ओझं सभ्यतेचं (सुनंदन लेले)

sunandan lele write article in saptarang
sunandan lele write article in saptarang

कोणताही खेळात मैदानावर घनघोर लढाई व्हायला पाहिजे; पण कोणत्याही क्षणी सभ्यतेच्या पातळीचं उल्लंघन होऊ नये, असं म्हटलं जातं. खेळाच्या क्षेत्रात सभ्यता कोणाला सहज पचते, तर कोणाला त्याचं ओझं होतं. खेळाडूंनी सभ्यता पाळल्याच्या खूप मजेदार आणि प्रेरणा देणाऱ्या कहाण्या आहेत; तसंच जिंकण्याकरता खेळाच्या संस्कृतीचं मातेरं केल्याच्या लाजिरवाण्या कहाण्याही आहेत. फुटबॉल, क्रिकेट, बॉक्‍सिंग अशा क्रीडाप्रकारांत अनेक वेळा दोन टोकाचं दर्शन घडलं. अशाच काही कहाण्यांवर एक नजर.

कोणताही खेळात मैदानावर घनघोर लढाई व्हायला पाहिजे; पण कोणत्याही क्षणी सभ्यतेच्या पातळीचं उल्लंघन होऊ नये, असं म्हटलं जातं. बोलायला सोपं; पण करायला कठीण अशी ही गोष्ट. खेळाच्या क्षेत्रात सभ्यता कोणाला सहज पचते, तर कोणाला त्याचं ओझं होतं. खेळाडूंनी सभ्यता पाळल्याच्या खूप मजेदार आणि प्रेरणा देणाऱ्या कहाण्या आहेत; तसंच जिंकण्याकरता खेळाच्या संस्कृतीचं मातेरं केल्याच्या लाजिरवाण्या कहाण्याही आहेत.

डेन्मार्ककडून पेनल्टीला "किक'
डेन्मार्क आणि इराणदरम्यान 2003 मध्ये झालेल्या फुटबॉल सामन्याची क्‍लिप सोशल मीडियावर सध्या खूप जोरात चालू आहे. त्या सामन्यात 45 मिनिटांनंतर मध्यंतराजवळ खेळ पोचला असताना प्रेक्षकांतून कोणीतरी जोरदार शिट्टी वाजवली. पंचांनी मध्यंतर झाल्याची सूचना द्यायला ती शिट्टी वाजवली आहे, असं वाटून इराणच्या खेळाडूनं चेंडू हाती घेतला. प्रत्यक्षात मध्यंतर झालं नव्हतं. पंचांनी नियमावर बोट ठेवून डेन्मार्कला पेनल्टी किक बहाल केली. डेन्मार्क संघाचा कर्णधार विघोर्स्ट यानं प्रशिक्षक ऑल्सन यांच्याशी चर्चा केली. इराणच्या खेळाडूनं अजाणतेपणानं चूक केल्याचं लक्षात ठेवून विघोर्स्टनं पेनल्टी किक घेतली; पण चेंडू जाणूनबुजून मुद्दाम गोलपोस्टच्या बाहेर मारला. प्रेक्षकांनी डेन्मार्क संघाच्या कर्णधारानं दाखवलेल्या सभ्यतेची वाहवा केली आणि इराणच्या खेळाडूंनी हात मिळवून प्रशंसा केली. विघोर्स्टला फिफानं खेळातल्या सभ्यतेचं खास बक्षीस दिलं.
1936 मधल्या ऑलिंपिक्‍स स्पर्धेत लांब उडी प्रकारातला सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार जेसी ओवेन्सनं पात्रता फेरी गाठण्याच्या ईर्षेत दोन वेळा फूट फॉल्ट केला होता. तिसऱ्यांदा परत तीच चूक जेसी ओवेन्सनं केली असती, तर तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असता. ओवेन्स चिंतेनं ग्रासला असताना त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी जर्मनीचा लुझ लॉंग यानं जेसीला त्याचा उडी मारतानाचा रनअप कसा चुकतो आहे आणि दुरुस्त करायला काय केलं पाहिजे, याचा सल्ला दिला. जेसी ओवेन्सनं चूक सुधारून तिसरी उडी मारली- जी योग्य ठरली. जेसी केवळ अंतिम फेरीकरता पात्र ठरला नाही, तर त्यानं सुवर्णपदकही जिंकलं. स्पर्धेनंतर बोलताना जेसी म्हणाला ः ""माझी सर्व पदकं आणि ट्रॉफीज वितळवून त्याचं सोनं केलं, तरी लुझ लॉंगच्या आणि माझ्या मैत्रीच्या नात्याला त्याचा साधा मुलामाही लागू शकत नाही.''

