...कितने आदमी थे! (सुहास किर्लोस्कर)

...कितने आदमी थे! (सुहास किर्लोस्कर)

‘कितने आदमी थे’ या सुप्रसिद्ध संवादापूर्वी जो व्हायोला वाजला आहे, त्याचा परिणाम वेगळाच. गब्बरसिंग दगडावरून चालतो...त्याच्या बुटाचा आवाज, त्याच्या हातातला पट्टा जमिनीवर घासला जातो तो आवाज आणि व्हायोलाचा परिणाम भीषण शांततेच्या पार्श्वभूमीवर नेमका होतो. ‘शोले’मध्ये गब्बरसिंगची भूमिका फार कमी वेळ आहे. गब्बरसिंग अर्थात अमजद खानचा वावर असलेले प्रसंग आहेत अवघे नऊ! पण सिनेमामध्ये त्याचे प्रसंग लक्षात राहतात ते संवाद आणि पार्श्वसंगीत यामुळं.

सि  नेमा सुरू होतो शीर्षकसंगीतानं आणि या सिनेमामध्ये पुढं काय ‘वाढून ठेवलं’ असेल, याची साधारण कल्पना पार्श्वसंगीतामधून प्रेक्षकाला येते.

विशेष उल्लेखनीय शीर्षकसंगीत म्हणजे ‘तिसरी मंझिल’ या सिनेमाचं. कारण, हे संगीत आणि त्याचं चित्रीकरण एकमेकांना पूरक आहे. घाटामधल्या रस्त्यावरून एक कार जोरात जात आहे. रस्त्यावरून फिरवलेला कॅमेरा दृश्‍यात्मक परिणाम साधतो. तो परिणाम अधोरेखित करतं आपल्या कानावर पडणाऱ्या वेगवेगळ्या वाद्यांचं संगीत... ट्रम्पेट, सेक्‍सोफोन. गाडीच्या हेडलाइटच्या फोकसप्रमाणे वाढणारं संगीत, गिटार, एकेका मजल्यावरून जाणारी युवती, तिसऱ्या मजल्यावरून ती पडल्यानंतर एकेक माणूस जमा होतं...तेवढ्यात पुढं जाणाऱ्या शम्मी कपूरला हेलन म्हणते ः ‘‘तुम्हे वहाँ नही जाना चाहिए?’’ गिटार आणि व्हायोलिन, जेम्स बाँड चित्रपटाचं संगीत, सर्व संशयितांवर फोकस आणि त्याला साजेसं उत्कंठा वाढवणारं संगीत, ड्रमसेटच्या प्लेट वाजताना आपल्याला दिसतात हातात तुटलेल्या बटणाचे दोरे.
***

‘तिसरी मंझिल’ हा सिनेमा एकाहून एक श्रवणीय गाण्यांसाठी ऐकण्यासारखा आहे. हिंदी सिनेमामध्ये संगीतमय थरारपट कसा असावा, याचा मानदंड गोल्डी म्हणजे विजय आनंद यांनी प्रस्थापित केला आहे. सिनेमाच्या यशात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पार्श्वसंगीत. सिनेमामध्ये इफ्तिकार येतो, तेव्हा वाजणारं कोर्नेट, नायक शम्मी कपूरला जेव्हा गूढ उकलतं, तेव्हा कोटाचं एकेक बटण बघताना जे संगीत दिलं आहे, ते विलक्षण आहे. या सिनेमाच्या पार्श्वसंगीताचा परिणाम श्रोत्यावर अजाणतेपणी होतो.
***

संवाद आणि पार्श्वसंगीतासह पाठ झालेला सिनेमा म्हणजे ‘शोले’. फक्त पार्श्वसंगीत ऐकायचं, या कारणासाठी मी हा सिनेमा परत एकदा बघितला. ‘शोले’चं शीर्षकसंगीत सिनेरसिकांना तोंडपाठ असतं. सिनेमामधल्या प्रसंगांचा विचार करून हे पार्श्वसंगीत केलेलं आहे. गिटारनं ही धून सुरू होते. ट्रम्पेट, सेक्‍सोफोन, ड्रम, तालवाद्य-तरंग, मादल, गावातल्या वस्तीमधून जाताना वाजणारी स्थानिक वाद्यं, पुन्हा गिटार आणि वाजवलेली शीळ. असं करत करत प्रेक्षक-श्रोते ठाकूरच्या हवेलीपर्यंत पोचतात. पुन्हा गिटार वाजते आणि घराजवळ शेळ्या बकऱ्यांचे आवाज ऐकू येतात.
***

