सोशल मीडियावरचं गाजलेलं... (गौरी ब्रह्मे)

सोशल मीडियावरचं गाजलेलं... (गौरी ब्रह्मे)

मातृदेवो भव

मी  नवीन लग्न होऊन आले, तेव्हा त्यांची स्वयंपाकघरात ओट्यापाशी मुख्य जागा ठरलेली होती. तिथं त्यांचीच सत्ता होती असं म्हटलं तरी चालेल. पहिली दोन वर्षं मी त्यांची लिंबूटिंबू मदतनीस म्हणून काढली. कुठं कांदा चिरून दे, काकडी कोचून दे, कूकरच्या शिट्ट्यांकडं लक्ष ठेवून योग्य वेळी बंद कर, बटाटे सोल, डबे भर...असलीच सटरफटर कामं! त्यांच्या हाताखाली डोळे, कान, नाक उघडं ठेवून हळूहळू बरंच शिकले आणि मग नकळतच ‘मुख्य स्वयंपाकी’ म्हणून माझं ‘प्रमोशन’ आणि लिंबूटिंबू गडी म्हणून त्यांचं आनंदानं आणि स्वेच्छेनं ‘डिमोशन’ झालं.

काही वर्षांनी त्यांनी किचन सहज दिसेल अशी हॉलमधल्या सोफ्यावरची जागा पकडली. त्यांचं जपजाप्य, नामस्मरण चालू असताना एक कान, डोळा स्वयंपाकघराकडे असायचा. ‘कढी ऊतू जाईल गं, लक्ष आहे ना? बटाटे शिजले असतील, गॅस बंद कर, गाजर किसून देऊ का तुला? आमटीत मेथी घातलीस का? वास छान येतोय...’ अशी त्यांची कधी तरी अधूनमधून टिप्पणी चालू असायची. काही जणींना हे असले शेरे त्रासदायक वाटू शकतात; पण मला नाही. कदाचित आमचं नातं तसं बऱ्यापैकी प्रेमाचं असल्यामुळं असेल. उलट त्यांचं बोलणं ऐकून हा पदार्थ करताना काही चुकणार नाही, कोणा तरी मोठ्या माणसाचं लक्ष आहे आपल्यावर, आधार आहे, असंच सतत वाटत राहायचं.

सध्या मात्र त्यांची आवडीची जागा देवघरात आहे. तिथून स्वयंपाकघरातलं काहीच दिसत नाही. त्यांच्या दृष्टीनं आता त्यांचा किचनमधला कार्यभाग बऱ्यापैकी संपला आहे. सून करेल ते (आणि ती उत्तमच करेल यात त्यांना शंका नाही- कारण ती त्यांचीच विद्यार्थिनी आहे!) दोन घास वेळेवर खाऊन आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवायचा त्यांचा निश्‍चय आहे आणि तो त्या उत्तम पार पाडत आहेत. माझ्या सासूबाईंचा गृहस्थाश्रमातून वानप्रस्थात आणि आता चक्क संन्यासाश्रमापर्यंतचा प्रवास खरच खूप शिकवून जाणारा आहे. कंपनीत आलेल्या नवशिक्‍या एम्प्लॉयीला योग्य ते ट्रेनिंग देऊन, योग्य वेळी प्रमोट करून, त्याच्याकडं कंपनीच्या किल्ल्या सोपवून त्यांनी सुखानं रिटायरमेंट घेतली. ही रिटायरमेंट प्रत्येकाला जमतेच असं नाही. आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे मला ‘ट्रेन’ करायच्या आधी त्यांच्या मुलालाही किचनमधल्या चार गोष्टी येता-जाता सहज शिकवल्या होत्या. (याचे फायदे मला प्रचंड होतात.) हे असं सगळ्यांबरोबर घडणार नाही, हे अगदी मान्य आहे- कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्यातून दोन बायका आणि स्वयंपाकघर हे तर अत्यंत नाजूक नातं! सूत जमलं, तर भांड्यांचे आवाजही सुरेल किणकिण म्हणून ऐकू येतील आणि नाही जमले तर फक्त आदळआपट! पण तरीही स्वयंपाकघरातल्या काही गोष्टी ज्येष्ठ बायकांकडूनच शिकाव्यात, असं मला आवर्जून वाटतं. त्यांनी शिकवल्याची सर ‘नेट’वरच्या रेसिपींना येत नाही.

इंटरनेट प्रमाण सांगेल; पण उकळी आल्यावरचा वास, पाकाची परफेक्‍ट तार आणि दमदमीत वाफ येण्यासाठीचं करेक्‍ट पातेलं नाही सांगू शकणार, युट्यूब एक वेळ कृती साग्रसंगीत दाखवेल; पण पदार्थ बनवतानाचा ‘फर्स्ट हॅंड’ अनुभव, आपल्या घरच्यांना आवडणारी ठराविक चव नाही सांगू शकणार. पोट भरण्याचे मार्ग इंटरनेट किंवा पुस्तकं शिकवतील; पण आपल्या आवडत्या व्यक्तींच्या पोटात शिरण्याचे मार्ग फक्त सासू, आई, आजेसासू, मामी, काकू, तर कधीकधी ज्येष्ठ पुरुषमंडळीसुद्धा सांगू शकतील. माझी आई साधी मुगाच्या डाळीची खिचडी केली, तरी माझ्या आजीला मजेत फक्त पातेल्याला हात लावायला सांगायची...आणि ती साधी खिचडी पण काय चवदार लागायची!

...मला आणि माझ्यासारख्या इतर अनेक जणींना वारसाहक्कानं स्वयंपाकघरातलं ज्ञान दिलेल्या सर्व मातांना अभिवादन! फक्त योग्य त्या वेळी आपली लुडबूड थांबवून, रिटायरमेंट घेऊन संन्यासाश्रमात जायची बुद्धी मात्र देवानं प्रत्येकाला वेळीच देवो ही प्रार्थना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com