चेन्नईची चर्मसंशोधन संस्था (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 14 मे 2017

आपल्या देशात चर्मोद्योगाची मोठी परंपरा असून, सध्या जगातल्या चर्मनिर्यातीत आपला सहभाग १३ टक्के आहे. या विषयासाठीच्या संशोधनाचं महत्त्व ओळखूनच १९४८ मध्ये चेन्नई इथं चर्म अर्थात चामड्यावर संशोधन करण्यासाठी केंद्रीय चर्मसंशोधन संस्था (सीएलआरआय) स्थापन करण्यात आली. चर्मोद्योग म्हटल्यानंतर हा विषय फक्त जनावरांचं कातडं व चपला-जोडे एवढ्यावरच न थांबता प्रक्रिया-उद्योग, वस्तू-पदार्थ विकास, संबंधित तंत्रज्ञान-अभियांत्रिकी, तसंच अभिनव विज्ञान शाखा एवढे पैलू आवाक्‍यात घेणारा आहे.

चर्म विषयक्षेत्रातल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास साधत देशाला जगात सर्वोच्च स्थानावर घेऊन जात या उद्योग-व्यवसासासाठी देशांतर्गत माहिती पुरवणं हे सीएलआरआयचं ध्येय आहे. संशोधनविकास, रासायनिक विज्ञान, अभियांत्रिकी, जैविक शास्त्र आणि माहिती विज्ञान असे प्रमुख विभाग या संस्थेत आहेत.
कातडं काढण्यासंदर्भातल्या अद्ययावत तंत्रज्ञानापासून पाण्याशिवाय कातडं कमावणं (वापरयोग्य स्थितीत आणणं), कातड्यांपासून वस्तू तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा विकास यापासून ते चर्मप्रक्रियांसाठी रसायनं, साधनं-उपकरणं, तसंच पर्यावरणपूरक व आरोग्यदायी तंत्रज्ञान विकसित करणं यापर्यंत जागतिक पातळीवरची पेटंट्‌सही संस्थेनं मिळवली आहेत.

संशोधनविकासांतर्गत कातडं कमावण्यापासून चर्मवस्तूंचा आराखडा विकसित करणं, तपासणी-गुणवत्ता पडताळणी करणं आदी कार्यं होतात. रासायनिक विज्ञानांतर्गत कातड्याशी संबंधित असेंद्रिय, तसंच भौतिक पॉलिमर विज्ञान-तंत्रज्ञान सेंद्रिय व जैवसेंद्रिय असे विभाग आहेत. अभियांत्रिकीत पर्यावरणविज्ञान, रासायनिक अभियांत्रिकी आणि लघुस्तरीय निर्मिती ही सुविधाकेंद्रं आहेत. जैविकशास्त्रात जैवरसायन, जैवतंत्रज्ञान, जैविक पदार्थ, अद्ययावत पदार्थ आदींच्या प्रयोगशाळा आहेत. माहितीविज्ञान विभागात संगणकनियोजन व व्यवसायविकास आणि माहिती स्रोतकेंद्र आहे. याशिवाय या केंद्रात चर्मवस्तू उद्योग-व्यवसायासाठी प्रमाणीकरण, गुणवत्ता-तपासणीपासून विश्‍लेषणापर्यंत सात प्रकारच्या सेवासुविधा उपलब्ध आहेत.
सीएलआरआयमध्ये चर्म विज्ञान-अभियांत्रिकीच्या विषयांमध्ये पदविका, पदवी आणि पीएच. डीपर्यंत शिक्षण व संशोधनाची, तसंच उद्योग-व्यवसायासाठी पूरक अशा अल्प कालावधीच्या प्रशिक्षणाची सुविधा आहे. याखेरीज या विषयांशी निगडित तंत्रज्ञानासाठी कार्याच्या संधी उपलब्ध असतात. अहमदाबाद, जालंधर, कानपूर आणि कोलकता इथं सीएलआरआयची प्रादेशिक केंद्रं आहेत. चर्म हे विषयक्षेत्र फारसं झगमगाटाचं नसलं, तरी संशोधनापासून रोजगारापर्यंत विविध प्रकारच्या संधी असणारं हे मोठ्या व्याप्तीचं महत्त्वपूर्ण विज्ञानक्षेत्र आहे.

संस्थेचा पत्ता -  केंद्रीय चर्मसंशोधन संस्था,
अड्यार चेन्नई - ६०००२०
दूरध्वनी - (०४४) २४९१५२३८
संकेतस्थळ  - www.clri.org

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang