बदल करा; खेळ वाचवा (सुनंदन लेले)

बदल करा; खेळ वाचवा (सुनंदन लेले)

कोणत्याही खेळात दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना समान संधी असेल, तरच मजा येते. क्रिकेटमध्ये तर बॅट-बॉलचं युद्ध रंगलंच पाहिजे. मात्र, गेले काही दिवस गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना पोषक वातावरण तयार केलं जात आहे. सध्या सुरू असलेल्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ही गोष्ट अनेकांना खटकली. इयान चॅपेल, सचिन तेंडुलकर आणि क्‍लाइव्ह लॉईड यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनीही धोक्‍याची घंटा वाजवली आहे. क्रिकेटमधल्या या नव्या ‘ट्रेंड’चा परामर्श.

बॅट-बॉलमधलं युद्ध रंगतं, तेव्हाच क्रिकेटचा सामना रंगतो. फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही आपलं कसब दाखवायची समान संधी लाभते. सध्या सुरू असलेल्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेत मात्र वेगळंच चित्र बघायला मिळत आहे. काही सामन्याचा अपवाद वगळता संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीला पोषक खेळपट्ट्या बनवल्या गेल्या होत्या. ‘फलंदाजांना मिठाई आणि गोलंदाजांची पिटाई’ असं सतत चालू होतं. क्रिकेट जाणकारांना ही गोष्ट चांगलीच खटकली आहे. फलंदाजांना असंच झुकतं माप मिळत राहिलं, तर मर्यादित षटकांच्या सामन्याची मजा निघून जाईल आणि सामने म्हणजे नुसतं ‘फलंदाजीचं प्रदर्शन’ बनत जाईल.

‘मिनी वर्ल्डकप’ नावानं जाणल्या जाणाऱ्या चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना आज होत असताना जाणकार बजावून सांगत आहेत, की नियमांत बदल करा- अन्यथा विनाश अटळ आहे.

इयान चॅपेल यांचा संताप
स्पष्टवक्तेपणाकरता प्रसिद्ध असलेले माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार इयान चॅपेल यांनी क्रिकेटच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘फलंदाज गोलंदाजांना कच्चे खात आहेत. बॅटचे आकार विचित्र मोठे आहेत, त्यामुळं खराब फटकाही प्रेक्षकांत जाऊन पडत आहे. ‘टी-२०’ सामन्यांत सीमारेषा इतक्‍या आत का आणल्या जात आहेत, हे समजत नाही. आधीच कित्येक फलंदाजांनंतर एखाद्या गोलंदाजाला ‘नाईटहूड’ मिळते. आता अशी वेळ येईल, की ‘नाईटहूड’साठी नव्हे, तर दयायाचनेसाठी गोलंदाजांना गुडघ्यावर बसावं लागेल. गोलंदाजांवर अन्याय करणारे नियम लगेच बदलले गेले नाहीत, तर विनाश अटळ आहे,’’ असं मत चॅपेल यांनी व्यक्त केलं आहे.

बॅटच्या आकारावर निर्बंध
आयपीएल सामने होत असताना पुण्यात एका सामाजिक संस्थेकरता निधी जमा करायला क्रिकेट स्मृतिचिन्हांचा लिलाव होणार होता. प्रथितयश खेळाडूंच्या बॅट्‌स, शर्ट, ग्लोव्ह्‌ज, बूट आदी गोष्टी लिलावात ठेवल्या गेल्या होत्या. लिलावाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हर्षा भोगले करणार होता. कार्यक्रमाआधी गप्पा मारताना हर्षाला म्हणालो ः ‘‘काय मस्त २१ स्मृतिचिन्हं ठेवली आहेत.’’
‘‘सुनंदन, स्मृतिचिन्हं २१ नाहीत- २० आहेत,’’ हातातल्या यादीकडं बघून हर्षा म्हणाला. ‘‘हर्षा, स्मृतिचिन्हं २० नाहीत- २१ आहेत,’’ मी मुद्दा सोडला नाही. ‘‘माझ्या हातात यादी आहे सुनंदन...लावतोस का पैज?...स्मृतिचिन्हं २० आहेत,’’ हर्षा काहीसा चिडून म्हणाला.      
हर्षा मला बाहेर ठेवलेल्या स्मृतिचिन्हांकडं नेऊन म्हणाला ः ‘‘बघ बघ. किती आहेत मोज. २० आहेत ना?’’
‘‘हर्षा, ख्रिस गेलच्या बॅटला तू एक धरणार असलास तर मी पैज हरलो रे,’’ डोळे मिचकावत मी म्हणालो.
‘‘खरं आहे रे... ख्रिस गेलची बॅट म्हणजे दोन बॅट एकत्र जोडल्याप्रमाणं आहे,’’ हसतहसत हर्षा म्हणाला.
सांगायचा अर्थ असा, की डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेलच्या बॅटच्या आकार इतका मोठा आहे, की बघून गंमत वाटते. काही महिन्यांपूर्वी क्रिकेटचे नियम ज्यांच्या अखत्यारीत आहेत, त्या मेर्लिबोन क्रिकेट क्‍लबनं नवे नियम मांडले- ज्यात बॅटच्या चेहऱ्याची रुंदी १०८ मिलिमीटर, कमाल जाडी ६७ मिलिमीटर आणि कडांची कमाल जाडी ४० मिलिमीटर ठेवता येईल, असं जाहीर केलं आहे.

