भेट एका अवलियाची (सुनंदन लेले)

sunandan lele write article in saptarang
sunandan lele write article in saptarang

रियान मॅनसर हा एक अवलिया साहसपटू. खेळाच्या आणि साहसाच्या आवडीतून या अवलियानं ज्या एकेक करामती केल्या, त्या ऐकून थक्क व्हायला होतं. सायकलवरून एकट्यानं ३५ देशांमधून फिरणं, कयाक बोट वल्हवत मादागास्कर बेटावर जाणं अशा त्याच्या मोहिमा गाजल्या. अवघ्या चाळीस वर्षांच्या रियानकडे आता थरारक आठवणींचा खजिनाच आहे. केपटाऊनमध्ये त्याच्या भेटीच्या निमित्तानं झालेला संवाद...

क्रिकेटच्या खेळात हजारोंनी धावा केल्यात किंवा शेकड्यात विकेट्‌स आहेत किंवा उसेन बोल्टसारखे कोणी ट्रॅक अँड फिल्ड खेळात राज्य केलं आहे किंवा रॉजर फेडररसारखं कोणी जगाला आपल्या टेनिस रॅकेटच्या जादूनं मंत्रमुग्ध करून टाकलं आहे, तरच आम्ही पत्रकार भारावून जातो. मग अशा महान खेळाडूला भेटता यावं, त्याची मुलाखत घेता यावी यासाठी जंग जंग पछाडतो. पण तुम्हांला सांगतो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येताना माझ्या वाचण्यात एका महान खेळाडूचं नाव आलं. रियान मॅनसर. त्यानं केलेल्या करामती वाचून मी अगदी वेडा झालो. मग त्याच्याशी संपर्क साधायला धडपड चालू केली.

मला समजलं, की त्याचं मूळ गाव केपटाऊन आहे. भारत वि. दक्षिण आफ्रिकादरम्यान पहिला कसोटी सामना केपटाऊनलाच असल्यानं माझ्या प्रयत्नांना वेग आला. दुर्दैवानं तो खेळाडू जानेवारीत आपल्या कुटुंबासह सुटीकरता बाहेर गेला होता. फोन नंबर मिळवून कसाबसा त्या खेळाडूची मॅनेजर केरेनशी संपर्क साधल्यावर ती म्हणाली ः ‘‘रियानबरोबर तू फोनवर बोलून घे ना.’’ मी नकार देत ठामपणे सांगितलं, की मला त्याला प्रत्यक्षच भेटायचं आहे. मग मी थोडं ‘नरो वा कुंजरो वा’ पद्धतीनं म्हणालो, की ‘‘मला तू रियानची १५ मिनिटं दिलीस, तरी तेवढ्यासाठी मी जोहान्सबर्गहून केपटाऊनला यायला तयार आहे.’’ हा बाण बरोबर बसला आणि केरेननं मला ‘पाच फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता वेळ आहे का,’ असं विचारलं. मी वेळापत्रक बघितलं, तर केपटाऊनला होणाऱ्या एकदिवसीय सामन्याकरता मी केपटाऊनला बरोबर पाच तारखेलाच सकाळच्या विमानानं नऊ वाजता पोचणार होतो. मी केरेनला फोन करून विमानाचं तिकीट बुक केल्याचं सांगून भेटीची वेळ नक्की केली.

पाच फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता माझी रियान मॅनसरबरोबर भेट झाली आणि मी त्याला भेटून त्याच्याशी बोलून खरंच भारावून गेलो. रियानची उंची अंदाजे सहा फूट, वजन नव्वद किलो आणि वय ४४. या खेळाडूनं काय ‘प्रताप’ करून दाखवले आहेत हे ऐकून तुम्ही थक्क झाला नाहीत, तर तुम्हाला अर्धं राज्य बक्षीस!

बालपणाबद्दल थोडं सांग ना तुझ्या...
रियान : मी काही खूप श्रीमंत कुटुंबातून आलो नाही. लहानपणापासून मला खेळाचं वेड. क्रिकेट, फुटबॉल, रग्बी, ॲथलेटिक्‍स, सायकलिंग अगदी सगळे सगळे खेळ मी खेळायचो. मी इतकंच सांगीन, की खेळावरच्या प्रेमानं मी जगलो आणि आता नावारूपाला आलो.

