गल्लीत दादा... बाहेर वांधा ! (सुनंदन लेले)

sunandan lele's cricket article in saptarang
sunandan lele's cricket article in saptarang

मायदेशात जिंकणं जितकं सहज असतं, तितकंच परदेशांत जाऊन त्याच धडाडीनं सर्वोत्तम खेळ करणं कर्मकठीण काम असतं. परदेशांत हवामानातल्या बदलांचा सामना करावा लागतो. अनेक गोष्टी धोरणात्मकदृष्ट्या माहीत असल्या, तरी प्रत्यक्ष मैदानावर फरक पडतोच. सराव केला आणि उत्तम योजना आखल्या, तरी मैदानात त्या मनासारख्या राबवणं कठीण काम असतं. वेगवेगळ्या कारणांमुळं न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका अशा अनेक देशांच्या क्रिकेट संघांच्या परदेशांतल्या कामगिरीला ग्रहण लागलेलं दिसलं. हे संघ मायदेशांत चांगल्या संघांना टक्कर देतात; पण परदेश दौऱ्यांत सपशेल शरणागती पत्करतात. ‘गली में शेर और बाहर ढेर’ असाच प्रवास बऱ्याच संघांचा होताना दिसतो आहे.

‘‘तू  १४०च्या जवळपास कसोटी सामने खेळला आहेस. आत्ताच्या घडीला जितक्‍या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं, त्याचा विचार करता तेवढाच उत्साह जाणवतो का? एक व्यावसायिक खेळाडू म्हणून सर्वोत्तम तयारी आणि सामन्यात सर्वस्व झोकून देण्याबाबत शंका नाहीये... पण कसोटी सामना चालू होताना लागणारी ती हुरहूर किंवा क्रिकेटची अनामिक ओढ आजही जाणवते का,’’ माझा प्रश्‍न ऐकून इंग्लंडचा कर्णधार ॲलिस्टर कूक काहीसा दचकला.

‘‘कठीण प्रश्‍न आहे... दहा वर्षांपूर्वी इंटरनॅशनल ‘टी-२०’ सामने नव्हते. एकदिवसीय सामन्यांची संख्या थोडी तरी मर्यादित होती. आजच्या जमान्यातले ज्यो रूट किंवा विराट कोहलीसारखे खेळाडू एका वर्षात चौदाच्या आसपास कसोटी सामने खेळतात. त्या सोबतीला चाळीसच्या आसपास एकदिवसीय सामने खेळतात आणि आठ ते दहा इंटरनॅशनल ‘टी-२०’ सामने खेळतात. हे सोडून बऱ्याच खेळाडूंना आयपीएलसारख्या स्पर्धा खुणावतात, हे विसरून चालणार नाही. म्हणजे अजून चौदा ‘टी-२०’ सामने आणि त्यासोबत येणारा दोन महिन्यांचा दौरा आलाच. हे सगळं नक्कीच जास्त होतं; पण खरं उत्तर द्यायचं झाल्यास कुठं तरी प्रमाण कमी व्हायला पाहिजे हे नक्की वाटतं. नाही तर तू म्हणतोस तसं- व्यावसायिक खेळाडू म्हणून सर्वोत्तम तयारी होते; पण तोच उत्साह कायम राखणं कठीण होतं- असं व्हायची शक्‍यता नाकारता येणार नाही,’’ ॲलिस्टर म्हणाला.

