कुंपणं तोडा मर्यादांची (सुनंदन लेले)

कुंपणं तोडा मर्यादांची (सुनंदन लेले)

आपण धडधाकट माणसं बहुतांश वेळी आपल्याकडं काय नाही याचं तोंडाचा चंबू करून वर्णन करत बसतो. दिव्यांग खेळाडूंची जिद्द बघितल्यावर आपल्याला खऱ्या समस्यांची जाणीव होते. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ‘काय नाही’पेक्षा देवानं, निसर्गानं आपल्याला ‘काय दिलं आहे,’ याचे मनोमन आभार मानून पुढं सकारात्मक विचारांनी कामाला लागलो, तर खरी मानवंदना या खेळाडूंना मिळेल. मर्यादा फक्त मनात असतात... मर्यादांची कुंपणं मनातून तोडून टाकली, की अशक्‍य काहीच नसतं. दीपा मलिक, मरिअप्पन थेंगावेलू, अरुणिमा सिन्हा यांच्या या प्रेरणादायी कहाण्या तेच तर सांगतात...

‘‘छे  छे! मी त्यांच्याबरोबर वर कसा बसणार?... माझी क्षमता नाही... ते ऑलिंपिक पदकविजेते आहेत. मी खाली बसतो तेच बरोबर आहे... सर्व ग्लॅमर, प्रसिद्धीव-0र फक्त त्यांचा हक्क आहे,’’ सचिन तेंडुलकर संयोजकांना नम्रपणानं समजावून सांगत होता. प्रसंग होता रिओला झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत ज्या चार कमाल खेळाडूंनी पदकं पटकावली त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम. सत्कार करताना प्रत्येक खेळाडू आपापली कहाणी सांगत होता. ती ऐकून नुसतंच भारावून जायला होत नव्हतं, तर थक्क व्हायला होत होतं.

‘‘किती अडचणी, किती समस्या; पण त्याला पार करणारी कमालीची जिद्द. खूप काही शिकण्यासारखं होतं सगळं काही ऐकताना,’’ सत्कार संपल्यावर सचिन तेंडुलकर पत्रकारांशी बोलताना म्हणाला. ‘‘माझ्या खेळाच्या कारकिर्दीत मला दुखापतींशी झुंज द्यावी लागली. काही दुखापती खरंच कठीण होत्या, वेदना देणाऱ्या होत्या. पण मी ज्या समस्या समजत होतो- त्या फार मोठ्या नव्हत्या, हे या पॅराॲथलिट्‌सची कहाणी ऐकून आज मला समजलं. कारण दुखापती येत होत्या, तशा त्या उपचारानंतर जातही होत्या. या चार पॅराॲथलिट्‌सच्या दुखापती किंवा समस्या त्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या. तरीही ते त्यांच्याबद्दल नाही, तर ध्येयाबद्दल बोलतात. मर्यादा फक्त आपल्या मनात असतात, हे मरिअप्पन थेंगावेलू, देवेंद्र झझारीया, दीपा मलिक आणि वरुणसिंग भाटी यांना भेटल्यावर मला स्पष्ट जाणवलं. डोळ्यासमोर स्पष्ट ध्येय असलं, मनाचा निग्रह असला आणि त्याला सातत्यपूर्ण मेहनतीची जोड असली, तर अशक्‍य काहीच नसतं,’’... सचिन भारावून बोलत होता.

रोटी आणि मिठाईला ‘टाटा’
त्याच सत्कार समारंभादरम्यान, ‘ऑलिंपिकसारख्या सर्वांत मोठ्या स्पर्धेची तयारी करत असताना आहारावर तुमचं नियंत्रण कसं होतं,’ असा प्रश्‍न दीपा मलिकला कोणी तरी पत्रकारानं प्रश्‍न विचारला. दीपानं एक सेकंद श्‍वास घेतला आणि मग म्हणाली, ‘‘कसं सांगू आणि काय सांगू समजत नाही. खेळात सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी आहार हा महत्त्वाचा असतो. आमची समस्या जरा अजून वेगळी असते. आता माझी केस बघा. माझ्या शरीराच्या छातीखालच्या भागाला काहीच संवेदना नाहीत. मला झालेल्या आजारामुळं माझी पचनशक्ती कमालीची कमजोर आहे. त्यातून कुठं ना कुठं ट्युमर येत असतातच. साहजिकच माझं वजन वाढतं आणि ते रोखणं कठीण जातं. माझं लिव्हर खूप कमी काम करतं. त्यामुळं मला आहार घेताना किंवा टाळताना फार काळजी घ्यावी लागते.

