लय शरीराची (सुनंदन लेले)

लय शरीराची (सुनंदन लेले)

शरीरातले अवयव एका विशिष्ट लयीत काम करत असतात, ज्याला ‘बायो ऱ्हिदम’ असं म्हटलं जातं. या ‘बायो ऱ्हिदम’चा खेळाडूंच्या कामगिरीवर थेट परिणाम होत असतो. त्याच्या चक्रात चांगला आणि खराब असे दोन काळ असल्याचं निदर्शनास आलं आहे. ‘बायो ऱ्हिदम’चं आपलं चक्र काय आहे, याचा अंदाज घेणं महत्त्वाचं. त्यामुळं दर वेळी चांगली कामगिरी करणं जमलं नाही, तरी समाधानकारक कामगिरीतलं सातत्य नक्की वाढवता येईल.

को  णत्याही खेळाडूकरिता जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनण्याचं ध्येय सर्वांत मोठं असतं. त्यासाठी तो जिवाचं रान करतो. कष्टाला त्यागाची जोड हसत हसत देतो. सातत्यपूर्ण कामगिरीनं अव्वल स्थानावर पोचल्यावर ते टिकवून ठेवायला अजून मेहनत करत धडपडतो. मग काही काळानंतर त्या खेळाडूला अव्वल क्रमांकाचं ओझं जाणवायला लागतं. कधी तरी त्याला दुखापत सतावते, तर कधी समोरचा खेळाडू खरंच वरचढ खेळ करतो. ज्यानं काहीशी निराशा येते. अचानक मग तो त्यागाला बाजूला सारून बेधुंद जगायचा आनंद घेतो. काही काळ सरावाला तेवढ्याच उत्साहानं जात नाही. अर्थात त्याचा व्हायचा तो परिणाम होतो आणि अव्वल स्थान पटकावण्याच्या ध्येयानं पिसाटलेला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अव्वल क्रमांकाच्या खेळाडूला वरचढ ठरू लागतो. काही काळानंतर साहजिकच अव्वल स्थानावर दुसरा खेळाडू बसू लागतो. अव्वल क्रमांक टिकवण्याचं आव्हान आता नव्यानं सिंहासनावर बसलेला खेळाडू अनुभवायला लागतो. हा काळाचा महिमा असतो. त्यातून कोणीही खेळाडू सुटत नसतो. सर्वोत्तम खेळ करत सर्वोच्च स्थानावर जागा पकडून बसणं किती कर्मकठीण काम असतं, हे नोवाक जोकोविचच्या २०१७ च्या खेळातल्या चढ-उताराकडं बघून दिसतं. शिस्तीचं परमोच्च शिखर गाठणारा जोकोविच अचानक थोडा निवांत झालेला आढळला. त्याचाच फायदा घेत वर्ष संपत असताना अँडी मरेनं टेनिस जगतातलं अव्वल स्थान पटकावलं. नेमका हाच शोधाचा विषय आहे, की खेळाडू अशा प्रकारच्या चढ-उतारावरून कसे प्रवास करतात, ज्याला ‘बायो ऱ्हिदम’ म्हणजे शरीरशास्त्राची लय कारणीभूत आहे का?

‘बायो ऱ्हिदम’ अभ्यास
तीन हजार वर्षांपूर्वी ग्रीक साम्राज्यातल्या विद्वानांनी शरीरशास्त्राचा अभ्यास करताना शरीरातले मुख्य अवयव कोणत्या लयीत काम करत असतात, याचा शोध घेतला. सुदृढ आणि आजारी दोनही प्रकारांतल्या माणसांमध्ये अवयव एका लयीत काम करताना आढळले. ही लय कधी वेगात असते, तर कधी मंद. माणूस त्या लयीच्या परिणामात वावरताना दिसले.

