धमाका मिनी वर्ल्डकपचा (सुनंदन लेले)

रविवार, 4 जून 2017

आठ देशांच्या क्रिकेट संघांचा समावेश असणारी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे आणि आज (रविवार) होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडं दोन्हीही देशांतल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजवरच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धांतल्या रंगतदार क्षणांचं स्मरणरंजन.

आठ देशांच्या क्रिकेट संघांचा समावेश असणारी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे आणि आज (रविवार) होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडं दोन्हीही देशांतल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजवरच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धांतल्या रंगतदार क्षणांचं स्मरणरंजन.

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलला (आयसीसी) आपला रुबाब वाढवण्यासाठी; तसंच क्रिकेटच्या प्रसारासाठी पैसा जमा करण्याकरता मोठ्या स्पर्धा भरवण्याची गरज होती. मुख्य विश्‍वकरंडक लोकांच्या पसंतीला पडला होता; परंतु तो दर चार वर्षांनी होत असल्यानं मोठा खंड पडत होता. याच कारणानं आयसीसीनं चॅंपियन्स करंडक स्पर्धा भरवण्याचा घाट घातला. मुख्य वर्ल्ड कप स्पर्धेत कसोटी खेळणारे संघ सोडूनही काही संघांना पात्रता फेरी पार करून प्रवेश मिळतो. चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकदिवसीय मानांकनात पात्र ठरणाऱ्या मोजून आठ संघांना प्रवेश मिळतो. साहजिकच ही स्पर्धा जरा जास्त आक्रमक असते. प्रत्येक सहभागी संघाला तीनच साखळी सामने खेळायला मिळतात आणि लगेच उपांत्य फेरी होते. १९९८मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा भरवली गेली तेव्हा तिचं नाव प्रायोजकाच्या नावानं चालू होणारं होतं. २०००पासून आयसीसीनं स्वत:चं नाव लावणं चालू केलं.  

तसं बघायला गेलं, तर आठवी चॅंपियन्स करंडक स्पर्धा एक जूनपासून सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांकरता मात्र स्पर्धेला खरी सुरवात आजपासून म्हणजेच चार तारखेपासून (रविवार) होत आहे. कारण सरळ साधं आहे...भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चार जूनला बर्मिंगहॅमच्या एजबास्टन मैदानावर रंगणार आहे. १९९८पासून भरवल्या गेलेल्या सर्व चॅंपियन्स करंडक स्पर्धांचं वार्तांकन करायची मला संधी मिळाली, म्हणून डोळ्यासमोरून झाल्या स्पर्धांमधल्या रंगतदार क्षणांचा फ्लॅशबॅक धावतो आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा उपवास सुटला
१९९८च्या पहिल्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा आयसीसीनं भरवलेल्या स्पर्धांतल्या अपयशाचा उपवास सुटला. बांगलादेशात झालेल्या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात फिलो वॉलेसनं बहारदार शतक ठोकूनही वेस्ट इंडीजला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तगड्या दक्षिण आफ्रिकन संघानं त्याचाच फायदा घेत विजयाकरता गरजेच्या धावा शांतपणे चोपून काढल्या होत्या. विजयात मुख्य वाटा कर्णधार हॅन्सी क्रोनिएच्या नाबाद अर्धशतकाचा होता. ज्या क्रोनिएनं संघाला विजय मिळवून दिला, तोच क्रोनिए पुढच्या सहा महिन्यांत सामनानिश्‍चिती प्रकरणात गुंतल्याचं समजलं, तेव्हा मनोमन धक्का बसला होता. 
ख्रिस केर्न्सनं सामना हिरावून नेला
केनियात झालेल्या दुसऱ्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघानं पहिली फलंदाजी करताना २६४ धावांचा भक्कम फलक उभारला होता. सौरव गांगुलीनं शतक, तर सचिन तेंडुलकरनं अर्धशतक करताना १४१ धावांची जबरदस्त सुरवात करून दिली होती. दुर्दैवानं मधल्या फळीतील फलंदाजांना हाणामारीच्या षटकात मोठे फटके मारणं जमलं नव्हतं. गोलंदाजांनी किवी फलंदाजांना चांगलं रोखलं होतं. ५ बाद १३२ धावसंख्येवर सामना भारताकडं झुकायला लागला असताना ख्रिस केर्न्सला ख्रिस हॅरिस येऊन मिळाला. दोघांनी शतकी भागीदारी रचून भारताच्या आशांना धुळीत मिळवलं. अष्टपैलू केर्न्सनं नाबाद शतक काढत संघाला विजयी केलं. दोन स्पर्धांत दोन नवे विजेते आयसीसीला लाभले होते.

