हर दिल जो प्यार करेगा... (सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर suhass.kirloskar@gmail.com
रविवार, 7 मे 2017

सायरिल डेमियन यांनी सहा मे १८२९ मध्ये अकॉर्डियन या वाद्यासाठीचं पेटंट दाखल केलं होतं. त्या घटनेच्या स्मरणार्थ तो दिवस ‘जागतिक अकॉर्डियन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसा तो काल साजरा झाला. त्यानिमित्त या अनोख्या वाद्याची माहिती आणि हे वाद्य भारतीय चित्रपटसंगीतात कुठं कुठं वापरलं गेलं आहे, त्याविषयीची ही झलक...

सायरिल डेमियन यांनी सहा मे १८२९ मध्ये अकॉर्डियन या वाद्यासाठीचं पेटंट दाखल केलं होतं. त्या घटनेच्या स्मरणार्थ तो दिवस ‘जागतिक अकॉर्डियन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसा तो काल साजरा झाला. त्यानिमित्त या अनोख्या वाद्याची माहिती आणि हे वाद्य भारतीय चित्रपटसंगीतात कुठं कुठं वापरलं गेलं आहे, त्याविषयीची ही झलक...

‘देख के तेरी नजर’ या ‘हावडा ब्रिज’ सिनेमातल्या गाण्यात मधुबालाला बघून आणि आशा भोसले यांचा आवाज ऐकून प्रेक्षक-श्रोते घायाळ होतात. संगीतकार ओ. पी. नय्यर यांची सुरेख चाल आणि महंमद रफी यांची सुरेल स्वरसाथ असलेलं हे गाणं ताल धरत श्रोते ऐकतात. या गाण्यात अकॉर्डियन हे वाद्य प्रामुख्यानं ऐकू येतं आणि दिसतंही. गाण्याच्या सुरवातीला आणि दोन अंतऱ्यांमध्ये वाजवलेलं अकॉर्डियन ऐकून मी अवाक्‌ झालो. ‘अच्छा जी मैं हारी, चलो मान जाओ ना’ हे मधुबालाचं आणखी एक मधुर गाणं. संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं रफी-आशा यांनी ‘साभिनय' गायिलं आहे आणि त्यात केरसी लॉर्ड यांनी अतिशय सुंदर अकॉर्डियन वाजवलं आहे.
***

हे अकॉर्डियन कुठून आलं? सहा मे १८२९ मध्ये सायरिल डेमियन यांनी अकॉर्डियनसाठी पेटंट दाखल केलं. त्यामुळं सहा मे हा दिवस ‘जागतिक अकॉर्डियन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. अकॉर्डियनवादक अमित वैद्य हे हा दिवस अकॉर्डियनवादनाचा जाहीर कार्यक्रम करून गेली काही वर्षं साजरा करत असतात. त्यामुळं त्यांना भेटून त्यांच्याकडून या अनोख्या वाद्याची माहिती जाणून घेतली.
***

‘अकोर्ड’ या जर्मन शब्दाचा अर्थ संगीतातल्या ‘कॉर्ड’चा सुसंवाद म्हणजेच हार्मनी असा आहे. आधी हार्पसीकॉर्ड आणि पियानो यांची निर्मिती झाली आणि नंतर माउथऑर्गन ते अकॉर्डियन असा या वाद्याच्या निर्मितीचा प्रवास आहे. हार्मोनिअम, ऑर्गन, अकॉर्डियन ही सगळी एकाच ‘कुटुंबा'तली वाद्यं आहेत. युरोप-अमेरिका यांसारख्या देशात नृत्य-पॉप-जाझ-लोकसंगीत-ऑर्केस्ट्रा अशा सर्व प्रकारांमध्ये अकॉर्डियन वाजवलं जातं. अकॉर्डियनमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्या सहगायनाचा एकत्र परिणाम ‘कपलर’द्वारे देता येतो. शिवाय, तो आपल्या आवाजातले चढ-उतार लीलया काढणारा असतो. भारतीय सिनेसंगीतात अकॉर्डियन हे गायनाला साथ, अंतरा-मुखडा यांच्या मधल्या जागा भरण्यासाठी (इंटरल्युड) म्हणून वाजवलं जातं; पण युरोपमध्ये हे वाद्य प्रामुख्यानं सोलो वाजवलं जातं. कारण, त्याचा आवाका मोठा आहे. हे वाद्य लोकसंगीत म्हणून जन्माला आलं; पण नंतर पाश्‍चात्य शास्त्रीय वादनासाठीसुद्धा त्याचा वापर केला जातो. आपल्याकडच्या शास्त्रीय संगीतात जशी घराणी आहेत, तसेच फ्रान्स, स्कॉटलंड, बल्गेरिया, इटली, आयर्लंड, रशिया, पोलंड, रुमानिया, जर्मनी या देशांमध्ये अकॉर्डियनवादनाचे वेगळे प्रकारे (स्टाईल) आहेत.
***

