सन्नाटा भी गूँज रहा है... (सुहास किर्लोस्कर)

सन्नाटा भी गूँज रहा है... (सुहास किर्लोस्कर)

काही काही गाणी संगीताशिवायही असतात... किंवा त्यांना अगदी जेमतेमच संगीत असतं. शब्दरचनेच्या आशयानुसार, सिनेमातल्या प्रसंगानुसार संगीतदिग्दर्शकानं ‘अजिबात संगीत नाही’ किंवा ‘मोजकं-माफक संगीत’ अशी ‘संगीतयोजना’ या गाण्यांसाठी जाणीवपूर्वकच केलेली असते. गाण्यातली ही शांतताच त्या गाण्याचा अर्थ-आशय श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवत असते. शिवाय, ही शांतताही श्रोत्यांना बरंच काही सांगून जात असते...शब्दांपलीकडचं!

‘प्या  सा’ हा उत्कृष्ट २५ सिनेमांपैकी एक गणला जातो. ज्याचा कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी कुणीही तयार नसतं, अशा एका कवीची-शायराची ही कथा आहे. निराश मनानं भटकत असताना माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनात एक कविता सादर करण्याची संधी या कवीला मिळते. तिथं हा फाटका शायर पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला आलिशान मोटारीतून उतरताना पाहतो. दोघांमधलं अंतर किती वाढलं आहे, याची त्याला कल्पना येते आणि तो ही भावना गझलेच्या शेरांतून व्यक्त करतो.तंग आ चुके है कश्‍मकश-ए-जिंदगी से हम ठुकरा न दे जहाँ को कहीं बेदिली से हम
हम गमजदा है, लाए कहाँ से खुशी के गीत?
देंगे वो ही जो पाएंगे इस जिंदगी से हम


संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी या शायरीच्या सादरीकरणाला काहीही संगीत दिलेलं नाही. केवळ चाल लावलेली आहे.  ंमद रफी यांनी सुरेल गायनातून साहीर लुधियानवी यांच्या या काव्याचा भावार्थ श्रोते-प्रेक्षकांपर्यंत समर्थपणे पोचवला आहे.
संगीतदिग्दर्शन आणि संगीतसंयोजन म्हणजे केवळ चाल लावणं नव्हे, तर कोणत्या वाद्यांचा वापर करायचा, हे ठरवणं होय. गाण्याच्या प्रसंगानुसार कोणती वाद्यं वापरायची नाहीत, हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं! दुःखी प्रसंगामध्ये गाणं सुचलं तरी ती खंत व्यक्त करताना आपण ताल धरणार नाही, तसंच कोणत्याही गाण्याला लय असते; पण ताल धरून गायलं, असा आविर्भाव तिथं नसेल. अशी बरीच गाणी आहेत, ज्यांत प्रसंगानुसार वाद्यांचा वापर केलेला नाही किंवा अगदी मोजकीच वाद्यं वापरलेली आहेत.

‘जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है?’ (सिनेमा ः प्यासा) हे साहिर यांचं अजरामर काव्य रफी गातात, तेव्हा कोणतंही वाद्य वाजत नाही. केवळ एक सिग्नेचर-ट्यून वाजते, तीसुद्धा अंतऱ्यापूर्वी. गाण्याच्या चित्रीकरणात ‘फोकस-आऊट ऑफ फोकस’चा खेळ बघण्यासारखा आहे. साहिर यांना जी व्यथा सांगायची आहे, ती सचिनदेव बर्मन यांनी अत्यंत प्रभावीपणे श्रोते-प्रेक्षकांपर्यंत पोचवली आहे. विशेष म्हणजे, हेच गाणं मन्ना डे यांनीसुद्धा गायलेलं आहे. मात्र, ते सिनेमात ऐकायला मिळत नाही; पण इंटरनेटवर ते व्हर्जन-साँग ऐकायला मिळतं.