सिनेमात रेल्वेवर डाकूंनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग रेल्वेच्या वाफेच्या आवाजाबरोबर ब्रास सेक्‍शनमधल्या वाद्यांनी परिणामकारक होतो. व्हायोलिन, गिटार, तालवाद्यं अशी एकेक वाद्यं वाढत जात प्रसंग उत्कंठापूर्ण होतो. रेल्वे इंजिनच्या आवाजानं आणि उडवलेल्या नाण्याच्या आवाजानं हा प्रसंग संपतो.
***

‘कितने आदमी थे’ या सुप्रसिद्ध संवादापूर्वी जो व्हायोला वाजला आहे, त्याचा परिणाम वेगळाच. गब्बरसिंग दगडावरून चालतो...त्याच्या बुटाचा आवाज, त्याच्या हातातला पट्टा जमिनीवर घासला जातो तो आवाज आणि व्हायोलाचा परिणाम भीषण शांततेच्या पार्श्वभूमीवर नेमका होतो. ‘शोले’मध्ये गब्बरसिंगची भूमिका फार कमी वेळ आहे. गब्बरसिंग अर्थात अमजद खानचा वावर असलेले प्रसंग आहेत अवघे नऊ! पण सिनेमामध्ये त्याचे प्रसंग लक्षात राहतात ते संवाद आणि पार्श्वसंगीत यामुळं.
***

ठाकूर आपल्या घरी येतो, तेव्हा त्याला धक्का बसतो ते सगळ्या कुटुंबीयांचे मृतदेह बघून. तेव्हा सारंगी दुःखाची तीव्रता अधिकाधिक गडद करते. त्यानंतर सूड घेण्याची भावना ठाकूरच्या मनात जेव्हा जेव्हा उफाळून येते, तेव्हा तेव्हा जे पार्श्वसंगीत वाजलेलं आहे, ते बांधकामाला वापरल्या जाणाऱ्या सळ्यांपासून बनवलेल्या वाद्यातून. या आवाजामुळं एक दहशत बसते! असे अचाट प्रयोग संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी बऱ्याच वेळा केले आहेत. त्यांचे सहायक सांगतात ः ‘कसं संगीत पाहिजे, याचा आवाज पंचमदा काढून दाखवायचे आणि तसा आवाज निघणारं वाद्य त्यांचे सहायक बनवून आणायचे.’ बसंतीचा पाठलाग करताना पंडित सामताप्रसाद यांनी तबल्यावर रेला वाजवला आहे. तो प्रसंग पार्श्वसंगीतामधून ज्या पद्धतीनं राहुलदेव यांनी खुलवला आहे, त्याला तोड नाही.
***

जय (अमिताभ बच्चन) जेव्हा जेव्हा ठाकूरच्या सुनेला (जया बच्चन) बघतो, तेव्हा तो माउथऑर्गनवर एक धून वाजवतो. सिनेमामध्ये ही धून ऐकून प्रेक्षक-श्रोत्यांना दोघांचं अव्यक्त प्रेम समजतं. अमिताभ म्हशीवर बसून ठाकूरच्या हवेलीत येतो, तेव्हा जया त्याला बघते. या वेळी तीच धून बिगुलवर वाजते आणि लगेच संध्याकाळी अमिताभ ती धून हार्मोनिकावर वाजवतो. शेवटच्या प्रसंगामध्ये चितेवर जयचा मृतदेह जळत असताना ही धून माउथऑर्गनवर सुरू होते, नंतर व्हायोलिनवर वाजते, त्याचा हार्मनीचा परिणाम प्रेक्षक-श्रोत्यांना ऐकू येतो. हीच धून नंतर संतूरवर वाजते.

यानंतरचा प्रसंग. रेल्वे स्टेशनवर वीरू (धर्मेंद्र) मित्राच्या वियोगानं दुःखी आहे आणि गाव सोडून जात आहे. रेल्वेमध्ये त्याला बसंती (हेमामालिनी) दिसते. त्यामुळं त्याला दुःखी प्रसंगातून सुखात दाखवताना संतूर द्रुत लयीत वाजते. ती लय हळूहळू वाढत जाते आणि संतूर-रेल्वे यांचा आवाज यातून पुन्हा ‘शोले’च्या शीर्षकसंगीताची शीळ वाजते आणि रेल्वे दूर जात असताना सिनेमाचा शेवट होतो. पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर आणि शीर्षकसंगीताची शीळ यातून अप्रतिम परिणाम साधण्यात आला आहे.

पार्श्वसंगीतामधले हे काही प्रयोग ऐकल्यानंतर आता पार्श्वगायनातल्या अनोख्या प्रयोगाबद्दल पुढील लेखात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com