क्रिकेटसमोरची मोठी आव्हानं (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा संघातल्या खेळाडूंबरोबर योग्य संवाद नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या आव्हानांचा परामर्श.

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघाला वेस्ट इंडीजसमोर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायला लावणं म्हणजे पीएचडीच्या थिसिसनंतर नववीची परीक्षा द्यायला लावण्याचा प्रकार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला 4-1 पराभव पत्करावा लागला होता. मालिका जिंकूनही इंग्लंडच्या कर्णधारानं मोकळेपणानं मान्य केलं होतं ः ""निकाल 4-1 दिसत असला, तरी ही मालिका त्यापेक्षा बरीच संघर्षपूर्ण झाली. प्रत्येक सामना जिंकायला भारतीय संघानं आम्हाला झगडायला लावलं. इंग्लंड संघानं योग्य वेळी योग्य खेळ करायची ताकद प्रत्येक अडचणीच्या क्षणी दाखवली म्हणूनच आम्हाला मालिका जिंकता आली.' शक्‍य असलेले विजय साकारता आले नाहीत, म्हणून विराट कोहली आणि त्याचे सहकारी निराश झाले. अर्थात, त्या पराभवात लाज वाटण्यासारखं काही नव्हतं, एक नक्की आहे. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट बघायला मिळाल्याचं समाधान होतंच.

दुसऱ्या बाजूला भारत विरुद्ध वेस्ट इंडीजदरम्यानचा पहिला कसोटी सामना जिंकूनही भारतीय संघाच्या चेहऱ्यावर खदखदून हास्य नव्हतं. कारण पहिल्या सामन्यात "लढत' नव्हतीच. वेस्ट इंडीज संघाच्या खेळाडूंना आपण कसोटी सामना खेळतो आहोत, असं जणू वाटतच नव्हतं. दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यात लढत होते, तेव्हाच खेळात रंग भरतो, त्या मुकाबल्याचा आनंद प्रेक्षकांना मिळतो. वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला कसोटी सामना म्हणजे कसोटी क्रिकेटची थट्टा होती. इतकंच काय, कसोटी क्रिकेटला लागलेल्या घरघरीची ती अत्यंत खराब जाहिरात होती.
मला खरं तर सकारात्मक लेख लिहायला आवडतात. मात्र, क्रिकेटसमोरची आव्हानं मांडण्यावाचून पर्याय नाहीये, अशी परिस्थिती आली आहे. त्यात सकारात्मकतेपेक्षा नैराश्‍याची भावना जास्त आहे.

मला वेस्ट इंडीजबद्दल प्रचंड प्रेम आहे. 24 बेटांवरचे लोक- ज्यांचे देश, चालीरीती इतकंच काय पासपोर्टसुद्धा वेगळे आहेत, जे ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत आपापल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि फक्त क्रिकेट खेळायला एकत्र येतात- त्याला आपण "वेस्ट इंडीज' संबोधतो. कल्पना यावी म्हणून मी फक्त एका बेटाची क्रिकेट कहाणी तुम्हाला सांगतो- ज्याचं नाव आहे बार्बाडोस.
बार्बाडोस बेट 34 किलोमीटर लांब आणि 24 किलोमीटर रुंद आहे. होय! फक्त 430 चौरस किलोमीटरचा हा देश आहे. 97 किलोमीटरचा सुंदर समुद्र किनारा बार्बाडोसला लाभला आहे. जेमतेम तीन लाख लोकसंख्या असलेला बार्बाडोस नावाचा संपूर्ण देश कारनं पालथा घालायला अर्धा दिवस खूप होतो.