सिनेमातल्या या शायराला स्वतःच्या श्रद्धांजलीची सभा बघावी लागते. त्याच्या पुस्तकप्रकाशनाचा सोहळा आणि त्याच्या पुतळ्याचं अनावरणही बघावं लागतं. साहिर यांना कवीची-शायराची-गीतकाराची जी वेदना अभिव्यक्त करायची आहे, ती रफी यांनी स्वरांतून श्रोते-प्रेक्षकांपर्यंत पोचवली आहे. थकलेला निराश कवी जिवावर आल्यासारखे शब्दोच्चार करेल. ते दर्शवण्यासाठी रफीही तसेच गायले आहेत. सचिनदेव बर्मन यांचं संगीत गाण्याच्या आशयाला अनुसरून आहे. खूप वाद्यं वाजवलेली नाहीत. गाण्याला लय आहे; पण ठेका नाही. साहिर कवीची व्यथा सांगत आहेत, अशा वेळी तालवाद्यं कशी वाजतील? आपला स्मृतिदिन ‘ह्याची देही, ह्याची डोळा’ बघून कवी म्हणतो ः
ये महलों, ये तख्यों, ये ताजों की दुनिया
ये इन्सां के दुश्‍मन समाजों की दुनिया
ये दौलत के भूखे रिवाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्‍या है

अंतऱ्याला व्हायोलिन वाजतं; पण जे घडतं आहे, ते परिणामकारक व्हावं एवढ्यापुरतंच. अंतरा सुरू झाला की फार काही वाजत नाही. प्यासा, गुरुदत्त यांचं दिग्दर्शन, संगीत, चित्रीकरण याबद्दल जितकं लिहावं तितकं थोडंच.
***

मोगल साम्राज्याच्या अखेरच्या काळावर आधारित असलेल्या ‘लाल किला’ या सिनेमातलंही गाणं अशाच धर्तीवरचं. अखेरचा मोगल सम्राट बहादूरशहा जफर यांच्या काही रचना या सिनेमात वापरण्यात आलेल्या आहेत. बहादूरशहा हे कवी-गझलकारसुद्धा होते.
लगता नही है दिल मेरा उजडे दयार में
किस की बनी है आलम-ए-नापायदार में

ही बहादूरशहा यांची रचना रफी यांनी या सिनेमासाठी गायली आहे. संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांनी सुरेख चाल या रचनेला दिली आहे. मात्र, फार वाद्यं वाजत नाहीत, ठेका तर नाहीच.
कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें
इतनी जगह कहाँ है दिल-ए-दागदार मे?

सगळ्या इच्छा-आकांक्षांनी दूर व्हावं, असं सांगणाऱ्या या रचनेत वाद्यं वाजत नाहीत; त्यामुळं ते दुःख श्रोते-प्रेक्षकांपर्यंत
परिणामकारकरीत्या पोचतं. या सिनेमातली बहादूरशहा यांचीच आणखी एक रचना शांततेचा आवाज असाच गहिरा करणारी आहे!
न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ
जो किसी के काम न आ सके, मै वो एक मुश्‍त-ए-गुबार हूँ

***
‘वक्त ने किया क्‍या हसीं सितम’ हे ‘कागज के फूल’ सिनेमातलं कैफी आझमीलिखित गाणंही असंच आहे. अंतऱ्याला मोजकंच संगीत आहे. गाणं सुरू असताना हलकंसं व्हायोलिन आणि ट्रॅंगल एवढंच वाजतं.

‘छोटे नबाब’ या सिनेमातल्या एका प्रसंगात नायक (महमूद) मरणशय्येवर असलेल्या आपल्या पित्याच्या आयुष्यासाठी विनवणी करत असतो. हे गाणं श्रवणीय आहे. राहुलदेव बर्मन यांनी संगीतकार या नात्यानं या पहिल्या सिनेमापासूनच स्वतःचं वेगळेपण जपलं. ‘इलाही तू सुन ले हमारी दुआ’ या गाण्याला चाल आहे; पण संगीत फार कमी आहे. अंतऱ्याला वाऱ्याचा आवाज प्रसंगानुरूप आहे, तेवढंच संगीत! मतिमंद छोट्या नबाबाचा महमूद यांनी वठवलेला अभिनय पाहण्यासारखा आहे. या गाण्यात ‘छोट्या’ नबाबासाठी रफी यांनी कधी कधी ‘र’ चा उच्चार ‘ल’ असा केला असून, तसं करणं अनुरूपच होय. मात्र, काही ठिकाणी ‘र’सुद्धा स्पष्टपणे ऐकू येतो. यात सातत्य का राखलं गेलं नसावं, याची कल्पना नाही.
***

