पुनरागमनाचं आव्हान (सुनंदन लेले)

sunandan lele write article in saptarang
sunandan lele write article in saptarang

खेळाडू आणि दुखापत यांचं विचित्र नातं असतं. दुखापत खेळाडूला पकडायचा सतत प्रयत्न करत असते आणि खेळाडू दुखापतीच्या तावडीत सापडू नये म्हणून जिवाचं रान करत असतो. बहुतांश यशस्वी खेळाडूंना कधी ना कधी भयावह दुखापतीला सामोरं जावं लागतंच. मग उपचार आणि त्यातून सावरून खेळात पुनरागमन करायचा संघर्ष सुरू होतो. हे पुनरागमनाचं आव्हान मोठं कठीण असतं.

खेळाडू आणि दुखापत यांचं विचित्र नातं असतं. दुखापत खेळाडूला पकडायचा सतत प्रयत्न करत असते आणि खेळाडू दुखापतीच्या तावडीत सापडू नये म्हणून जिवाचं रान करत असतो. छोट्या दुखापतींना खेळाडू घाबरत नाहीत. "घाव तो पहलवानका गहना होता है' ख्यातनाम कुस्ती प्रशिक्षक आपल्या शिष्यांना अभिमानानं सांगतात तेव्हा कमाल वाटते. जगात एखादा रॉजर फेडरर असतो, जो कमीत कमी दुखापतींना सामोरे जात इतकी उंची गाठू शकला. अन्यथा बहुतांश यशस्वी खेळाडूंना कधी ना कधी भयावह दुखापतीला सामोरं जावं लागतंच. मग संघर्ष सुरू होतो उपचार आणि त्यातून सावरून खेळात पुनरागमन करायचा.

धोनीची विचारपद्धती
दुखापती आणि अपेक्षित कामगिरी न झाल्यानं युवराजसिंह कारकिर्दीच्या मधल्या काळात भारतीय संघातून बाहेर गेला होता. त्यावेळी जोरदार पुनरागमन करायच्या इच्छेनं झपाटलेला युवराज झहीर खानसोबत फ्रान्सला गेला. फ्रान्सच्या दक्षिण भागातल्या एका गावात जाऊन खास प्रशिक्षकासोबत व्यायाम करून युवराजसिंह आणि झहीर खान जबरदस्त तंदुरुस्त व्हायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी नेमका महेंद्रसिंह धोनीला पुण्यात निवांत भेटायचा योग जमून आला होता. ""फ्रान्स नावाचा देश आत्ता जन्माला आला का तिथल्या गावातला प्रशिक्षक अचानक आकाशातून अवतरला? तंदुरुस्तीच्या बाबतीत खेळाडू संघातून वगळले गेल्यावर जागे का होतात, हे मला समजत नाही. वय वाढत जातं तशी सर्वोच्च तंदुरुस्ती राखायला खास वेगळे प्रयत्न करावे लागतात. वीस वर्षांच्या मुलांना काहीही खाल्लं, प्यायलं तरी पचवता येतं. मात्र, वयाची तिशी पार केली, की खाण्यावर नियंत्रण ठेवावं लागतं; तसंच व्यायामाबरोबर शिस्तीचा पारा वर सरकवायला लागतो. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडनं वय वाढू लागल्यावर त्याकरता केलेले खास प्रयत्न मी स्वत: अनुभवले आहेत. मला पूर्वात्ताप पसंत आहे; पश्‍चात्ताप नाही,'' धोनीनं गप्पा मारताना मत सांगितलं होतं.

धोनीच्या विचारांतली स्पष्टता मला भावली होती. त्यावेळी धोनी नुकताच तिशी पार करून पुढं सरकला होता. "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे,' हे संतांचं म्हणणं धोनीला जणू माहीत होतं. त्यानं तंदुरुस्ती राखायला वेगळे प्रयत्न सुरू केले. अगोदर धोनी व्यायामशाळेत अधूनमधून जायचा. तिशी पार केल्यावर त्यानं योग्य सल्ला घेऊन व्यायामशाळेत जाऊन विविध व्यायाम करायचं प्रमाण वाढवलं.

