मनं जिंकली; मित्र गमावले (सुनंदन लेले)

मनं जिंकली; मित्र गमावले (सुनंदन लेले)

‘‘वेताळा, भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी सामन्यांतल्या धगधगत्या क्रिकेटसोबत वादांचे निखारेही धुगधुगताना दिसलेच मला,’’ विक्रमादित्यानं मत व्यक्त केलं. ‘‘म्हणजे काय चांगलंच. मैदानावर आणि मैदानाबाहेरची वादावादी शेवटचा सामना संपला, तरी चालूच राहिली; पण तुला सांगतो विक्रमादित्या, याला भारतीय कर्णधार किंवा भारतीय संघ कारणीभूत नव्हता. संपूर्ण मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय संघातल्या खेळाडूंचं लक्ष विचलित करायला भरपूर बडबड केली. तुला सांगून खोटं वाटेल; पण भारतीय कर्णधार विराट कोहलीला सतत टोचून बोलून आणि वादग्रस्त प्रश्‍न विचारण्याची ऑस्ट्रेलियन पत्रकारांची व्यूहरचना होती,’’ वेताळानं स्पष्ट केलं.

...तरीही विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही. वेताळाच्या शोधार्थ तो भारतभर फिरत होता. विक्रमादित्याला कल्पना होती, की भारतात क्रिकेट मोसम चालू असल्यानं वेताळ कोणत्या ना कोणत्या क्रिकेट मैदानाच्या ‘फ्लड लाइट’ खांबाला लटकून सामना बघत असणार. पूर्वी वेताळाला शोधायची ठिकाणे विक्रमादित्याला माहीत असायची. मुंबईचं वानखेडे स्टेडियम, बंगळूरचं चिन्नास्वामी स्टेडियम, कोलकत्याचं ईडन गार्डन ही वेताळाची खास लाडकी मैदानं होती. आता अडचण अशी होती, की चालू मोसमात भारतीय संघ तब्बल १३ शहरांत कसोटी सामने खेळत होता. त्यामुळं वेताळ नक्की कोणत्या शहरात असेल याचा अंदाज राजाला येत नव्हता. शेवटी विक्रमादित्यानं क्रिकेट मोसमाचं वेळापत्रक बघितलं आणि त्याला शेवटचा सामना हिमालयाच्या कुशीतल्या धरमशाला गावी असल्याचं समजलं. विक्रमादित्य राजधानी दिल्लीमार्गे धरमशालाला येऊन पोचला. कसोटी सामना पाच दिवसांचा असतो, म्हणून विक्रमादित्य गाफील राहणाऱ्यांतला नव्हता. पाच दिवसांचे कसोटी सामने आजकाल कधीकधी तीन दिवसांत आटोपतात, याची त्याला कल्पना होती.
विक्रमादित्याचा अंदाज बरोबर ठरला. धरमशाला कसोटी सामना चौथ्या दिवशी उपाहाराला संपला. ‘फ्लड लाइट’च्या खांबाला उलटं लटकून वेताळ सामना बघताना हिमालयाचं दृश्‍य बघण्यात मग्न होता. भारतीय संघानं कसोटी सामन्याबरोबर मालिका २-१ फरकानं जिंकल्यानं वेताळ जाम खुश होता. भारतीय संघातल्या खेळाडूंना टाळ्या देऊन अभिनंदन करताना गाफील असताना विक्रमादित्यानं वेताळाला हिसडा देऊन खाली पाडलं आणि झडप घालून पकडलं. वेताळाने सुटकेकरता तडफड केली; पण विक्रमादित्याची पकड चांगलीच मजबूत होती. वेताळाला पाठीवर टाकून विक्रमादित्य धौलगीरी पर्वत रांगांची वाट पकडून चालू लागला. बघता-बघता धरमशाला गाव मागं पडलं. घनदाट जंगलाचा रस्ता लागल्यावर विक्रमादित्य जरा मोकळा झालेला बघून वेताळानं संभाषण चालू केलं.

‘‘किती अरसिक आहेस तू राजा...काय मस्त ‘सेलिब्रेशन’ चालू होतं भारतीय संघाच्या भन्नाट विजयाचं आणि तू मला बेसावध क्षणी असं जेरबंद केलंस... क्रिकेटच्या संस्कृतीत हे बसत नाही,’’ वेताळानं विक्रमादित्याला बोलतं करण्यासाठी टोमणा मारला.
‘‘तुला शोधून-शोधून मी थकलो होतो वेताळा...अरे किती गावी हे सामने...आता पूर्वीसारखे मोजक्‍या शहरांत का नाही होत हे क्रिकेट सामने,’’ विक्रमादित्यानं काहीसं वैतागून विचारलं.
‘‘पूर्वी मोजक्‍या शहरांतच कसोटी सामने व्हायचे. आता धरमशाला हिशेबात घेतलं, तर किती तरी नव्या गावी आता कसोटी सामने भरवले गेले... क्रिकेटचा प्रसार केला गेला,’’ वेताळ अभिमानानं बोलत होता.

‘‘नव्या शहरांत कसोटी सामने भरवले गेले, हे मान्य; पण ऑस्ट्रेलियासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यासमोरचे चारपैकी तीन सामने नव्या जागी खेळवणं हा भारतीय संघाच्या नशिबाशी खेळलेला जुगार नव्हता का,’’ विक्रमादित्यानं बरोबर मुद्दा काढला.
‘‘होता रे राजा होता. हा नशिबाचा जुगारच होता...फक्त ज्या तीन नवीन जागी कसोटी सामने पहिल्यांदा भरवले गेले, त्या संघटनांचे दोन सर्वेसर्वा बीसीसीआयचे माजी उच्चाधिकारी होते, तर एक आत्ताचे उच्चाधिकारी आहेत, हे लक्षात घे. त्यामुळं ज्याचं आश्‍चर्य तुला वाटत आहे, ते मला अजिबात वाटत नाहीये. नव्या जागी खेळपट्टी नक्की काय असेल, याच्या भयानं खेळाडू मात्र चिंतातुर झाले होते, हे सत्य मी नाकारणार नाही,’’ वेताळ समजावणीच्या सुरात म्हणाला.

