जनरल बाजवा यांचा शांततासंदेश

पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्याबाबत ज्या ज्या वेळी चर्चा होते, त्या त्या वेळी शंकेखोर लोक तीन प्रश्न नेहमी विचारतात.
जनरल बाजवा यांचा शांततासंदेश
Summary

पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्याबाबत ज्या ज्या वेळी चर्चा होते, त्या त्या वेळी शंकेखोर लोक तीन प्रश्न नेहमी विचारतात.

पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्याबाबत ज्या ज्या वेळी चर्चा होते, त्या त्या वेळी शंकेखोर लोक तीन प्रश्न नेहमी विचारतात.

पहिला प्रश्न : ‘पाकिस्तानबरोबर शांततेचे संबंध असावेत, असं आपणा भारतीयांना वाटत असेल; पण पाकिस्तानलाही तसं वाटतं का?’

- पाकिस्तानला असंख्य वेळा जाऊन आलेल्या मला आणि माझ्याप्रमाणेच तिथं जाऊन आलेल्या इतरांनाही याचं उत्तर ठाऊक आहे. भारताबरोबर शत्रुत्व जपण्यापेक्षा मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक अधिक उत्सुक आहे.

दुसरा प्रश्न : ‘पाकिस्तानी जनतेला कदाचित मैत्रीचे संबंध हवे असतील; पण पाकिस्तानी नेत्यांचीही तशीच इच्छा आहे?’

- भारताला कायम पाण्यात पाहू इच्छिणाऱ्या नेत्यांची संख्या आताशा फारशी उरलेली नाही. ‘भारताविरुद्ध एक हजार वर्षांचं युद्ध’ छेडण्याची भाषा करणाऱ्या झुल्फिकार अली भुट्टो यांचा काळ सरला आहे.

तिसरा प्रश्न : हा जवळपास प्रत्येक भारतीयाच्या मनात उपस्थित होतो : ‘पाकिस्तानी नेत्यांना जरी भारताबरोबर शांतता हवी असली तरी पाकिस्तानी लष्कराला ती हवी आहे का?’ कारण, पाकिस्तानमधल्या सत्तेच्या नाड्या त्यांच्या लष्कराच्याच हातात आहेत. लष्कराच्या गणवेशधारी जनरलना भारताबरोबर चांगले संबंध असावेत असं कधीही वाटलं नव्हतं आणि त्यांनी मुलकी नेत्यांनाही तसं कधी करू दिलं नाही.

- पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल क़मर जावेद बाजवा यांनी या तिसऱ्या प्रश्नाला नुकतंच उत्तर दिलं आहे. गेल्या शनिवारी झालेल्या ‘इस्लामाबाद सुरक्षाचर्चे’त बोलताना बाजवा म्हणाले होते. ‘काश्मीरसह भारताबरोबर असलेल्या सर्व वादाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि राजनैतिक मार्गानं तोडगा काढण्यावर पाकिस्तानचा विश्वास आहे. भारतानं तयारी दाखवली तर आम्हीही यासाठी तयार आहोत. प्रादेशिक समृद्धी आणि विकास साधण्यासाठी आपल्या या विस्तृत प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण होणं आवश्यक आहे. आमच्या सर्व शेजाऱ्यांसाठी आमची दारं कायम खुली आहेत.’

स्वतःचा मुद्दा पटवून देताना त्यांनी एक इशाराही दिला. ‘एकतृतीयांश आखाती देश आणि इतर काही जण कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या संघर्षात अडकलेले असताना, आपण संघर्षाची ही ठिणगी आपल्यापासून दूर ठेवलेलीच बरी.’

भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्याच्या बाजूनं बाजवा हे यापूर्वीही अनेकदा बोलले आहेत. जून २०१९ ला राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात बोलताना ते म्हणाले होते, ‘एकेकटं राहून विकास साधणं कोणत्याही देशाला शक्य नाही, त्यासाठी संपूर्ण प्रदेशाचा विकास व्हावा लागतो. आपल्या प्रदेशाचा विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला सर्व शेजारीदेशांबरोबर उत्तम संपर्क ठेवणं आवश्यक आहे.’ त्यांना काय म्हणायचं होतं ते स्पष्टच आहे - पाकिस्तानला प्रगती करायची असेल तर, सर्व शेजाऱ्यांशी, विशेषतः भारताशी शांतता, संपर्क आणि सहकार्य राखणं गरजेचं आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येही त्यांनी स्वतःच्या देशाला परखडपणे बजावलं होतं,‘पाकिस्तानच्या सुरक्षेला भारतापासून नव्हे तर, धार्मिक कट्टरतावादापासून सर्वांत मोठा धोका आहे. परस्पर आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्व या तत्त्वांशी आम्ही ठाम आहोत. शांततेचे बाहू फैलावण्याची हीच वेळ आहे.’

जनरल बाजवा यांच्या या विधायक दृष्टिकोनाचा ठोस परिणाम गेल्या वर्षी २५ फेब्रुवारीला दिसला. त्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियंत्रणरेषेवर शस्त्रसंधी पाळण्याचा निर्णय झाला. हा करार आतापर्यंत तरी यशस्वीपणे पाळला गेला आहे. सीमेवर सातत्यानं होणारी चकमक आणि तीत आपल्याकडचे जवान, त्यांच्याकडचे सैनिक असे हजारो जण आणि निरपराध सामान्य नागरिक मृत्युमुखी पडण्याचा प्रकार वर्षभरापासून थांबलेला आहे. ही काही सामान्य घटना नाही. आणखी एका प्रसंगात, जनरल बाजवा यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात सांगितलं की, ‘भूतकाळ गाडून टाकत भविष्याकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. आधीच अपयशी ठरलेल्या क्लृप्त्यांचा उपयोग करून सध्याच्या आणि भविष्यातल्या आव्हानांना सामोरं जाणं हा भाबडेपणा आहे.’

पाकिस्तान आणि भारत यांच्यासमोर त्यांनी दोन पर्याय अत्यंत स्पष्टपणे ठेवले -

पहिला पर्याय - ‘भूतकाळातली कटुता आणि विष मनात कायम ठेवून संघर्षाला कायम प्रोत्साहन देत राहा... दुसरा पर्याय - वाद मागं सारत पुढं व्हा, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक विकासाचे फायदे आपल्या जनतेला मिळू द्या आणि, शांततेच्या आणि समृद्धीच्या नव्या युगात प्रवेश करा.’

या सगळ्या उदाहरणांमधून जनरल बाजवा यांचं भारताबरोबर शांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नातलं सातत्य अधोरेखित होतं. हे प्रयत्न करताना ते आपल्याच देशाच्या राजकीय नेत्यांनाही, परंपरागत भारतविरोध सोडून देऊन नवीन सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचं आवाहन करत आहेत. त्यांनी नुकत्याच, दोन एप्रिलला, केलेल्या भाषणात आपलं म्हणणं आणखी ठळकपणे मांडलं होतं. ते म्हणाले होते की,‘आपल्या प्रदेशातल्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या भावनांतून आणि पूर्वग्रहदूषित विचारांतून बाहेर पडावं. या भागातल्या जवळपास तीन अब्ज नागरिकांना शांतता आणि समृद्धी देण्यासाठी इतिहासातली जळमटं काढून टाका.’

अशी काय कारणं असतील की, ज्यांच्यामुळं पाकिस्तानी लष्कराला भारताबरोबर शांतता हवीशी वाटू लागली आहे? यातलं एक कारण म्हणजे, जनरल बाजवा हे खरोखरच शांतताप्रिय व्यक्ती आहेत. मला याबाबतची वैयक्तिक पातळीवर माहिती आहे. दुसरं म्हणजे, पाकिस्तानमधल्या आर्थिक संकटानं तिथल्या लष्करी नेतृत्वाला आत्मपरीक्षण करणं भाग पाडलं आहे.

