अशक्‍य ते शक्‍य (सुनंदन लेले)

sunandan lele write article in saptarang
sunandan lele write article in saptarang

सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा प्रवास, फ्रान्सचं "आफ्रिकन' कनेक्‍शन आणि इंग्लंड संघाच्या भवितव्याविषयी ऊहापोह.

सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉलनं डोकं चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. लॅटिन अमेरिकन संघांची फुटबॉल जगतावरची दादागिरी मोडून काढत चार युरोपियन संघांनी विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, तेव्हा सगळ्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. मात्र, सध्या कौतुकाचे पाटच्या पाट एका संघाबाबत भरून वाहून जात आहेत. हा संघ आहे क्रोएशियाचा.

पार्श्वभूमी जाणून घ्या
1990च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंड संघानं उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम करून दाखवला होता. तो काळ असा होता, की त्यांचा उपांत्य फेरीचा प्रतिस्पर्धी क्रोएशियाचा राजकीय जन्मही झाला नव्हता. होय! क्रोएशिया हा देश 1991 मध्ये जन्माला आला आहे. सत्य परिस्थिती अशी आहे, की फुटबॉलचं आगर समजला जाणाऱ्या इंग्लंडनं उपांत्य फेरीची लढत हाती आलेली 1 गोलाची आघाडी गमावून हातची घालवली, तर दुसरीकडं क्रोएशिया संघानं अंतिम फेरीत धडक मारली. आज (रविवार, ता. 15 जुलै) विश्‍वकरंडक फुटबॉलचा अंतिम सामना फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया संघांदरम्यान रंगणार आहे.

क्रोएशिया म्हणजे 56 हजार चौरस किलोमीटरचा देश म्हणजे आकारात महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या एक पंचमांश. क्रोएशियाची सध्याची लोकसंख्या जेमतेम 46 लाख. पहिल्या जागतिक महायुद्धाअगोदर हा एक ऍस्ट्रो- हंगेरीयन राजघराण्याचा भाग होता. 1918 मध्ये क्रोएशियन, सर्बियन आणि स्लोवेनियन लोकांनी एकत्र येऊन भांडून युगोस्लाविया देशाची स्थापना केली. युगोस्लावियाला मोठा देश बनवण्यात मार्शल टिटोंचा मोठा हात होता. एके काळी अमेरिका, रशियानंतर युगोस्लावियाकडं जगात सैनिकी महासत्ता म्हणून बघितलं जायचं. एका देशाचा भाग म्हणून राहत असले, तरी क्रोएशियन, सर्बियन आणि स्लोवेनियन लोकांच्या चालीरीती खूप भिन्न होत्या. त्यांच्यात सतत वाद व्हायचे. शेवटी 1991 मध्ये युगोस्लावियाचं विघटन होऊन क्रोएशिया आणि स्लोवेनिया हे दोन वेगळे देश स्वतंत्र म्हणून अस्तित्वात आले. स्वातंत्र्यानंतरची पहिली पाच वर्षं क्रोएशिया आणि सर्बियन लोकांमधे युद्ध होत राहिलं. 1995 नंतर थोडी शांतता त्या भागात नांदू लागली.

सध्याच्या घडीला क्रोएशियातली परिस्थिती सुंदर नाहीये. राजकीय स्तरावर मोठे घोळ आहेत. क्रोएशियाच्या अध्यक्षा कोलिंडा ग्राबर यांनी रशियात जाऊन सामना बघून नंतर खेळाडूंना भेटल्याच्या क्‍लिप्स सोशल मीडियावर चवीनं बघितल्या गेल्या. प्रत्यक्षात याच अध्यक्षा मायदेशातल्या एकाही सामन्याला फिरकलेल्या नाहीत आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवून प्रसिद्धी मिळवायला रशियाला गेल्या असंही बोललं जात आहे. ड्रावको मामिक हे क्रोएशियन फुटबॉलचे सर्वेसर्वा समजले जातात. मामिक शेजारी देशातून आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर पळून क्रोएशियात आलेले आहेत. हे सर्व खरं असलं, तरी सध्याच्या घडीला क्रोएशियन संघाचे प्रशिक्षक लाटको डॅलिक देशातले सर्वांत लोकप्रिय माणूस बनले आहेत, हे नाकारता येत नाहीये.

अशी भयानक झगड्याची पार्श्वभूमी असलेल्या क्रोएशियन संघानं चालू स्पर्धेत नायजेरिया, ब्राझिल, अर्जेंटिना, यजमान रशिया आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. अजून एक मोठा कौतुकाचा भाग म्हणजे क्रोएशियन संघातले बहुतेक सर्व खेळाडू मायदेशातलेच आहेत. मुद्दाम सांगायचा मतलब असा, की फ्रान्सच्या संघातले तब्बल दहा खेळाडू आफ्रिकन वंशाचे आहेत.