हे वेड नंतर तुला कुठं घेऊन गेलं?
रियान : मोठा झालो, तसं मला समजलं, की मला खासकरून सायकलिंग आणि समुद्राची जास्त ओढ आहे. २००१-०२ मध्ये माझ्या मनात काहीतरी कमाल करून दाखवायची इच्छा आली. कमाल म्हणजे माझ्या गावाहून म्हणजे केपटाऊनहून निघून डाव्या बाजूनं संपूर्ण आफ्रिकन खंडाला बाहेरून सायकलवरून एकट्यानं फेरी मारायची कल्पना माझ्या डोक्‍यात आली. स्टॅमिना आणि ताकद टिकण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर जवळपास ३५ देशांतून मला जायचं असल्यानं त्या देशांचे व्हिसा मिळवण्याकरता धडपड सुरू केली. मी अर्ज केल्यापैकी फक्त एका देशाचा व्हिसा मला मिळाला नाही. मला माझ्या दक्षिण आफ्रिका सरकारनं म्हणजेच परदेश व्यवहार मंत्रालयानं चांगलं पाठबळ दिलं. शारीरिक तयारी मी बऱ्यापैकी जोरदार केली होती. मानसिक तयारी तेवढी नव्हती- कारण माझ्यासमोर पुढं काय वाढून ठेवले आहे- मलाच माहीत नव्हतं.

म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला?
रियान : तो काळ असा होता, की काही देशांत यादवी युद्ध चालू होतं, तर काही देशांत दहशतवादाचा राक्षस घुसला होता. अतिरेक्‍यांचा सुळसुळाट वाढला होता. आता मागं वळून बघताना असं वाटतं, की मी सद्य परिस्थितीचा जास्त अभ्यास केला असता, तर मी मोहिमेवर गेलोच नसतो. काही देशांमधली अवस्था भयानक होती. चांगुलपणावर विश्‍वास ठेवून मी निघालो म्हणून जे केलं ते करू शकलो. मला ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्याची पुसटशी कल्पना मला आलेली असती, तर मी कदाचित घाबरलो असतो. मी शूरपणा दाखवून मोहिमेला सुरुवात केली तेच चांगलं केलं.

मोहिमेबद्दल सांग ना...      
रियान : काय सांगू तुला मित्रा... २००३ सप्टेंबरला मी चालू केलेली मोहीम २००५ मध्ये संपली- ज्यात मी ३४ देशांतून सायकलवर एकट्यानं प्रवास करत ३६ हजार ५०० किलोमीटर अंतर कापलं होतं. परतल्यावर माझं १४ किलोंनी वजन कमी झालं होतं. बास! जास्त काही नाही. रियाननं डोळे मिचकावत हसतहसत सांगितलं.

काय अनुभव होता?
रियान : बापरे! अनुभवांची पोतडी आहे माझ्याकडे. दोन वेळा मला अतिरेक्‍यांनी पकडलं. काही वेळा पोलिसांनी तुरुंगात टाकलं. काही विचारू नकोस. इक्वेटोरीयल गिनी या देशात मला मद्यधुंद पोलिसांनी अतिरेकी समजून तुरुंगात टाकलं. लायबेरियातली परिस्थिती अजून गंभीर होती. अंमली पदार्थांचं सेवन केलेल्या अगदी षोडशवर्षीय मुलांनी मला पकडून जिवे मारण्याची धमकी दिली आणि एक रात्र पकडून ठेवलं. अल्जिरियात मला अल्‌ कायदाच्या अतिरेक्‍यांनी हेर म्हणून पकडले आणि जायबंदी करून ठेवले. सगळ्यातून मी केवळ सुसंवादातून सुटका करून घेतली. कोणी मला काहीही इजा केली नाही. सगळ्या संकटातून मी सुखरूप बाहेर पडलो.