पियानो-अकॉर्डियन, बटन-अकॉर्डि यन, डायटॉनिक, क्रोमॅटिक, कॉन्सर्टिना असे अकॉर्डियनचे प्रमुख प्रकार आहेत. पियानो-अकॉर्डियन हे हिंदी सिनेसंगीताच्या माध्यमातून भारतात आलं. यात वादकाच्या डाव्या बाजूला असलेल्या बेसबोर्डवरून रिदम नोट्‌स वाजवतात. उजव्या बाजूला (ट्रेबल) हार्मोनिअमसारखा की-बोर्ड असतो. डाव्या बाजूच्या बेसबोर्डच्या कीज्‌ वादकाला दिसत नाहीत. मधला भाता (बेलोज्‌) कमी-जास्त करून हवा भरली-सोडली जाते आणि आवाज कमी-जास्त केला जातो. बास आणि ट्रेबलला ‘स्विच’ असतात, त्यांना ‘कपलर’ म्हणतात. अकॉर्डियनच्या ‘रीड’मधून येणाऱ्या आवाजाचा परिणाम पुरुष आणि स्त्री-गायकांच्या एकत्र आवाजासारखा असतो. गाण्याच्या बोलामधला अभिनय, त्यातले हेलकावे-भाव बेलोच्या माध्यमातून जास्त परिणामकारकरीत्या वाजवून ऑर्केस्ट्राचा अनुभव देणं हे वादकाचं कौशल्य असतं. वैद्य यांनी पाश्‍चात्य पद्धतीनं आणि भारतीय संगीतामध्ये जसं वाजवलं जातं, त्या पद्धतीनं अकॉर्डियन वाजवून दाखवल्यावर फरक लक्षात आला.
***

भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, पाश्‍चात्य संगीत, वेगवेगळ्या प्रदेशांमधली वाद्यं यांचा सुरेख मेळ हिंदी सिनेसंगीतातल्या गाण्यांमध्ये ऐकायला मिळतो. हिंदी सिनेसृष्टीत अकॉर्डियन हे युरोपीय वाद्य आपलंसं करून त्याच्या चपखल उपयोगानं रसिकांचं आयुष्य संगीतमय करणारे बरेच अकॉर्डियनवादक आहेत. गुडी सिरवाई, केरसी लॉर्ड, सुमित मित्रा, इनॉक डॅनियल, अंजन बिस्वास ही त्यातली काही ठळक नावं. ‘इक बेवफा से प्यार किया’ या गाण्यात अकॉर्डियनवादक गुडी सिरवाई हे अगदी थोड्या वेळासाठी पडद्यावर दिसतात. संगीतकार सी. रामचंद्र यांनी ताज हॉटेलमध्ये एकदा या पारशी कलाकाराला चिक चॉकलेट यांच्या ट्रम्पेटसह अकॉर्डियन वाजवताना पाहिलं आणि त्यांनी हे वाद्य आणि वादक यांना हिंदी सिनेसृष्टीत ‘समाधी’ या चित्रपटाच्या संगीताद्वारे आणलं. सन १९५० मध्ये गुडी सिरवाई यांनी प्रथम हिंदी सिनेमांमध्ये अकॉर्डियन वाजवलं. ते गाणे म्हणजे, अमीरबाई कर्नाटकी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ः गोरे गोरे ओ बांके छोरे...!
***