पाकिस्तानकडे साडेपाच लाखांचं सैन्यबळ असून त्यावर दरवर्षी १० अब्ज डॉलर खर्च होतो. ‘पुढल्या पाच वर्षांत सैन्यबळ मोठ्या प्रमाणात कमी करण्याबाबत आम्ही अभ्यास केला आहे,’ असं स्वतः बाजवा यांनीच सांगितलं आहे. यातून वाचणाऱ्या पैशाचा वापर देशाच्या विकासासाठी करता येईल.

ते म्हणाले होते की,‘पाकिस्तानच्या जनतेचं कल्याण हाच मुख्य मुद्दा असल्यानं, आम्हाला जिथं खरी गरज आहे, तिथंच पैशाचा उपयोग करायचा आहे. पाकिस्तान हा आर्थिक आणि व्यूहात्मक उद्दिष्टांच्या वळणावर उभा आहे. आम्हाला उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे (पाकिस्तान-अफगाणिस्तान- मध्य आशिया आणि रशिया), आम्हाला पूर्व ते पश्चिम (इराण ते भारत) असा संपर्कमार्ग निर्माण करायचा आहे, यामुळे व्यापार वाढून पाकिस्तानचा आणि या भूप्रदेशाचा फायदा होणार आहे. आपल्याला प्रादेशिक व्यूहरचनेकडून प्रादेशिक अर्थव्यवस्थेकडे जात पाकिस्तानला आधुनिक आणि प्रगतशील देश बनवायचं आहे. त्यामुळे एकत्र येऊ आणि काश्मीरसह सर्व वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढू... आम्हाला आधी विकास हवा आहे.’

पाकिस्तान सध्या अचानक अनेक राजकीय आणि घटनात्मक पेचप्रसंगांत अडकला असल्याच्या पार्श्वभूमीवर जनरल बाजवा यांचं हे भाषण महत्त्वाचं ठरतं. मावळते पंतप्रधान इम्रान खान यांच्या चुकीच्या आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी केलेल्या आरोपामुळे हे संकट आणखी गडद झालं आहे. पाकिस्तानमधल्या विरोधी पक्षांना हाताशी धरून सरकार पाडण्याचा अमेरिकेचा डाव असल्याचा दावा इम्रान यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याला कोणताही आधार नाही. अशातच, अमेरिकेशी चांगले संबंध कायम ठेवण्यास पाकिस्तानचं प्राधान्य असेल, असं विधान खुद्द लष्करप्रमुखांनीच केल्यानं पंतप्रधान तोंडघशी पडले. आपल्या भाषणात जनरल बाजवा म्हणाले होते की,‘गटातटाच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही. आमच्या सहकाऱ्यांबरोबर (चीन) असलेले द्विपक्षीय संबंध इतर देशांशी असलेल्या संबंधांवर अवलंबून नाहीत.’ पाकिस्तानची चीनशी असलेली जवळीक सुपरिचित आहे, तरीही लष्करप्रमुख म्हणाले की, ‘आमचे अमेरिकेबरोबरही दीर्घ काळापासून चांगले संबंध आहेत आणि ती आमची अजूनही निर्यातीसाठीची मोठी बाजारपेठ आहे. कोणत्याही संबंधांवर विपरीत परिणाम होऊ न देता, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांबरोबर पाकिस्तानला संबंध वृद्धिंगत करायचे आहेत.

‘भारतातल्या अनेकांना वाटतं की, पाकिस्तान हा चीनच्या हातातलं बाहुलं बनला आहे. हे काही खरं नाही. आम्हाला कोणत्याही विदेशी शक्तीच्या कच्छपि लागायचं नाही, सर्वांशी मैत्रीचे संबंध हवेत,’ असं बाजवा यांचं म्हणणं आहे. पाकिस्तानचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण असावं, असं त्यांना वाटतं. जनरल बाजवा या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत; त्यामुळे, भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा चर्चा सुरू करून सकारात्मक पाऊल टाकण्याची पुढील सहा महिने संधी आहे. आपल्या शेजारच्या देशातल्या सर्वशक्तिमान लष्करप्रमुखाकडून आलेल्या या शांततासंदेशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, ‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com