मानाची जागा मिळाली
२००२मध्ये श्रीलंकेत झालेल्या चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन आशियाई संघांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. मला एक प्रसंग आठवतो. स्पर्धा शेजारी देश श्रीलंकेत असल्यानं भारतातून बरेच पत्रकार स्पर्धेचं वार्तांकन करायला श्रीलंकेत गेले होते. आयसीसीचा माध्यम अधिकारी ते बघून चपापला होता. त्यानं आम्हाला सगळ्यांना बोलावून सांगितलं होतं, की आयसीसीच्या नियमांनुसार ज्या दोन देशांदरम्यान सामना चालू असेल, त्या देशांच्या पत्रकारांना पत्रकार कक्षात बसायला प्राधान्य दिलं जाईल. त्याला म्हणायचं होतं, की नुसतं यजमानपद असून किंवा जास्त संख्येत पत्रकार आले म्हणून श्रीलंका आणि भारतीय पत्रकारांना प्राधान्य मिळणार नाही. झालं उलटंच. श्रीलंका आणि भारतीय संघानं समोर आलेल्या संघांचा पाडाव करत अंतिम फेरी गाठली. अर्थातच बाकीचे पत्रकार साध्या स्टॅंडमध्ये बसले आणि श्रीलंकेच्या आणि भारताच्या पत्रकारांना पत्रकार कक्षात मानानं जागा द्यावी लागली. 

त्या स्पर्धेदरम्यान सेहवागनं एक मजेदार किस्सा सांगितला होता. सचिन तेंडुलकरसोबत सेहवाग त्या स्पर्धेत सलामीला जायचा, तेव्हा फलंदाजी करताना तो हुबेहूब सचिनसारखाच दिसायचा. सेहवाग म्हणाला होताः ‘‘फलंदाजीला गेल्यावर सुरवातीला माझा अहंकार दुखावला- कारण सलामीला दोन फलंदाज मैदानात उतरलेले असले, तरी समोरच्या संघाची शंभर टक्के ऊर्जा फक्त सचिन तेंडुलकरला बाद कसं करायचं यावर लागलेली दिसायची. मला राग आला त्याचा. म्हणजे मी कोणीच नाही का?...मग मी वेगळा विचार केला. सगळं लक्ष सचिनकडं आहे, तर दुसऱ्या बाजूनं मला धावांची बॅंक लुटायची नामी संधी असल्याचं माझ्या लक्षात आलं. मनातून मी मोकळा झालो आणि बेधडक फलंदाजी करू लागलो; पण अंतिम सामन्याचा मला राग आला. लागोपाठ दोन दिवस आम्ही पूर्ण पन्नास षटकांची फिल्डिंग केल्यावर पाऊस आला होता...खेळणं फुकट गेल्याची भावना लहानपणाप्रमाणं मला वाटली होती.’’ अंतिम सामन्याच्या वेळी पाऊस पडला. सामना दुसऱ्या दिवशी परत भरवला गेला, तेव्हा श्रीलंकेची फलंदाजी झाल्यावर परत पाऊस आला. परिणामी भारत- श्रीलंकेला संयुक्त विजेतेपद द्यावं लागलं.

सर्वात कमाल अंतिम सामना
२००४मध्ये इंग्लंडमधे झालेली चॅंपियन्स करंडक स्पर्धा अंतिम सामन्यातल्या नाट्यानं गाजली होती. यजमान इंग्लंड संघाचा मुकाबला ओव्हल मैदानावर वेस्ट इंडीजबरोबर रंगला होता. अंतिम सामन्याची विकेट काहीशी गोलंदाजांना मदत करणारी होती. मार्क्‍स ट्रिस्कोथिकनं शानदार शतक केल्यानं इंग्लंडला २१७ धावांचा पल्ला गाठता आला होता. फ्लिंटॉफनं जबरदस्त गोलंदाजी करताना रामनरेश सरवान, ब्रायन लारा आणि ड्‌वेने ब्राव्होला बाद केलं होतं. चिवट चंदरपॉल बाद झाल्यावर विंडीजची अवस्था ८ बाद १४७ अशी केविलवाणी झाली. 

इंग्लंड बोर्डाचे अधिकारी विजयानंतर फोडायची ती शॅंम्पेन बर्फावर ठेवायला लागले. इंग्लिश पत्रकारांना मनोमन गुदगुल्या व्हायला लागल्या. कोर्टनी ब्राऊन आणि इयन ब्रॅडशॉच्या मनात वेगळे विचार होते. दोघांनी अत्यंत धीरानं खिंड लढवत धावांचा पाठलाग चालू ठेवला. इंग्लंड कर्णधारानं सर्व उपाय करून बघितले. ज्या खेळपट्टीवर लाराची डाळ शिजली नाही, तिथं ब्राऊन- ब्रॅडशॉची जोडी जमली. काही केल्या जमलेली जोडी तोडणं गोलंदाजांना जमेना. ओव्हल मैदानावर काळे ढग जमून आले. विजयाकरता अजून तीस धावा करायच्या बाकी होत्या. पंचांनी फलंदाजांना ‘काय करायचं’ असं विचारलं. दोघा फलंदाजांनी एकमुखी खेळ चालू ठेवायचा निर्णय घेतला. चांगल्यापैकी कमी प्रकाशात ब्राऊन- ब्रॅडशॉ जोडीनंच विजयी धावा पूर्ण केल्या. वेस्ट इंडीजचे खेळाडू ब्राऊन- ब्रॅडशॉला खांद्यावर उचलून न्यायला मैदानात धावत आले, तेव्हा इंग्लंड संघाचे खेळाडू निराशेनं मटकन्‌ मैदानात बसले. 