कर्णधार लुका मॉड्रिच
लुका मॉड्रिच सहा वर्षांचा असताना 1991 मध्ये सर्बियन बंडखोर सैनिकांनी त्याचं घर जाळून टाकलं आणि त्याच्या आजोबांना गोळ्या घालून ठार मारलं होतं. नंतरची पाच वर्षं तो निर्वासित म्हणून एका हॉटेलच्या आवारात राहिला. आजूबाजूला मधूनच फुटणाऱ्या बॉंबगोळ्यांच्या आवाजात हॉटेलच्या पार्किंगमधे फुटबॉल खेळत लुका वाढला. तो इतका काटकुळा होता, की प्रशिक्षकांनी तो कोणताही खेळ खेळायला कमजोर असल्याचं सांगितलं होतं. फुटबॉल खेळू लागल्यावर तो समोरच्या खेळाडूच्या पायातून चेंडू काढून घ्यायलाच घाबरायचा- कारण कोणाकडून कोणतीही वस्तू हिसकावून घेणं त्याला पसंत नव्हतं. वयाच्या फक्त सतराव्या वर्षी त्याच्यातली गुणवत्ता बघून झाग्रेब डायनामोज संघानं लुकाला संघात घेतलं. पाच वर्षांतच त्याच्यातली फुटबॉलची गुणवत्ता बघून इंग्लंडच्या टॉटनहॅम हॉटस्पर संघानं लुकाला मोठी रक्कम देऊन संघात घेतलं. लुका मॉड्रिचनं फुटबॉल खेळताना दाखवलेली करामत आणि त्यातलं सातत्य बघून रियाल माद्रिद क्‍लबनं तीस लाख पौंड फी देऊन संघात दाखल करून घेतलं आणि लुका मॉड्रिचचं आयुष्य पार बदलून गेलं. त्याच लुका मॉड्रिचवर प्रशिक्षक लाटको डॅलिकनं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आणि दोघांनी मिळून क्रोएशियातच्या संघाला वाट दाखवत विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेलं आहे.

आफ्रिकन कनेक्‍शन
फुटबॉल जाणकारांच्यात अजून एक चर्चा खूप रंगत आहे ती म्हणजे फ्रेंच फुटबॉल संघाच्या आफ्रिकन कनेक्‍शनची. टोमणे मारणारे काही जाणकार म्हणत आहेत, की "एकच आफ्रिकन संघ फुटबॉल स्पर्धेत टिकून आहे तो म्हणजे "फ्रान्सचा संघ.' वाचायला हे जरा विचित्र वाटेल; पण सत्य गोष्ट अशी आहे, की फ्रान्सच्या संघात तब्बल दहा खेळाडू आफ्रिकन वंशाचे आहेत. मायदेशातल्या रोजच्या भयानक अडचणींमुळं त्या खेळाडूंची कुटुंबं निर्वासित म्हणून फ्रान्सला आली. पायात फुटबॉलचं कौशल्य मुळातच ठासून भरलेल्या या मुलांनी मग फ्रेंच फुटबॉलमध्ये नुसता प्रवेश केला नाही, तर झपाट्यानं प्रगती करत राष्ट्रीय संघात जागा पटकावली.
फ्रेंच संघाचा सध्याचा सर्वांत गुणवान खेळाडू किलीयन एम्बाप्पे हा खेळाडू कॅमरून देशाचा आहे. ज्याचे काही वंशज अल्जिरिया देशाचे आहेत. मॅंचेस्टर युनायटेड संघाचा एक प्रमुख खेळाडू पॉल पोगबा गिनिआ देशातून आलाय. ब्लेस मॅटिडीचं कुटुंब अंगोला देशातून स्थलांतर करून फ्रान्सला आलं आहे. उपांत्य सामन्यातला गोल मारणारा हिरो खेळाडू सॅम्युअल उम्टीटीचं कुटुंब कॅमरून देशातून आलं आहे. हेच कारण आहे, की विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या फ्रान्सच्या संघाला आफ्रिकन प्रेक्षक मनापासून दाद देत आहेत- पाठिंबा देत आहेत.