चुकीचा आहार घेतला तर लिव्हर सुटीवर जायचा अर्ज टाकतं आणि कमी आहार घेतला, तर त्याच्यात ताकदच उरत नाही काम करायला. ‘इकडं आड आणि तिकडं विहीर’ अशी अवस्था सतत असते. त्यातून मला सतत औषधं घ्यावीच लागतात. त्याचे परिणाम- दुष्परिणाम होत असतात. या सगळ्याचा विचार करून मला आहार घ्यावा लागतो. उगाच मी खूप त्याग करते, असं मला नाही म्हणायचं!.. स्पर्धेअगोदरचे चार महिने मी रोटी आणि मिठाईला ‘टाटा’ केलं होतं. एका पक्‍क्‍या हरियानवी व्यक्तीला रोटी आणि मिठाईला हात न लावणं किती कठीण असतं, हे मी कसं समजावू तुम्हाला?... पण माझ्या ध्येयाकरता मी हसतहसत त्याग केला.’’ दीपा मलिकनं हसतहसत विनोद करत हे उत्तर दिलं, तेव्हा ऐकणारे सगळे अवाक्‌ झाले.

‘बोललो नाही; फक्त रडलो’
रिओ पॅरालिंपिकमध्ये गोल्ड मेडल पटकावणारा मरिअप्पन थेंगावेलू बोलला, तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावले. चार भाऊ आणि एक बहीण अशा कुटुंबाला मरिअप्पनच्या वडिलांनी सोडून दिलं होतं. त्याची आई इमारत बांधकाम जागेवर विटा उचलायचं काम करून रोज जेमतेम १०० रुपये कमावत पाच लेकरांना सांभाळायची. स्वत: उपाशी राहून ती माय आपल्या लेकरांना जेवायला घालायची. चालत शाळेत जात असताना मरिअप्पनच्या पायावरून ट्रकचं चाक गेलं. त्यामुळं त्याचा उजवा पाय कायमस्वरूपी निकामी झाला. सहानुभूती सोडा; पण त्याचे मित्र त्याला खेळात सामावून घेईनासे झाले. मग मरिअप्पननं वेगळा मार्ग चोखाळला. त्यानं स्वत:शीच खेळणं आणि स्वत:लाच आव्हान देणं सुरू केलं. त्याचे खेळाचे शिक्षक चांगले होते. त्यांनी मरिअप्पनला प्रोत्साहन दिलं. चौदाव्या वर्षीच खुल्या गटात मरिअप्पननं उंच उडीत दुसरं स्थान पटकावलं.

त्याच मरिअप्पननं रियोला झालेल्या पॅरालिंपिकमध्ये १.८९ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक कमावलं. मरिअप्पनचे प्रशिक्षक सत्यनारायण यांचं स्थान मोलाचं आहे, तसंच मरिअप्पनला आईच्या त्यागाची, प्रेमाची जाणीव मोठी आहे. ‘‘पॅरालिंपिक सुवर्णपदक पटकावल्यावर अभिनंदन आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. मला मात्र कधी आईला भेटतो असं झालं होतं. आईला भेटल्यावर काय सांगू आणि काय नको, असं मला झालं होतं. प्रत्यक्ष भेट झाल्यावर गंमतच झाली. मी सुवर्णपदक आईच्या गळ्यात घातलं आणि आईनं मला कुशीत घेतलं आणि मग काही समजायच्या आत आम्ही रडू लागलो. हे दुःखाश्रू नव्हते. आईनं केलेल्या त्यागाचं, प्रेमाचं, कष्टाचं चीज झालं होतं. माझ्या आईचं नाव मी उज्ज्वल करू शकलो होतो, त्याचं अपार समाधान होतं म्हणून आनंदाश्रू सहज ओघळले. आम्ही काही बोललोच नाही... फक्त मनसोक्त रडलो... तीच भाषा पुरेशी होती... तोच
आमच्या हृदयातला संवाद होता,’’ मरिअप्पन डोळ्याच्या कडा पुसत म्हणाला.

