'ये, बयो...ये!' (सुनंदा भावसार)

sunanda bhavsar
sunanda bhavsar

"म्हातारीला जाऊन आता लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. म्हातारी असली खाष्ट की कावळादेखील शिवला नव्हता तिच्या पिंडाला!' रूपालीच्या मनात सासूविषयी असा विचार आला. त्या विचारातच हातातल्या किल्लीनं रूपालीनं घराचं दार उघडलं. दाराशेजारचं ट्यूबलाईटचं बटण दाबलं आणि...

"दादा, तेवढं जमलं का बघ ना रे! ऑडिओ आणि लेसर व्हिडिओचा ताळमेळ व्यवस्थित बसतोय ना?''
"अगं हो, काम हट के झालंय. त्यात काय एवढं? तुला म्हणालो ना, माझं रोजचंच काम आहे ते. बाकी उद्या बघू. तू आता घाई कर. आवर. कारण, एकदा का पिक्‍चरची सुरवात गेली ना तर मग मजा नाही येणार.''
दीपाचं आणि प्रसादचं हे संभाषण सुरू होतं तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. दीपा कपडे बदलायला आत गेली आणि प्रसादनंही त्याच्या उपकरणांची आवराआवर करायला सुरवात केली. आज शनिवार म्हणून या सख्ख्या बहीण-भावाचा सिनेमाला जायचा बेत होता.
तसं पाहायला गेलं तर या दोन्ही भावंडांचं घरात अजिबात पटायचं नाही. एकमेकांची टिंगलटवाळी करायला आणि वाद घालायला कुठलंही कारण पुरायचं. अपवाद मात्र फक्त दोन गोष्टींचा. सिनेमा आणि वैज्ञानिक प्रयोग. या दोन्ही गोष्टींची दोघांनाही प्रचंड आवड. प्रसाद नुकताच पीएच.डी होऊन एका विख्यात संशोधन संस्थेत रुजू झालेला, तर दीपाचं एमएस्सीचं शेवटचं वर्ष. तिच्याच एका प्रोजेक्‍टमध्ये आज दोघंही दिवसभर डोकं घालून बसले होते. दिवस कसा गेला हे दोघांनाही कळलं नव्हतं आणि म्हणून आता ही घाई...
***

पुढच्या दहाच मिनिटांत दोघंही आवराआवर करून सिनेमाला जाण्यासाठी तयार झाले आणि घराला कुलूप लावून गेलेही. समोरच्या खोलीतली ट्यूबलाईट बंदच होती. कारण, त्याच प्लगमध्ये दीपानं ती करत असलेल्या प्रोजेक्‍टच्या उपकरणाची पीन खोचून ठेवलेली होती.
दीपा-प्रसाद या भावंडांचं हे घर तसं गावापासून दूर, शेतातच होतं आणि ऐसपैस जरी असलं तरी जुन्या प्रकारचं होतं. अलीकडंच्या काळात शहराच्या सीमा वाढता वाढता थेट इथपर्यंत येऊन भिडल्या होत्या आणि दूरपर्यंत नव्या बांधकामांना वेग आला होता, हा भाग वेगळा.

दीपा-प्रसादचे वडील व्यवसायानिमित्त बहुतकरून बाहेरच असत; पण वडिलोपार्जित जागेवर त्यांच्या आजीनं मात्र शेती-पोल्ट्रीफार्म असा बराच पसारा वाढवलेला होता. म्हातारी काही शिकलेली नव्हती; पण डोक्‍यानं मात्र तल्लख. दांडगा जनसंपर्क, माणसं टिकवून ठेवण्याची व त्यांच्याकडून काम करवून घ्यायची हातोटी आणि अचूक व्यवस्थापन यांचं ती उत्कृष्ट उदाहरण होती. आयुष्यभर राब राब राबून खस्ता खाल्लेल्या. स्वभाव जात्याच कडक. त्यामुळं सून रूपाली - दीपा-प्रसादची आई - हिच्याशी मात्र तिचं कधीच पटलं नव्हतं; पण नातवंडांवर मात्र म्हातारीचा भारी जीव. साहजिकच आहे, तिच्याच देखरेखीखाली ते दोघं वाढले होते. दोघांनाही योग्य ते वळण लागलं होतं ते आजीमुळंच. रूपाली मात्र आठवड्याकाठी होणाऱ्या किटी पार्टीज्‌मध्ये मग्न असायची. ना शिक्षणाची आवड, ना वाचन-लेखनासारखा कुठला छंद. नोकरांवर हुकूमत गाजवणं मात्र तिला फार आवडायचं!