२५-२५ षटकांचे दोन डाव
लंडनमधल्या वास्तव्यात सचिन तेंडुलकरला निवांत भेटायची संधी मिळाली. पावसानं व्यत्यय आणलेला सामना आम्ही एकत्र बघत होतो. ‘‘किती दिवस हे नियम असेच आहेत. पावसानं व्यत्यय आणला, की सामन्याचं वाटोळं होतं. मला २००२च्या चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धेची आठवण होते. अंतिम सामन्यात सलग दोन दिवस आम्ही ५० षटकांची फिल्डिंग केली आणि भारताची फलंदाजी चालू झाल्यावर पाऊस आला होता. थोडक्‍यात दोन दिवस मिळून ११५च्या आसपास षटकांचा खेळ होऊनही सामन्याचा निकाल लागला नव्हता. भारत आणि श्रीलंकेला एकत्र विजेता घोषित करावं लागलं होतं. ११५ षटकांचा खेळ होतो, तर मग निकाल लागायला नको का? माझ्या मनात एक योजना आहे. एकदिवसीय सामना ५०-५० षटकांचाच होईल. फक्त त्यात २५-२५ षटकांचे दोन डाव खेळवले जातील. यानं होईल काय, की पहिला २५-२५ षटकांचा खेळ पूर्ण झाला, तरी नंतर पाऊस पडला, तरी हाती निकाल असेल,’’ सचिननं योजना मांडली. ‘‘अजून एक महत्त्वाचा मुद्दा. जगात अशी खूप मैदानं आहेत- जिथं दिवस रात्रीचा सामना होत असताना दवाचा खूप परिणाम होतो. नाणेफेक जिंकलेला कर्णधार बेधडक दर वेळी गोलंदाजी करायचा निर्णय घेतो- कारण संध्याकाळी दव पडायला सुरवात होते. दव पडलं आणि मैदान ओलं झालं, की गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या अडचणी वाढतात. जमिनीलगत मारलेला चेंडू दवानं भिजलेल्या गवतावरून गेला, की ओला होता. ओला झालेला चेंडू वेगवान गोलंदाज स्विंग करू शकत नाहीत, किंवा फिरकी गोलंदाज स्पीन करू शकत नाहीत. गोलंदाज हताश झाले, की फलंदाजांना आघाडी मिळवणं खूप सोपं जातं. २५-२५ षटकांचे दोन डाव एकदिवसीय सामन्यात खेळवले, तर दोन्ही संघांना चांगल्या हवेत २५ षटकं खेळायला मिळतील आणि दवाचा त्रास दोघांना समसमान होईल,’’ असं सचिन सांगत होता.

एकच चेंडूनं खेळायला हवं
एकदिवसीय सामन्यातले नियम गोलंदाजांना जखडून ठेवणारे आहेत, असं सचिन तेंडुलकरला वाटत आहे. ‘‘नियम असे केलेत, की गोलंदाजांना मर्यादा घातल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात दोन बाजूंनी दोन वेगळे नवे चेंडू वापरले जातात. ३५ षटकांनंतर कर्णधार त्यातला एक चेंडू घेऊन उरलेल्या १५ षटकांचा मारा पूर्ण करू शकतो; पण १७ षटकं टाकलेला चेंडू होऊन-होऊन किती जुना होणार?...आणि चेंडू जुना झाला नाही, तर वेगवान गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगचं कौशल्य कसं वापरता येणार? चेंडू नवा राहत असल्यानं फिरकी गोलंदाजांनाही चेंडू बोटात घट्ट पकडून त्याला फिरकी देणं कठीण होतं. भारतीय उपखंडात चेंडू पटकन्‌ खराब व्हायला सुरवात होते; पण इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफिकेतली मैदानं इतकी चांगली असतात, की चेंडू खराब व्हायची प्रक्रिया खूप उशिरानं चालू होते. चेंडू नवा राहत असल्याचा फायदा फलंदाजांना होतो- कारण जुन्या झालेल्या चेंडूंवर मोठे फटके मारणं कठीण जातं. म्हणूनच मला दोन चेंडूंनी एकदिवसीय सामना खेळण्याचा नियम गोलंदाजांसाठी जाचक वाटतो,’’ सचिननं विचारपूर्वक मुद्दे मांडले.