विश्‍वनाथ यांचा खिलाडूपणा
मुंबईच्या वानखेडे मैदानावर 1980 मध्ये भारत आणि इंग्लंडदरम्यान खास कसोटी सामना चालू होता. इंग्लंडचा विकेटकीपर बॉब टेलर फलंदाजी करत असताना पंचांनी त्याला बाद ठरवलं. खरं तर पंचांचा तो निर्णय चुकीचा होता. पंचांचा निर्णय झालेला असला, तरी तो योग्य नाही हे लक्षात आल्यावर भारतीय संघाचे कर्णधार गुंडप्पा विश्‍वनाथ यांनी पंचांकडं मागितलेली दाद मागं घेऊन बॉब टेलरला चक्क फलंदाजीकरता परत बोलावलं. गुंडप्पा विश्‍वनाथ यांच्या खिलाडूपणानं सगळेच भारावून गेले होते. फलंदाजी करतानाही विश्‍वनाथ झेलबाद झाले, तर कधी पंचांच्या निर्णयाची वाट बघायचे नाहीत. चेंडूनं बॅटची कड घेतली आहे हे त्यांना कळलं, की ते चक्क चालू लागायचे.
या झाले खेळातल्या सभ्यतेच्या गोड कहाण्या. काही खेळाडू जिंकण्या-हरण्याइतकंच खेळाची संस्कृती पाळायलाही धडपडतात. मात्र, काही महाभाग असेही असतात- जे जिंकण्याकरता कोणत्याही थराला जातात. लज्जास्पद वर्तणुकीनं खेळाच्या संस्कृती अगदी पायदळी तुडवतात.

लान्स आर्मस्ट्रॉंगची कबुली
माझी आई म्हणायची ः ""मोती या शब्दातली एक वेलांटी काढली, तर "मोती'ची "माती' होते हे लक्षात ठेव.'' आईचे ते शब्द लान्स आर्मस्ट्रॉंगच्या बाबतीत किती खरे ठरतात बघा. अमेरिकन खेळाडू लान्स आर्मस्ट्रॉंग एक चांगला सायकलिस्ट होता. "टूर द फ्रान्स' स्पर्धेत तो चार वेळा सहभागी झाला आणि त्यानं फक्त एकदा स्पर्धा पूर्ण केली. 1996 मध्ये वयाच्या फक्त पंचविसाव्या वर्षी त्याला कॅन्सर झाल्याचं समजलं. नुसत्या फुफ्फुसांमधेच नाही, तर मेंदूत कॅन्सरनं थैमान घातलं होतं. लान्स आर्मस्ट्रॉंगनं कॅन्सरशी झुंज दिली. तीन वर्षं उपचार घेऊन तो परत आला ते "टूर द फ्रान्स' स्पर्धा जिंकण्याच्या ईर्षेनं. आर्मस्ट्रॉंगनं त्यानंतर 1999 ते 2005 या सात वर्षांत "टूर द फ्रान्स' जिंकून जगाला थक्कं करून सोडलं.
दरम्यानच्या काळात आर्मस्ट्रॉंगशी स्पर्धा करणाऱ्या सायकलिस्टनी तो कामगिरीला मदत करणारी आणि सायकलिस्ट संघटनेनं बंदी घातलेली औषधं घेत असल्याचे आरोप वारंवार केले. आर्मस्ट्रॉंगनं नेहमी आरोपांचं खंडन केलं. प्रदीर्घ तपासानंतर आर्मस्ट्रॉंगनं परफॉर्मन्स एन्हान्सिंग ड्रग्ज घेतल्याचं सिद्ध झालं. 2012 मध्ये त्याचे सर्व किताब आणि मेडल्स काढून घेऊन त्याच्यावर आजन्म बंदी घालण्याची शिक्षा ठोठावली गेली.
भयानक गोष्ट म्हणजे ज्येष्ठ पत्रकार ओप्रा विनफ्रेला मुलाखत देताना लान्स आर्मस्ट्रॉंगनं त्याच्यावरचे आरोप योग्य असल्याची कबुली दिली. मुलाखतीत ओप्रा विनफ्रेनं त्याला ""तू असं का केलेस,'' असं विचारले असता आर्मस्ट्रॉंग म्हणाला ः ""बाकी काही कारण नाही. मला जिंकायचं होतं...बास, कसंही करून जिंकायचं होतं.'' जिंकण्याकरता सर्व काही या त्याच्या विचारांनी जग हादरून गेलं.