गेल्या शतकात जर्मन डॉक्‍टर विलहॅम फ्लिस आणि हरमन्ना स्वोबोडा नावाच्या शास्त्रज्ञांनी ‘बायो ऱ्हिदम’ विषयावर सखोल अभ्यास केला. विशेष बाब म्हणजे डॉक्‍टर विलहॅम फ्लिस आणि हरमन्ना स्वोबोडा यांचा एकमेकांशी काडीमात्र संपर्क नसताना दोघांनी अभ्यासानंतर मांडलेल्या शोधनिबंधांतल्या निष्कर्षांमध्ये कमालीचं साम्य होतं. १९०० मध्ये हरमन्ना स्वोबोडा यांनी पहिला निबंध सादर केला, ज्यात त्यांनी विषय मांडताना लिहिलं, की ‘शारीरिक अवस्था कितीही चांगली असली, तरी माणसाला कधी कधी आजारी असल्यासारखं वाटतं. दिनक्रमात कितीही साधर्म्य असलं, तरी रोजचा दिवस अगदी तसाच जातो, असं नक्कीच नाही. शरीरशास्त्राची एक लय या सगळ्या गोष्टींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असते.’

दोनही शास्त्रज्ञांच्या अभ्यासात दिसून आलं, की जातीच्या कलाकाराला कधी कधी काही कारण नसताना अचानक प्रतिभेचा कमाल साक्षात्कार होतो. नव्यानं माता झालेल्या महिलांना आपल्या बालकांबद्दल कधी कधी फारच कमालीची काळजी वाटू लागते. हे सगळे बदल शरीरशास्त्राच्या लयीनं होत असतात असा फ्लिस-स्वोबोडांचा अनुभव होता. स्वोबोडाइतकी प्रसिद्धी फ्लिस यांना मिळाली नसली, तरी त्यांनी मार्गदर्शन केलेल्या सिगमंड फ्रॉइड यांना आधुनिक मानसशास्त्राचं जनक म्हटलं जातं, हे विसरून चालणार नाही.

खेळाडूंवर होणारा संभाव्य परिणाम
‘बायो ऱ्हिदम’चा खेळाडूंवर थेट परिणाम होत असतो. वीरेंद्र सेहवागला याबाबत विचारलं असता, तो म्हणाला, ‘‘भाई, ‘बायो ऱ्हिदम’ क्‍या होता है मुझे पता नही!...पण मैदानात फलंदाजीला जाताना कधी कधी स्पष्ट जाणवतं, की आज माझा दिवस आहे. २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबर्न कसोटी सामन्यात मला तसा अनुभव आला होता. एमसीजी मैदानावर फलंदाजीला उतरताना मला जाणवत होतं, की आज मी गोलंदाजांवर राज्य करणार. कोणताही गोलंदाज मला त्याच्या तालावर नाचवू शकणार नाही. अगदी तसंच झालं. सामन्याच्या पहिल्याच दिवशी मी सर्व ‘ऑसी’ गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत १९५ धावा केल्या. त्या दिवशी वेगळीच शक्ती, वेगळीच ऊर्जा मला साथ करत होती जणू. त्याप्रमाणं कधी तरी असंही जाणवतं, की कितीही प्रयत्न केला, तरी आज आपली डाळ शिजणार नाही.’’

सचिन तेंडुलकरला फलंदाजाची समाधी लागणं म्हणजे काय अवस्था असते, असं विचारलं होतं. ‘‘२४ वर्षांच्या कारकिर्दीत मी बरेच विविध अनुभव घेतले आहेत. कधी एकाग्रता राखत फलंदाजी करायला वेगळे कष्ट पडत नाहीत, तर कधी मन भरकटत असल्याचं जाणवतं. तेव्हा सतत त्याला ताळ्यावर आणायला खास प्रयत्न करावे लागतात. फलंदाजीला जाताना मनात कोणतेच विचार नसले, तर कोऱ्या पाटीचं रूप जाणवतं, असं माझं निरीक्षण आहे. मग अशा अवस्थेत चेंडू उत्तम दिसतो. तसंच त्याचा फार चांगला अचूक अंदाज लागतो. असं होतं तेव्हा गोलंदाजानं चेंडू टाकल्यावर आपली होणारी प्रतिक्रिया फार सहज आणि चांगली होते. सर्वोत्तम फलंदाजी करत असताना जी सहजता दिसते त्यालाच मी समाधी म्हणीन,’’ असं सचिननं विषयावर प्रकाश टाकताना सांगितलं होतं.