‘खुशबू’ या गुलजार यांच्या सिनेमात नायिकेचं (हेमा मालिनी) नायकाबरोबर (जितेंद्र) लग्न झालं आहे; पण काही प्रसंगांमुळं आणिं ती नायकाच्या घरी गेलेली नाही. हे आपलं दुःख ती गाणं गुणगुणत व्यक्त करते. त्याला राहुलदेव बर्मन यांनी फार सुरेख चाल दिली आहे; पण कोणतंही वाद्य वाजत नाही, तरीही हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं असं! अंतऱ्याला हलकीशी बासरी, सरोद वाजते. लता मंगेशकर यांनी नायिकेची वेदना श्रोते-प्रेक्षकांपर्यंत सुरेलपणे पोचवली आहे. गुलजार यांचे या गाण्याचे अर्थपूर्ण शब्द आहेत ः
दो नैनों मे आँसू भरे है, निंदिया कैसे समाये?
डूबी डूबी आंखों में सपनों के साये
रातभर अपने है, दिन में पराये
कैसे नैनो में निंदिया समाये?

***

अशी गाणी फक्त पूर्वीच्या काळाची होती का? तर असं काही नाही. ‘तूही रे’ हे हरिहरन यांनी आर्ततेनं गायलेलं ‘बॉम्बे’ सिनेमातलं सदाबहार गाणं दरवेळी ऐकताना नवीन काहीतरी देऊन जातं. ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात एक हलका बिट वाजतो. अंतऱ्यापूर्वीची बासरी ‘दर्द’चा परिणाम वाढवते. ‘मौत और जिंदगी तेरे हाथों में दे दिया रे’ असं तो म्हणतो आणि एका कडव्यानंतर तिचा आवाज ऐकू येतो...‘आयी रे, आयी रे, लो मै तेरे लिये’ ...पण त्याला ती अजून दिसत नाही. तो शोधतो आहे...अजून तोच बिट वाजतो आहे...अखेर ती दिसते. सारंगीचे सूर दुःख गहिरं करतात. याच वेळी सारंगीच्या साथीला तबला वाजतो. नायिकेचा बुरखा अडकतो, त्यामुळं ती बुरखा काढून टाकते. बंधनं तोडून टाकत त्याला भेटते आणि ओळ ऐकू येते...‘सौ बार बुलाई, मै सौ बार आऊँ, इक बार जो दिल दिया.’ या गाण्यातला कविता कृष्णमूर्ती यांचाही आवाज तितकाच आर्त!ज्या हलक्‍या बिटनं गाणं सुरू होतं, तो बिट वाजत राहतो आणि गाणं संपतं. कमीत कमी वाद्यांचा वापर करून प्रसंगानुसार शब्द आपल्यापर्यंत पोचवणारी अशी नव्या-जुन्या काळातली बरीच गाणी सापडतील. पुढच्या लेखात अशाच काही गाण्यांचा मागोवा घेऊ या.
जका सिद्दिकी यांची एक आशयसमृद्ध गझल आहे. जगजितसिंग यांनी ती फार सुरेख गायली आहे. तिचं संगीतही हलकंच आहे...
खामोशी खुद अपनी सदा हो, ऐसा भी हो सकता है
सन्नाटा भी गूँज रहा हो, ऐसा भी हो सकता है
सदा म्हणजे आवाज. शांततेचासुद्धा आवाज येतो. आपण ऐकलं तर तिचे प्रतिध्वनीसुद्धा ऐकू येतात...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com