प्रेक्षकही कंटाळतील
भारतीय संघ बांगलादेशसमोर उपांत्य सामना खेळत असताना क्‍लाइव्ह लॉईड भेटले. स्वत: फलंदाज असून त्यांनाही फलंदाजांचे इतके लाड होताना बघणं पटत नाहीये. ‘‘मी कॉमेंटरी करतो, तेव्हा परतपरत फक्त फलंदाजांच्या कौतुकाचे शब्द बोलावे लागतात. करूनकरून किती स्तुती करणार, किती विशेषणं वापरणार मला सांग. आम्ही खेळत होतो, तेव्हा बॅट-बॉलमधे लढत व्हायची. कौशल्य वापरायला दोघांना समान संधी असायची. ‘टी-२०’ क्रिकेटनं बरेच चांगले बदल केले असले, तरी काही बदल चांगले नाहीत. किती मोठ्या बॅट्‌स वापरतात आजचे काही फलंदाज!...त्यांचा आकार गोलंदाजांवर अन्याय करणारा आहे. आयसीसीनं एकदिवसीय सामन्यांतल्या खेळपट्ट्या कशा असाव्यात, याकडं बारीक लक्ष देणं आता खरंच गरजेचं झालं आहे. चालू स्पर्धेतल्या विकेट्‌स फक्त फलंदाजांना मदत करत आहेत. असंच चालू राहिलं, तर सध्या मोठ्या फटक्‍यांना आवाजी दाद देणारे प्रेक्षक काही दिवसांनी तेचतेच बघून कंटाळून जातील,’’ क्‍लाईव्ह लॉईड त्यांच्या खास खर्जातल्या आवाजात सांगून गेले.
सुरवातीला बरीच वर्षं फक्त कसोटी क्रिकेटचं राज्य होतं. प्रेक्षकांना नव्या जमान्यात काहीतरी चटपटीत पाहिजे, म्हणून एकदिवसीय क्रिकेटचा घाट घालण्यात आला. एकदिवसीय क्रिकेटपेक्षाही काहीतरी चमचमीत पाहिजे, म्हणून ‘टी-२०’ क्रिकेट सुरू झालं. मर्यादित षटकांच्या सामन्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद जास्त लाभतो, हे मान्य. ‘टी-२०’ प्रकारानं क्रिकेटला संपूर्ण नवे प्रेक्षक मिळवून दिले आहेत. मात्र, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातले क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक अजूनही त्याच उत्साहानं कसोटी सामन्यांना गर्दी करतात. बाकी देशांत तसं प्रेम राहिलेलं नाही. लोकांचा कल मर्यादित षटकांच्या सामन्याकडं जास्त झाला आहे. कसोटी क्रिकेट बघायला येणारा प्रेक्षकवर्ग वेगळा असतो. त्याउलट मर्यादित षटकांचा सामना बघायला आलेल्या प्रेक्षकाला क्रिकेट नाही तर ‘क्रिकेटेनमेंट’ हवी असते.

‘टी-२०’ असो वा एकदिवसीय सामना-त्यांच्या आयोजनातून संघटकांना जबरदस्त आर्थिक फायदा होतो. इंग्लंडनं आपणहून चॅंपियन्स करंडक स्पर्धेचं आयोजन करायची तयारी दाखवली, याला तेच कारण आहे. क्रिकेटचा प्रचार-प्रसार व्हायला मजबूत अर्थकारण ही मोठी जमेची बाजू आहे, यात शंका नाही. सर्व सकारात्मक गोष्टी मान्य केल्या, तरी लोकप्रियता जपून ठेवायला खेळाच्या मूळ अंगाला म्हणजे बॅट-बॉलमधल्या युद्धाला बाधा आणणं क्रिकेटच्या प्रगतीला ब्रेक लावणारं ठरणार आहे.
खेळ कोणताही असो- त्यात दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना समान संधी पाहिजे. तरच मजा येते. क्रिकेटच्या खेळातली नेमकी तीच मजा सध्या हिरावून घेतली जात आहे. इयान चॅपेल, सचिन तेंडुलकर आणि क्‍लाइव्ह लॉईड यांच्यासारखे दिग्गज खेळाडू धोक्‍याची घंटा वाजवत आहेत. आयसीसीनं कानांतले बोळे काढून त्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com