जमाना उसी का... (सुहास किर्लोस्कर)

जमाना उसी का... (सुहास किर्लोस्कर)

हिंदी चित्रपटसंगीतामध्ये नवीन ट्रेंड आणणाऱ्या ‘तिसरी मंझील’ या चित्रपटातल्या ‘ओ हसीना जुल्फोंवाली जानेजहाँ’ या गाण्यात शम्मी कपूर प्रत्येक कडव्यामध्ये वेगवेगळं वाद्य वाजवतो. एक अंतरा झाल्यावर तो सॅक्‍सोफोन वाजवतो. हिंदी चित्रपटसंगीताला या वाद्यानं सुरेल साथ केली आहे. ‘है दुनिया उसी की जमाना उसी का’, ‘तुम्हे याद होगा, तुम्हे हम मिले थे’, ‘यही वो जगह है’ अशा गाण्यांत या वाद्यानं भावनांना कोंदण दिलं आहे. त्याची वैशिष्ट्यं, त्याचा वापर, त्यानं तयार केलेले ट्रेंड्‌स आदींविषयी माहिती.

‘ओ  हसीना जुल्फोंवाली जानेजहाँ’ हे हिंदी चित्रपटसंगीतामध्ये नवीन ट्रेंड आणणारं ‘तिसरी मंझील’ या चित्रपटातलं गाणं ड्रमवादनानं सुरू होतं. शम्मी कपूर प्रत्येक कडव्यामध्ये वेगवेगळी वाद्यं वाजवतो. ती वाद्यं कोणती याची माहिती घेण्यासाठी संगीताचे अभ्यासक, विविध वाद्यं लीलया वाजवणारे हरहुन्नरी कलाकार डॉ. दत्ता कुंभार यांना भेटलो. त्यांनी दिलखुलासपणे माहिती सांगितली. वाद्यं वाजवून दाखवली आणि त्यातले बारकावेही समजावून सांगितले. राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात पहिल्या अंतऱ्यापूर्वी शम्मी कपूर ट्रॅंगल वाजवतो. एक अंतरा झाल्यावर तो सॅक्‍सोफोन वाजवतो.
***
वाद्यं वाजवण्याचे प्रकारसुद्धा वेगवेगळे आहेत. सनई तोंडात धरून वाजवतात. बासरी ओठाबाहेर धरून फुंकून वाजवली जाते. ब्रास सेक्‍शनची वाद्यं ओठात धरून वाजवतात. सॅक्‍सोफोन फुंकून वाजवला जातो. ‘कश्‍मीर की कली’ चित्रपटातल्या ‘है दुनिया उसी की जमाना उसी का, मुहब्बत में जो हो गया हो किसी का’ या दर्दभऱ्या गाण्यात शम्मी कपूरबरोबर एक वादक सॅक्‍सोफोन वाजवताना दिसतो. सहसा हे वाद्य रोमॅंटिक गाण्याला साथ म्हणून वाजवलं जातं; पण या गाण्यात नायकाचं दुःख गहिरं होण्यासाठी या वाद्याचा उपयोग केला आहे, हे विशेष. ओ. पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात मुखड्यानंतर, पहिल्या अंतऱ्यापूर्वी, दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी फक्त सॅक्‍सोफोन वाजतो. महंमद रफी शम्मीसाठी गात असताना साथीला हलकीशी बासरी वाजते. गाण्याच्या शेवटीसुद्धा हीच धून सॅक्‍सोफोनवर वाजत राहते आणि आपण अजाणतेपणे गाणं गुणगुणत राहतो.
