#SocialMediaDay अनियंत्रित सोशल मीडिया आणि राजकारण

download12.jpg
download12.jpg

सोशल मीडियावर असणं आत्ताच्या काळाची अनिवार्य गरज झाली आहे. तिथं नसणं काळाबरोबर नसल्याचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे काळानं निर्माण केलेलं हे माध्यम समाजानं आपलंसं करणं स्वाभाविक आहे. हे माध्यम आत्ताच्या समाज जीवनाचा आरसा आहे. बदलत्या राजकारणाला समजून घेताना सोशल मीडियाला बाजूला करून  पुढे जाता येत नाही. सध्याच्या काळात एकूणच राजकारण अन समाजकारण यांचं नातं घट्ट होत चाललं आहे, तर दुसर्‍या बाजूला माध्यमांचं लोकशाहीतील स्थान व महत्त्व, राजकारणाशी आपले संबंध घट्ट करून ठेवण्यात हे माध्यम यशस्वी झालं आहे. राजकारण परिवर्तनशील असतं, तसंच माध्यमंदेखील सतत बदलत असतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राजकारणातील परिवर्तनात कळीची भूमिका माध्यमं बजावतात असतात.

हे माध्यम जन्मानं परदेशी आहे. मात्र ते आज इतकं देशी झालेलं आहे की, त्याचा उगम भारतातच झाला असं असं वाटायला लागलं आहे. या माध्यमानं आपल्या देशात जे काही चांगल्या अन वाईट अर्थानं जे काही नियंत्रण मिळवलं आहे, ते पाहता, त्यातून राजकारण, उद्योग, करमणूक, आरोग्य अशी जवळपास सगळ्याच क्षेत्रांना याची गरज वाटू लागली आहे. या माध्यमानं एकाच वेळी समाजाचं जेवढं प्रबोधन चालवलं आहे, तेवढीच काही घटकांची बदनामीही या माध्यमाच्या अनियंत्रित व्यवस्थेमुळे होत आहे.  सर्व प्रथम निवडणुकांत सोशल मीडियाचा वापर हा अमेरिकेत झाला. ओबामांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली त्यात सोशल मीडियाचा मोठा हात होता. ओबामांनी दिलेला ‘येस, वी कॅन’ हा संदेश सोशल मीडियाने तरूण मतदारांपर्यंत पोहोचवला. हा संदेश सकारात्मक होता. म्हणूनच अमेरिकेत सोशल मीडियाचा सकारात्मक वापर झाला. त्याचा सकारात्मक परिणाम अमेरिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच ‘ब्लॅक’ व्यक्ती देशाचा अध्यक्ष बनला. या सकारात्मक संदेशाची भाषा भारतात वापरली जाताना दिसत नाही. 

आपल्याला सगळं अमेरिकेकडून शिकण्याची सवय लागल्यानं निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करायचा असतो हे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. ओबामांनी ती शिकवण आपल्याला घालून दिली आहे. त्यामुळं या निवडणुकीत कधी नव्हे इतका सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे. मोदींनी तर ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना विधानसभेतच केला. मोदींमुळं अनेक राजकारण्यांनी आणि त्यांच्या पक्षांनीही सोशल मीडियाच्या वापराची खुणगाठ बांधून घेतलेली आहे. त्यांनी आता सोशल मीडियाचा दुहेरी वापर सुरू केला आहे किंवा तो जाणीवपूर्वक केला जात आहे.

पण, त्याचा अधिकाधिक वापर नकारात्मक होताना दिसतोय आणि तो अधिकाधिक धोकायदायकही होतो आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकांच्यावेळी एका नामाकिंत वेबसाइटने एक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं. त्यात आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कबुली दिलेली होती की, छोटे छोटे दंगे करून  नागरी वस्तीत गोंधळ निर्माण केला जातो. विरोधी उमेदवारीची बदनामी केली जाते आणि अशा परिस्थितीचा ज्या नेत्याचं कंत्राट घेतलेलं आहे त्याच्या फायद्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजे सोशल मीडिया हे एखाद्याच्या इमेज बिल्डिंगचं किंवा एखाद्याच्या बदनामीचं साधन बनलेलं आहे. 

