धडकन ताल है ताल है सूर... (सुहास किर्लोस्कर)

- सुहास किर्लोस्कर
रविवार, 12 मार्च 2017

एखादं गाणं अवघड तालामध्ये बसविण्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे राहुल देव बर्मन यांचं संगीतदिग्दर्शन असलेल्या ‘शालीमार’ या सिनेमाचं शीर्षकगीत. ११ मात्रा!! केरसी लॉर्ड यांचं संगीतसंयोजन असलेलं हे गाणं ११ मात्रा धरून ऐकणं आणि ऐकल्यावर ताल समजणं हा एक सोहळा होतो!

एखादं गाणं अवघड तालामध्ये बसविण्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे राहुल देव बर्मन यांचं संगीतदिग्दर्शन असलेल्या ‘शालीमार’ या सिनेमाचं शीर्षकगीत. ११ मात्रा!! केरसी लॉर्ड यांचं संगीतसंयोजन असलेलं हे गाणं ११ मात्रा धरून ऐकणं आणि ऐकल्यावर ताल समजणं हा एक सोहळा होतो!

‘साज’ या सई परांजपेदिग्दर्शित सिनेमामध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जावेद अख्तर यांनी लिहिलेलं सुंदर गीत आहे. ‘‘सुननेवाले सुन लेते है कण कण मे संगीत । धडकन ताल है, साँस है सूर, जीवन है इक गीत.’ तालाच्या दृष्टिकोनातून गाणी ऐकताना असं लक्षात आलं, की सिनेसंगीत/भावगीत/ नाट्यसंगीत यांमध्ये गाणी संगीतबद्ध करताना तालात बरेच प्रयोग केले गेले आहेत.

‘शर्मिली’ या सिनेमात अभिनेत्रीची दुहेरी भूमिका (डबल रोल) आहे. अर्थातच दोन व्यक्तींचे चेहरे एकसारखे असले तरीही स्वभाव भिन्न. एक नायिका आहे चंचल आणि एक फार गंभीर, शांत स्वभावाची. हे गाण्यात दाखविण्यासाठी दोन वेगळ्या तालांमध्ये गाणं तयार करण्याची किमया संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन आणि संगीतसंयोजक केरसी लॉर्ड यांनी केली आहे. पटदीप रागातलं हे गाणं सुरू होतं पाश्‍चात्त्य पद्धतीच्या ठेक्‍यावर. पाश्‍चात्त्य वेशभूषेतली चंचल नायिका धावत धावत येत नायकाच्या बाहुपाशात शिरते. त्याच वेळी दुसरीकडं शांत स्वभावाची दुःखी नायिका ‘आपल्या वाट्याला असं दुःख का आलं,’ असा विचार करत असते. लगेच पाश्‍चात्त्य ठेका बदलून तबल्यावर रूपक ताल सुरू होतो - ‘मेघा छाये आधी रात, बैरन बन गयी निंदिया, बता दे मैं क्‍या करूँ...’ सतार, व्हायोलिन, ॲकॉर्डियन, बासरी, सिंथेसायझर, सारंगी या वाद्यांचा चपखल उपयोग करून या ओळी संपल्या, की पुन्हा अंतऱ्यापूर्वीचं संगीत पाश्‍चात्त्य ठेक्‍यावर आहे. गिटारच्या सुंदर वादनावर आपल्याला चंचल नायिका दिसते आणि अंतऱ्यामध्ये शांत स्वभावाची नायिका रूपक तालात मनोगत व्यक्त करते ः ‘सब के आँगन दिया जले रे मोरे आँगन जिया। हवा लागे शूल जैसी, ताना मारे चुनरिया... आयी है आँसू की बारात...बैरन बन गयी निंदिया...’’
एकाच गाण्यात दोन वेगवेगळे ताल असलेली अशीच आणखी काही गाणी हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केली आहेत. ‘चांदणे शिंपीत जाशी...’ या आशा भोसले यांच्या गाण्यात मुखडा रूपक तालात आणि अंतरा केरवा तालात आहे. ‘सावर रे, सावर रे उंच उंच झुला...’ या गाण्यात मुखडा झपतालामध्ये आणि अंतरा केरवामध्ये आहे. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले आणि वसंतराव देशपांडे यांनी गायिलेलं ‘सुरत पिया की न छिन बिसुराये, हर हर दम उनकी याद आये’ हे गाणं सुरू होतं तीनतालामध्ये. पहिला अंतरा एकतालामध्ये आहे ‘नैनन और न कोहू समाये, तडपत हूँ बिलखत रैन निभाये, अखियाँ नीर असुवन झर लाये...’ मुखडा पुन्हा तीनतालामध्ये. यानंतरचा अंतरा झपतालामध्ये आहे. ‘साजन बिन मोहे कछु ना सुहावे, बिगडी को मेरे कौन बनावे...हसनरंग आ सो जी बहलावे.’’ ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातलं हे गीत. या नाटकाचं संगीत जेवढं अभ्यासावं तितक्‍या नवीन गोष्टी समजतात.

