खेळ सभ्यतेचा? (सुनंदन लेले)

sunandan lele write article in saptarang
sunandan lele write article in saptarang

चेंडूची स्थिती बदलण्याचा (बॉल टॅंपरिंग) प्रकार उघडकीस आल्यामुळं ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू अडचणीत आले आहेत. कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि प्रत्यक्ष हे कृत्य करणारा खेळाडू कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमांतून क्रिकेटमधल्या सभ्यतेचे वाभाडे निघत होतेच, त्याची परिणती या प्रकरणात झाली आहे. मात्र, एकूणच "बॉल टॅंपरिंग' म्हणजे काय, ते का करतात, आधी कोणी "बॉल टॅंपरिंग' केलं आणि क्रिकेट हा खेळ खरंच सभ्य लोकांचा राहिला आहे का आदी गोष्टींवर भाष्य.

मी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर कधी जातो आणि बार्बाडोसला जायची संधी मिळते, तेव्हा कसंही करून मी "युनिव्हर्सिटी ऑफ 3 डब्ल्यूज्‌'च्या आवारात जातो. कोणाही क्रिकेटप्रेमीकरता तिथं जाणं हे तीर्थक्षेत्री जाण्यासारखं आहे. सर फ्रॅंक वॉरल यांची समाधी तिथं आहे. जो मान सर फ्रॅंक वॉरल यांना आहे तो क्‍लाइव्ह लॉईड, सर व्हिवियन रिचर्डस किंवा ब्रायन लारालाही नाही हे बघून मी थक्क झालो. त्याला सबळ कारण होतं. विविध बेटांना- खरं सांगायचं तर देशांना- एकत्रित करून क्रिकेट संघ घडवणं आणि त्याला ताकदवान बनवणं हे मोठं कार्य सर फ्रॅंक वॉरल यांनी केलं. "युनिव्हर्सिटी ऑफ 3 डब्ल्यूज्‌'वर जायला मला आवडतं, कारण तिथलं वातावरण पवित्र आहे. एका बाजूला सर फ्रॅंक वॉरल यांची समाधी आहे. त्याच्या समोरच "वॉक ऑफ फेम' आहे, जिथं वेस्ट इंडीजच्या महान फलंदाज, गोलंदाज आणि विकेट कीपर्सनी केलेल्या कमाल कामगिरीच्या स्मृती जपलेल्या आहेत. त्याच्या पलीकडं मोठं क्रिकेटचं मैदान आहे. याच मैदानाच्या सीमारेषेबाहेर आणि "वॉक ऑफ फेम'च्या कडेवर दोन पोडियम आहेत. त्यांच्यांवर सर फ्रॅंक वॉरल यांचे दोन विचार कोरून ठेवलेले आहेत. त्यातला दुसरा विचार माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. सर फ्रॅंक वॉरल म्हणतात ः "जिंकण्याचा विचार मनात आणणं चुकीचं नाही. जिंकण्यात काहीच गैर नाही...परंतु विजयाच्या ईर्षेनं वाहवत जात खेळाची संस्कृती विसरून जाणं फार चुकीचं आहे. क्रिकेटचा खेळ बघायला आलेल्या प्रेक्षकांचं चांगल्या खेळानं मनोरंजन व्हायला पाहिजे... नुसती विजय मिळवायला केलेली वाट्टेल ती धडपड नव्हे.'
सिडनी क्रिकेट मैदानावर 2008 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात रिकी पॉंटिंगच्या संघानं विजयाकरता केलेली जीवघेणी धडपड बघून मला ऑसी संघाला सोबतच्या फोटोच्या प्रती द्याव्यात असं वाटलं होतं. "बॉल टॅंपरिंग' प्रकरणानंतर मला परत एकदा त्याच फोटोच्या प्रति स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरला द्याव्यात, असं वाटत आहे.

