समाधानाचा राजमार्ग (सुनंदन लेले)

समाधानाचा राजमार्ग (सुनंदन लेले)

‘देशाकरता खेळणं हे अत्यंत अभिमानाचं असतं; तसंच चांगलं सामाजिक काम करणं हा मला समाधानाचा राजमार्ग वाटतो,’ असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉनं नुकतंच सांगितलं. स्टीव्हबरोबर ग्लेन मॅग्राथ, युवराजसिंग, विराट कोहली या आणि इतर खेळाडूंनाही या ‘समाधानाच्या राजमार्गा’ची वाट सापडली आहे. मैदानावरच्या झळाळत्या कामगिरीबरोबरच चांगुलपणाचीही पखरण करणाऱ्या या खेळाडूंची ही वेगळी बाजू...

‘‘खेळानं मला खूप काही दिलं...समाजानं मला भरभरून प्रेम दिलं... निवृत्त झाल्यावर मला समाजाचे आणि खेळाचे ऋण फेडायचे आहेत,’’... महान खेळाडू निवृत्त होत असताना हमखास ही वाक्‍यं उच्चारतो. ऐकणारे पत्रकार त्यानं भारावून जात रकानेच्या रकाने भरून लिहितात. बोलणं आचरणात आणणारे किती खेळाडू असतात? फार मोजके. त्यातला एक आहे महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ. क्रिकेटजगतावर राज्य करणाऱ्या ‘ऑसी’ संघाचा हा तत्कालीन कर्णधार खेळाडू म्हणून जितका भरवशाचा होता, तितकाच सामाजिक भान असलेला, सच्चा सहृदयी माणूसही आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान बंगळूरला स्टीव्ह वॉला भेटायची संधी मिळाली. बाकी पत्रकार क्रिकेटवर बोलायला त्याची वेळ मागत असताना मी स्टीव्हला ‘खेळाडूचं सामाजिक भान’ या विषयावर बोलायची विनंती केली. हा विषय त्याच्या हृदयाच्या जवळचा असल्यानं स्टीव्ह बोलायला तयार झाला.

मैदानावर अत्यंत खमका कर्णधार आणि खडूस क्रिकेटर असणाऱ्या स्टीव्हला सामाजिक कामाचे विचार आले कधी, असं विचारलं तेव्हा तो म्हणाला, ‘‘भारताच्या दौऱ्यावर असताना कोलकत्यातल्या वास्तव्यादरम्यान मला मदर तेरेसांना भेटायची संधी लाभली. बघता क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरील शांततेचं तेजोवलय मला स्पष्ट दिसलं. मदर तेरेसा म्हणजे जगाच्या ‘आई’ असल्याचा प्रेमळ भाव त्यांच्या चेहऱ्यावर विसावला होता. त्यांच्या कामाचं स्वरूप आणि व्याप्ती समजल्यावर मी मनातून थक्क झालो होतो. त्या भेटीतूनच मला समाजकार्याची प्रेरणा मिळाली,’’ स्टीव्ह म्हणाला.

‘तुझ्या आत्मचरित्राचं नाव आणि तुझं सामाजिक काम एकाच विचारांचं दिसतं,’ असं म्हटल्यावर स्टीव्ह वॉ मनापासून हसला. ‘‘माझ्या पुस्तकाला ‘आउट ऑफ माय कंफर्ट झोन’ हे नाव मी विचारांती दिलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळत असताना चमकदार कामगिरी सातत्यानं करायची असेल, तर खेळाडूला आरामाचा विचार करून चालत नाही. मायदेशात चांगला खेळ करून दाखवण्यापेक्षा परदेशांत अनोळखी वातावरणात चांगली कामगिरी करण्यात खरं आव्हान असतं. तसंच आम्ही खेळाडू नेहमी सर्वोत्तम व्यवस्थेतच राहत-फिरत आलो आहोत. मैदानावरचे कष्ट एका बाजूला आणि मैदानाबाहेरचं आरामदायी आयुष्य दुसऱ्या बाजूला असं आमचं मजेदार जीवन असतं. बिझनेस क्‍लासनं विमानप्रवास आणि पंचतारांकित हॉटेलातलं वास्तव्य आमच्यासारख्या खेळाडूंच्या अंगवळणी पडतं. अडचणी समस्या, संकटं फक्त या गोष्टी मैदानापुरत्या मर्यादित असतात. प्रत्यक्ष बाहेरच्या जगात सर्वसामान्य लोक रोजच्या जीवनात किती झगडत असतात...खरी दु:खं काय असतात, याची आम्हाला तशी कल्पना येत नाही. कोलकात्याच्या दीनदुबळ्या लोकांकरता मदर तेरेसा जे काम करायच्या ते बघून मी अंतर्मुख झालो. मग मी माझ्या क्रिकेटव्यतिरिक्तच्या आयुष्यातही ‘आउट ऑफ माय कंफर्ट झोन’ डोकावून बघायचा विचार केला. अशातच मी एकदा ‘उदयन’ संस्थेला भेट दिली. ही संस्था कुष्ठरोगाच्या कचाट्यात अडकलेल्या लहान मुलांकरता करत असलेलं काम बघून मी भारावून गेलो आणि तिथूनच माझ्या समाजकार्याची सुरवात झाली. गेली काही वर्षं मी ‘उदयन’ संस्थेकरता काम करतो आहे. देशाकरता खेळणं हे अत्यंत अभिमानाचं असतं; तसंच चांगलं सामाजिक काम करणं हा मला समाधानाचा राजमार्ग वाटतो,’’ स्टीव्ह वॉ म्हणाला.