अशक्‍य म्हणजे काय?
अशीच कहाणी अरुणिमा सिन्हाचीही. तिच्या कहाणीनं अंगावर एकाच वेळी ‘काटा’ आणि ‘रोमांच’ उभे राहतात. रेल्वेमधून प्रवास करताना अरुणिमाची सोन्याची साखळी काढून घ्यायला चार गुंड पुढे सरसावले. साखळी तिच्या आईनं दिली असल्यामुळं अरुणिमानं ती द्यायला नकार दिला. मग अगदी मारामारी झाली. अरुणिमानं दोन गुंडांना चक्क मारलं. पण अखेर चार गुंडांनी एकत्र येऊन अरुणिमाला चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. ती पडली शेजारच्या रेल्वे ट्रॅकवर. नंतर तिच्या एका पायावरून समोरून येणारी रेल्वे गेली ज्यामुळं तिच्या एका पायाचा चेंदामेंदा झाला. गॅंगरीन होऊन नये म्हणून तो पाय गुडघ्याखाली कापून टाकावा लागला. दुसऱ्या पायावर मोठं ऑपरेशन झालं आणि पायात रॉड टाकून तो नीट केला गेला. समाजानं तिला मदत करणं सोडा; उलट नाकारलं. ‘अरुणिमानंच आत्महत्या करायला उडी मारली नसेल कशावरून,’ असे गलिच्छ प्रश्‍नही विचारले गेले. माध्यमांनी तिच्यावरच्या अत्याचाराला वाचा फोडली आणि मग सगळे राजकारणी तिला मदत करून प्रसिद्धी मिळवायला पुढं सरसावले. या सगळ्याचा तिला खूप उबग आला. तिला समाजाची खोटी सहानुभूती नकोच होती. तिला ‘बिचारी’ म्हणून वावरायचं नव्हतं.
आपलं अस्तित्व सिद्ध करायला तिच्या डोक्‍यात एक पराकोटीचा विचार आला. ‘आपण एव्हरेस्ट चढलं पाहिजे,’ असा विचार तिनं मांडला. त्याबद्दल सगळ्यांनी तिला रोखायचाच प्रयत्न केला. काहींनी तर तिच्या डोक्‍यावर परिणाम झाल्याचे बोलून दाखवलं. अरुणिमा नुसती विचार करत बसली नाही, तर तिनं या क्षेत्रातलं प्रशिक्षण देणारी संस्था शोधून त्यात दाखल होऊन मेहनत करायला सुरवात केली. अरुणिमा पहिली महिला एव्हरेस्टवीर बचेंद्री पाललाही भेटली. ‘‘इतका मोठा निर्णय घेऊन तू मनातलं एव्हरेस्ट कधीच सर केलं आहेस... आता फक्त पर्वत सर करून जगाला तुझी क्षमता दाखवून द्यायची आहे,’’ असं सांगून बचेंद्री पालनं अरुणिमाचा उत्साह वाढवला. २१ मे २०१३ रोजी अरुणिमानं खरंच एव्हरेस्ट सर केलं. सागर माथ्यावर उभी असताना अरुणिमाच्या मनात या ओळी आल्या होत्या...   
रहने दे आसमाँ, जमीं की तलाश कर
सब कुछ यही है, कहीं और न तलाश कर
जिने के लिये बस एक ‘कमी’ की तलाश कर

कुंपणं तोडा

पॅराॲथलिट्‌सचा सत्कार झाल्यावर सचिन तेंडुलकर म्हणाला होता, ‘‘आपण धडधाकट माणसं बहुतांश वेळी आपल्याकडं काय नाही याचं तोंडाचा चंबू करून वर्णन करत बसतो. दिव्यांग खेळाडूंची जिद्द बघितल्यावर आपल्याला खऱ्या समस्यांची जाणीव होते. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ‘काय नाही’पेक्षा देवानं, निसर्गानं आपल्याला ‘काय दिलं आहे,’ याचे मनोमन आभार मानून पुढं सकारात्मक विचारांनी कामाला लागलो, तर खरी मानवंदना या खेळाडूंना मिळेल. दिव्यांग खेळाडूंच्या ध्येयासक्तीला वंदन करताना मला इतकंच सांगायचं आहे, की आपण मानतो त्या मर्यादा फक्त मनात असतात... मर्यादांची कुंपणं आपण मनातून तोडून टाकली, की अशक्‍य काहीच नसतं.’’

दीपा मलिक, मरिअप्पन आणि अरुणिमाची कहाणी वाचताना हाच विचार मनात ठेवला, तर बरंच काही साध्य होईल. बऱ्याच वेळेला आपण फक्त सहानुभूती देऊन किंवा तात्पुरती मदत करून पुढे सरकतो. खरी गरज असते ती आपुलकीची. दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला योग्य वेळी योग्य त्या कार्यात साथ देण्याची. याचं अजून एक ताजं उदाहरण देतो. दिव्यांशू गणात्रा नावाच्या दृष्टिहीन जिद्दी सायकलपटूला गगन ग्रोव्हर नावाचा सच्चा मित्र लाभला. दोघांनी मिळून मनाली ते खारदुंगला प्रवास सायकलवर एकत्र करून कमाल केली. याला म्हणतात दोस्ती. याला म्हणतात खरी आपुलकी... विश्‍वास नाही बसत?... ही लिंक क्‍लिक करा आणि बघा काय कमाल केली दोन मित्रांनी मिळून...
https://www.facebook.com/giantstarkenn

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com