आधीपासूनच संकेत
कोणताही आजार अचानक उद्‌भवत नाही, हे कोणताही निष्णात डॉक्‍टर तुम्हाला सांगेल. तुमचं शरीर स्पष्ट संकेत द्यायला लागतं. कुठं सर्दी होते, बारीक ताप येतो किंवा पचनक्रिया मंदावते. मग एक दिवस मोठ्या रोगाचं लक्षण दिसतं. क्रिकेटच्या मैदानावर अगदी तसंच बघायला मिळत होतं. जिंकण्याकरता काहीही करायचा पहिला प्रसंग म्हणजे ग्रेग चॅपेल यांनी आपल्याच लहान भावाला शेवटचा चेंडू अंडरआर्म टाकायला सांगितलं तेव्हाचा. असं केलं म्हणजे शेवटच्या चेंडूवर षटकार मारून समोरच्या संघानं सामना जिंकू नये, अशी त्यांची खेळी होती. दुसरी पायमल्ली डेनिस लिलीनं केली होती. तो मैदानात ऍल्युमिनियमची बॅट घेऊन उतरला होता तेव्हा.
याच मालिकेतला तिसरा मोठा प्रसंग दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान डर्बनला पहिला कसोटी सामन्यात झाला. विजयाकरता वाट्टेल ते करणारा ऑसी संघ पहिला कसोटी जिंकायला नेहमीची चुकीची धडपड करू लागला ते भरकटण्याचं पहिलं चिन्हं होतं. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज बाद करून कसोटी जिंकणं ऑस्ट्रेलियन संघ साध्य करणार हे उघड दिसत असतानाही त्यांनी सभ्यतेची पायमल्ली करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बोचरं स्लेजिंग केलं. क्विंटन डिकॉकनं फलंदाजी करताना एकाग्रता राखण्यासाठी स्लेजिंगकडे दुर्लक्ष केलं. सामना जिंकल्यावरही बहुतेक डेव्हिड वॉर्नरचं समाधान झालं नाही. सामना संपल्यावर खेळाडू परत येत असताना वॉर्नरनं क्विंटन डिकॉकला परत एक टोमणा मारला. डिकॉक भडकला आणि त्यानं जोरदार उलट उत्तर दिलं- ज्यात त्यानं रागाच्या भरात वॉर्नरच्या पत्नीचा उल्लेख केला. झालं! त्यावरून तोंडी बाचाबाचीचं परिवर्तन मारामारीत झालं. त्या प्रसंगावरून बरंच रणकंदन झालं. आपल्या संघातले खेळाडू क्रिकेटच्या संस्कृतीला पायदळी तुडवणाऱ्या कृती आणि वक्तव्य करत असल्याचे संकेत खरं तर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि प्रशिक्षक डेरेन लिहमनला मिळाले होते. ऑसी संघ "शिकारी कुत्र्यांच्या समूहासारखा' असला पाहिजे, असं अभिमानानं सांगणाऱ्या संघ व्यवस्थापनाला नजीकच्या भविष्यात येणाऱ्या भयावह वादळाची कल्पना नव्हती.

"बॉल टॅंपरिंग' म्हणजे काय?
भारतीय संघ 1980च्या दशकात पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हाच्या खेळाडूंशी गप्पा मारल्यावर वेगवान गोलंदाज सर्फराज नवाज जुना चेंडू स्विंग करायचा, त्याच्या कहाण्या ऐकायला मिळाल्या. मुदस्सर नझर या खेळाडूची बोटं लाकडासारखी कडक होती. त्यांचा आणि नखांचा वापर करून तो जुन्या चेंडूची शिवण सहजी उचकटायचा. त्या काळात पाणी पिण्याच्या ब्रेकमध्ये चेंडू खेळाडूंकडंच असायचा. मग काही पाकिस्तानी खेळाडू शीतपेयांच्या बुचांचा वापर करून चेंडूची एक बाजू खराब करायचे. चेहऱ्यावरचं क्रीम आणि थुंकीचा वापर करत चेंडू पॅंटवर जोरजोरात घासत त्याची दुसरी बाजू चकाकत ठेवायचे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ही कला सहजी सोपवली गेली आणि वसिम अक्रम आणि वकार युनूस जुना चेंडू "तयार' करून रिव्हर्स स्विंग करू लागले. तेव्हापासून ते आत्तापर्यंत जुना चेंडू "रिव्हर्स स्विंग'करता योग्य मेहनत करून "तयार' करण्याची "कला' जोपासली गेली. प्रांजळपणे कबूल करायचं, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे सर्वच्या सर्व संघ काही ना काही प्रमाणात "बॉल टॅंपरिंग' करतातच. कोणी खास च्युइंग गमचा वापर करून चेंडूची चकाकी ठेवतात, तर कोणी भरपूर घाम येणाऱ्या खेळाडूला चेंडू सोपवत खराब झालेल्या चेंडूच्या भागात घाम मुरवून ती बाजू जड करायला हातभार लावतात.
अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर जुन्या होत जाणाऱ्या क्रिकेट चेंडूची एक बाजू चकचकीत केली जाते आणि दुसरी बाजू कातडं खराब करून, घाम मुरवून जड केली जाते. बरेच लोक विचारतात, की एक बाजू जड होऊनहोऊन किती होणार आणि त्याचा चेंडूवर आणि खेळावर असा काय परिणाम होणार? लक्षात घ्या, की क्रिकेट बॅटची रुंदी सव्वा चार इंच असते. त्याच्या मधोमध चेंडू लागला, की फटका ताकदवान ठरतो. गोलंदाजानं कौशल्य वापरत चेंडू हलवला किंवा वळवला आणि तो बॅटच्या मधोमध लागण्याऐवजी बॅटच्या कडेला लागला, की फलंदाज बाद होण्याची शक्‍यता लगेच निर्माण होते. थोडक्‍यात चेंडू दोन इंच वळवला किंवा स्विंग केला, तरी गोलंदाजाला अपेक्षित परिणाम साधता येतो. बॉलशी छेडछाड करत एक बाजू थोडी जड केली जाते, तेव्हा कुशल गोलंदाज जुन्या चेंडूचा असा वापर करतो, की तो फलंदाजाचा अंदाज चुकवायला पुरेसा ठरू शकतो. नजीकच्या भूतकाळात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार "फाफ डू प्लेसिस'ला दोन वेळा बॉल टॅंपरिंगच्या आरोपावरून दंड झाला आहे. फक्त कॅमरून बॅनक्रॉफ्टनं ज्या उघडपणे चेंडूशी छेडछाड केली आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती चोरी "रंगे हाथ' पकडली गेली.

