अशी बोलते माझी कविता (सुमन किराणे)

सुमन किराणे, ९८५०० ९२६७६, मुपो ः हेरले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
रविवार, 19 मार्च 2017

पाऊलवाटा

पाऊलवाटा
कुशीत हिरवळ घेऊन झाडा-झुडपांमधून
शेताकडं जाणाऱ्या
काटेरी बोरी-बाभळीतून
रानावनात जाणाऱ्या

डगर उतरत, गाळात रुतत
नदीकडं जाणाऱ्या
वेडी-वाकडी वळणं घेत
डोंगरावर जाणाऱ्या

ढोरा-गुरांना चरायला
कुरणात नेणाऱ्या
दमल्या-भागल्या जिवांना
घराकडं घेऊन येणाऱ्या

सरळ, वेड्या-वाकड्या, मऊ, खडकाळ
उन्हात तापलेल्या, सावलीतल्या थंडगार
काळ्या, भुऱ्या, लाल...

पाऊलवाटा

पाऊलवाटा
कुशीत हिरवळ घेऊन झाडा-झुडपांमधून
शेताकडं जाणाऱ्या
काटेरी बोरी-बाभळीतून
रानावनात जाणाऱ्या

डगर उतरत, गाळात रुतत
नदीकडं जाणाऱ्या
वेडी-वाकडी वळणं घेत
डोंगरावर जाणाऱ्या

ढोरा-गुरांना चरायला
कुरणात नेणाऱ्या
दमल्या-भागल्या जिवांना
घराकडं घेऊन येणाऱ्या

सरळ, वेड्या-वाकड्या, मऊ, खडकाळ
उन्हात तापलेल्या, सावलीतल्या थंडगार
काळ्या, भुऱ्या, लाल...

अशा कितीतरी पाऊलवाटांवरून
कधी चालायचं, कधी धावायचं
कधी नाचायचं, कधी बागडायचं
कधी धापा टाकायच्या, कधी हसायचं
कधी मध्येच कुठंतरी
गप्पागोष्टी करत बसायचं...

कधी याच वाटांवर चिंचा-आवळे खायचे
कधी करवंदं-बोरं चाखायची
पूर्वी या पाऊलवाटांशी
काही वेगळीच जिव्हाळ्याची नाती असायची

आज धकाधकीचे आणि पळापळीचे
दिवस आलेत
आणि या पाऊलवाटा, त्यांच्यावरचे ठसे
खडी-डांबर-सिमेंटखाली गडप झालेत

आता वेगाकडं जीव गहाण ठेवून
मोठमोठ्या रस्त्यांवरून धावताना
मन जातं नकळत गतकाळाच्या पाऊलवाटेवर...
आणि विचारतं ः
‘आज दिसेल का तेव्हासारखी
अशी मनात जपून ठेवलेली
एखादी तरी पाऊलवाट?’

Web Title: suman kirane write poem in saptarang