क्रिकेटर जुंपले घाण्याला ! (सुनंदन लेले)

sunandan lele's cricket article in saptarang
sunandan lele's cricket article in saptarang

क्रिकेटचा सध्या अतिरेक होतो आहे. भारतातलेच नव्हे, तर जगभरातले खेळाडू नुसते इकडून तिकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळत सुटले आहेत. कसोटी सामने वाढले आहेत; पण खेळणाऱ्या संघांची संख्या तेवढीच आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदिवसीय सामने, टी-२० सामने आणि जगभरातल्या ‘आयपीएल’सारख्या स्पर्धांमधल्या सामन्यांत भरघोस वाढ झाली आहे. खेळाडूंना सरावाला वेळ नाही, की विश्रांतीला वेळ नाही. खेळाडूनं सरावावर भरपूर ध्यान देऊन आपल्यातलं कसब दाखवायला हवं. दुर्दैवानं आजच्या क्रिकेटमध्ये तशी संधी नाही.

हा  पूस आंब्याच्या सीझनची आपण कशी आतुरतेनं वाट बघत असतो. मार्च महिन्यात आपली चुळबुळ चालू होते. काहीसे आंबट असले, तरी एप्रिल महिन्याच्या सुरवातीला आपण केवळ हापूसच्या धुंद करून टाकणाऱ्या वासाकरता प्रचंड महाग असूनही पहिले एक डझन आंबे घरात आणतो. मग मात्र खंड पडत नाही. कधी हापूस, तर कधी आमरस-पुरीच्या बेताकरता पायरी आणून रतीब चालू राहतो. एप्रिल- मे आणि नंतर जूनचा अर्धा महिना गृहलक्ष्मी खास आंब्यांसाठी घरखर्चात वेगळं बजेट ठेवायला लागते. जून महिन्यात पावसाची चाहूल लागू लागते, तशी आंब्याची चव उतरू लागते. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात आंबा हळूहळू बाजारातून कमी व्हायला लागतो. मग दहा महिने परत प्रतीक्षा चालू होते... किती मजा आहे या सर्व प्रक्रियेत! पण हापूसचा आंबा बारमाही मिळू लागला तर काय होईल, असा एक सेकंद विचार करून बघा. केळी जशी बारा महिने मिळतात, तसा आंबा मिळायला लागला तर त्याची रया, त्याचा रुबाब राहील का? नाही ना? अगदी तशीच अवस्था क्रिकेटची झाली आहे, असं नाही का वाटत तुम्हाला?

कधीही टीव्ही लावा, कोणत्या तरी दोन संघांत कसोटी सामना चालू असलेला दिसेलच. क्रिकेटचा अतिरेक होतोय, हे आयसीसीला कळत असलं तरी वळत नाही असं दिसतंय.
प्रतीक्षेत मजा होती
सुनील गावसकर यांच्यासारखा दिग्गज माजी खेळाडू सांगतो, ‘‘कोणत्याही कसोटी मालिकेची माझी तयारी जबरदस्त असायची. सामने मायदेशात आहेत, की परदेशात त्याप्रमाणं सराव चालू व्हायचा. समोरच्या संघाची गोलंदाजी कशी आहे... त्यांच्या संघात काय तोफखाना आहे त्याचा विचार करून मग योजना आखून सरावाला लागायचो. कसोटी सामना जवळ येण्याअगोदर प्रथम श्रेणीचे सामने खेळून तयारी पूर्ण व्हायची. मग जसजसा कसोटी सामना जवळ यायचा तशी हुरहूर लागायची. फार मजा यायची.’’

वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्याअगोदर सुनील गावसकर गच्च ओला टेनिसचा चेंडू २५ फुटांवरून ताकदीने जोरात फेकायला लावायचे आणि अंगभेदी गोलंदाजीचा सराव करायचे. अशाच एका तयारीची कहाणी सचिन तेंडुलकरनं एकदा सांगितली.
शेन वॉर्न गोलंदाजांच्या बुटांच्या खिळ्यांनी खराब झालेल्या खेळपट्टीवरच्या भागात चेंडू टाकून खूप मोठा वळवायचा. ॲशेस मालिकेत शेन वॉर्ननं काही इंग्लिश फलंदाजांना पायामागून चेंडू वळवून बोल्ड केलं होतं. असा दबदबा मिरवत शेन वॉर्न भारताच्या दौऱ्यावर आला. सचिन तेंडुलकरनं साईराज बहुतुलेची मदत घेत ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळपट्टी नसलेल्या जागी स्टंप लावून सराव केला होता. ‘‘इफ फेल टू प्रीपेअर देन बेटर यू प्रीपेअर टू फेल’ असं म्हणलं जातं ते उगाच नाही. योजनाबद्ध सरावासारखा आनंद नसतो... कारण हाच सराव हीच सुनियोजित मेहनत प्रत्यक्ष सामन्यात कामाला येते,’’ सचिन सांगत होता. ‘‘मी शेन वॉर्नविरुद्ध खेळण्याचा असाच सखोल सराव केला होता. इतकंच नाही, तर ऑस्ट्रेलियन संघ रणजीविजेत्या मुंबई संघासमोर सामना खेळणार, हे समजल्यावर स्वत:हून सामना खेळायची तयारी दाखवली. त्या सामन्यात शतकानंतर मी मुद्दाम शेन वॉर्नला आडवे-तिडवे फटके मारले. मला माहीत होतं, की धुलाई व्हायला लागली, की शेन वॉर्न मला बाद करायला ‘राउंड द विकेट’ गोलंदाजी करेल आणि मला त्याच्या अँगलचा, त्याला मिळणाऱ्या ड्रीफ्टचा अंदाज येईल. माझ्या आक्रमकतेचा परिणाम झाला. शेन वॉर्ननं ‘राउंड द विकेट’ गोलंदाजी करण्याची सूचना पंचांना दिली. वॉर्न चेंडू टाकणार इतक्‍यात कप्तान मार्क टेलरनं त्याला थांबवलं आणि ‘राउंड द विकेट’ गोलंदाजी करू नको, असं सांगितलं कारण त्याला माझा विचार काय आहे याचा अंदाज आला होता. वॉर्न वैतागला आणि त्यानं चेंडू कप्तानाच्या हाती देत गोलंदाजी करणार नसल्याचं रागात सांगितलं. मार्क टेलर चिडला नाही. त्यानं दुसऱ्या गोलंदाजाला चेंडू दिला. रागाच्या भरात वॉर्न ‘राउंड द विकेट’ गोलंदाजी करायला निघाला असताना सजग कप्तान मार्क टेलरनं त्याला रोखलं, याला म्हणतात शह- काटशह!... याला म्हणतात खरी कसोटी सामन्याची तयारी,’’ सचिन तेंडुलकर जुना अनुभव सांगताना आठवणीत रमून गेला होता.

जमाना बदलला
आता जमाना बदलला आहे. जगभरचे खेळाडू नुसते इकडून तिकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळत फिरू लागले आहेत. कसोटी सामन्यांत किती भर पडली आहे, याकरता एका छोट्या आकडेवारीवर नजर टाकूयात.
 कालावधी    कसोटी सामने
१ जानेवारी ७० ते ३१ डिसेंबर १९७९    ३९६ कसोटी
१ जानेवारी ८० ते ३१ डिसेंबर १९८९    ५३२ कसोटी
१ जानेवारी ९० ते ३१ डिसेंबर १९९९    ६९४ कसोटी
१ जानेवारी २००० ते ३१ डिसेंबर २०१०    ९२८ कसोटी
१ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६    ५८० कसोटी
खेळ वाढला तसे सामने वाढणारच असा विचार कदाचित तुमच्या मनात येईल; पण खेळणाऱ्या संघांत वाढ झाली नाहीय, हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक दिवसीय सामने, टी-२० सामने आणि जगभरातल्या ‘आयपीएल’सारख्या स्पर्धांमधल्या सामन्यांत भरघोस वाढ झाली आहे.