आत्ताही ती मैत्रिणींबरोबर लोणावळ्याला कुठल्याशी रिसॉर्टवरच गेलेली होती. तीन दिवसांची सहल. मात्र, एका मैत्रिणीच्या घरी अचानक उद्भवलेल्या काही कारणामुळं सगळ्याच मैत्रिणींना सहल आटोपती घ्यावी लागली होती. त्यांची मोटार रूपालीला तिच्या घराच्या फाटकापर्यंत सोडून गेली होती, तरी ती मात्र चिडलेलीच होती. कारण, दीपा किंवा प्रसाद दोघांचाही फोन लागत नव्हता. दीपा प्रोजेक्‍टमध्ये गर्क असल्यानं तिच्या मोबाईल फोनची बॅटरी पूर्णतः डाऊन होती, तर प्रसादचा फोन आऊट ऑफ कव्हरेज! रात्रीची बारा-साडेबाराची वेळ. बाहेर मिट्ट काळोख. पर्समधली किल्ली घेऊन रूपालीनं चाचपडतच फाटक उघडलं. प्रत्येकाजवळ घराची एक किल्ली असावी, हीसुद्धा म्हाताऱ्या सासूचीच शिकवण. चौघांजवळ चार किल्ल्या ती कायम ठेवायला लावायची. वेळी-अवेळी कुणी कुठं बाहेर गेलं तरी घर उघडता आलं पाहिजे. अशा एक ना हजार चांगल्या गोष्टी शिकवून म्हातारी मात्र अचानकच गेली होती. तिच्या मृत्यूला आता बघता बघता एक वर्ष पूर्ण होईल...रूपालीच्या मनात विचार आला.

विचार सुरू झाले की मग साध्या सावल्यांमध्येही मन आकार शोधायला लागतं!
फाटकापासून घरापर्यंतचं अंतर भरपूर होतं आणि पाऊस येण्याअगोदरच्या कुंद वातावरणात रातकिड्यांचा आवाज आणि दूर कुत्र्यांचं विव्हळणं आणखीच भीतिदायक वाटत होतं. "आज अमावास्या की काय?' रूपाली स्वतःशीच पुटपुटली. कारण, चंद्रप्रकाश असता तर निदान पायाखालची वाट दिसेल एवढा तरी उजेड जाणवला असता. रूपालीला आपल्या सासूचा पुन्हा एकदा संताप आला. गावाबाहेर एवढा फापटपसारा वाढवून ठेवण्यापेक्षा शहरातच एक ऐसपैस, मस्त फ्लॅट घेतला असता तर! हे असं रात्री-बेरात्री एकटं येताना अशी भीती तरी वाटली नसती...एकाकीपणा जाणवला नसता. विधवा सासूनं केलेली कर्तबगारी मानायला रूपालीचं मन अजूनही तयार नव्हतं. जेवढी बुद्धीची झेप, तेवढंच कळणार ना!
"म्हातारीला जाऊन आता लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. म्हातारी असली खाष्ट की कावळादेखील शिवला नव्हता तिच्या पिंडाला!' रूपालीच्या मनात विचार आला. त्या विचारातच हातातल्या किल्लीनं रूपालीनं घराचं दार उघडलं. दाराशेजारचं ट्यूबलाईटचं बटण दाबलं आणि...आणि ती एकदम दचकलीच! कारण, समोरच्याच खुर्चीवर म्हाताऱ्या सासूचं ध्यान बसलेलं होतं. तेच ते जुनकट पांढरं पातळ, काड्यांसारखे बारीक हात आणि तीच भेदक, तीक्ष्ण नजर...!