निवडणुकीसाठी सोशल मीडियाच्या वापराचं तंत्र विकसीत झालं आहे आणि त्याचा छोट्या छोट्या आयटी कंपन्यांनी धंदा सुरू केला आहे. किंबहुना या धंद्यासाठी बोगस आयटी कंपन्या स्थापनही केल्या जाऊ शकतात. राजकीय नेते आणि पक्ष सोशल मीडियात पैसा ओतायला तयार असल्यानं हा धंदा आणखी फोफावू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे फेसबुक आणि केम्ब्रिज अनॅलिटीका यांच्यातला व्यवहार. ती राजकीय सल्लागार कंपनी आहे. केम्ब्रिज अनॅलिटीकाच्या एका वरिष्ठ व्यक्तीने फेसबुककडून अधिकृतपणे लोकांचा सगळा डेटा घेतला. केम्ब्रिज अनॅलिटीकाने तो डेटा मिळवून ट्रम्प यांच्यासाठी प्रचारकार्यात वापरला. पुढे ट्रम्प निवडून आले. म्हणजेच या डेटाचा त्यांना खूप उपयोग झाला. 

एखाद्या नेत्याबद्दल फक्त चांगलंच लिहून आणायचं आहे. त्यांच्या न केलेल्या कामांचं कौतुक करायचं आहे. दंगल घडवण्यात हात असला तरी त्याचा या गोष्टींशी कसा संबंध नाही हे पटवून द्यायचे. कितीही पैसा खाल्ला असला तरी त्याने भ्रष्टाचाराविरोधात कसा लढा दिला आहे हे जगापुढे मांडायचं आहे... असं काहीही. ते घडवून आणण्याचं कसब या सोशल मीडियात आहे. अनेक कंपन्या कमी पैशात ते करून देतात. बोगस ट्विटर अकाऊंट काढायची. नेत्यांच्या ट्विटवरील पोस्ट रिट्विट करून चांगलं लिहीत राहायचं. फेसबुक पेज तयार करायचं. त्यावर नेत्यांच्या कौतुकांचा निबंध लिहायचा. हे इमेज बिल्डिंग करण्याचं काम सध्या कसं केलं जात हे आता समोर आलं आहे. 

नरेंद्र मोदींचे भक्त किंवा त्यांना विरोध करणारे रूग्ण या दोन प्रकाराच्या लोकांनी सध्या सोशल मीडियावर थैमान घातले आहे. अगदी सहज राजकारणावर चर्चा सुरु झाली कि दोन प्रश्न हमखास आपल्याला ऐकायला मिळते कि झाले का १५ लाख बँकेत जमा? किंवा तुमच्या काँग्रेसनं  ६० वर्षात काय केल? मोदींच्या इमेज बिल्डिंगसाठी अनेक टीम काम करत आहे. मोदींनी वेळोवेळी केलेले दावे सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचवते, असं सांगतात. अशी टीम अनेक नेत्यांचीही असू शकेल. मोदींच्या दाव्यातील पोकळपणा दाखवण्यासाठी विरोधकांनी एक फेसबुक पेज तयार केले आहे.  

भारतातील सध्याचं राजकारण सकारात्मक पर्यायांपेक्षा विरोधकांच्या नकारात्मक मुद्द्यांचा वापर करण्यासाठी अधिक सोयीचं होऊ लागलं आहे. त्याचं प्रमाण अधिकाधिक वाढत जाईल. हे नकारात्मक राजकारण फक्त येणाऱ्या २०१९च्या  लोकसभा निवडणुकीपुरतं सीमित राहील असं नाही. अनेक वर्षे सुरू राहील. त्यामुळं सोशल मीडियाचाही वापर अधिकाधिक प्रमाणात नकारात्मकच होताना दिसेल. या सगळ्या दिव्यांतून गेल्यानंतर राजकारणाचा स्तर सुधरेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com