किती विविध माणसं भेटली असतील ना तुला?
रियान : खूप खूप. सगळीच भयानक माणसं नाही, तर चांगली माणसंही बरीच भेटली. एक सांगतो तुला. सायकलिंगची एक वेगळी ‘जमात’ आहे आपली. एकदा का तुम्ही सायकलिंग करत प्रवास करत आला आहात समजलं, की मग आपल्या जमातीची माणसं एकमेकांना खूप मदत करतात. मला किती चांगल्या मनाच्या माणसांनी मदत केली. एका अशाच सायकलप्रेमी माणसानं त्याला झालेल्या दुखापतींची कहाणी सांगितली. त्याला अपघात झाला ज्यात त्याची सायकल उलटली आणि पायाला मार लागला. एक्‍सरे काढायला गेले, तर हाडांना काही झालं नसल्याचं दिसलं. उठत असताना तेच एक्‍सरे मशीन त्याच्या पायावर पडलं आणि गुडघ्याचा चक्काचूर झाला. सहा महिने तो माणूस घरात बसून होता....आणि सर्वांत कमाल म्हणजे हा अनुभव तो मला हसत सांगत होता आणि दुसऱ्या दिवशी मला तो दहा किलोमीटर सायकलवर साथ देत सोडायला आला त्याच्या गावाच्या वेशीपर्यंत!
संपूर्ण प्रवासात कधी मला उंदीर, साप इतकंच काय वटवाघूळसुद्धा खायला लागलं. कधी घरात बोलावून स्थानिक प्रेमळ लोकांनी मला गरमगरम जेवायला घातलं. मला आवडलेली सर्वांत कमाल गोष्ट म्हणजे विविध देशांतली कॉफी. आफ्रिका खंडात किती विविध प्रकारची, स्वादाची कॉफी मिळते म्हणून सांगू. इथियोपियासारख्या देशांत कॉफी समारंभ करून प्यायला देतात जेवणानंतर. खूप मजा आली कॉफीचा स्वाद घ्यायला. सांगून खोटं वाटेल; पण प्रवास, खाणं, राहणं, औषधोपचार, पिण्याचं पाणी, सायकलच्या देखभालीचा वगैरे सगळाच्या सगळा खर्च पकडला, तरी माझा दिवसाचा खर्च एक हजार रुपयांच्या वर कधीच गेला नाही.

तुझी दुसरी मोहीमही कमाल होती....
रियान : होय. एकतर मादागास्कर बेटावर सहसा कोणी पटकन्‌ पर्यटनाला जात नाही. २००८- ०९ मध्ये मी गेलो, तेसुद्धा एकटा कयाक बोटीतून वल्हवत. एका गावी मी पोचलो, तर मला तिथल्या माणसानं आश्‍चर्यचकित होऊन विचारलं ः ‘‘आत्ता तू समुद्रातून या बोटीतून वल्हवत आलास?...वेडा आहेस का तू?’’ त्यानं मला गावातल्या चर्चपाशी नेलं. दगडांनी बांधलेल्या चर्चचा निम्मा भाग वादळानं उचकटून पार उडवून टाकला होता. तो आणि मी विचार करत बसलो, की ते वादळ मला समुद्रात कसं लागलं नाही.
मादागास्कर बेटाला बाहेरून फेरी मारत असताना मला हंचबॅक व्हेल माशांनी ‘साथ’ दिली. अगदी वीस-तीस फुटांवर ते होते. विश्‍वास बसणार नाही; पण चक्क सहा फुटी कासवांनी माझ्या बोटीखालून तरंगत मला भीती दाखवली. एकदा शार्क माशानं माझ्या कयाकला लहानशी धडक मारली; पण मला समुद्राची किंवा जलचरांची कधीच भीती नाही वाटली. तरून गेलो मी संकटांतून.
 