द्रविड आणि तेंडुलकरही!
क्रिकेटच्या क्षेत्रात मानाचं स्थान मिळवलेल्या आणि कोणत्याही वादविवादापासून लांब राहिलेल्या राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनाही बॉल टॅंपरिंगच्या आरोपाखाली शिक्षा झालेली आहे, हे वाचून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. चेंडूच्या शिवणीत अडकलेला चिखल नखांनी काढताना राहुल द्रविड आढळला. सचिन तेंडुलकर चेंडूला थुंकी लावून घासत होता, ज्यात काही आश्‍चर्य वाटण्यासारखं नाही. मात्र, असं करताना तो नेमका लाल रंगाचं च्युइंग गम खात होता, ज्यामुळं तो चेंडूला लावणारी थुंकी लालभडक रंगाची दिसत होती. टीव्ही कॅमेऱ्यानं ते चित्र पकडलं, ज्यामुळं सचिन दोषी ठरला होता. द्रविड आणि सचिनवर आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली, तरी त्यावर फार मोठं वादंग झालं नाही- कारण दोघांच्या हातून ती गोष्ट अनवधानानं झाली होती.
केपटाऊन कसोटीत जे घडलं, ते वेगळं होतं. कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टनं दोन बोटांच्या बेचकीत सॅंडपेपर पकडत चेंडू खराब करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. एका हुशार, खबरदार टीव्ही कॅमेऱ्यानं कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टच्या हालचालींवर बारीक नजर ठेवत चोरी "रंगे हाथ' पकडली. ही कर्मकहाणी तिथं संपली. दिवसाचा खेळ संपल्यावर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथनं "प्रत्यक्षात हे सर्व पूर्वनियोजित होतं,' असं कबूल केलं आणि क्रिकेट संस्कृतीला सुरुंग लागला. ही "चूक' नव्हे, तर "संघटित गुन्हा' असल्याचं जणू स्मिथनं कबूल केलं. त्यामुळं क्रिकेटविश्‍व हादरून गेलं.

