अंतरा-मुखडा-संचारी (सुहास किर्लोस्कर)

अंतरा-मुखडा-संचारी (सुहास किर्लोस्कर)

‘गाइड’मध्ये नायिका पडद्यावर जे काही करते, ते सगळं बंधनं तोडून टाकण्याशी संबंधित आहे! ट्रकमधून फेकलेले घट, उंटावर बसणं, उंच कठड्यावरून बिनधास्त नृत्य करणं...नायिकेनं ही बंधनं झुगारून दिली आहेत, हे संगीताच्या माध्यमातून कसं दाखवायचं? ...तर ते दाखविण्यासाठी गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी एक खास युक्ती योजलेली जाणवते.
ती युक्ती म्हणजे, या गाण्याची सुरवात मुखड्याऐवजी अंतऱ्यापासून करण्यात आलेली आहे. ‘काँटों से खिंच के ये आँचल’ या ओळीनं गाण्याला सुरवात होते आणि मुखडा नंतर येतो.

गाण्यातल्या काव्याचे दोन भाग असतात. रूढार्थानं मुखडा म्हणजे गाण्याची सुरवात आणि अंतरा म्हणजे गाण्याची कडवी. मुखड्याच्या ओळी अंतऱ्यानंतर परत म्हटल्या जातात. ‘गाता रहे मेरा दिल’  या गाण्यात ‘प्यार  करनेवाले, अरे प्यारही  करेंगे’  हा  पहिला अंतरा आहे. ‘ओ मेरे हमराही मेरी बाह थामे चलना...’ हा दुसरा अंतरा आहे आणि अर्थातच ‘गाता रहे मेरा दिल’ हा मुखडा आहे. अशी बरीच गाणी आहेत. मात्र काही गाणी अशी आहेत, की ज्यांमध्ये ‘अंतरा आणि मुखडा’ या  संकल्पनेत बदल करण्यात आला आहे. आपण आपलं अस्तित्व, स्वत्त्व गमावून बसलो आहोत, अशी भावना ‘गाइड’मधल्या नायिकेची झालेली असते. मात्र तिचा हा गमावलेला आत्मविश्‍वास नायक तिच्या ठायी पुन्हा निर्माण करतो. ती काय काय करू शकते, याची तिला जाणीव करून देतो. या प्रसंगानंतर एक गाणं आहे. आजवरची बंधनं झुगारून देण्याची मनोवस्था दाखवणारं आणि आयुष्य मनमुक्तपणे जगण्याबाबतचा नायिकेचा निश्‍चय प्रकट करणारं... नायिकेनं ही बंधनं झुगारून दिली आहेत, हे संगीताच्या माध्यमातून कसं दाखवायचं? ...तर ते दाखविण्यासाठी गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी एक खास युक्ती योजलेली जाणवते.
ती युक्ती म्हणजे, या गाण्याची सुरवात मुखड्याऐवजी अंतऱ्यापासून करण्यात आलेली आहे. ‘काँटों से खिंच के ये आँचल’ या ओळीनं गाण्याला सुरवात होते आणि मुखडा नंतर येतो. ‘आज फिर जीने की तमन्ना है...’ या गाण्याचं विजय आनंद या महान दिग्दर्शकानं केलेलं चित्रीकरण बघण्यासारखं आहे. गाइडमध्ये नायिकेची भूमिका वठविणारी अभिनेत्री वहिदा रहमान पडद्यावर जे काही करते, ते सगळं बंधनं तोडून टाकण्याशी संबंधित आहे! ट्रकमधून फेकलेले घट, उंटावर बसणं, उंच कठड्यावरून बिनधास्त नृत्य करणं... आणि ‘कल के अंधेरों से निकल के’ या ओळीच्या वेळी अंधारातून उजेडाकडं फिरणारा कॅमेरा! दिग्दर्शक-गीतकार-संगीतकार-अभिनेता-अभिनेत्री सगळेजण एका सुरात गात आहेत - ‘आज फिर जीने की तमन्ना है...’
***