भावनिक चढ-उतार
काही खेळाडू जात्याच शांत असतात, तर काही भडक माथ्याचे. रागावर नियंत्रण ठेवणं रागीट खेळाडूंना फार कठीण जातं. ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ येते’ या म्हणीचा अनुभव अशा रागीट खेळाडूंचा खेळ बघताना येतो. अमेरिकेचा टेनिसपटू अँडी रॉडीकबद्दलचा असाच एक किस्सा आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतला महत्त्वाचा सामना खेळत असताना त्याच्या वागणुकीतला चंचलपणा दिसत होता. चुकीचा फटका मारल्यावर तो स्वत:वर चिडत होता. रॅकेट आपटून तो राग व्यक्त करत होता. त्याचा प्रशिक्षक त्याला शांत राहायचा सल्ला देत होता. सामना समतोल अवस्थेत होता आणि अँडी रॉडीक शांत राहायचा प्रयत्न करत होता; पण काही केल्या त्याचं नियंत्रण सुटत होतं. त्याला कळत होतं, की रागाच्या भडक्‍यानं आपल्या खेळावर विपरीत परिणाम होत आहे. तरीही तो नियंत्रण राखू शकत नव्हता. इतक्‍यात त्यानं मारलेला फटका बाहेर पडल्याचं लाइन्समननं सांगितलं. अँडी रॉडीकला आपला फटका आत पडल्याचं वाटत होतं. त्यानं लाइन्समनशी हुज्जत घातली. मुख्य पंचांकडं वारंवार तक्रार केली. पंचांनी निर्णय बदलला नाही. झालं! त्या एका पॉइंटवरून त्याचं डोकं इतकं फिरलं, की त्यानं पुढील सामना असंख्य चुका करत जणू प्रतिस्पर्ध्याला बहाल करून टाकला. सामन्यानंतर बोलताना अँडी रॉडीक म्हणाला, ‘‘त्या दिवशी मी रागावर नियंत्रण ठेवायचा आटोकाट प्रयत्न केला; पण जणू सैतानाचं राज्य माझ्या मनावर होतं. चांगला तुल्यबळ अवस्थेत असलेला सामना मी रागाच्या भरात फेकून दिला. कधी कधी असं का होतं, हे माहीत नाही. चूक होते हे कळत असूनही ती रोखता येत नाही’’ ‘बायो ऱ्हिदम’चा तर हा भाग नसेल, अशी शंका हा किस्सा वाचल्यावर नक्कीच येते.

‘बायो ऱ्हिदम’चे फेरे
‘बायो ऱ्हिदम’चे फेरे तीन चक्रांत फिरत असतात. एक असतं शारीरिक, दुसरं असतं भावनिक आणि तिसरं असतं बौद्धिक. ‘बायो ऱ्हिदम’च्या शारीरिक चक्रात चांगला आणि खराब दोन काळ असल्याचं निदर्शनास आलं आहे. चांगल्या अवस्थेत खेळाडूला ताकद स्पष्ट अधिक जाणवते. नजर आणि शरीराचा समन्वय उत्तम असतो. थकव्यातून सावरायला लागणारा वेळ बराच कमी असतो. खराब काळात थकवा लगेच जाणवतो आणि प्रतिक्रियेला वेळ किंचित जास्त लागतो, जो उच्च पातळीवरच्या खेळात फार मोठा परिणाम करून जातो.