असंगाशी संग
फलंदाज म्हणून "फटाका' असलेला डेव्हिड वॉर्नर माणूस म्हणून "फाटका' आहे, हे वारंवार दिसून आलं आहे. कधी मद्यधुंद अवस्थेत समोरच्या संघातल्या खेळाडूच्या चेहऱ्यावर बुक्का मार, कधी स्लेजिंगची किळसवाणी सीमा गाठ, तर कधी बाद झालेल्या खेळाडूला वाट्टेल ते असभ्य भाषेत टोमणे मार, असे माकडचाळे वॉर्नर करत आला. बऱ्याच वेळा त्याला समज देण्यात आली, तर काही वेळा त्याला मोठी शिक्षा भोगावी लागली. सध्या गाजलेल्या बॉल टॅंपरिंग प्रकरणात मुख्य गुन्हेगार डेव्हिड वॉर्नर असल्याची बातमी मला ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी दिली, तेव्हा मला आश्‍चर्य वाटले नाही.
वॉर्नरनं बॉलशी छेडछाड करून तो "रिव्हर्स स्विंग'करता तयार करण्याची योजना मांडली, ज्याला थेट नकार देण्याऐवजी स्मिथनं ती मान्य केली. क्रिकेट सभ्यतेचा पाया तिथंच ढासळला. वॉर्नरनं प्रस्ताव मांडण्यामागं आणि स्मिथनं तो मान्य करण्यामागं एकच कारण होतं, ते म्हणजे "कसंही करून जिंकण्याची ऑसी संघाची राक्षसी महत्त्वाकांक्षा.' वॉर्नरनं सांगितलं आणि स्मिथनं ऐकलं म्हणून स्मिथचा गुन्हा कमी होत नाही. कारण अखेर तो कर्णधार होता ऑस्ट्रेलियन संघाचा. असंगाशी संग ठेवल्यानंच अशा चुका घडतात, हे एव्हाना स्मिथला कळलं असेल.

तिखट प्रतिक्रिया का आली?
तसं बघायला गेलं, तर खेळाची दुनिया धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही, हे मान्य करावंच लागेल. अनेक वेळा "टूर द फ्रान्स' जिंकणारा लान्स आर्मस्ट्रॉंग अखेर फसवणारा निघाला. अनेक ऍथलिट्‌सनी कामगिरी सुधारण्याकरता ड्रग्जचं सेवन केल्याचं उघड झालं आहे. टायगर वूड्‌ससारखा दादा गोल्फपटू वैयक्तिक आयुष्यात मोठ्या चुका करून बसला. या सर्वांचा विचार करता "बॉल टॅंपरिंग' प्रकरणानंतर इतकी तिखट प्रतिक्रिया का आली याचा विचार करणं गरजेचं आहे.

ऑस्ट्रेलिया नागरिकांना खेळाचं प्रचंड प्रेम आहे. कोणताही खेळ ते त्वेषानं सर्वस्व झोकून देत खेळणं पसंत करतात. याआधी ऑसी क्रिकेट संघ मैदानावर चुकीचं वर्तन करत आला, तरी "नैसर्गिक आक्रमकता' या नावाखाली त्याला माफी मिळाली. केपटाऊन कसोटीत घडलेलं बॉल टॅंपरिंग प्रकरण "संघटित गुन्हेगारी'च्या स्वरूपात समोर आलं. झाल्या प्रकरणानं केवळ स्मिथ, वॉर्नर किंवा बॅंक्रॉफ्ट दोषी ठरले नाहीत, तर "ऑसीज्‌ आर चिट्‌स' म्हणजेच ऑस्ट्रेलियन लोक फसवणूक करणारे असतात, असा काळा शिक्का बसला.

ब्राझीलमधे जशी पंतप्रधानपदापेक्षा फुटबॉल संघाचा कर्णधार ही मोठी मानाची जागा समजली जाते, तसंच ऑस्ट्रेलियात क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा मान समजला जातो. असं असताना स्मिथ आणि वॉर्नरकडून जे घडलं, त्याला ऑसी नागरिक क्षमा करायला तयार झाले नाहीत. पालक संस्था म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं कारवाई करायच्याआधीच पंतप्रधान टर्नबूल यांनी झाल्या प्रकाराची उघड निंदा केली. मायदेशी झालेल्या लोकक्षोभाचा विचार करून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दोषी तीन खेळाडूंनी कठोर शिक्षा सुनावली आहे.

कठोर शिक्षा
झाल्या प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला बारा महिने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटपासून लांब ठेवलं आहे. कॅमरून बॅनक्रॉफ्टला नऊ महिने क्रिकेटपासून लांब राहायची शिक्षा ठोठावली गेली आहे. एक वर्ष क्रिकेटपासून लांब राहिल्यावर पुनरागमन केलं, तरी स्मिथचं नाव अजून एक वर्ष कर्णधारपदासाठी विचारात घेतलं जाणार नाही. वॉर्नरला भविष्यात कोणत्याच मानाच्या पदाकरता विचारात घेतलं जाणार नाही.

