झुंझार विनी मंडेला काळाच्या पडद्याआड 

winnie mandela
winnie mandela

दक्षिण आफ्रिकेचे महान स्वातंत्र्यसेनानी व पहिले अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची द्वितीय पत्नी विनी माडिकझेला मंडेला यांचे काल जोहान्सबर्गमध्ये वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले व मंडेला कुटुंबाचे एक पर्व इतिहासाआड झाले. मंडेला यांचे तीन विवाह झाले. पहिली पत्नी एव्हलीन मासे, दुसरी विनी व तिसरी ग्रासा माशेल. यापैकी मंडेला यांच्या खांद्याला खांदा लावून श्‍वेतवर्णीय वसाहतवादी सरकारविरूद्ध संघर्ष करणारी विनी एक अदम्य झुंझार म्हणून ओळखली जाते. मंडेला तुरूंगात असताना सोवेटोतील छोट्या घरात झिंझी व झेनानी या दोन लहान मुलींना सांभाळीत विनीनं सरकारविरूद्ध लढा दिला. "मदर ऑफ ब्लॅक पीपल" या नावान ती ओळखली जाई. 14 जून 1958 रोजी तिचा मंडेला यांच्याबरोबर विवाह झाला,तेव्हा मंडेला वकिली करत होते. सोवेटो शहरातील बारग्वनाथ रूग्णालयात मंडेला भेटले, तेव्हा ती तिथं नर्स होती. त्यांचा प्रेमविवाह होता. 

"सकाळ"च्या वतीनं वसाहतवादानंतरच्या राजकीय स्थित्यंतराचे अध्ययन व वार्तांकन करण्यासाठी मी 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेला भेट दिली होती. त्यावेळी जोहान्सबर्ग व राजधानी प्रेटोरिया दरम्यान असलेल्या सोवेटो (साऊथ वेस्ट टाऊनशिप)ला गेलो होतो. सोवेटो सर्वाधिक गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध होते, तसेच, मंडेला यांच्या क्रांतिचे स्फुल्लिंगही तेथूनच निघाले. तिथं नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला, धर्मगुरू डेशमंड टुटू व विनी मंडेला यांची घरे आहेत. त्यापैकी अभेद्य कुंपणं होती ती टुटू व विनीच्या बंगल्यांना. मंडेला यांचे घर साधे दुमजली. ते मात्र खुले होते. 

दक्षिण आफ्रिकेतील पोंडोलॅंडच्या डोंगराळ भागात विनी उर्फ नोमझामोचे वडील सरकारी सेवेत होते. त्यांच्या नऊ मुलींपैकी विनी एक. कुटुंबाला पैसा पुरत नव्हता. आई वारल्यावर ती शेतावर काम करायला लागली. गाईचं दूध काढणं, शेळ्या मेंढ्यांवर देखरेख करणं, हे ती नित्यानं करी. वडिलांनी तिचं नाव विनफ्रेड असं ठेवलं. पण ते तिला मुळीच आवडत नसे. तिचं मूळचं नाव नोमझानो. जर्मन राष्ट्राच्या ऐक्‍यासाठी संघर्ष करणारा ऑटो व्हॉन बिसमार्क हा तिच्या वडिलांचा आदर्श होता. मंडेलांबरोबरचं जीवन हे अग्निदिव्य असेल, याची काहीशी चाहूल तिला लागली होती. कारण विवाह होताच पोलिसांचा ससेमिरा तिच्यामागे सुरू झाला, तो तब्बल पुढील पंचवीस वर्षे. 

27 वर्षांच्या कारावासातून बाहेर आल्यावर नेल्सन व विनीचा प्रदीर्घ काळानंतर एकत्र आले. 1994 मध्ये नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष झाले. पण, त्याआधी विनीच्या संघर्षमय जीवनाला गालबोट लागलं होतं, ते तिचे अंगरक्षक व मंडेला फुटबॉट टीममधील खेळाडूंनी केलेल्या हिंसाचारामुळे. त्यात 14 वर्षाचा स्टोम्पी सिपेई व त्याच्या चार मित्रांना पळविण्यात आलं. नंतर स्टोम्पीचा खून झाला. त्यामागे विनी असल्याचा आरोप होता. विनीला शिक्षा झाली. काही काळाने तुरुंगवासाची शिक्षा माफ झाली. परंतु, मंडेला यांनी विनीपासून वैयक्तिक कारणासाठी विभक्त होत असल्याची घोषणा केली. मंडेला यांच्या सुटकेनंतर ते दोघे जेमतेम दोन वर्ष बरोबर होते. नंतर, पुन्हा दोघांचा एकाकी प्रवास सुरू झाला. 

मंडेलांनी विनीला कला, संस्कृती, विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या उपमंत्रीपदी नेमलं. अर्थात, ते पत्नी म्हणून नव्हे, तर वर्णभेदाच्या काळात तिनं देशासाठी जो त्याग केला, त्यामुळे तिला मंत्रिमंडळात स्थान मिळण सहाजिक होतं. विनीच्या असंख्य चाहत्यांच्या भावनांचा विचार मंडेला यांना करावा लागला. मंत्रिमंडळात असता केलेल्या गैरव्यवहारामुळे मंडेला यांनी तिला मंत्रिमंडळातून काढून टाकलं. तरीही आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसच्या महिला शाखेची ती प्रमुख म्हणून कार्य करीत होती. महिलांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होती. त्या काळातही मंडेलांवरील तिच्या प्रेमात तसूभरही कमी झाली नाही. मंडेला यांच्या अखेरच्या काळात विनी व दोन्ही मुली व त्यांची नातवंड अनेकदा एकत्र आली. ग्रासाने हे समजाऊन घेतलं. 

"मंडेलांच्या देशात" या माझ्या पुस्तकातील विनीबाबत एक परिछ्चेद असा - "दक्षिण आफ्रिकेच्या इतिहास व राजकाणात विनी मंडेलांचं पारडं जड राहील. त्यांच्या जीवनाकडे पाहिलं, की रामायणाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. प्रभु रामचंद्राला वनवासात जाण्याची अज्ञा झाली, तेव्हा सीता त्याच्याबरोबर होती. पण दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन व विनी मंडेला यांचं जीवन अत्यंत कठोर होतं. विनीनं एकाच वेळी उर्मिला व सीता या दोन्ही भूमिका बजावल्या. तिनं 22 वर्ष एकान्तवास भोगला. इतक्‍या वर्षांच्या विरहानंतरही विरह कायम. विनी म्हणाली होती, तेच खरं , की मी विवाहित असूनही सर्वाधिक अविवाहिता आहे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com