भावनिक चक्रातल्या चांगल्या मनोवस्थेत माणसाला जास्त चांगल्या कल्पना सुचतात, तसंच सगळं जग आपल्या पाठीशी असल्याचं ‘सकारात्मक फिलिंग’ येते. भावनिक चक्राच्या वाईट मनोवस्थेत माणूस असहकारी होतो. छोट्या कारणावरून चिडचिड करतो आणि सतत खराब कामगिरीच्या आठवणी मनात रेंगाळत ठेवतो.
बौद्धिक चक्राची सुरवात मेंदूपासून होते. स्मरणशक्ती, सतर्कता, एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता आणि सारासार विचारसरणी या काळात हेलकावे खाते. चांगल्या मनोवस्थेत सगळं सुरळीत होतं. त्याचे निकाल चांगले ठरतात. दुर्दैवानं खराब अवस्थेत तुम्ही सगळ्यांकडे संशयाच्या नजरेनं बघता. ज्यात तुमचा प्रशिक्षकही असू शकतो.

तुमचे तुम्ही तपासा
‘बायो ऱ्हिदम’ कोणाला चुकलेला नाही, असंच हरमन्ना स्वोबोडा यांचं म्हणणं आहे. आपली पृथ्वी एका लयीत फिरते आहे, तर त्याचा परिणाम मानवाच्या शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक पातळीवर होणं क्रमप्राप्त असल्याचं ते पुस्तकातून सांगतात. फक्त खेळाडूच नाही, तर आपण रोजच्या जीवनात चांगल्या-वाईट लयीचा अनुभव घेतोच की! खराब काळातून जात असताना एक प्रकारची नकारात्मकता आपल्याला जाणवते ना? अशा वेळी आपलं मन सकारात्मक विचारांकडं वळवणं किती कठीण असतं, हे आपण जाणतो. रागावरचं नियंत्रण जात असताना आपल्या लक्षात येतं; पण ते थांबवणं जमतं का? एखादा दिवसच बट्टा लागलेला वाटतो आपल्याला. ‘काहीच मनासारखं होत नाही आज,’ असं म्हणत वावरतो आपण. चांगला खेळाडू महान तेव्हाच होतो, जेव्हा त्याला चांगल्या ‘बायो ऱ्हिदम’ सायकलचा अंदाज येतो आणि त्यात सर्वोत्तम कामगिरी करताना तो चुकत नाही. उलटपक्षी ‘बायो ऱ्हिदम’च्या खराब काळात महान खेळाडू जाणीवपूर्वक रागावर नियंत्रण ठेवतात. स्वत: जिंकण्याचा आटापिटा करण्यापेक्षा खेळात प्राथमिक सातत्य ठेवून समोरच्या खेळाडूला चूक करायला भाग पाडतात. राहुल द्रविडच्या भाषेत सांगायचं, तर ‘फलंदाजी जमत नसली तर मी करून दाखवतोच असा अट्टहास करण्यापेक्षा एकेरी धाव घेऊन ‘नॉन स्ट्रायकिंग एंड’ला जाणं फायद्याचं ठरतं. एकदा का जम बसला की मग वर्चस्व गाजवता येतं.’  

उदाहरणं खेळाची दिली असली, तरी या सगळ्या मुद्द्यांचा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध वाटतो मला. ‘बायो ऱ्हिदम’ची आपली सायकल काय आहे, आपली लय काय आहे याचा अंदाज घेतला, तर दर वेळी चांगली कामगिरी करणं जमलं नाही, तरी समाधानकारक कामगिरीतलं सातत्य वाढवता येईल, हे नक्की. मग ते घर सांभाळणारी गृहिणी असो, मोठा व्यवसाय करणारा उद्योजक असो, वा नोकरी करणारा माणूस असो. सगळ्यांनाच आपली चांगली लय साधता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com