इतक्‍या छोट्या देशानं क्रिकेट जगतावर राज्य केलं आहे. विश्वास बसत नाही तुमचा? मग ही नावं वाचा ः फ्रॅंक वॉरल, इव्हर्टन विक्‍स, क्‍लाईड वॉलकॉट, सर गारफिल्ड सोबर्स, कॉनरॅड हंट, वेस हॉल, ज्योएल गार्नर, माल्कम मार्शल, गॉर्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स आणि सिल्व्हेस्टर क्‍लार्क. होय! हे सगळे महान क्रिकेटपटू बार्बाडोसमध्ये जन्माला आले आणि त्यांनी क्रिकेटविश्व अफलातून कामगिरी करून दणाणून सोडलं.
भारतीय संघानं 1983च्या विश्वकरंडक अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाला पराभूत केलं, तो क्षण निर्णायक ठरला. त्यानंतर क्‍लाईव्ह लॉईडच्या संघानं भारतात येऊन पराभवाचा बदला घेतला, तरी त्यानंतर वेस्ट इंडीज संघातली रया जायला लागली. जमाना बदलला आणि ब्रायन लारासारखे कमाल खेळाडू येऊन आपला कायमचा ठसा उमटवून गेले; पण संघ म्हणून वेस्ट इंडीजनं अपेक्षित कामगिरी केली नाही. आता तर, "तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटणं' अशी अवस्था वेस्ट इंडीज क्रिकेटची झाली आहे.

एक काळ असा होता, की वेस्ट इंडीज संघात तर सोडा- बार्बाडोस संघातसुद्धा प्रवेश करायला खेळाडूंना अशक्‍यप्राय कामगिरी करून दाखवायला लागायची. आता बदललेल्या भयानक परिस्थितीची कल्पना यावी म्हणून एकच उदाहरण देतो. सध्याच्या वेस्ट इंडीज संघात शिमरॉन हेटमायर नावाचा 21 वर्षीय खेळाडू अव्वल फलंदाज म्हणून आहे. त्याच्या नावावर फक्त प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये केलेलं फक्त एक शतक आहे. केवळ गुणवान खेळाडू असं बिरुद लावून निवड समितीनं त्याला संघात घेऊन सात कसोटी सामने खेळवले आहेत.

एकीकडं गेल्या 15 वर्षांत दोन वेळा विंडीज संघानं टी-20 विश्‍वकरंडक जिंकला आहे. दुसऱ्या बाजूला कसोटी क्रिकेटमधली त्यांची खराब कामगिरी चटका लावत आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलला काही ना काही उपाय योजना करून वेस्ट इंडीज क्रिकेटची घसरण थांबवावी लागेल. नाहीतर वेस्ट इंडीजचे खेळाडू फक्त टी-20 क्रिकेट खेळणं पसंत करून रोजीरोटी कमावण्यावर समाधान मानतील. विंडीज संघ क्रिकेटला एक रंग आणतो, हे लक्षात घेता त्यांच्या संघाला अशा गटांगळ्या खाताना बघणं फार क्‍लेषकारक आहे.

अर्थात, कसोटी सामन्यांमधे सपाटून मार खाल्ला तरी एकदिवसीय आणि खास करून टी-20 सामन्यांत विंडीज संघ चमकदार कामगिरी करून दाखवेल, अशी मला आशा आहे.

कोलपॅकचं आव्हान
प्रेरणेचा अभाव हा वेस्ट इंडीज क्रिकेटसमोरचा प्रश्न आहे, तर दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. हा कोलपॅक करार काय आहे हे समजून घेऊयात, म्हणजे तुम्हाला त्याचं गांभीर्य समजेल. काइल ऍबट नावाचा तगडा वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा विश्वासाचा घटक बनत असताना त्यानं निर्णय घेतला, की कोलपॅक करारावर सही करून आपली कारकीर्द इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यात घालवायची. युरोपियन युनियनमधल्या फ्री ट्रेड ट्रीटी करारावर सही केलेल्या देशांतील नागरिक इतर सहभागी देशांत काम करायला बिनदिक्कत जाऊ शकतात. तसाच कॉंटू करार दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडसोबत केला आहे. या करारानुसार दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं कोलपॅक करारावर सही केली आणि जर त्याला कोणत्याही कौंटीनं आपल्या संघात दाखल करून घेतलं, तर तो खेळाडू परदेशी खेळाडू धरला जात नाही. प्रत्येक कौंटीला फक्त एकच परदेशी खेळाडू संघात खेळवण्याची परवानगी असल्यानं कोलपॅक करारावर सही केलेला खेळाडू संघात असल्याचा फायदा घेता येतो. हॅंम्पशायर कौंटीनं काईल ऍबटला आपल्या संघात घेताना हीच युक्ती वापरली आहे.