‘‘याचा अर्थ कोणत्याही मालिकेची सखोल तयारी करायला पुरेसा वेळ संघांना मिळत नाही, हे नाकारून चालणार नाही. त्याचाच परिणाम मग निकालांमधे दिसतोय का? कारण बहुतांश संघ मायदेशात उत्तम खेळतात; पण परदेश दौऱ्यावर त्यांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झालेला दिसतो. ‘गल्लीत दादा आणि बाहेर वांधा’ असं होतंय ते त्याचमुळं का,’’ मी दुसरा प्रश्‍न विचारला.
‘‘परदेश दौऱ्यावर जाऊन जिंकणं कोणत्याही संघाला कठीणच असतं. संघाचा समतोल सर्वोत्तम असावा लागतो. मुख्य खेळाडूंचा फॉर्म एकाच वेळी चांगला असावा लागतो. त्यासाठी खूप चांगली तयारी करावी लागते. खेळाडू ताजेतवाने असावे लागतात. इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियात आणि भारतात येऊन जिंकणं जमलं आहे पूर्वी. आता चित्र बदललं, हे सत्य आहे. मालिकेची सुरवात उत्तम झाली, तर उत्साहात शतपटीनं फरक पडतो. पण मालिका चालू होतानाच फासे चुकीचे पडत गेले आणि कामगिरी खराब व्हायला लागली, तर त्यातून बाहेर पडून पुनरागमन करणं जवळपास अशक्‍य होऊन बसतं. भारतीय संघ २०१४ मध्ये आमच्यासमोर सपशेल हरला. आमच्या संघाला आता तसेच फटके बसत आहेत. नजीकच्या भूतकाळात फक्त दक्षिण आफ्रिकन संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करून कसोटी मालिका जिंकली. मात्र, त्या मालिकेअगोदर दक्षिण आफ्रिकन संघ ताजातवाना होता, लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांची सुरवात चांगली झाली. अर्थात तरी ते शेवटची कसोटी मोठ्या फरकानं हरलेच. मायदेशात जिंकणं जितकं सहज असतं, तितकंच परदेशांत जाऊन त्याच धडाडीनं सर्वोत्तम खेळ करणं कर्मकठीण काम असतं. त्यातून आमच्या संघाला भारतीय उपखंडात येऊन सर्वोत्तम खेळ सातत्यानं करून दाखवणं फारच मोठं आव्हान असतं. चालू दौऱ्यात तेच आव्हान आम्हाला पेलवलं नाहीये. भारतातल्या पाच कसोटी सामन्यांअगोदर आम्ही बांगलादेशात कसोटी खेळलो, हेसुद्धा विसरून चालणार नाही. आमचा चालू दौरा जास्तच लांबलचक आहे,’’ अत्यंत संयमित उत्तर देतानाही ॲलिस्टर कूकला खराब कामगिरीची निराशा लपवता येत नव्हती. खेळाडूंना आलेल्या शारीरिक आणि मानसिक थकव्याची समस्या त्याच्या बोलतून लपत नव्हती.

दर्जा आणि संख्या
क्रिकेटच्या वेळापत्रकावर नजर टाकली, तर भारत - ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मंडळं सामन्यांचं नियोजन करताना खेळाडूंचा जास्त विचार करत नाहीयेत, असं दिसतं. ऑस्ट्रेलियातले खेळाडू वर्षातले फक्त ३८ दिवस घरी राहतात, बाकीचे दिवस या ना त्या सामन्यासाठी प्रवास करत असतात, असं आधीच्या लेखात म्हटलं होतंच. ऑस्ट्रेलियात खेळाडूंची चांगली संघटना असूनसुद्धा त्यांना अतिक्रिकेटचा मुद्दा मंडळाशी बोलून सोडवता आलेला नाही. भारतात खेळाडूंची संस्था नसल्यानं बीसीसीआय सांगते, तेव्हा आणि तिथं खेळाडूंना खेळावं लागतं. सामन्यांची संख्या वाढली म्हणजे ‘क्वांटिटी’ वाढली; पण क्रिकेटचा दर्जा (क्वालिटी) चांगला राहिला का? संघाची कामगिरी चांगली होते, तेव्हा हा फरक समजत नाही. मात्र, कामगिरीचा एक-एक बुरूज ढासळू लागतो, तेव्हा संघाला दौरा कधी एकदा संपतोय, असं व्हायला लागतं. इंग्लंड संघाची सध्याची अवस्था बघता २०११ मध्ये भारतीय संघाचे विश्‍वकरंडकानंतर लगेच आयपीएल आणि पाठोपाठ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे दौरे आयोजित केल्यावर काय हाल झाले, त्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.   

परदेश दौरा कठीण का?
हा मुद्दा मांडायला इंग्लंड संघाचं उदाहरण लक्षात घेऊयात. इंग्लंडमधलं हवामान आणि भारतातल्या हवामानाचा विचार करता पाहुण्या संघाला पहिला दणका बदलत्या हवामानाचा सहन करावा लागतो. मग प्रत्यक्ष मैदानावरचा बदल काय असतो? खेळपट्टीतला फरक पाहुण्या संघासमोर सर्वांत मोठी परीक्षा निर्माण करतो. भारतात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या असणार, हे पाहुण्या संघाला माहीत असतं. त्या दृष्टीनं तयारी करून घेण्यात प्रशिक्षक कोणतीही कसर ठेवत नाहीत. योजना आखून ती कितीही समजावून सांगितली, तरी मैदानावर ती राबवणं किती कठीण असतं. हा मुद्दा पटवायला अगदी एक मजेदार उदाहरण देतो. आईनं पुरणपोळी करायची कृती टप्प्याटप्प्यानं कितीही समजावून सांगितली आणि आपण ती लिहून घेतली, तरी तिचं पालन करून पुरणपोळी आईसारखी करणं शक्‍य होईल का? नाही ना? तसाच हा प्रकार आहे. सराव केला आणि उत्तम योजना आखल्या, तरी मैदानात त्या मनासारख्या राबवणं कठीण काम असतं. दौऱ्यावर खराब कामगिरी व्हायला लागली, की घरची आठवण जास्त यायला लागते. भारतीयांना साजरे करायला बरेच सण असतात. एखादा चुकला हुकला, तरी काही विशेष फरक पडत नाही. त्याउलट ख्रिस्ती धर्मीयांकरता ख्रिसमस हाच सर्वांत मोठा आणि तसं बघायला गेलं, तर एकमेव मोठा सण आहे. इंग्लंड संघाला कधीपासून ख्रिसमसच्या सुटीचे वेध लागले आहेत. कधी एकदा भारताचा दौरा संपतो आणि आपल्या कुटुंबीयांसोबत ख्रिसमस साजरा करतो... मनाला शरीराला विश्रांती देतो, असं इंग्लिश खेळाडूंना झालेलं असणार.