2014 मध्ये माझं लक्ष धोनीच्या हातांकडं गेलं. फलंदाजी असो वा विकेटकीपिंग, सतत ग्लोव्ह्‌जमध्ये राहत असल्यानं धोनीचे हात फारच स्वच्छ, सुंदर दिसतात, हे मला लक्षात आलं. त्याच काळात धोनी कोणी माणूस भेटला, की हस्तांदोलन करायचं टाळून चक्क हात जोडून नमस्ते म्हणत बोलणं सुरू करायचा, असं माझ्या लक्षात आलं. असं का करतो आहेस हे विचारल्यावर त्यानं मला तेच हात जवळून दाखवले. ""सतत खेळत असल्यानं माझ्या बोटांना इजा झाली आहे. इजा वरून दिसत नाही; पण मला वेदना देते,'' हात दाखवत धोनी म्हणाला होता. विकेटकीपिंग करताना हातावर बोटांवर चेंडू आदळून बोटांच्या पेरांना ठणका लागून ती हुळहुळी झाली होती. ही अशी दुखापत असते ज्यावर इलाज करता येत नाही. विश्रांती घेणं आणि कधी गरम पाण्यानं तर कधी बर्फात शक्‍य तितका वेळ ठेवून ती बोटं शेकून काढणं हाच उपाय होता.''

धोनीला लक्षात आलं, की आपली कारकिर्द पुढं चालू ठेवायची असली, तर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्यावाचून पर्याय नाही. 24 डिसेंबर 2014. मेलबर्न क्रिकेट मैदानावरचा तो दिवस मला अजूनही आठवतो. धोनीनं कोणताही गाजावाजा न करता कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. दुखऱ्या बोटांना आणि दुखापतींनी ग्रासलेल्या शरीराला विश्रांती देण्याची निकड धोनीनं जाणली आणि मोह बाजूला ठेवून फक्त मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळायचा निर्णय पक्का केला. धोनीनं घेतलेला निर्णय किती अचूक होता हे आपल्या सगळ्यांना समजत आहे.

जवळपास तसाच निर्णय महान टेनिसपटू रॉजर फेडररनं घेतला आहे. गेली दोन वर्षं फेडरर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेताना दिसतो आहे- कारण 37 वय झालेलं दिसत असताना शरीराला किती ताण द्यायचा याचा अंदाज फेडररला आहे.

जोकोविचची धडपड
नोवाक जोकोविचला 2016,17 ही दोन्ही वर्षं कोपराच्या दुखापतीनं सतावलं होतं. विविध वैद्यकीय उपायांबरोबर सहा महिने टेनिसपासून लांब राहून विश्रांतीचा काही फरक पडतो का, हा उपायही जोकोविचनं करून बघितला. विंबल्डन स्पर्धेतल्या उपांत्य फेरीचा सामना त्याच दुखापतीनं सोडायचा दु:खद निर्णय जोकोविचला घ्यावा लागला, तेव्हा शस्त्रक्रियेवाचून पर्याय नसल्याचं त्याला मान्य करावं लागलं. दुखऱ्या कोपरावर जोकोविचनं निष्णात डॉक्‍टरांकडून ऑपरेशन करून घेतलं. वाटलं होतं त्यापेक्षा इजा गंभीर असल्यानं ऑपरेशन लांबलं.

जवळपास तशीच शस्त्रक्रिया सचिन तेंडुलकरच्या कोपरावर झाली होती. त्या अनुभवाबद्दल बोलताना सचिन म्हणाला होता ः ""शस्त्रक्रियेनंतरचं "रिहॅबिलिटेशन' अजून क्‍लेशकारक असते. टेनिस एल्बोची दुखापत फार विचित्र असते- कारण ऑपरेशन यशस्वी झालं का नाही हे डॉक्‍टरही सांगू शकत नाही. संयम ठेवून व्यायाम करून आस्तेआस्ते इजा बरी करावी लागते. त्यानंतर पहिल्यांदा बॅट हाती पकडली, तेव्हा वेदना गेली नव्हती. माझी भीती शतपटीनं वाढली. देवाच्या कृपेनं नंतर वेदना नाहीशी झाली आणि मी क्रिकेट जोमानं खेळू शकलो.''

