबर गेली होती, हे स्पष्ट झालेलं नाही.

गेल्या आठवड्यातली आणखी एक बातमी. त्याची व तिची ओळख झाली. ते मोबाईल-फ्रेंड झाले. त्यानं तिला लग्नाचं वचन दिलं. ती त्याचा आहारी गेली. त्यानं या परिस्थितीचा लाभ उठवला. पुढं तो लग्नाविषयी बोलेनासा झाला. ती त्याला लग्नाविषयी विचारू लागली, तेव्हा तिचे नको त्या अवस्थेतले फोटो नेटवर प्रसिद्ध करण्याची धमकी त्यानं तिला दिली. त्यानंतरही तो तिच्या परिस्थितीचा लाभ उठवतच राहिला. शेवटी न राहवून तिनं पोलिसांचा आधार घेतला. त्यानं केलेली गोष्ट अमानुष होती. तो नराधम निघाला. जखमी ती झाली. प्रश्‍न असा आहे, की तिनं त्याला आपले नको त्या अवस्थेतले फोटो घेऊच का दिले ? तिनं त्या गोष्टीला विरोध का दर्शवला नाही ? त्याचं वय २३ वर्षं आणि तिचं वय २० वर्षं. दोघंही सज्ञान.

असं सांगतात, की स्त्रीकडं संवेदनशीलतेचं सहावं इंद्रिय (सिक्‍स्थ सेन्स) असतं. पुरुषाच्या नजरेतलं जहर आणि स्पर्शातला दाह ती सहज ओळखू शकते. वरील प्रकरणांमध्ये त्या भगिनींना ते जहर व तो दाह वेळीच ओळखता आला नाही...
म्हणूनच ‘सावध हरिणी, सावध गं!