केंद्रीय गोवंश संशोधन संस्था (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 16 एप्रिल 2017

आपल्या देशात धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गाईंची भरपूर मंदिरं आहेत. मात्र, गोवंशाचं संशोधन करणारं एक खास विज्ञानक्षेत्र दिल्लीच्या ईशान्येला ७० किलोमीटरवर मीरत (मेरठ) इथं आहे. या संस्थेचं कार्य भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीत चालतं. गोवंशाची उत्तमात उत्तम निर्मिती होण्यासाठी मूलभूत, उपयोजित आणि अनुकूल संशोधन करत विज्ञान-तंत्रज्ञान विकसित करण्याचा उद्देश ठेवून या संस्थेची सन १९८७ मध्ये स्थापना झाली. गोवंशाच्या अनुषंगानं इथं प्रजनन, खाद्य, पैदास, व्यवस्थापन आदी संशोधनाचे विषय आहेत.

संशोधनासंदर्भात या संस्थेत गोवंशाच्या अनुषंगानं गाय, बैल, तसंच म्हैस या प्राण्यांच्या जनुकीय व पैदास, आहार, शरीरशास्त्र आणि वीर्य या विषयक्षेत्रांसाठी अद्ययावत स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. यापैकी काहींना आंतरराष्ट्रीय मानांकनं प्राप्त आहेत. इथं पोषक व समतोल आहार, खाद्य तपासणी, रवंथज्ञान, वीर्य तपासणी, गर्भधारणा, गर्भारोपण, जनुकीय निवड याखेरीज दुग्धशाळा व्यवस्थापन इत्यादी अनेक विषयांची संशोधित माहिती- तंत्रज्ञान सल्ला- मार्गदर्शन सेवेच्या रूपात उपलब्ध असतं.

इथं विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे, तसंच गोवंशाच्या विविध वाणांचे स्वामित्व हक्क संस्थेला मिळालेले आहेत, तसेच या वाणांचं गुणवत्तापूर्ण मूल्यांकन राखण्यासाठी खास प्रकारचा गोठा, वातावरण आदी सुविधा इथं उभारलेल्या आहेत. गोवंशाच्या प्रमुख उपयोगकर्त्यांना संस्थेनं जोडून घेतलेलं आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सहकार्यातूनही संशोधनकार्य चालतं; त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी गोवंशाची निगा राखण्यासाठी ऋतुमानानुसार स्थानिक भाषेत दर महिन्याला माहितीचं प्रसारण केलं जातं. संशोधनाचा उपयोग करत समृद्ध झालेल्या शेतकऱ्यांनाही इथं त्यांचे अनुभव-विचार मांडण्यासाठी संधी दिली जाते. याखेरीज संस्थेतलं संशोधन हे विशेष वार्तापत्र, वार्षिक अहवाल व पुस्तकांच्या माध्यमातूनही प्रकाशित केलं जातं. इथं गोवंशासंबंधी वैज्ञानिक ग्रंथालयदेखील आहे. केंद्रीय गोवंश संशोधन संस्थेनं पशुधनाच्या समृद्धीसाठी २०५० पर्यंत दर दशकाच्या टप्प्यानं योजना आखलेल्या आहेत. या संस्थेत उच्चस्तरीय विज्ञान- तंत्रज्ञानासंदर्भात अल्प मुदतीच्या प्रशिक्षणाचं, तसंच कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. जैवतंत्रज्ञान, जनुकीय विज्ञान, प्राणिशास्त्र, दुग्धशाळाविज्ञान आणि पशुवैद्यकीय आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींसाठी कार्यक्षेत्र उपलब्ध असतं.

संस्थेचा पत्ता - केंद्रीय गोवंश संशोधन संस्था, ग्रास फार्म मार्ग,
पोस्ट बॉक्‍स क्रमांक - १७, मीरत कॅंटोन्मेंट, मीरत - २५० ००१
दूरध्वनी - (०१२१) २६५७१३६, संकेतस्थळ - www.circ.org.in