माईक टायसननं कान तोडला
जिंकण्याकरता कोणत्याही थराला जाण्याचं अजून एक भयाण उदाहरण म्हणजे माईक टायसन. अमेरिकच्या अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या माईक टायसनला देवानं प्रचंड ताकद दिली होती. त्याच्यात मुळातच हमरीतुमरीवर यायची खोड होती. एका प्रशिक्षकानं ती हेरून माईकच्या हाती बॉक्‍सिंग ग्लोव्ह्‌ज अडकवले. रस्त्यावर हाणामारी करणाऱ्या टायसनच्या भरकटलेल्या विचारांना दिशा मिळाली आणि तो बॉक्‍सर बनला. अचाट मेहनत करून तो जगातला सर्वोत्तम खेळाडू बनला; परंतु मुळातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीनं कधी त्याची साथ सोडली नाही. यशाच्या शिखरावर असतानाही कधी पत्नीला मारहाण कर, तर कधी सार्वजनिक जीवनात गैरवर्तणूक कर असा प्रकार टायसन करत राहिला. 1997 मधल्या इव्हॅंडर हॉलिफिल्डविरुद्धच्या लढतीत टायसननं सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार केल्या. लढतीदरम्यान हॉलिफिल्ड वरचढ ठरतो आहे, हे टायसनच्या लक्षात आलं. पराभव समोर दिसू लागल्यावर टायसननं हॉलिफिल्डच्या कानाचा चावा घेत चक्क लचका तोडला. त्या भयानक प्रसंगानंतर टायसनवर बंदी घालण्यात आली.

सभ्यता झेपत नाही
काहीसं तसंच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचं झाल्याचं दिसतं. ऑसी संघाला सभ्यता राखून क्रिकेट खेळताना सर्वोत्तम कामगिरी करणं झेपत नाहीये. फार जुनं नको; पण गेल्या 25 वर्षांत काय बदल झाला यावर नजर टाकूयात. मार्क टेलरकडून ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व स्टीव्ह वॉकडं आलं. स्टीव्ह वॉ स्वत: खूप गुणवान नव्हता. त्यानं केवळ अचाट जिद्द आणि कष्टाच्या जोरावर क्रिकेट जगतावर ठसा उमटवला. वॉच्या संघात जबरदस्त फलंदाज होते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ग्लेन मॅग्राथ आणि शेन वॉर्न नावेचे दोन अफलातून गोलंदाज होते. संघ अडचणीत असताना स्टीव्ह वॉ जातीनं मैदानावर उभा राहून मोठी खेळी सादर करायचा. एक ना दोन सलग सोळा कसोटी जिंकण्याचा पराक्रम वॉच्या संघानं करून दाखवला होता. त्या ऑस्ट्रेलियन संघात जिंकण्याची जिद्द होती; तसंच ते समोरच्या संघाला कोणतीही दयामाया दाखवायचे नाहीत. फक्त सभ्यतेची पातळी स्टीव्ह वॉच्या संघानं पाळली होती.

वॉ निवृत्त झाला आणि रिकी पॉंटिंग संघाचा कर्णधार झाला. एव्हाना खेळत असलेला प्रत्येक सामना जिंकायची ऑसी संघाला सवय झाली होती. संघातले जाणकार खेळाडू हळूहळू आपल्या सर्वोत्तम कामगिरीपासून लांब जायला लागल्यावर सामने सहजी जिंकणं ऑसी संघाला कठीण जायला लागलं. त्याच काळात ऑसी संघ नकळत सभ्यतेची पातळी सोडून खेळू लागला. कधी मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराकोटीचं टोचून बोलणं, तर कधी पंचांवर दबाव टाकणारं तंत्र वापरणं चालू झालं. समोरच्या संघातल्या खेळाडूंची मन:स्थिती बदलावी, त्यांच्या एकाग्रतेला बाधा यावी याकरता ऑसी खेळाडू संघटित प्रयत्न करू लागले. बरं, असं करताना आपण नेहमी क्रिकेटची संस्कृती पाळत असल्याचा कांगावा ऑस्ट्रेलियन संघ करत राहिला. 2008 मधल्या सिडनी कसोटीत "मंकीगेट' प्रकरण घडलं. सायमंड्‌सनं केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याला हरभजनसिंग बळी पडला. प्रकरण चिघळलं. भारतीय संघानं ठाम भूमिका घेतल्यानं ऑसी संघानं केलेली वर्णद्वेषी टिप्पणीची तक्रार त्यांनाच मागं घ्यावी लागली.