दुर्धर आजारांबाबत लक्षणीय काम
नुसतं बोलणं एक आणि स्टीव्ह वॉसारखं मातीत उतरून काम करणं वेगळं. स्टीव्ह वॉनं त्याच्या सामाजिक कामाची व्याप्ती बरीच वाढवली. स्टीव्ह वॉ फाउंडेशन अत्यंत दुर्धर आजारानं पछाडलेल्या रुग्णांकरता करत असलेलं काम वेगळंच आहे. काही रोग असे आहेत ज्याला नावही नाही. म्हणून त्याला ‘सिम्प्टम विदाऊट अ नेम’ म्हटलं जातं, इतका तो रोग लक्षावधी लोकांतून एखाद्याला होतो. जॅक आणि बेन नावाच्या दोन भावांना असा एक आजार झाला आणि त्यांचे पालक हतबल झाले. स्टीव्ह वॉ फाउंडेशननं नामांकित डॉक्‍टरांचे उपचार उपलब्ध करून देण्याबरोबरच शास्त्रज्ञांशी बोलून जॅक आणि बेनकरता खास खुर्च्या करून घेतल्या, ज्यामुळं त्यांना जीवनाचा थोडा आनंद घेणं शक्‍य झालं आहे. यासारखी अनेक उदाहरणं आहेत स्टीव्ह वॉ फाउंडेशनच्या चांगल्या कामाची.

स्टीव्हचा साथीदार ग्लेन मॅग्राथ कर्करोग उपचारांच्या क्षेत्रात असंच चांगलं काम करत आहे. ग्लेनची पत्नी जेन ‘ब्रेस्ट कॅन्सर’नं लहान वयात देवाघरी गेली. तेव्हापासून ग्लेननं ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस’करता सर्वस्व झोकून देऊन काम करणं चालू केलं आहे. ऑस्ट्रेलियातली ‘क्रिकेट बिरादरी’ ग्लेन मॅग्राथला मनापासून पाठिंबा देते. दर वर्षी नवीन वर्षाची पहिली कसोटी सिडनी मैदानावर खेळली जाते, ज्याचा दुसरा दिवस ग्लेन मॅग्राथ फाउंडेशनच्या निधी संकलनासाठी राखून ठेवला जातो. मैदान गुलाबी रंगानं सजवलं जातं, इतकंच काय फलंदाजी करणारे ‘ऑसी’ खेळाडू बॅटला गुलाबी रंगाची ‘ग्रिप’ लावतात. ‘‘कर्करोगाबाबत जागरूकता वाढवणं हेच माझं ध्येय आहे. या रोगाबाबतची तपासणी अगोदर केली, तर पुढचा धोका टळू शकतो किंवा उपचार लवकर चालू करून रोगातून मुक्ती मिळण्याची शक्‍यता एकदम वाढते,’’ असं ग्लेन म्हणतो.

युवराज, विराटचं उत्तम काम
चालू जमान्यातल्या भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर युवराजसिंग ‘कॅन्सर डिटेक्‍शन’ क्षेत्रात ग्लेन मॅग्राथसारखंच उत्तम काम करतो आहे. फरक इतकाच आहे, की युवराज स्वत: कर्करोगासारख्या भयानक रोगाशी लढाई जिंकून मैदानावर परतला आहे. खेळत असताना युवराजनं फाउंडेशन चालू करून जवळपास एक लाख लोकांची ‘कॅन्सर डिटेक्‍शन’ चाचणी केली आहे.

विराट कोहलीनं फाउंडेशन कारकिर्दीत बऱ्याच आधी चालू केलं आहे. मैदानावर अत्यंत आक्रमकतेनं प्रतिस्पर्धी संघांशी दोन हात करणाऱ्या विराट कोहलीचं हृदय उपेक्षित लहान मुलांकरता धडकतं. ‘‘चांगल्या घरात लहानाचे मोठे झालेल्या मुला-मुलींना उपेक्षित लहान मुलांचं दु:ख कळणं कठीण आहे. भारतातल्या सगळ्या मुलांना समान संधी मिळायला पाहिजे, हे स्वप्न जरा लांबचं असलं, तरी माझ्या परीने मी उपेक्षित लहान मुलांना त्यांची स्वप्नं साकारायला सकारात्मक मदत माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहे,’’ असं विराट एकदा सांगत होता.  