कोलपॅक कराराचा एक मोठा तोटा आहे, तो म्हणजे या करारावर सही केलेल्या खेळाडूला नंतर त्याचा जन्म झालेल्या देशाच्या संघात खेळता येत नाही. क्रिकेट खेळून योग्य मोबदला मिळत नसल्यानं दक्षिण आफ्रिकेतले काही गुणवान खेळाडू कोलपॅक करारावर सही करून इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळायचा पर्याय पसंत करत आहेत- कारण त्यांना चांगल्या जीवनशैलीसोबत चांगले पैसे कौंटी देत आहेत.
कोलपॅक करारानं काईल ऍबट आणि रायली रसो हे दोन दर्जेदार खेळाडू दक्षिण आफ्रिकेनं गमावले आहेत. मॉर्ने मॉर्कलनं आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द जरा लवकर संपल्याचं जाहीर करताना कोलपॅक करार स्वीकारला आहे. वेस्ट इंडीजचा ड्‌वेन स्मिथनंही कोलपॅक करार करणं पसंत केलं आहे. भविष्यात अजूनही काही गुणवान खेळाडू लहान वयातच कोलपॅक कराराचा विचार करणार नाहीत ना, या शंकेनं दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाला घरघर लागली आहे.

भारतीय क्रिकेटमधील आव्हानं
क्रिकेटचा विषय निघाला, की भारतीय क्रिकेटला लांब ठेवताच येत नाही. नजीकच्या भविष्यकाळात भारतीय क्रिकेटला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीसोबत काम करावं लागत आहे- ज्यातून विविध आव्हानं निर्माण होत आहेत. न्यायालयानं बीसीसीआयच्या सर्व संलग्न संस्थांना आपल्या घटनेत बदल करायला भाग पाडलं आहे. बऱ्याच संस्थांनी बदल करताना मुख्य विषयांना समजून उमजून बरोबर बगल दिली आहे. न्यायालयानं दिलेल्या आदेशांची दिशाभूल करणाऱ्या नव्या घटना काही संस्थांनी सादर केल्या आहेत. कमिटी ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर अशा "नाठाळ' संस्थांना कसं जागेवर आणतं, हे मोठं आव्हान आहे.

सर्वांत मोलाचं आव्हान आहे ते म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये खरी लोकशाही राबवण्याचं. 2018 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला तेव्हापासून भारतीय संघात खरी मोकळी लोकशाही आहे की नाही याची चर्चा चालू झाली. संघातल्या महत्त्वाच्या खेळाडूंना अचानक काही कसोटी सामन्यांतून वगळण्यावरून माध्यमांनी ताशेरे ओढले. संघ व्यवस्थापनानं माध्यमांचे फटकारे सहन केले नाहीत- उलट माध्यमांशी "पंगा' घेणं पसंत केलं. तीच रणनीती इंग्लंड दौऱ्यात चालू राहिली. इतके दिवस संघातला कोणीही खेळाडू संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीच्या विचारांवरून अवाक्षर काढत नव्हते. इंग्लंड दौऱ्यानंतर मुरली विजय आणि करुण नायर यांनी संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा संघातील खेळाडूंबरोबर योग्य संवाद नसल्याचं बोलले आहेत. बीसीसीआयनं खेळाडूंचं म्हणणं समजून घेण्याऐवजी नियमांवर बोट ठेवून संबंधित खेळाडूंना कारणं दाखवा नोटीस पाठवायची कार्यवाही चालू केल्याचं समजतं.

संघ व्यवस्थापन खेळाडूंशी सुसंवाद साधत नाही, ही कुजबुज खेळाडूंमध्ये चालू झाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीनं नाराज खेळाडूंचा राग करायची चूक केली, तर खूप महागात पडेल. बीसीसीआय आणि निवड समिती कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकाला संपूर्ण पाठिंबा देताना खेळाडूंच्या म्हणण्याकडं काणाडोळा करू लागली, तर आत्ता सुधारू शकतील अशा चुकांचं रूपांतर मोठ्या आव्हानांत व्हायला वेळ लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com