१२ मात्रांच्या एकतालामध्ये ‘मनमोहना बडे झूठे’ (जयजयवंती राग) सारखी गाणी आहेत. दादरा हा सहा मात्रांचा ताल ऐकायला तसा सोपा आहे.

‘अमरप्रेम’ सिनेमातलं ‘बडा नटखट है रे कृष्ण कन्हैया...’ ‘सूरज’ सिनेमातलं ‘बहारों फूल बरसाओ...’ ही काही गाणी या तालातली. ‘कटी पतंग’ या सिनेमात नायिकेचं आयुष्य उद्‌ध्वस्त झालेलें आहे. ती निराश मनानं गाणे म्हणते ः ‘मेरी जिंदगी है क्‍या, एक कटी पतंग है...’ या गाण्यात दादरा ताल वेगळ्या पद्धतीनं वाजविलेला आहे. तीन बोल वाजविले आहेत, तीन सोडले आहेत. कटलेल्या पतंगाच्या अवस्थेसारखा परिणाम तालातून संगीतदिग्दर्शक राहुल देव बर्मन यांनी असा काही साधला आहे, की त्याला तोड नाही.

लहानपणापासून भजनं कानावर पडल्यामुळं भजनी ठेका अजाणतेपणे आपल्याला माहीत असतो; पण हाच भजनी ठेका वेगळ्या पद्धतीनं वाजवला गेला आहे तो ‘माय नेम इज शीला’ या गाण्यात! पाश्‍चिमात्य तालवाद्यं या ठेक्‍यात कशी वाजवली गेली आहेत, ते ऐकलं की आश्‍चर्य वाटतं. ‘आयटम साँग’ भजनी ठेक्‍यात करण्याची विशाल शेखर यांची कल्पकता दाद देण्यासारखी. ‘चेहरा है या चाँद खिला है’ हे ‘सागर’ या सिनेमातलं गाणं. या गाण्याचं वजन, झोल भजनी तालाप्रमाणे आहे; पण ठेका वेगळा वाजविण्यात आला आहे.

‘दिल पडोसी है’ हा अल्बम राहुल देव बर्मन- गुलजार-आशा भोसले यांनी केला होता. यातली सगळीच गाणी एकापेक्षा एक सरस आहेत. ‘झूठे तेरे नैन’ हे गाणं साडेआठ मात्रांमध्ये आहे. हे ‘शिवधनुष्य’ आशा भोसले यांनी लीलया पेललं आहे. पटदीप रागावर आधारित हे गाणं ताल धरून ऐकण्याचा एक वस्तुपाठ आहे. हे गाणं ताल धरून कसं ऐकावं, हे तबलावादक नितीन देशमुख यांच्याकडून मी शिकलो. साडेआठ मात्रा समजल्यावर गाण्याचा वेगळाच आनंद घेता आला. ‘इन अखियन का नमक पराया’ हा अंतरा आठ मात्रांचा आहे. हे गाणं ज्या पद्धतीनं ‘अंतरा ते मुखडा’ असं अवघड वळणं घेत जातं, ते ऐकताना संगीतकाराच्या प्रतिभेचं कौतुक करत केवळ स्तिमित होऊन जावं!

एखादं गाणं अवघड तालामध्ये बसविण्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे राहुल देव बर्मन यांचंच संगीतदिग्दर्शन असलेल्या ‘शालीमार’ या सिनेमाचं शीर्षकगीत. ११ मात्रा!! केरसी लॉर्ड यांचं संगीतसंयोजन असलेलं हे गाणं ११ मात्रा धरून ऐकणं आणि ऐकल्यावर ताल समजणं हा एक सोहळा होतो!
सिनेमा परिणामकारक होण्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे सिनेमाचं पार्श्‍वसंगीत, त्याबद्दल पुढील लेखात...