नशीब, जिद्द आणि बरंच काही...! (सुनंदन लेले)

sunandan lele write article in saptarang
sunandan lele write article in saptarang

दुःखद, अपमानरकारक गतकाळ विसरून आलेल्या संधीचं सोनं करणारे सॅम आणि टॉम हे करनबंधू, अल्प यशाकडंही सकारात्मकतेनं पाहणारी पी. व्ही सिंधू, आई म्हणून आपण कुठं कमी पडतो याचं सतत आत्मपरीक्षण करणारी सेरेना...आणि आपल्या गैरवर्तनानं संघातलं स्थान गमावून बसणारा बेन...
क्रीडाक्षेत्रातल्या या वेगवेगळ्या मंडळींचं वागणं बरंच काही शिकवून जाणारं आहे...

दौऱ्यावर जाण्याचे बरेच फायदे असतात. विविध लोकांना भेटता येणं, नवे संपर्क साधता येणं हे दौऱ्यावर असताना घडतं. नव्या संपर्कांमधून नव्या कहाण्या समजतात. खेळाडूंच्या जीवनात नशिबाला काय स्थान असतं, मोठे खेळाडू यशापयशाचे चढ-उतार कसे पचवतात आणि चांगला खेळाडू रागाच्या भरात आपल्या बहरणाऱ्या कारकीर्दीचं उमलणारं फूल कसं तोडून टाकतो, हे सगळं काही मला गेल्या एका आठवड्यात बघायला मिळालं. या लेखातून तेच तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न...

कठीण वाट वहिवाट
भारत-इंग्लंड संघांदरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा सामनावीर सॅम करनची कहाणी फार हेलावून टाकणारी आहे. सॅमचे वडील केव्हिन करन हे झिंम्बाब्वे संघाकडून खेळले होते. सन 1987 मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. सन 2005-07 या काळात झिम्बाब्वे संघाचे ते मुख्य प्रशिक्षकही होते. सन 2001 मध्ये रॉबर्ट मुगाबे यांनी झिंबाब्वेची सत्ता बळजबरीनं हस्तगत केली. इतकी वर्षं झिम्बाब्वेमध्ये वर्णद्वेष होता. गोऱ्या वर्णाचे लोक कृष्णवर्णीय लोकांवर अन्याय करायचे. झिबाब्वे हा देश म्हणून स्वतंत्र झाल्यावर रॉबर्ट मुगाबे यांनी सत्ता हाती घेतल्यावर सूडाचं राजकारण सुरू केलं. उलटा वर्णद्वेष सुरू करताना कृष्णवर्णीय लोकांनी गोऱ्या वर्णाच्या लोकांचा छळ चालू केला. कुणाची जमीन हडप कर, तर कुणाच्या गोठ्यातली गुरं पळवून ने, कुणाचं बहरलेलं उभं शेत जाळून टाक, तर कुणाच्या घरावर टाच आण...असं सुरू झालं.

याच दुष्टचक्रात करन यांचं कुटुंब सापडलं. मायदेशातली परिस्थिती इतकी बिघडली, की करन कुटुंबीयांना जगणं कठीण झालं. त्यावेळी सॅम, बेन आणि टॉम ही करन-भावंडं अगदी लहान होती. सन 2005 मध्ये सरकारी लोक आले आणि त्यांनी करन कुटुंबीयांना त्यांचं शेत आणि घर रिकामं करायला सांगितलं. उपकार इतकेच केले की एक महिन्याचा अवधी त्यासाठी दिला. हा मनःस्ताप केव्हिन यांच्या सहनशक्तीपलीकडचा होता, त्यामुळे वयाच्या अवघ्या त्रेचाळिसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं. सॅम तेव्हा जेमतेम 12 वर्षांचा होता. केव्हिन यांची पत्नी सेरा हिनं मुलांना वाढवण्यासाठी काबाडकष्ट केले. जेफ मार्श त्या वेळी झिम्बाब्वेमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असताना सॅम-टॉम आणि शॉन-मिचेल मार्श एकत्र खेळायच्या वयाचे होते. वेळ मिळाला की ही चारही तरुण मुलं राहत्या घराच्या मागच्या अंगणात क्रिकेट खेळायची.

