वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ही संस्था म्हणजे आपल्या देशाचा अमूल्य ठेवा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात सी. व्ही. रामन, जे. सी. घोष व ब्रिटिश अधिकारी सॅम्युअल सॅवेल यांचा प्रस्ताव, शांतिस्वरूप भटनागर यांचे अथक्‌ प्रयत्न आणि दूरदृष्टीचे तत्कालीन नेते रामस्वामी मुदलीयार यांचा पाठपुरावा अशा तीन बाबींमुळं १९४२ मध्ये सीएसआयआर अस्तित्वात आली. त्या वेळी ‘नवभारताच्या आकांक्षांची पूर्तता’ या ध्येयानं प्रेरित होऊन सीएसआयआरनं वाटचाल सुरू केली.
विज्ञान-तंत्रज्ञानात सक्षम नेतृत्व करणं, नवनवीन तंत्रप्रणालींचा शोध घेणं, उद्योगजगताला मार्गदर्शन करणं; तसंच या विकासाचा प्रसार करत देशाच्या आर्थिक-सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील राहणं असे उद्देश समोर ठेवत सीएसआयआर प्रगतिपथावर आहे. एकविसाव्या शतकाला सामोरं जाताना सीएसआयआरनं आपली व्याप्ती जगभर वाढविण्याचं ठरवलं आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागांतर्गत आणि पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद कार्य करते. जीव, रसायन, माहिती, अभियांत्रिकी, तसेच चर्म व पर्यावरण, भौतिकीय व पृथ्वी अशा विविध विज्ञानशाखांमध्ये ही परिषद योगदान देत आहे.

सध्या दरवर्षी सुमारे एक हजार ८०० विदेशी पेटंट मिळविणारी, चार हजार शोधनिबंध प्रसिद्ध करणारी आणि ३०० पेक्षाही जास्त उद्योग-व्यवसायांचे करार करणारी ही देशातली एकमेव परिषद असावी. गेल्या दशकात सीएसआयआरनं भारतात आणि परदेशात मिळून पाच हजारपेक्षाही जास्त उद्योगसमूहांशी सहकार्य प्रस्थापित केलं आहे. केवळ काही राज्यं सोडली, तर प्रत्येक राज्यात सीएसआयआरच्या विविध धातू-पदार्थांपासून इंधन-ऊर्जा, औषध, अवजड उद्योग, अन्नप्रक्रिया, उपकरण-साधनं, स्थापत्य-बांधकाम, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, पर्यावरण, खनिज, जैविक इत्यादी अनेक विषयशाखांच्या ३७ राष्ट्रीय प्रयोगशाळा, चार सहभागी विभाग आणि ३९ विस्तारित केंद्रं यावरून या संस्थेची व्याप्ती लक्षात यावी. १९६४ मध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी उभारलेलं  ‘माहिती-स्रोतकेंद्र’ हाही सीएसआयआरचा मौलीक ठेवा होय. ‘विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या सगळ्याच शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी या आणि तुमच्या विषयात शक्‍य असेल तेवढं संशोधन करा’! असं आवाहन करत सीएसआयआर विद्यार्थ्यांची वाट पाहत असते. नियुक्‍त्यांसाटी इथं स्वतंत्र मंडळ असून, विविध शिष्यवृत्तींची उपलब्धता असते. २०११ मध्ये सीएसआयआरच्या चेन्नईच्या आवारात पदवी आणि त्यापुढच्या शिक्षणासंदर्भात स्वतंत्र अशी वैज्ञानिक व नवसंशोधन अकादमी स्थापन करण्यात आली आहे. या अकादमीत तीन हजार विद्यार्थ्यांसाठीची सुविधा आहे.

संस्थेचा पत्ता -
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, अनुसंधानभवन, २, रफी मार्ग नवी दिल्ली - ११० ००१
दूरध्वनी - (०११) २३७३७८८९
संकेतस्थळ - www.csir.res.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com