‘फूलों के रंग से’ हे गाणं याच ओळीनं ओळखलं जातं; पण ऐकता ऐकता लक्षात आलं, की गाण्याचा मुखडा आहे ‘बादल, बिजली, चंदन, पानी ऐसा अपना प्यार । लेना होगा जनम हमे कई कई बार।’  गीतकार नीरज यांनी लिहिलेलं हे अप्रतिम गाणं तितक्‍याच मधुर संगीतानं नटवलं आहे सचिन देव बर्मन यांनी... आणि  किशोरकुमार यांचा आवाज म्हणजे सोने पे सुहागा. या गाण्याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे, हे गाणं रेल्वेमध्ये आहे; पण गाण्याचा रिदम मात्रांच्या दादरा तालात आहे. रेल्वे जर १-२-३, १-२-३ अशी धावू लागली तर तसा परिणाम मिळणार नाही. कदाचित म्हणूनच  सचिनदेव बर्मन यांनी ६ मध्ये ४ चा छंद वापरला आहे. म्हणजे तालाच्या २ मात्रांमध्ये ४ वाजवले आणि वजन (१-२-३-४-५-६) (१-२-३-४-५-६) ऐवजी (१-२-३-४), (१-२-३-४), (१-२-३-४) असं वाजवलं आहे. म्हणजे गणितीय भाषेत ६x२ ऐवजी ४ x ३ असं केलं आहे. रेल्वेप्रमाणे रिदमचा आवाजही कमी-जास्त होत जातो.

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनानं गाण्याचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. ‘ख्वाब हो तुम या...(सिनेमा - तीन देवियां, गायक - किशोरकुमार, गीतकार - मजरूह सुलतानपुरी, संगीतकार - सचिनदेव बर्मन), तू धूप है... (सिनेमा - तारे जमीं पर, गायक - रमण महादेवन, गीतकार - प्रसून जोशी, संगीतकार - शंकर-एहसान-लॉय) ही अशीच मुखड्यांनंतर येणारी गाणी.

यादृष्टीनं ऐकायला सुरवात केली आणि एक गाणं असं आढळून आलं, की ज्याला मुखडाच नाही. ख्यातनाम कवी-गीतकार साहिर  लुधियानवी यांनी लिहिलेल्या ‘नया दौर’ या सिनेमातल्या गाण्याची सुरवात होते ‘उडे जब जब जुल्फें तेरी’ या ओळीनं. हे गाणं नायक  आणि नायिका यांच्यातल्या सवाल-जबाब या पद्धतीचं आहे. मुखड्याचा परिणाम साधण्यासाठी संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी जिला मुखड्याचं रूप दिलं आहे, ती एक धून होय! त्यामुळं या गाण्याला मुखडाच नाही, हे आपल्या पटकन लक्षात येत नाही.

‘दिल आज शायर है, गम आज नगमा है’ (सिनेमा - गॅम्बलर, गायक - किशोरकुमार, गीतकार - नीरज, संगीतकार - सचिनदेव बर्मन), - ‘मनमोहिनी तेरी अदा’ (सिनेमा - हम दिल दे चुके सनम, गायक - शंकर महादेवन, गीतकार - महबूब, संगीतकार - इस्माईल दरबार) ही अशीच मुखडा नसलेली आणखी काही गाणी. काही गाण्यांमध्ये मध्येच एक वेगळी ओळ ऐकायला मिळते. या प्रकाराला काय म्हणतात, असा शोध घेतला, तेव्हा ‘संचारी’बद्दल समजलं. संचारी म्हणजे तिन्ही सप्तकांमध्ये गाण्याचा संचार. हा प्रकार ‘रवींद्रसंगीता’मध्येही ऐकायला मिळतो. दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी वेगळी धून तयार केली जाते आणि शब्दही तसेच लिहिले जातात. सिनेसंगीतामध्ये संचारी वापरल्याची उदाहरणं आहेत. हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ या सिनेमात ‘ना जिया लागे ना’ या गाण्यात संचारीचा वापर करण्यात आलेला आहे. ‘पिया तेरी बावरी से रहा जाए ना’ ही वेगळी धून आहे. (गीतकार - गुलजार, संगीतकार - सलील चौधरी). ‘ओ सजना बरखा बहार आयी’ या गाण्यातही ‘ऐसी रिमझिम मे ओ सजन, प्यासे प्यासे तेरे नयन, तेरेही ख्वाब मे खो गये’ (गीतकार - शैलेंद्र, संगीतकार - सलील चौधरी) ही धून वेगळी आहे आणि पुन्हा मूळ धून जी आहे, तिच्यामध्ये गाणं सुरू होतं, हे संचारीचं वैशिष्ट्य होय. या गाण्यात जे वाद्य प्रामुख्यानं वापरण्यात आलेलं आहे, ते म्हणजे सतार होय, हेही असंच ऐकता ऐकता लक्षात येतं. अशी काही सौंदर्यस्थळं आणि पैलू उलगडत गेले की गाणं ऐकण्याची खुमारी वाढतच जाते. मी तबला शिकला असल्यामुळं मला ताल-लय या दृष्टिकोनातूनच गाणी ऐकायची सवय झाली...त्याबद्दल पुढच्या लेखात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com