दुखापतींचं ग्रहण
भारतीय संघाचा आलेख सध्या चढ्या क्रमाचा असल्यामुळं मुख्य खेळाडूंना झालेल्या दुखापती संघाच्या कामगिरीवर परिणाम करताना दिसत नाहीत. भारताची राखीव फळी तयार असल्याचं हे सुलक्षणही मानता येईल. पण हे लक्षात ठेवायलाच हवं, की बरेचसे सामने या वर्षी भारतीय संघ मायदेशात खेळतो आहे. दुसरीकडं जगातल्या बऱ्याच मुख्य खेळाडूंना अतिक्रिकेटनं दुखापती होताना स्पष्ट दिसते आहे. भविष्यातल्या दौऱ्यांचा कार्यक्रम खूप अगोदरपासून ठरतो. तो पक्का करताना फक्त मंडळाचे पदाधिकारी एकत्र येतात आणि निर्णय घेतात. खेळाडूंच्या मतांना अजिबात वाव या निर्णयप्रक्रियेत दिला जात नाही. खेळाडूंना काही समस्या भेडसावत आहेत का, हे विचारलं जात नाही. खेळाडूंच्या उत्साहाला आणि प्रायोजक- प्रेक्षकांच्या पाठिंब्याला गृहीत धरण्याची चूक संयोजक करत आहेत. प्रत्येक संघच परदेश दौऱ्यांत मोठा पराभव स्वीकारू लागले, तर क्रिकेटची रंगत कमी होईल, ही सर्वांत मोठी भीती वाटते.

विचार करावाच लागेल
क्‍लाईव्ह लॉईडचा वेस्ट इंडीज संघ किंवा स्टीव वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाची आठवण निघणं साहजिक आहे. मायदेशाबरोबर परदेशांतही तितकाच ताकदवान खेळ करून यजमान संघाला पराभूत करण्याची क्षमता असणारे हे दोनच संघ होते. परदेश दौऱ्यांवर सातत्यानं मालिका जिंकण्याची कमाल या दोन संघांनी करून दाखवली होती. आताच्या घडीला दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत असे चार संघ तुल्यबळ वाटतात. पाकिस्तानचा संघ कधी कमाल चांगली, तर कधी लज्जास्पद खराब कामगिरी करतो. सातत्याचा अभाव हेच त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य बनलं आहे. न्यूझीलंड संघानं ब्रॅंडन मॅक्‌लमच्या नेतृत्वाखाली लक्षणीय प्रगती केली; पण मॅक्‌लम निवृत्त झाल्यावर त्यांच्या परदेशांतल्या कामगिरीला परत ग्रहण लागलेलं दिसलं. श्रीलंकेचा संघ मायदेशात चांगल्या संघांना टक्कर देतो; पण तोच संघ परदेश दौऱ्यांत सपशेल शरणागती पत्करतो. ‘गली में शेर और बाहर ढेर’ असाच प्रवास बऱ्याच संघांचा होताना दिसतो आहे.

विराट कोहलीचा संघ मायदेशात समोर आलेल्या प्रत्येक संघाची चटणी करत सुटला आहे. न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडला धूळ चारल्यावर फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर येतो आहे. गेल्या वेळी ‘ऑसी’ संघाला भारताच्या दौऱ्यात ४-० पराभवाची नामुष्की सहन करावी लागली होती. २०१७ मध्ये निम्म्यापेक्षा जास्त महिने भारतीय संघाला परदेश दौऱ्यांचं आव्हान नाहीये. तोपर्यंत गुणतक्‍त्यात भारतीय संघ अव्वल स्थानावर राज्य करणार आहे. पुढील वर्षी परदेश दौरे चालू होतील, तेव्हा ‘विराटसेने’लाही आपण फक्त ‘गल्लीत शेर’ नसल्याचं सिद्ध करायला घाम गाळावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com