मला तू करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.
रियान : ‘नो फूड फॉर लेझी मॅन’ असं मी माझ्या सामाजिक संस्थेचं मजेदार नाव ठेवलं आहे. आम्ही सरळ साधं काम करतो. माझ्या मोहिमेतून जमा होणारा निधी शाळेत जाणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना विविध प्रकारचे खेळ, साहित्य देण्यात खर्च करतो. माझं नातं खेळाशी आहे. खेळानं मला काय दिलं, मी सांगू शकत नाही. माझा प्रयत्न आहे, की दक्षिण आफ्रिकेतल्या सगळ्या मुलांना मनमोकळं खेळता यायला पाहिजे.

नेल्सन मंडेला यांनी तुला भेटायला बोलावलं होतं. तो अनुभव काय होता?
रियान : संस्मरणीय. कधीच विसरू शकत नाही. नेल्सन मंडेला म्हणजे पृथ्वीवर पाठवलेला शांतिदूत. आम्ही भेटलो गप्पा मारल्या आणि नंतर पत्रकार परिषद घेतली गेली. संपूर्ण वार्तालापात मडीबांनी प्रकाशझोत फक्त माझ्यावर ठेवला. मी भारावून गेलो. मंडेलांना राष्ट्रउभारणीच्या कामात खेळ काय भूमिका करू शकतो, याचा अंदाज होता. त्यांनी मला दक्षिण आफ्रिकेतल्या जास्तीत जास्त मुलांना भेटून माझी कहाणी सांगण्याची विनंती केली. त्यांनी दाखवलेला तोच मार्ग मी पाळत आलो आहे.

आपल्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घालायला लोक काय काय करतात... आणि तू काय केलंस?
रियान : बरोबर म्हणालास तू. आपल्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घालायला लोक सिडनी हार्बर ब्रीजवर जातात, दुबईच्या बुर्ज खलिफा इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर जातात. मी माझी मैत्रीण ‘वस्ती’ला माझ्यासोबत न्यूयॉर्कला यायची विनंती केली. नीट समजून घे मित्रा... केपटाऊन ते न्यूयॉर्क वल्हवायच्या बोटीतून जायचं, मग लग्न करून हनिमूनला मयामी ते हवाई बेटांवर परत नौका वल्हवत जायचं असा माझा आग्रह होता. वस्तीनं तो मान्य केला. खरं तर ती कायदेतज्ज्ञ आहे. (हसत) वाटलं असतं, तर तिला माझ्यावर केपटाऊन न्यायालयात दावा ठोकता आला असता; पण तिनं माझ्याबरोबर केपटाऊन ते न्यूयॉर्क प्रवास बोटीतून करून मग माझ्याशी लग्नही केलं.

रियानची कथा ऐकून मी खल्लास झालो होतो. शेवटी मी त्याला म्हणालो ः ‘‘रियान, माझ्याकडे पुरावा आहे, की तुला दोन नाही, तर चार फुफ्फुसं आहेत आणि एक नाही तर दोन हृदयं आहेत. कारण त्याशिवाय अशा साहसी सफरींवर जायचा तू विचारच करू शकत नाहीस.’’
रियान माझं बोलणं ऐकून हसत सुटला. ‘‘नाही रे नाही. इतर कोणत्याही माणसाप्रमाणं मलाही दोनच लंग्ज आहेत आणि एकच हार्ट आहे. होय! माझं हार्ट मोठं असेल कदाचित हे सगळे विचार करायला आणि हिंमत दाखवायला. एक सांगतो. मी जेव्हा शाळाशाळांत जाऊन माझी कथा सांगतो, तेव्हा लहान मुलांचे डोळे विस्फारतात. त्यांच्या मनात माझ्यासारख्या भयचकित करून सोडणाऱ्या साहसी सफरींवर जायचा विचार यायला लागतो. माझ्याकरता तीच मोठी पावती आहे,’’ रियान सहजपणे म्हणाला.     

अगोदरच मला केपटाऊन शहर प्रचंड आवडतं. आता केपटाऊनला येण्याच्या कारणांमध्ये मोठी भर रियान मॅनसरशी झालेल्या मस्त दिलखुलास मैत्रीची पडली आहे. परत कधी रियानला भेटतो आणि त्याच्या अनुभवांच्या पोतडीतून अजून चार-दहा किस्से ऐकतो, असं मला झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com