पुढच्याला ठेच मागचा शहाणा
खेळाडू म्हणून कितीही महान असला, तरी खासगी आयुष्यात बेशिस्त असलेल्या शेन वॉर्ननं प्रतिक्रिया नोंदवताना "गुन्ह्यापेक्षा शिक्षा मोठी,' असं म्हटलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं शिक्षा निश्‍चित करताना सर्व विचार करता बॉल टॅंपरिंगच्या गुन्ह्यापेक्षा झाल्या प्रकारानं देशाची मान खाली गेल्याचं आणि भविष्यात कोणीही जबाबदार ऑसी नागरिकानं अशी कृती करायचं धाडस करू नये म्हणून पावलं उचलली आहेत. शेन वॉर्नच्या मते दोषी खेळाडूंना मोठा आर्थिक दंड ठोठावून खेळायला परवानगी द्यायला पाहिजे होती. मला वाटतं, की आधुनिक जमान्यातले खेळाडू गैरवर्तनाबद्दल दिल्या जाणाऱ्या आर्थिक दंडाला घाबरत नाहीत. कारण भरपूर पैसा त्यांच्या खात्यात खेळत असतो. त्यांना दणका खेळापासून लांब राहण्याचाच बसतो. त्यामुळं चवली पावलीच्या दंडाने जो फरक पडणार नाही, तो फरक स्मिथ आणि वॉर्नरला आयपीएल 2018 गमावण्यापासून होणार आहे. दोघं प्रत्येकी एका आयपीएल संघाचे कर्णधार होते. आता त्यांच्याकडं बघण्याची नजर बदलणार आहे.

झाल्या घडामोडीतून नुसत्या खेळाडूंनीच नव्हे, तर आपण सर्वांनाच शिकायची गरज आहे. प्रत्येक चोराला त्याची चोरीची योजना "फुलप्रूफ' वाटते. आपली चोरी पकडली जाणारच नाही, असा फाजील आत्मविश्‍वास प्रत्येक चोराला असतो. ऑसी खेळाडूंनी केलेली कृती निंदनीय होती, तशीच ती कमालीची मूर्खपणाची होती. दहा कॅमेरे मैदानावर नजर ठेवून असताना आपली चोरी पकडली जाणार नाही, हा विचार हास्यास्पद होता. गैरकृत्य करण्याचा विचार मनात येणारच नाही हे गृहीत धरणं चुकीचं ठरेल.

शेवटचा मुद्दा क्रिकेट संस्कृतीचा राहतो. ज्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं गेली कित्येक वर्षं कसंही करून जिंका ही संस्कृती जोपासली, त्यांना आता त्याच अट्टाहासानं विनाशाकडं ओढून नेलेलं बघायला मिळालं आहे. क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियन जनतेला मान खाली घालायला लावल्यानंतर खेळाला खेळासारखं जपायचे विचार परत जोर धरू लागले आहेत. मला परत एकदा तुमची नजर सोबतच्या फोटोकडे न्यायची आहे, ज्यात सर फ्रॅंक वॉरल यांनी खूप मोलाचा मुद्दा मांडला आहे- जो त्रिकालाबाधित आहे.
वाममार्गानं यश संपादन करायची अनावश्‍यक इर्षा माणसाला कोणत्या स्तराला नेते, याची ही उदाहरणं आहेत. तरुण खेळाडूंना यातून धडा घ्यावाच लागेल. शंभर अपराध भरल्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला जाग आली आहे. खेळाडू असो, वा कोणत्याही क्षेत्रात काम करत असलेले आपण सगळे असो, प्रलोभनाला लांब ठेवून ही वेळ येऊन न देण्याकरता योग्य उपाययोजना आपल्या सगळ्यांना करावी लागणार आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला एक वर्ष क्रिकेटपासून लांब राहावं लागणार आहे आणि आयपीएलला मुकावं लागणार आहे. खरी निंदानालस्ती मायदेशात परतल्यावरची आहे. बोचऱ्या नजरांना त्यांना यापुढं जन्मभर सहन करावं लागणार आहे. पश्‍चात्तापाच्या अश्रूंना खेळाच्या दुनियेत कवडीचंही मोल नसतं, हा धडा शिकायची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com