मला तो प्रसंग चांगलाच आठवतो- कारण त्यानंतर झालेल्या पर्थ कसोटी सामन्यात ऑसी खेळाडू परत चिथावणीखोर वर्तणूक करतात का, यावर सगळ्यांची नजर होती. लादलेली सभ्यता पाळताना ऑसी संघाची तारांबळ उडाली. पर्थ कसोटीत भारतीय संघानं विजय मिळवला. त्यानंतरच्या गेल्या दहा वर्षांत ऑसी खेळाडूंनी मैदानावर सभ्यतेची पातळी काही वेळा ओलांडली. ज्याच्याकडं ऑसी बोर्डानं म्हणावं तितकं गंभीरतेनं बघितलं नाही. अगदी गेल्या वर्षी बंगळूर कसोटीत पंचांच्या निर्णयाला दाद मागताना कर्णधार स्टीव्ह स्मिथनं पॅव्हेलियनकडं बघून विचारणा केली आणि चोरी पकडली गेल्यावर "ब्रेनफेड' म्हणजेच मती गुंग झाल्याचं सांगून पळवाट काढली. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं ""ऑसी खेळाडू हा खोडसाळपणा पहिल्यांदा करत नाहीयेतस'' असं सांगून कानउघडणी केली- जी ऑसी संघ व्यवस्थापनानं अपेक्षेप्रमाणं फेटाळून लावली. ऑसी संघ कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या संगनमतानं संघटित चुका करतो, असंच विराटला म्हणायचं होतं.

खरं तर त्या प्रसंगानंतर ऑसी क्रिकेट बोर्डानं कठोर कारवाई करायची निदान धमकी द्यायला पाहिजे होती. मग घडलं चेंडू कुरतडण्याचं प्रकरण. बॉल टॅंपरिंग प्रकारातला पुरावा इतका धडधडीत होता, की ऑसी कर्णधाराला कोणतीच सबब पुढं करता आली नाही. स्टीव्ह स्मिथनं जाहीर कबुली देताना, ठरवून गुन्हा केल्याचं मान्य केलं. तरीही ऑसी बोर्ड मोठी कारवाई करायच्या मन:स्थितीत नव्हतं. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी उघड नाराजी व्यक्त करताना, ""क्रिकेटपटूंच्या असभ्य वर्तनानं देशाची मान खाली गेली आणि फक्त खेळाडूंवर नव्हे, तर सगळ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांवर फसवणुकीचा ठपका लागतो आहे,'' असं रागावून म्हटल्यावर ऑस्ट्रेलियन बोर्डाला त्याची व्याप्ती लक्षात आली. कर्णदार, उपकर्णधाराला एक वर्ष बंदीची शिक्षा ठोठावण्यावाचून पर्याय उरला नाही.

झाल्या प्रसंगानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला सभ्यतेनं क्रिकेट खेळण्यावाचून पर्याय उरला नाहीये- जो त्यांना झेपत नाहीये. मैदानावर बाचाबाची न करता खेळणं ऑसी खेळाडूंना स्वभावाला मुरड घालून करावं लागतं आहे असं वाटू लागलं आहे. त्यामुळंच गेल्या काही सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाला मोठ्या पराभवांना सामोरं जावं लागलं आहे की काय, अशी शंका मला यायला लागली आहे. एका वर्षाच्या अज्ञातवासानंतर स्मिथ आणि वॉर्नर परत येतील तेव्हा तेही गोंधळून जाणार आहेत.

कोणताही खेळाडू मैदानावर उतरतो ते जिंकण्याच्या जिद्दीनं. त्यात काहीच चुकीचं नसतं. मात्र, कसंही करून जिंकण्याची ईर्षा बऱ्याच वेळा चुकीच्या मार्गावर घेऊन जायला कारण ठरते. मला नेहमी वाटतं, की ही शिकवण नुसती खेळापरती मर्यादित नसून आपल्या सगळ्यांना लागू ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com