इंग्लंडचा माजी खेळाडू ऍलन लॅम्ब यांनी टॉमला खेळताना बघून इंग्लंडमध्ये एका शाळेत त्याला दाखल करून घेण्यासाठी शब्द टाकला. टॉम शाळेत दाखल होऊन क्रिकेटही खेळू लागला. नंतर लॅम्ब यांनी सॅमला बघितलं आणि परत त्याच शाळेत सॅमला प्रवेश देण्याविषयी विनंती केली. शाळेनं ती मान्य केली. कारण, सॅम क्रिकेट सुरेख खेळायचा. दोन्ही भावंडांमध्ये अष्टपैलू क्रिकेटचे गुण वडिलांकडून आले होते. पतीविना दोन मुलांना वाढवायचा खर्च एकट्या सेराला झेपत नसताना लॅम्ब यांनी दोन्ही मुलांसाठी खूप काही केलं. लॅम्ब आणि केविन हे जिवश्‍चकंठश्‍च मित्र होते. ते एकत्र कौंटी क्रिकेट खेळायचे.

सन 2015 मध्ये कौंटी संघात टॉमला पहिल्यांदा संधी दिली गेली. नंतर सरे संघानं सॅमला संघात दाखल करून घेतलं. "17 वर्षांच्या सॅमला इंग्लंड संघात खेळायची संधी द्यायला हवी,' यासाठी निवड समितीचे सदस्य एड स्मिथ यांनी समितीचं मन वळवलं. कौंटी स्पर्धेत सॅमनं जी चमक दाखवली होती, तिच्यामुळं स्मिथ हे समितीचं मन वळवू शकले.

पदार्पणाच्या कसोटीत सॅमला मोठी छाप पाडणारा खेळ करता आला नाही. भारताविरुद्ध बर्मिंगहॅमला होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळायची संधी सॅमला देण्यात आली. तिचं त्यानं सोनं केलं. दोन्ही डावांत उपयुक्त धावा मोक्‍याच्या नाजूक क्षणी सॅमनं केल्या आणि गोलंदाजीत चेंडू स्विंग करायचं तंत्र आपल्याला येत असल्याचं सिद्ध केलं. इंग्लंड संघानं पहिला कसोटी सामना जिंकला, ज्यात सॅमच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल "मॅन ऑफ द मॅच'चं बक्षीस त्याला देण्यात आलं. मायदेशात करन कुटुंबीयांचे झालेले हाल ऐकल्याच्या पार्श्वभूमीवर सॅमनं आपल्या वडिलांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी बजावलेली कामगिरी खरोखरच विस्मयकारक वाटावी अशीच आहे. नशिबानं साथ दिली नसती, तर सॅम आणि टॉम हे झिम्बाब्वेत रखडणाऱ्या असंख्य तरुण मुलांमध्येच जमा झाले असते. तेव्हा खेळाडूंच्या जीवनात स्वकर्तृत्वाबरोबरच नशिबालाही स्थान असतं, हे नाकारून चालणार नाही.

कहाणी दोन जिद्दी महिलांची
गेल्या आठवड्यात पी. व्ही. सिंधूनं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामना गमावल्यावर चर्चेला उधाण आलं. सिंधू नेमकी अंतिम लढतीत का अपेक्षित खेळ करत नाही वगैरे मतं क्रीडाप्रेमींनी मोठ्या अहमहमिकेनं मांडली. अगदी खरं सांगायचं तर बॅडमिंटनच्या खेळात आपले खेळाडू सातत्यानं सर्वोच्च पातळीवर कमालीचा खेळ करत आहेत. केवळ मुलीच नव्हे तर मुलंही या खेळाडूंना पराभवाचे झटके देत आहेत. गेली जवळपास 10 वर्षं बॅडमिंटनच्या क्षेत्रात भारतात क्रांती झाली नाहीय, तर ती घडवून आणली गेलीय!

