बदला है नूर, बदला है सूर... (सुहास किर्लोस्कर)

बदला है नूर, बदला है सूर... (सुहास किर्लोस्कर)

पाश्‍चात्य संगीतात रूढ असलेला ‘स्केल-चेंज’ हा प्रकार हिंदी सिनेसंगीतात आणण्याचं श्रेय संगीतकार राहुलदेव बर्मन यांना जातं. सिनेमातल्या प्रसंगात दाखवला जाणारा बदल राहुलदेव बर्मन यांनी ‘स्केल-चेंज’ करून संगीताद्वारे अनेकदा साधलेला आहे. ‘या स्केल-चेंज’ प्रकारामुळं पूर्ण गाण्याचा सूर आणि नूर बदलतो.

‘मौ  सम प्यार का रंग बदलता रहे... यूँही चलता रहे प्यार का कारवाँ’ हे ‘सितमगर’ या सिनेमातलं गाजलेलं गाणं (गीतकार ः ‘मजरूह’ सुलतानपुरी). ‘बदलता मौसम’ अर्थात बदलता ऋतू- म्हणजेच इथं उन्हाळा हिवाळा-पावसाळा या ढोबळ अर्थानं - संगीतातून कसा दाखवायचा? तो बदलणार म्हणजे पूर्ण वातावरण बदलेल, पात्रांच्या भावना बदलतील, उन्हाळ्याचं रखरखीत ऊन्ह असेल, तर पावसाळा येऊन सगळीकडं हिरवळ दिसेल...मनोवस्थासुद्धा बदलेल. हे सगळं संगीतामधून दाखवताना संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी दोन कडव्यांनंतर गाण्याची पट्टी (स्केल) बदलली आहे. आशा भोसले आणि किशोरकुमार गाण्याची सुरवात करतात खालच्या स्वरात, हळूच कानात सांगितल्यासारख्या आवाजात आणि शेवटचं कडवं वरच्या पट्टीमध्ये गातात. त्यामुळं या गाण्यात ‘बदलता मौसम’चा परिणाम  संगीतातून साधला आहे. या गाण्यातला तबला आणि गिटारवरचा मिक्‍स रिदम ऐकण्यासारखा आहे.
***

‘सीता और गीता’ या सिनेमात नायक-नायिकेचं (संजीवकुमार-हेमामालिनी) भांडण होतं. एकमेकांना चिडवण्यासाठी ते गाण्यातून ‘कोई लडकी मुझे कल रात सपने मे मिली’ (गीतकार ः आनंद बक्षी) भांडतात. ते लुटुपुटूचं भांडण गाण्याच्या एका कडव्यानंतर संपतं आणि दोघंही एका सुरात गाऊ लागतात ः ‘अरे तुम ही मुझे कल रात सपने में मिली...’ सिनेमातल्या प्रसंगात झालेला हा बदल संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी ‘स्केल-चेंज’ करून साधला आहे. त्यामुळं पूर्ण गाण्याचा सूर आणि नूर बदलतो. पाश्‍चात्य संगीतात रूढ असलेला ‘स्केल-चेंज’ हा प्रकार हिंदी सिनेसंगीतात आणण्याचं श्रेय राहुलदेव बर्मन यांना जातं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेल्या ‘पडोसन’ या सिनेमातल्या ‘मै चली मै चली’ या गाण्यात शेवटच्या कडव्यापूर्वी गाण्याची पूर्ण पट्टी बदलते आणि ते कडवं वरच्या स्वरात गायलं जातं. कडव्यापूर्वी अकॉर्डियनमधून स्केलबदलाला सुरवात होते. गाण्याची स्केल म्हणजे काय हे गंमत म्हणून बघायचं असेल, तर ‘पडोसन’मध्ये गुरू (किशोरकुमार) भोलाला (सुनील दत्त) गायला शिकवतो, तो धमाल प्रसंग बघण्यासारखा आहे.
***

स्केल-चेंज म्हणजे गाण्याच्या स्वरांचा पूर्ण समूह पुढं किंवा मागं नेऊन ठराविक अंतर बदलून गाणं. गायक गाण्याच्या ठराविक स्केलला (पट्टी) प्रमाण मानून सगळे स्वर लावतो. त्यामुळं किशोरकुमार आणि आशा भोसले गात असतील, तर ते दोघांना मान्य असलेल्या पट्टीमध्ये गात पुढचं मार्गक्रमण करतात. स्केल बदलताना पुढचा स्वर म्हणजे ‘रे’ किंवा ‘ग’ ला ‘सा’ मानून पुढचं गाणं गायलं जातं. म्हणजे पहिल्या पायरीपासून एक न मोजता दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीला एक मानून मोजायला सुरवात करायची. त्यामुळं पुढच्या सगळ्या पायऱ्यांचे क्रमांक बदलतील. सगळी गणितं बदलतील.
***