'ये, बयो... ये! कुठं गेली होतीस? मी तुझीच वाट पाहात होते'' दोन्ही हात पुढं करून म्हातारी म्हणत होती. घाबरलेल्या मनःस्थितीत हे शब्द अचानक कानावर पडताच रूपालीनं जोराची किंकाळी फोडली. जागेवरच तिची शुद्ध हरपली.
बाहेर गाडी येऊन थांबली. दीपा-प्रसादनं आईचा आवाज ऐकलाच होता.
'अरे, आई उद्या येणार होती ना? आज कशी परतली?'' प्रसाद धावतच घराच्या दारापर्यंत पोचला आणि खुर्चीवर बसलेल्या आजीकडं बघतच राहिला.
"ये, बयो...ये, कुठं गेली होतीस? मी तुझीच वाट पाहत होते...' आवाज घुमला आणि क्षणात खरा प्रकार दीपा-प्रसादच्या लक्षात आला. आपली आई आपल्या पायाशी बेशुद्ध होऊन पडली आहे, हेही दोघांना जाणवलं. प्रसाद पाणी आणायला चटकन आत धावला, तर दीपानंही उपकरणाची पिन काढून ट्यूबलाईट लावली.
***

चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा होताच शुद्धीवर आलेली रूपाली अजूनही भेदरून समोरच्या रिकाम्या खुर्चीकडंच पाहत आहे, हे लक्षात येताच प्रसादला हसू आवरेनाच! तशी दीपाही वरमून म्हणाली ः 'सॉरी आई, तू घाबरलीस... पण मागं मीच आजीची एक व्हिडिओ क्‍लिप करून ठेवली होती. तिचाच वापर करून दादानं आणि मी माझ्या प्रोजेक्‍टसाठी लेसर किरणांचा "होलोग्राफ' तयार केला होता आणि तुझ्याकडून अचानक तेच बटण दाबलं गेलं...हो ना?''
काहीच कल्पना नसताना एकदम अशी मनुष्याकृती समोर आल्यावर कुणीही घाबरणं साहजिकच आहे आणि त्यातही ज्यांच्याशी कायमच वाकडं होतं, अशा दिवंगत सासूबाईंची आकृती समोर आल्यावर रूपाली घाबरली यात नवल ते काय?
प्रसाद नव्या पिढीतला मुलगा होता. आईला समजावण्याची हीच वेळ आहे, हे त्यानं ओळखलं. तो शांतपणे रूपालीकडं पाहत म्हणाला ः 'आई, तू कधी आजीला समजून घेतलंच नाहीस. तुझ्या मनात तिच्याविषयी गैरसमज आणि आकसच खूप आहे, हे आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहोत. आजोबांच्या नंतर एकटी असूनही आजी कधी डगमगली नाही. अशिक्षित असूनही तिनं बाबांच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली. शेती-पोल्ट्रीफार्म वाढवून आर्थिक बाबतीतच नव्हे, तर सगळ्याच बाबतीत तिनं आपल्याला चांगला सपोर्ट दिला. तुझ्या जागी आत्ता इथं बाबा असते आणि त्यांना आजी अशी अनपेक्षितपणे दिसली असती तर त्यांची रिऍक्‍शन नक्कीच वेगळी झाली असती...''

प्रसाद योग्य तेच बोलत होता...जसे संबंध राखले जातात, तसाच प्रतिसादही असतो. आपण प्रतिसाद देतो तेव्हा विचार करून ती क्रिया घडते. दृश्‍य पाहिल्यावर आधी मेंदूपर्यंत संकेत जातो. मेंदूत त्यावर प्रक्रिया होते आणि नंतर उत्तर दिलं जातं; पण जिथं अज्ञान असतं, मनात भय असतं तिथं मेंदूपर्यंत संकेत जातच नाही. मग विचार करून प्रतिसाद देणं दूरच... तिथं घडते ती केवळ प्रतिक्षिप्त क्रिया! म्हणूनच "मृत पावलेली व्यक्ती आपल्याला परत कशी काय दिसू शकते आणि आपल्याशी बोलू कशी काय शकते,' याबाबतचा सारासार विचारच रूपाली करू शकली नव्हती.
प्रसादनं जे काही सांगितलंय ते बरोबरच आहे, हे रूपालीनं मनोमन समजून घेतलं आणि हे आईला सांगण्यात आजीबद्दलचा आदर ही भावना तर प्रसादच्या मनात होतीच; पण भविष्यात आईनंही आजीसारखंच सगळ्या गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे, अशी अपेक्षाही होती...
...आणि रूपालीलासुद्धा आता हे चांगलंच उमगलं होतं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com