इतर वेळी कोणत्याही कार्यक्रमाला यायला नकारघंटा वाजवणाऱ्या विराटला खऱ्या समाजकार्याकरिता साद घातली, की तो प्रयत्नपूर्वक वेळ काढतो, हा माझा अनुभव आहे. गेल्या वर्षी आयपीएल सामन्याकरता पुण्यात विराट येणार असताना सिंहगड रस्त्यावरच्या आभाळमाया वृद्धाश्रमाच्या मदतीकरता विराटला साद घातली असता तो लगेच तयार झाला. एरवी दोन लोकांनासुद्धा भेटायला नाही म्हणणारा विराट आभाळमाया वृद्धाश्रमातल्या सर्वच्या सर्व ५७ ज्येष्ठ नागरिकांपाशी स्वत: जाऊन भेटला. काही लोकांशी त्यानं गप्पा मारल्या, तर काहींच्या प्रकृतीची आस्थेनं चौकशी केली. एकीकडे विराटला वृद्धाश्रम ही संकल्पना चुकीची वाटत होती. ‘‘आपल्याच माणसांना कोणी सांभाळायला नकार देत आश्रमात सोडून कसं येतो,’’ असा प्रश्‍न तो उद्विग्नतेनं विचारत होता. वृद्धाश्रमाला भेट देऊन निघाल्यावर डोळ्यांतलं पाणी पुसत भावुक झालेला विराट वेगळा भासला.

दर वेळी समाजातल्या उपेक्षित लोकांना आर्थिक स्वरूपातच मदत करणं गरजेचं नसतं. अंध, अपंग मुला-मुलींना चांगल्या कार्यक्रमाला बोलावणं किंवा चक्क कोणत्याही चांगल्या सामन्याच्या अनुभवाचा आनंद दृष्टिहीन मित्रांना देणं हासुद्धा सरळ-साधा सामाजिक उपक्रम ठरू शकतो. पुण्यात पहिला कसोटी सामना होत असताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं शहरातल्या ‘निवांत’ नावाच्या सामाजिक संस्थेतल्या क्रिकेटप्रेमी दृष्टिहीन मुलांना कसोटी सामन्याला पाहुणे म्हणून बोलावलं होतं. संपूर्ण दिवस बारा मुलांनी भारतीय संघाला प्रोत्साहन देताना आरडाओरडी करून क्रिकेट सामन्याचा आनंद घेतला.

असंच उदाहरण ‘प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड’ या संस्थेच्या कामाचं देता येईल. या संस्थेचे कार्यकर्ते गेली १४ वर्षं दिवाळी सीमेवरच्या कोणत्या ना कोणत्या ठाण्यावरच्या जवानांसोबत साजरी करतात. यंदाच्या दिवाळीला हे उत्साही कार्यकर्ते वाघा बॉर्डरला जाणार असताना चारही बाजूंनी त्यांना साथ मिळाली. पुण्यातले प्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी त्रिमितीतलं खास चित्र काढलं. वाघा बॉर्डरला भेट देणाऱ्या प्रत्येक दृष्टिहीन व्यक्तीला आपण कुठं आलो आहोत आणि त्या जागेचं महत्त्व काय आहे, याचा अनुभव या चित्राला स्पर्श करून घेता येईल, अशा पद्धतीचं हे चित्र होतं. इतकंच नाही, तर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणेनं खास व्हिडिओ संदेश सीमेवरच्या जवानांसाठी स्वत:च्या मोबाईलवर रेकॉर्ड करून या मुलांच्या हाती दिला. इथंच कहाणी संपली नाही, तर सचिन, विराट आणि अजिंक्‍यनं क्रिकेट किटसाठी पैसे दिले. त्यांतून सीमेवरच्या तीन ठाण्यांकरता ‘प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड’चे कार्यकर्ते संपूर्ण क्रिकेट किट सोबत घेऊन गेले. चांगल्या कामाला चारही बाजूंनी साथ लाभते, याचं हे जिवंत उदाहरण.

काही खेळाडू असेही आहेत, जे फौंडेशन चालू न करता बरीच चांगली सामाजिक कामं करतात. जास्त गाजावाजा न करता त्यांचं काम चालू ठेवतात. माध्यमं वाईट गोष्टींचा ‘गजर’ करतात, तसा त्यांनी चांगल्याही गोष्टींचा ‘जागर’ करायला नको का? एखाद्या खेळाडूला प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहत सामाजिक काम करायचं असेल, तर तो विचार चांगला आहे हे मान्य केलं तरी मग ‘चांगल्या’ची ‘वाइटा’वर मात कशी होणार? चांगल्या कामांच्या बातम्या सातत्यानं नजरेत किंवा कानांवर पडल्या नाहीत, तर चांगुलपणावरचा विश्‍वास वाढणार तरी कसा? ‘समाधानाचा राजमार्ग’ हा फक्त प्रसिद्धीच्या झोतात न्हाऊन निघणाऱ्या व्यक्तींकरता खुला नाही, तर आपल्या सगळ्यांकरता आहे हे विसरायला नको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com