***
ओ. पी. नय्यर यांच्या ‘यही वो जगह है’ या आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या गाण्यात सॅक्‍सोफोनची साथ प्रकर्षानं जाणवते. आशा भोसले यांचा आर्त स्वर आणि सॅक्‍सोफोनची साथ. शर्मिला टागोरच्या विनंतीचा विश्वजितच्या चेहऱ्यावर काहीही परिणाम होत नाही तो भाग अलाहिदा. आपल्या मनावर गारुड करणारं हे वाद्य १८४६मध्ये अन्तोनिए जोसेफ अडोल्फ सॅक्‍स या बेल्जियममधल्या अवलिया कलाकारानं तयार केलं. फ्लूट (बासरी), क्‍लॅरिनेट ही वाद्यं वाजवताना या वाद्याचा शोध लागला. सॅक्‍सोफोनव्यतिरिक्त सॅक्‍सोटरोम्बा, सॅक्‍सहॉर्न आणि सॅक्‍सोट्यूबा ही वाद्यंसुद्धा तयार केली. एकोणिसाव्या शतकामध्ये सॅक्‍सोफोन बेल्जियममध्ये लोकप्रिय झालं आणि नंतर जॅझ संगीताचा एक अविभाज्य अंग बनलं. सॅक्‍सोफोन हे वाद्य बेल्जियममधून आलेलं वाद्य ब्रासनं बनलेलं असतं, तरीही ब्रास सेक्‍शनच्या वाद्यामध्ये या वाद्याचा अंतर्भाव होत नाही. या वाद्याचं वर्गीकरण ‘वूडविंड’ वाद्यामध्ये केलं जातं. याचं कारण सॅक्‍सोफोनची ‘रीड’ लाकडाची असते. रीडच्या खालच्या बाजूला मेटल असतं. सॅक्‍सोफोनचे प्रामुख्यानं तीन भाग असतात. माउथपीस, मेटल ट्यूब आणि बोटानं वाजवण्याच्या कीज. सॅक्‍सोफोनचे सर्वसाधारणपणे ‘सोप्रानिनो’, ‘सोप्रानो’, ‘आल्टो’, ‘टेनोर’, ‘बॅरिटोन’, ‘बास’, ‘काँट्राब्रास’, ‘सब-काँट्राबास’ असे प्रकार असतात. ‘ओ हसिना’ गाण्यात शम्मी कपूर वाजवतो तो ‘टेनोर सॅक्‍सोफोन’ आहे.
***
सलील चौधरी यांनी सॅक्‍सोफोनचा अप्रतिमरीत्या वेगळा उपयोग केलेलं गाण म्हणजे ‘छोटीसी बात’ या चित्रपटातलं ‘ये दिन क्‍या आये लगे फूल हसने’ मुकेशनं गायलेल्या या गाण्यात मेलडी आणि हार्मनीचा सुरेख संगम ऐकायला मिळतो. सतार आणि सॅक्‍सोफोन या दोन वेगळ्या प्रकृतीच्या वाद्यांचं फ्युजन ऐकल्यावर सलीलदा यांच्या प्रतिभेला आपण सलाम करतो. सॅक्‍सोफोनच्या दृष्टिकोनातून हे गाणं ऐकल्यावर लक्षात आलं, की अंतऱ्यापूर्वी किंवा मुकेशच्या आवाजापूर्वी ते नेहमीच्या आवाजात वाजते आणि मुकेश ‘लगे फूल हसने, देखो बसंती...’ गात असतो त्या वेळेस वरच्या स्वरात वाजवण्यात आलं आहे. त्याला ‘काऊंटर मेलडी’ म्हणतात. या गाण्याचं चित्रीकरणसुद्धा बघण्यासारखं आहे. अमोल पालेकर यांनी अशोककुमार यांच्या सल्ल्यानं असरानीवर केलेल्या कुरघोड्या धमाल आहेत. विरोधकावर मानसिक दडपण कसं आणावं, याचं प्रशिक्षण हा चित्रपट आणि विशेषतः हे गाणं देतं.