इंग्लंडचं पुढं काय?
एकीकडं इंग्लंड संघ विश्‍वकरंडक उपांत्य फेरीपर्यंत पोचला म्हणून लोकांना आनंद होतो आहे, तर दुसरीकडं बाकी देशांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये खेळाची लक्षणीय प्रगती होत नाहीये, म्हणून धोक्‍याची घंटा वाजवली जात आहे. 28 वर्षांनंतर इंग्लंड संघ विश्‍वकरंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करून गेला, याचा याचा आनंद आहे; पण पुढची पायरी गाठली नाही म्हणून कमालीची निराशाही आहे. "छी छी! क्रोएशियाकडून काय हरलो आम्ही,' असं म्हणत स्थानिक लोक अजूनही क्रोएशियानं करून दाखवलेली कमाल मान्य करायला राजी नाहीत. काही जाणकार म्हणत आहेत, की "आम्ही क्रोएशियाला कमी लेखण्याची मोठी चूक केली. ज्या संघानं भल्याभल्या संघांची शिकार करताना चांगला खेळ करून दाखवला. त्यांच्यासमोर खेळताना अजून चांगला खेळ करणं आवश्‍यक होतं. इंग्लंड संघानं सामना चालू झाल्यावर लगेच आघाडी घेतली आणि नंतर आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला नाही- तिथंच गणित चुकलं.'

इंग्लंडकरता खरी चिंता वेगळीच आहे. जगातल्या सर्वोत्तम टेनिस स्पर्धेचे संयोजक आम्ही आहोत, अशी शेखी मिरवणाऱ्या इंग्लंडच्या अँडी मरेनंतर एकही दर्जेदार खेळाडू टेनिस क्षेत्रात जागतिक पातळीवर ठसा उमटवताना दिसत नाही. इतक्‍या सोयी-सुविधा असूनही लहान मुलं अपेक्षित संख्येमध्ये टेनिसकडं वळत का नाहीत, याचं उत्तर कोणाला सापडत नाहीये.

तीच गोष्ट इंग्लिश प्रीमिअरशिपची बोलली जात आहे. जगात नावाजलेली ही स्पर्धा आहे यात शंका असायचं कारण नाही. जगभरातले तमाम चांगले खेळाडू या स्पर्धेत येऊन खेळतात. गंमत अशी होत आहे, की इंग्लंडबाहेर जन्माला आलेली; पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबातली मुलं मन लावून फुटबॉल खेळतात तितकी खरी इंग्लिश मुलं मैदानाच्या ओढीनं नाही जात. आफ्रिकेतल्या गरीब देशांतली मुलं पोट भरायला फुटबॉल खेळात कौशल्य दाखवतात आणि नंतर आयुष्य घडवतात.
क्रिकेटच्या खेळातही इंग्लंड संघानं म्हणावी तशी भरघोस प्रगती केलेली नाही. चांगलं खेळण्यापेक्षा इंग्लंडचे फलंदाज खेळताना तंत्रशुद्ध आणि "छान' दिसण्याकडं भर देतात. संस्कृती पाळण्याच्या नावाखाली किंवा अट्टाहासापायी प्रगतीच्या आणि आधुनिकतेच्या मार्गाकडं पाठ फिरवतात, असं वाटू लागलं आहे. अतिप्रशिक्षणाचा मारा हेसुद्धा इंग्लंडच्या खेळातल्या प्रगतीला बाधा आणत आहे. अगदी लहान वयापासून इंग्लंडमध्ये मुला-मुलींना प्रख्यात प्रशिक्षकाकडं खेळाचे धडे गिरवायला पाठवायची सवय आहे. यामुळं मुलं खेळाचा आनंद घेत निसर्गतः फुलण्याऐवजी साचेबद्ध प्रकारे खेळ शिकत राहतात. अगदी लहान वयापासून खेळाचा अतिविचार पालक करतात, हेसुद्धा नाशाचं एक कारण आहे.

ऑलिंपिक खेळांत इंग्लंडची कामगिरी चांगली झालेली आहे. वैयक्तिक खेळातली इंग्लिश खेळाडूंची मजल उत्तम झालेली आहे. याला कारण इंग्लंडमधल्या खेळ सुविधा नसून, त्या त्या खेळाडूची पराकोटीची जिद्द आहे. इंग्लंडमध्ये जन्माला येणाऱ्या चांगल्या घरातल्या शाळकरी मुलांना सगळ्या गोष्टी फार सहजी मिळतात, म्हणून त्यांना किंमत राहत नाही; तसंच झगडायची सवय लागत नाही, असंही लक्षात येतं आहे.

याच कारणांमुळं विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी इंग्लंड संघानं गाठल्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
फुटबॉल जगताचे तारे समजले जाणारे रोनाल्डो आणि मेसी टीव्हीवर अंतिम सामना बघत रविवार घालवणार, तर याच स्पर्धेत अचानक नावारूपाला आलेले एम्बाप्पे आणि मारीओ मांडुकीच मॉस्कोच्या भव्य मैदानावर विश्‍वकरंडक अंतिम सामना खेळणार. म्हणूनच सांगतो, खेळ म्हणजे खायची गोष्ट राहिली नसून यशाचं "शिखर' आणि अपयशाची "दरी' दाखवणारं मोठं चाक झालं आहे. खेळ कोणाला कडेवर घेऊन लाड करेल आणि कोणाच्या पाठीत गुद्दा घालेल सांगता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com