जोकोविचनं पुनरागमनानंतर केलेला खेळ त्याच्या लौकिकाला साजेसा नाही. कोणाही नवख्या खेळाडूसमोर त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. ""दुखऱ्या कोपरावर झालेल्या ऑपरेशननंतर मी व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करायचा केलेला प्रयत्न थोडा उतावळेपणाचा आहे. मला टेनिसपासून लांब राहणं अशक्‍य व्हायला लागल्यानं मी जरा वेळापत्रकाच्या अगोदर परतलो आहे- ज्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागत आहेत. अजून मी दुखापतीतून शंभर टक्के सावरलो नाहीये हे मान्य करावं लागेल; पण हळूहळू माझी तंदुरुस्ती वाढते आहे. फटके मारताना दम पूर्ण लावता येत नाही- ज्यामुळं समोरचा प्रतिस्पर्धी फायदा घेत आहे. माझा आत्मविश्‍वास कमालीचा नाहीये, हे मान्य करावं लागेल- कारण मनात आहे ते सगळं टेनिस कोर्टावर करता न येणं हे खेळाडू म्हणून मला मान्य करणं कठीण जात आहे. मला संयम ठेवण्यावाचून आता पर्याय नाही. विश्‍वास ठेवा टेनिस जगतात सर्वोच्च स्तरावर सर्वोत्तम खेळ करायची माझी प्रेरणा आणि जिद्द शंभर टक्के कायम आहे,'' नोवाक जोकोविच म्हणाला आहे. बघा, 12 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या जोकोविचला गतवैभव पुन्हा मिळवायला किती धडपड करावी लागत आहे.

पुनरागमन कठीणच
दोन वर्षांच्या शिक्षेनंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांचं आयपीएल स्पर्धेत पुनरागमन झालं आहे. पुणे आयपीएल संघचालकांनी आततायी निर्णय घेतल्यानं धोनीचा खरं तर अपमान झाला होता. खेळावर अपार निष्ठेमुळं धोनीने अपमान गिळून पुणे संघाकरता सर्वोत्तम खेळ केला. गेल्या वर्षीची स्पर्धा संपल्यावर धोनीच्या मनात चेन्नई सुपर किंग्जचे वारे वाहायला लागले होते. पहिल्या दहा वर्षांत घेतली नाही इतकी काळजी धोनीनं 2018 च्या आयपीएल स्पर्धेची योजना आखताना घेतली. संघात कोण असायला पाहिजे, कोण नाही याचा सारासार विचार करून बांधणी केली. चालू स्पर्धेत हा लेख मांडेपर्यंत तरी चेन्नई सुपर किंग्ज गुणतक्‍त्यामधे सर्वोच्च स्थानावर आहे.

दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्स संघाच्या योजनांना स्पर्धा चालू होण्याअगोदर सुरुंग लागला. कर्णधार स्टिव्ह स्मिथ स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्यानं बसलेल्या धक्‍क्‍यातून राजस्थान रॉयल्स संघ सावरू शकला नाहीये. इतकंच काय मारझोडीच्या प्रकरणाची सुनावणी चालू असलेल्या बेन स्टोकस्‌ मोठ्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना अडखळताना दिसतो आहे.

2013, 2015 आणि 2017 मध्ये खराब सुरवात होऊन, नंतर जोरदार मुसंडी मारून मुंबई इंडियन्स संघानं आयपीएल स्पर्धेवर जेतेपदाचं नाव कोरलं होतं. 2018 च्या स्पर्धेची खराब सुरवात झाली, तेव्हा चमत्कार परत घडू शकतो हीच आशा मुंबई इंडियन्स संघचालकांना होती. दरवेळी चमत्कार घडत नाही, हेच आता दिसू लागलं आहे. आठपैकी सहा सामने गमावल्यानं मुंबई इंडियन्सकरता पुनरागमनाचे दरवाजे बंद झाल्यात जमा आहेत.

सारासार विचार केल्यावर मला महेंद्रसिंह धोनीच्या ""मला पूर्वात्ताप पसंत आहे पश्‍चात्ताप नाही,'' हा विचार भावतो. प्रोफेशनल स्पोर्टस्‌ची दुनिया एका अर्थी निर्दयी असते. इथं चुकांना क्षमा नसते. उलटपक्षी तुम्ही चुका केल्या, तर त्याचा फायदा घ्यायला प्रतिस्पर्धी टपून बसलेला असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या खेळाचा ठसा उमटवून आगमन करणं कठीण असतं यात दुमत नाही; पण दुखापतीनं किंवा खराब कामगिरीनं खेळातून बाहेर जावं लागलं, तर पुनरागमन करायला दुप्पट शक्ती लागते आणि अथक प्रयत्न करूनही यश मिळतंच असं नाही. आपापल्या खेळावर अधिराज्य गाजवलेल्या टायगर वूड्‌स, नोवाक जोकोविच आणि सेरेना विल्यम्सला पुनरागमन करताना किती त्रास होतो आहे, यातून तरुण खेळाडूंनी बोध घ्यायची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com