संगीतकार सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, नौशाद, सलिल चौधरी, सचिनदेव बर्मन, ओ. पी. नय्यर यांनी अनेक गाण्यांमध्ये या वाद्याचा सुयोग्य वापर केला आहे. सिनेमांमधल्या काही गाण्यांमध्ये सिनेरसिकांनी अकॉर्डियनवादन पाहिलं असेल. ‘संगम’ सिनेमातल्या ‘हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा’ या गाण्यात राज कपूर अकॉर्डियन वाजवताना दिसतात; पण ते ३४ कीज्‌ असलेलं छोटं अकॉर्डियन आहे. चांगल्या प्रतीच्या अकॉर्डियनचं वजन साधारणतः दहा ते १५ किलो असतं. लहान अकॉर्डियनचं वजन पाच ते आठ किलो असतं. सिनेमांमधली गाणी बघून असा समज होऊ शकतो, की अकॉर्डियन वाजवणं सोपं असतं आणि उभं राहून ते फिरत फिरत वाजवलं जातं! मात्र, सर्वसाधारणतः हे वाद्य बसून वाजवलं जातं. वाजवण्यात  अनेक वर्षांचा रियाज आवश्‍यक असतो.
***

‘अमर अकबर अँथनी’ या सिनेमात ‘अनहोनी को होनी कर दे..’ या गाण्यात विनोद खन्ना यानं हातानं अकॉर्डियन, पायानं झांजा, गुडघ्याला बांधून तालवाद्यं, एका खांद्यावर ब्रास सेक्‍शन, दुसऱ्या खांद्यावर बासरी एवढी वाद्य वाजवली आहेत! अमर हे गाणं म्हणत अकबर आणि अँथनी यांच्याबरोबर नाचतो, तेव्हा त्याच्या गळ्यात ज्या पद्धतीनं अकॉर्डियन लटकत असतं, ते बघून ‘होनी को अनहोनी’ म्हणजे काय हे मला समजलं! सिनेमांमधून काहीही दाखवलं जाऊ शकतं! अशा वेळी साहजिकच ओठावर गाणं येतं ः ‘सच है दुनियावालो, के हम है अनाडी...’! शंकर-जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘जीना यहॉं, मरना यहॉं’ (सिनेमा ः मेरा नाम जोकर) या गाण्यात अकॉर्डियनचा आवाज, त्याचा कमी-जास्त होणाऱ्या आवाजाचा केलेला उपयोग लक्षात राहतो. ‘आवारा हूँ’ या मुकेश यांच्या आवाजातल्या गाण्यात अकॉर्डियन आणि हार्मोनिअम दोन्ही ऐकू येतात. त्यामुळं दोन्ही वाद्यांतला फरक लक्षात येतो. शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांमधल्या वेगवेगळ्या वाद्यांच्या वापराचं श्रेय संगीतसंयोजक सॅबेस्टियन यांना जातं.
***

‘धीरे धीरे चल चॉंद गगन मे’ (सिनेमा ः लव्ह मॅरेज), ‘ए मेरे दिल कहीं और चल’(दाग, संगीतकार ः शंकर-जयकिशन),
‘बेकरार कर के हमें यूँ न जाइए’ (बीस साल बाद, संगीतकार ः हेमंतकुमार ), ‘इक निगाह क्‍या मिली तबीयत मचल गयी’ (हाफ टिकीट, संगीतकार ः सलिल चौधरी), ‘जिंदगी ख्वाब है’ (जागते रहो, संगीतकार ः सलील चौधरी), ‘ए हैरत, ए आशिकी’ (सिनेमा ः गुरू, संगीतकार ए. आर. रहेमान) ही काही गाणी अकॉर्डियनच्या दृष्टिकोनातून ऐकली की ऐकलेल्या गाण्याचा वेगळाच आनंद घेता येतो. सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘रूप तेरा मस्ताना’या ‘आराधना’ सिनेमातल्या गाण्यात केरसी लॉर्ड यांनी अकॉर्डियनमधून प्रणयप्रसंगाचा परिणाम साधला आहे. ही वादनाची पद्धत अनोखी आहे. अकॉर्डियनचा आवाज कमी-जास्त कसा होतो, हे ऐकल्यावर हेच वाद्य इथं का वापरलं, हे लक्षात येते. ‘दिल तो बच्चा है जी’ (सिनेमा ः इश्‍किया, संगीतकार ः विशाल भारद्वाज) या गाण्यातही अकॉर्डियन वाजतं आणि ती धूनसुद्धा सिनेरसिकांच्या ओळखीची आहे. अकॉर्डियन हे अनोखं  वाद्य भारतीय सिनेसंगीतात आणणाऱ्या आणि रुजवणाऱ्या वादकांना नेहमी विचारावंसं वाटतं ः ‘याद किया दिल ने, कहॉं हो तुम...?’

Web Title: suhas kirloskar's article in saptarang