विश्रांतीला वेळ नाही
प्रश्‍न फक्त भारतीय खेळाडूंचा नाही. उदाहरण देतो. सध्या ऑस्ट्रेलियन संघातून सातत्यानं खेळणारा खेळाडू वर्षातले सरासरी फक्त ३८ दिवस घरी राहू शकतो आहे. बाकी सगळे दिवस कुठला ना कुठला सामना खेळायला किंवा सामन्याच्या जागी पोचायला प्रवासात असल्यानं त्याला घराबाहेर राहावं लागत आहे. ही काही ऐकिवातली आकडेवारी नसून अधिकृत आहे. सरावाला वेळ नाही, की विश्रांतीला वेळ नाही. जगभरातले क्रिकेटर नुसते खेळत सुटले आहेत. याचा व्हायचा तो गंभीर परिणाम ऑस्ट्रेलियन संघावर झालेला स्पष्ट दिसतो आहे.

भारतीय संघ चालू कॅलेंडर वर्षात १६ कसोटी सामने खेळणार आहे. त्या सोबतीला एकदिवसीय सामने, टी-२० सामने आणि एकूण १४ सामन्यांत सर्वांत जास्त भटकंती करायला लावणारी ‘आयपीएल’ स्पर्धा भारतीय खेळाडूंच्या सोबतीला आहे. दिवाळीसाठी तीन दिवस खेळाडू आपापल्या घरी गेले, नंतर परत घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे खेळू लागले आहेत.

स्पर्धा समितीचे काम काय?
बीसीसीआयची स्पर्धा समिती काय विचार करून सामन्यांचं नियोजन करते देव जाणे! मोकळा वेळ मिळाला, की कोंबा सामने असंच एकूण चित्र दिसतं. एकाच क्रिकेट मोसमात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशसोबत सामने खेळणार आहे, यावर हसावं की रडावं समजत नाही. हातात पैसा आहे म्हणून चारशे फुटांच्या घरात चार सोफासेट लावले, तर काय गिचमीड होईल, तसं चित्र सामन्यांची ही आखणी बघितल्यावर डोळ्यांसमोर येतं का नाही सांगा.

एबी डिव्हीलीअर्स, डेल स्टेनला मोठी दुखापत झाली आहे. वेस्ट इंडीजचे ख्रिस गेलसारखे बरेच मोठे खेळाडू आता झेपत नाही, म्हणून फक्त ‘टी-२०’ सामने खेळणं पसंत करू लागले आहेत. महेंद्रसिंह धोनीनं अतिक्रिकेटचा ताण सोसत नसल्यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली हे विसरायला नको. भारतीय संघातल्या तरुण खेळाडूंना अतिक्रिकेटचा ताण कळायला लागला आहे. कोणाला मांडीला, तर कोणाला पाठीला दुखापत सतावायला लागली आहे.

रियाज आणि मैफल
‘शंभर वाचावे आणि एक लिहावे’ असं जुने-जाणते लोक सांगायचे. ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेनसुद्धा अगदी तसाच विचार मांडतात. ‘‘कलाकाराला आपल्यातल्या गुणवत्तेला न्याय द्यायचा असेल, तर रियाज आणि मैफील यांतला समन्वय साधता यायला हवा. एक चांगली पातळी गाठली, की कलाकाराला प्रेक्षकांचं प्रेम आणि दाद मिळू लागते- जी अत्यंत सुखावह असते. मग तुम्ही उत्तम गात असलेली बंदिश किंवा उत्तम वाजवत असलेला राग प्रेक्षक परतपरत ऐकायची मागणी करतात. सुरवातीला या मागणीनं अहंकार सुखावतो. पण नवं काही आपण सादरच करत नाहीय, असं नंतर कळायला लागतं. कारण रियाजावर आपलं अपेक्षित तितकं लक्ष राहत नाही. कलाकारानं सतत नावीन्याच्या शोधात असायला हवं, असं मला वाटतं. नवनवे उपक्रम आपल्या कलेतून सादर करायची हिंमत ठेवायला हवी,’’ हे उस्तादजींचे हे विचार क्रिकेटरलाही तंतोतंत लागू होतात. खेळाडूनं सरावावर भरपूर ध्यान देऊन आपल्यातलं कसब दाखवायला हवं. दुर्दैवानं आजच्या क्रिकेटला तशी संधी नाही आणि प्रशासकांविरुद्ध चकार शब्द काढायची कोणाची हिंमत नाही... म्हणूनच आजचे क्रिकेटपटू मला घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे वाटतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com