त्या विजयाच्या बक्षीस समारंभानंतर विंडीज संघाचा प्रशिक्षक गस लोगीनं मला चक्क ड्रेसिंग रूममध्ये नेलं होतं. विंडीज संघाच्या खेळाडूंनी आनंदानं बेभान होत करंडकाभोवती केलेला खास कॅरेबियन नाच मला बघायला मिळाला होता. कर्णधार ब्रायन लाराच्या डोक्‍यावरची शॅंपेननं भिजलेली टोपी त्यानं मला सही करून दिली- जी आजही मी घरी जपून ठेवली आहे.  

कांगारूंची दादागिरी
पुढील दोन स्पर्धांवर ऑस्ट्रेलियानं मोहोर उमटवली. २००६मध्ये भारतात स्पर्धा झाली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम ऑसी वेगवान गोलंदाजांनी विंडीज फलंदाजांची दाणादाण उडवली. वेस्ट इंडीजचा डाव १३८ धावांवर गुंडाळल्यावर ऑसी फलंदाजीला सुरवातीला पावसानं व्यत्यय आणला. अगोदरच सुमार आव्हान होतं- ते अजून सोपं झालं. शेन वॉटसन आणि डेमियन मार्टिननं गरजेच्या धावा काढून संघाला पहिल्यांदा करंडकावर नाव कोरायला मदत केली.
२००९मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा स्पर्धा भरवली गेली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला दोनशे धावांवर रोखल्यावर परत एकदा शेन वॉटसननंच शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. लागोपाठ दोन स्पर्धा ऑस्ट्रेलियानं जिंकल्या- ज्यात मानकरी शेन वॉटसन ठरला.

भारताचं पुनरागमन
२०१३ चॅंपियन्स करंडक स्पर्धेअगोदर भारतीय क्रिकेटमध्ये वादळ आलं होतं. आयपीएल स्पर्धेला स्पॉट फिक्‍सिंगचं गालबोट लागलं होतं. भारतीय संघ काहीशा अस्वस्थ मनानं इंग्लंडला आला होता. निराशा आणि वादांच्या भोवऱ्यातून बाहेर यायला एकच राजमार्ग असल्याचं कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं संघाला सांगितलं. तो राजमार्ग होता चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळण्याचा. धोनीनं संघाला प्रोत्साहन देत तेच करायला लावलं. दणदणीत खेळ करत दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेसारख्या चांगल्या संघांना भारतीय संघानं पराभूत केलं. 
अंतिम सामन्याच्या वेळी पावसाचा व्यत्यय आला. वेळेअभावी सामना २०-२० षटकांचा करण्यात आला. समोर इंग्लंडचा यजमान संघ होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना कठीण गेलं. संपूर्ण स्पर्धेत तुफान फलंदाजी करणारा शिखर धवन, विराट कोहली आणि जडेजाला चांगला खेळ करता आला. १२९ धावांचा बचाव करणं धोनीकरता सोपं नव्हतं; तसंच अशक्‍यही नव्हतं. कारण टी-२० प्रकारात तो ‘मास्टर’ होता. धोनीनं हळूहळू दडपणाचा बोजा इंग्लंडच्या फलंदाजांवर वाढवत नेला. ईशांत शर्मानं मॉर्गन- बोपाराची जमलेली जोडी लागोपाठ बाद केली, तिथंच सामना फिरला. जडेजा-आश्‍विननं फारच अचूक मारा केला. भारतानं सामना पाच धावांनी जिंकून कमाल केली. सामना संपल्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देणाऱ्या धोनीनं मूठ आवळत ओरडून मन मोकळं केलं. भारतानं दुसऱ्यांदा चॅंपियन्स करंडकावर नाव कोरलं. 

यंदा कोण बाजी मारणार?
कुंबळे- कोहली वादाला तोंड फुटलं असलं, तरी जाणकार भारतीय संघाला कमी लेखत नाहीयेत. यजमान इंग्लंड संघ, मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमी चांगला खेळ करणारा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल, असा बऱ्याच जणांचा अंदाज आहे. आज भारत-पाकिस्तान लढतीने बर्मिंगहॅमचं वातावरण पेटणार आहे. शेकोटीजवळ बसल्यावर मस्त धग लागते, तसं पत्रकार कक्षात बसून मी क्रिकेटच्या शेकोटीची ऊब कशी असते याचा अनुभव घेणार आहे.