संगीतकार ए. आर. रहमान यांनीसुद्धा स्केल-चेंजचा वापर ‘पुकार’ (अनिल कपूर-माधुरी दीक्षित) या सिनेमातल्या गाण्यात प्रसंगानुसार केला आहे. ‘के सिरा सिरा’ याचा अर्थ ‘जो भी हो सो हो’ म्हणजेच ‘कशाला उद्याची बात’. शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गाणं माधुरी दीक्षित आणि प्रभू देवा यांच्या नृत्यासाठी बघण्यासारखं आहे. नायिका माधुरी दीक्षितचं नायक अनिल कपूरवर प्रेम आहे. त्यामुळं ती प्रेम म्हणजे काय हे सांगते आणि तिच्याबरोबर नृत्य करताना प्रभू देवा सांगतो ः ‘कभी किसी से प्यार न करना’. गाण्यातला प्रेमाबाबतचा हा वाद कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी फार सुंदररीत्या शब्दबद्ध केला आहे. ‘प्रेमासाठी वाट्टेल ते करू,’ असं नायिका म्हणत असते. तिला तिच्या प्रियकराशिवाय काहीच दिसत नसतं. तेव्हाच दुसऱ्या कडव्यानंतर अजून एका नायिकेचं - नम्रता शिरोडकर हिचं- आगमन होतं. स्पर्धक आल्यावर माधुरीच्या प्रेमाच्या भावनेची जागा असूया घेते. मूड बदलल्यावर गाण्याचं स्केल बदलतं. सगळ्यांचा फोकस बदलतो. प्रेक्षकांनाही असं वाटतं, की हा माधुरीला सोडून दुसरा विचार का करत आहे? स्केल-चेंज ही एक सांगीतिक कल्पना प्रसंगानुसार कशी वापरली जाते, हे महत्त्वाचं असतं.
***

स्केल-चेंजमधलं एक गाणं ऐकलं, की हा प्रकार काय आहे, हे लगेच समजतं. ‘कारवाँ’ या सिनेमात नायिका फसलेली आहे. अशा वेळी गाणं गावं लागत असेल तर एका स्केलमध्ये गायन कसं होईल? अशा प्रसंगाला अनुसरून राहुलदेव बर्मन यांनी अनोखा प्रयोग केला आहे. प्रत्येक ओळीला स्केल-चेंज! आशा भोसले यांनी अप्रतिमरीत्या गायलेलं हे गाणं आहे ः ‘दैय्या मै कहाँ आ फसी, कैसी फसी । रोना आवे ना आवे हसी, पापे बचा लो तुस्सी’. हीच ओळ परत गाताना आशा भोसले वरच्या स्वरात गातात. कडवं गाण्याच्या मूळ स्वरामध्ये, मुखडा परत आला की पुन्हा स्केल-चेंज. हे गाणं गायला अवघड आहे, त्यामुळं सहसा कोणत्याही जाहीर कार्यक्रमात हे गाणं गायचं धाडस कुणी करत नाही. आपल्यासारख्यांनी हे गाणं गायचा प्रयत्न केल्यास आशा भोसले यांची महती कळते आणि त्यांना आपोआपच मानाचा मुजरा केला जातो.
***

यानिमित्तानं भारतीय शास्त्रीय संगीतामधल्या ‘मूर्च्छना’ या तत्त्वाची ओळख करून घेता येईल. मूर्च्छना या तत्त्वानुसार गात असलेल्या एका रागाच्या षड्‌जाव्यतिरिक्त त्या रागाच्या दुसऱ्या स्वराला जर ‘सा’ मानलं आणि त्याच रागाचे स्वर गात राहिलं, तर एखादा वेगळा राग निघू शकतो. तो प्रत्येक वेळी निघेल असंही नाही; पण या मूर्च्छना-तत्त्वामुळं अनेक रागांची निर्मिती झाली असावी. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे ‘जसरंगी जुगलबंदी’. हा अनोखा गायनप्रकार शास्त्रीय गायिका अश्‍विनी भिडे-देशपांडे आणि शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर गातात, तेव्हा गायक किंवा गायिका स्वतःची स्वरपट्टी न बदलता आपापल्या स्वरात गातात. पुरुष आणि स्त्री यांची नैसर्गिक गाण्याची स्केल वेगवेगळी असते. साधारणपणे स्त्रियांचा मध्यम हा पुरुषाचा षड्‌ज असतो. गायिका जो राग गाते, तोच राग वरच्या स्केलमध्ये गायकानं गायला तर त्याच स्वरसमूहाचा दुसरा राग होतो. त्यामुळं चलन एकच असलं तरी दोन राग गायले जातात. स्त्री जो राग गाते, त्याच्या मध्यमातून जर दुसरा राग निघत असेल, तर तो राग पुरुष गाऊ शकतो आणि ते स्वर एकच असल्यामुळं एकमेकांना छेद देत नाहीत आणि एकत्र गायनाचा वेगळाच प्रभाव निर्माण होतो. शुद्ध धैवताचा.
ललत हा राग गायिका गात असेल तर या रागाच्या मध्यमाला गायकानं षड्‌ज मानल्यावर राग पूरिया धनाश्री होतो. दुर्गा रागाच्या मध्यमाला सा मानलं तर भूप राग होतो. अशा प्रकारे अश्‍विनी भिडे-देशपांडे या गात असलेल्या चंद्रकंस रागाच्या मध्यमाला संजीव अभ्यंकर षड्‌ज मानून गायला सुरवात करतात, तो राग मधुकंस होतो. सवाई गंधर्व महोत्सवात ऐकलेली अशा प्रकारची ‘जसरंगी जुगलबंदी’ संस्मरणीय होती. तांत्रिक तपशील समजला नाही तरीही गायनाचा हा प्रकार वेगळा श्रवणानंद देतो. माहिती घेऊन संगीत ऐकलं, तर वेगळीच अनुभूती मिळते.
‘जसरंगी जुगलबंदी’बद्दलची सविस्तर माहिती पंडित संजीव अभ्यंकर यांनी समजावून सांगितली, त्याबद्दल त्यांचे आभार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com