खणीकर्म व इंधन-संशोधन संस्था (सुधीर फाकटकर)

खणीकर्म व इंधन-संशोधन संस्था (सुधीर फाकटकर)

अनुक्रमे १९४६ आणि १९५६ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय इंधन-संशोधन संस्था आणि केंद्रीय खणीकर्म संशोधन संस्था यांचं एकत्रीकरण म्हणजे केंद्रीय खणीकर्म आणि इंधन-संशोधन संस्था (सीआयएमएफआर). या संस्थेचं कार्य विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत चालतं.

इंधन-पदार्थांसंदर्भात खणन विज्ञान-तंत्रज्ञानापासून इंधनाचा वापर आणि वापरातून होणाऱ्या पर्यावरणबदलाच्या अभ्यासाकरिता ही संस्था समर्पित आहे. सीआयएमएफआरचं धनबाद (कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेलं झारखंडमधलं जिल्ह्याचं ठिकाण) इथं मुख्य कार्यक्षेत्र असून १५ किलोमीटरवरच्या दिग्वादीह इथं उपकार्यक्षेत्र आहे. याखेरीज उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात या संस्थेची प्रादेशिक कार्यक्षेत्रं आहेत.
खणीकर्म आणि इंधन-संशोधनात देशासाठी ऊर्जासुरक्षा साधत जागतिक पातळीवर पथदर्शक होऊन नेतृत्व करण्याचं संस्थेचं ध्येय आहे.

खाणकाम संशोधनासंदर्भात खाणसर्वेक्षण, भू-यांत्रिकी व खाण-आराखडा, स्फोटविषयक संशोधन, स्फोटयंत्रणा, लघुस्तरीय खाणकाम, भू-पर्यावरण, पदार्थ तपासणी, धातुशास्त्र, खाणसुरक्षा आणि नैसर्गिक स्रोत व पर्यावरण व्यवस्थापन असे संस्थेचे संशोधन विभाग आहेत. इंधनासंदर्भात स्रोतगुणवत्ता, वायुकरण व द्रवीकरण, कार्बनीकरण, ज्वलन विज्ञान व तंत्रज्ञान, औद्योगिक जैवतंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन असे विभाग आहेत. खणीकर्म आणि इंधनाच्या विविध नमुनापदार्थांसाठी राष्ट्रीय स्तरावरची मोजमापन व तपासणी प्रयोगशाळांची सुविधा आहे.

आजवर संशोधित झालेलं ३० पेक्षाही जास्त विषय-क्षेत्रातलं विज्ञान व विकसित झालेलं तंत्रज्ञान सरकारी आणि खासगी उद्योगव्यवयायांकरिता हस्तांतरासाठी उपलब्ध आहे. संबंधित संशोधनपर अहवाल, शोधनिबंध, स्वामित्व हक्क आदी समाविष्ट असलेलं ज्ञानकोश भांडार संकेतस्थळावर खुलं आहे. खाणकाम आणि इंधनाच्या संशोधनाखेरीज टाकाऊ पदार्थांच्या व्यवस्थापनातलं संशोधनही संस्थेकडून विकसित करण्यात आलं असून आता बदलत्या कालखंडानुसार हरितऊर्जेच्या संशोधनाकडंही वाटचाल सुरू आहे.

खणीकर्म आणि इंधनसंबंधी अभियांत्रिकी शाखांमधल्या ४० प्रकारच्या विषयांसाठी, तर विज्ञान शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी इंधन भूगर्भशास्त्रात इथं पीएच.डीची सुविधा आहे. याखेरीज संशोधक, प्रकल्प सहाय्यक, शास्त्रज्ञांसाठी कार्यक्षेत्रात संधी आहेत. या संस्थेत अल्प मुदतीचं प्रशिक्षण आणि कौशल्यविकास उपक्रम राबवले जातात.

खणीकर्म आणि इंधन संशोधन संस्थेकडून विज्ञानप्रसाराचेही कार्यक्रम आयोजित केले जातात.

केंद्रीय खणीकर्म आणि इंधन संशोधन संस्था, वरवा मार्ग, धनबाद ः ८२६०१५. दूरध्वनी ः (०३२६) २२९६००४. संकेतस्थळ - www.cimfr.res.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com