अंतिम फेरीत पोचल्यावर आशा वाढतात, हे मान्यच आहे; पण म्हणून लगेच पराभूत झाल्यावर टीकेचे सूर काढणं हेही दरवेळी बरोबर नाही. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सिंधू जे म्हणाली ते मार्मिक आहे. ती म्हणाली ः ""मी सुवर्णपदक गमावलं नाही तर रौप्यपदक कमावलं आहे...माझं पदक चमकत आहे...गेल्या काही मोठ्या स्पर्धांमध्ये मी सातत्यानं चांगला खेळ करून अटीतटीचा सामना जगातल्या सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंना देत आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. यश मिळाल्यावर सभ्यता बाळगायची आणि अपयश पचवायची ताकदही वाढवायची हाच माझा मंत्र आहे.''
दुसरीकडं सेरेना विल्यम्सनं फार भावनिक म्हणणं मांडलं. ती आई झाल्यानंतर पुनरागमनाच्या प्रयत्नात आहे. विम्बल्डन स्पर्धेत अंतिम फेरी गाठून सेरेनानं खरंच कमाल करून दाखवली. एकेकाळी कुणीच सेरेनाला आव्हान देऊ शकत नव्हतं आणि आता कधी कधी साध्या खेळाडूंकडूनही तिचा पराभव होत आहे म्हणून तिच्यावर टीका होत असतानाच सेरेनानं हे मत व्यक्त केलं आहे. ती म्हणते ः ""आई झाल्यानंतर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जाण्यासाठी जे आत्मबळ लागतं, त्याच्याविषयी मी विचारच केलेला नव्हता. टेनिस माझं जीवन आहे. खेळापासून मी लांब राहू शकत नाही. त्यासाठी माझा पुनरागमनाचा प्रयत्न सुरू आहे. मी आणि माझे सहकारी त्यासाठी खूप मेहनत करत आहोत; पण कधी कधी स्पर्धेत खेळताना किंवा सराव करताना माझ्यातली आई जागी होते आणि स्वत:लाच विचारते ः "एक आई म्हणून तू तुझ्या मुलीसाठी जे आवश्‍यक आहे ते सर्व काही करत आहेस का?' मग जेव्हा मला या प्रश्नाचं शंभर टक्के सकारात्मक उत्तर मिळत नाही तेव्हा मी बेचैन होते...स्वतःला अपराधी समजू लागते. "मी चांगली आई नाहीय' असं मला वाटू लागतं. मी माझं मलाच समजून घेण्यासंदर्भात हा काळ मोठा कठीण आहे.''
सेरेनानं हे प्रांजळ मत व्यक्त केलं आणि त्याला जगभरातून प्रचंड पाठिंबा मिळाला.
दोन जिद्दी महिला खेळाडूंचे हे दृष्टिकोन खूप काही शिकवून जात नाहीत काय?

एक भरकटलेलं पाऊल
दुसऱ्या कसोटीला लॉर्डस मैदानावर सुरवात झालेली असताना इंग्लंड संघ बेन स्टोकस नावाच्या अष्टपैलू खेळाडूला संघात घेऊ शकलेला नाही. बेननं याच वर्षी ब्रिस्टल गावातल्या एका पबमधे धिंगाणा घातला. मद्याच्या धुंदीत त्याची दुसऱ्या लोकांशी बाचाबाची झाली. तिचं रूपांतर धक्काबुक्कीत, मारामारीत झालं. बेननं दोन मुलांना ठोसे लगावले. त्यातल्या एकाला मारलेला ठोसा इतका जोराचा होता की तो मुलगा कोसळलाच. इतकंच नव्हे तर बेननं केलेल्या आघातानं त्या मुलाच्या जबड्याला फ्रॅक्‍चर झालं.

प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं. बेनवर सध्या खटला सुरू आहे. "मी ही कृती फक्त आत्मरक्षणासाठी केली,' असं म्हणणं बेननं सुरवातीला मांडलं. मात्र, बेनच्या या मारामारीचं एका माणसानं मोबाईल फोनमधल्या व्हिडिओद्वारे चित्रीकरण केलं होतं. मद्यसेवन करून बेन हे कृत्य करत असल्याचं त्या चित्रीकरणातून स्पष्ट दिसत आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मौज-मजा करण्याच्या उद्देशानं बाहेर पडतात; पण जेव्हा ते पबमध्ये जाऊन मद्यसेवन करतात, तेव्हा त्यांचं वर्तन भयानक असतं असंच आढळून आलेलं आहे. बर्मिंगहॅमला एका पबमध्ये डेव्हिड वॉर्नरनं मद्यसेवनानंतर ज्यो रूट याला ठोसा लगावला होता. त्या कृत्याकरता चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेतून वॉर्नरला बाहेर पडावं लागलं होतं. बेन स्टोकसला त्याच्या कृत्याकरता इंग्लंड संघाचे काही सामने गमवावे लागले आहेत. म्हणजेच क्षणिक सुखासाठी किंवा नशेसाठी मद्यसेवन केल्यानंतर एक पाऊल चुकीचं पडलं तर त्याची किती भयानक शिक्षा भोगावी लागते हेच वॉर्नर आणि बेन यांच्या उदाहरणांतून स्पष्ट होत आहे. दोघंही अफलातून क्रिकेटपटू असले तरी त्यांची वर्तणूक संस्कारशील दिसत नाही. खेळाडू कितीही गुणवान असला तरी जर त्याचं पाऊल भरकटलं तर काय होतं तेच ही दोन्ही उदाहरणं सांगतात.

पूर्णतः वेगवेगळ्या असलेल्या या कहाण्या एकाच आठवड्यातल्या आहेत...कुणाचा पतंग उंच उडतो...कुणाचा थोडा गोते खातो आणि कुणाचा भरकटून काटेरी झाडात अडकून फाटतो हे समजून घेताना बरंच काही शिकायला मिळतं आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com