***
सी. रामचंद्र यांनी बाँगो, क्‍लॅरिनेट, ओबो, ट्रम्पेट, सॅक्‍सोफोन अशा पाश्‍चिमात्य वाद्यांचा चपखल उपयोग ‘अलबेला’ चित्रपटातल्या ‘शोला जो भडके’ यांसारख्या गाण्यांमध्ये करून सर्वांना ताल धरायला लावलं. सॅक्‍सोफोनला हिंदी चित्रपटसंगीतामध्ये महत्त्वाचं स्थान देण्यात मनोहारीसिंह यांचा मोलाचा वाटा आहे. सलील चौधरी यांच्या सल्ल्यानुसार मनोहारीदा १९५८मध्ये मुंबईमध्ये आले, सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि आशा भोसले यांनी गायलेल्या ‘चंदा के चांदनी का जादू’ या गाण्यात त्यांनी सॅक्‍सोफोन वाजवला. हेमंतकुमार यांचं ‘तुम्हे याद होगा, तुम्हे हम मिले थे’ या गाण्याच्या अंतऱ्यामध्ये मनोहारीदांनी वाजवलेला सॅक्‍सोफोन ऐकू येतो. शंकर-जयकिशन, मदनमोहन, ओ. पी. नय्यर या संगीतकाराबरोबर काम करताना त्यांनी बरीच गाणी सजवली. नंतर राहुलदेव बर्मन यांच्याबरोबर त्यांची अशी काही जोडी जमली, की बऱ्याच गाण्यांत हे वाद्य ऐकू येऊ लागलं. सुरेश यादव, शामराज, राज सोढा या वादकांनीही हिंदी-मराठी गाणी सजवली.
***
‘रूप तेरा मस्ताना’ हे सचिवदेव बर्मन यांनी स्वरबद्ध केलेलं गाणं ॲकॉर्डियन, सॅक्‍सोफोननं सजलं आहे. या गाण्यातलं ॲकॉर्डियन केरसी लॉर्ड यांनी वाजवलं आहे. सॅक्‍सोफोन मनोहारीसिंह यांनी, व्हायब्रोफोन बजी लार्ड यांनी आणि बाँगो कावस लार्ड यांनी वाजवला आहे. सॅक्‍सोफोन आणि ॲकॉर्डियन यांमुळं या गाण्याला हवी तशी उन्मादकता आली आहे. ‘शोले’ चित्रपटातलं ‘मेहबूबा मेहबूबा’ हे गाणं राहुलदेव बर्मन यांनी गायलं आहे. जलाल आगाच्या हातात सरोदसारखं वाद्य दिसतं; पण गाणे रेकॉर्ड करताना वाजवलं आहे ते इराणी संतूर आणि वादक आहेत पंडित शिवकुमार शर्मा. संतूरच्या या वेगळ्या परिणामाबद्दल पंडित शिवकुमार शर्मा म्हणतात ः ‘‘वो तो पंचम का कमाल है.’’ अंतऱ्यापूर्वीचा ‘सोप्रानो सॅक्‍सोफोन’ वाजवला आहे मनोहारीदांनी. या दोन्ही वाद्यांच्या अनुषंगानं हे गाणं ऐकलं, की वाद्याची परिणामकारकता लक्षात येते.
***
या चित्रपटसंगीताव्यतिरिक्त सॅक्‍सोफोन ऐकायला मिळतं ते मिलिट्री किंवा ब्रास बॅंडमध्ये. काद्री गोपालनाथ यांनी शास्त्रीय संगीतामध्ये या वाद्याला मानाचं स्थान मिळवून दिलं. सवाई गंधर्व महोत्सवामध्ये काद्री यांचा सॅक्‍सोफोन आणि रोणू मुजुमदार यांची बासरी अशी अनोखी जुगलबंदी ऐकायला मिळाली. ‘बेदर्दी बालमा मुझको’, ‘आवाज देके हमे तुम बुलाओ,’ या शंकर-जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यात अंतऱ्यापूर्वी सॅक्‍सोफोन वाजतं. ‘येऊ कशी प्रिया’ हे अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं बहारदार गाणं सॅक्‍सोफोननं सुरू होतं. ‘आनेवाला पल’, ‘जिस गली में तेरा घर न हो बालमा’, ‘आगे भी जाने ना तू’ अशा गाण्यांतून हे वाद्य ऐकायचं समजायला लागलं. ‘ओ हसिना जुल्फोवाली’ या गाण्यातल्या ‘ठहरिये तो सही’ या दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी शम्मी कपूर ट्रोंबोन वाजवताना दिसतो. त्याबद्दल पुढच्या लेखामध्ये.
***

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com