‘‘तुझ्या क्रिकेटप्रेमाचा परिणाम माझ्यावरही झालाय वेताळा. तुला पटणार नाही; पण ऑस्ट्रेलियासमोरच्या मालिकेत काय चालू आहे याकडं माझीसुद्धा नजर होती थोडी-थोडी... पहिल्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यावर काळजी नाही वाटली तुला?’’- अभावितपणे विक्रमादित्यानं विचारलं.

‘‘नाही कशी वाटणार?..पुण्यनगरीतल्या सामन्यात खेळपट्टीशी ‘खेळ’ झाला आणि त्यातून नाणेफेकीचा कौल ऑसी कप्तानाच्या बाजूनं लागला. सगळे फासे उलटे पडले. मोठा पराभव माझ्या संघाला सहन करावा लागला; पण आमचा प्रशिक्षक मागं हटला नाही की खच्ची झाला नाही. त्यानं संघाला काही काळाकरता क्रिकेटपासून दूर नेलं. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत जाऊन भारतीय खेळाडू मनानं शांत झाले- ज्याचा परिणाम बंगळूर कसोटी सामन्यात दिसला. भारतीय संघानं जबरदस्त पुनरागमन करताना दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली,’’ वेताळ उत्साहानं बोलत होता.

‘‘बंगळूरचा सामना उत्कंठा वाढवणारा होता हे मान्य; पण बंगळूर कसोटीत वादविवाद बरेच झाले. नक्की काय झालं पडद्यामागं सांग मला...’’ राजानं वेताळाला संधी दिली.
‘‘बरंच काही नाट्य घडलं राजा, काय सांगू तुला! भारतीय कर्णधार विराट कोहलीनं जे आरोप केले ते सत्य होते. मिशेल मार्शन नावाचा खेळाडू पहिल्या डावात बाद झाला असताना ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापन आतून खाणाखुणा करून तिसऱ्या पंचांकडं दाद मागायचा सल्ला देत होते. विराटनं ते बघितलं आणि मैदानावरच्या पंचांना दाखवलं. अजूनही एकदा हाच प्रकार झाला. मग जेव्हा कर्णधार स्मिथनं थेट मैदानावरून पॅव्हेलियनकडं बघत सल्ला मागितला, तेव्हा हद्दच झाली. इतकंच नाही, तर त्या सामन्यानंतर विराट कोहली आणि अनिल कुंबळे सामना अधिकारी ख्रिस ब्रॉडकडं गेले. सामना अधिकारी नावानंच ‘ब्रॉड’ होता; पण त्याचं हृदय छोटं होतं. त्यानं आपल्याला मायदेशी जायची घाई आहे, असं सांगत भारतीय संघाची तक्रार नोंदवून घेतली नाही. याच कारणानं कोणतीही कारवाई ऑस्ट्रेलियन संघावर झाली नाही. ही सर्व बित्तंबातमी मला माहीत आहे- कारण मी दाराच्या वरच्या खांबाला लटकून हे सगळं बघत होतो,’’ वेताळ ‘आँखो देखा हाल’ सांगून गेला.

‘‘रांचीचा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानं शेवटच्या सामन्यातील रंगत वाढली नाही वेताळा?’’
‘‘प्रचंड वाढली. अत्यंत महत्त्वाचा सामना धरमशालाच्या निसर्गसुंदर मैदानावर होणार, या विचारानं माझ्या मानेवरचे केस उभे राहिले राजा. काय देखणं मैदान आणि त्याला लाभलेलं निसर्गाचं कोंदण. आहाहा. मजा आली अशा सुंदर जागी सामना बघताना. न्यूझीलंडमधल्या क्वीन्सटाऊनच्या मैदानाला आणि दक्षिण आफिकेतल्या केपटाऊनच्या न्यूलॅंड्‌स मैदानाला असा निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली दुखापतीतून सावरला नाही. फार मोठा धक्का होता तो. मात्र, अजिंक्‍य रहाणेनं त्याच्या शांत स्वभावाला धरून आपल्या पद्धतीनं कर्णधारपद निभावलं- ज्यात धाडसी निर्णयांचा समावेश होता. संघातल्या खेळाडूंनी अत्यंत मोक्‍याच्या क्षणी कामगिरी उंचावली- ज्यामुळं भारतीय संघाला सामना जिंकताना धाकधूक झाली नाही. काय मोहक क्षण होता तो जेव्हा रहाणे-राहुलच्या जोडीनं विजय हाती घेत मालिका २-१ फरकानं जिंकण्याचा पराक्रम निश्‍चित केला. मी तर फार खुश झालो...अगदी आनंदानं मोहरून गेलो,’’ वेताळ भरभरून बोलत होता.
‘‘पण वेताळा, धगधगत्या क्रिकेटसोबत या सामन्यातही वादांचे निखारे धुगधुगताना दिसलेच मला,’’ विक्रमादित्यानं विचारलं.

‘‘म्हणजे काय चांगलंच. मैदानावर आणि मैदानाबाहेरची वादावादी शेवटचा सामना संपला, तरी चालूच राहिली; पण तुला सांगतो विक्रमादित्या, याला भारतीय कर्णधार किंवा भारतीय संघ कारणीभूत नव्हता. संपूर्ण मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय संघातल्या खेळाडूंचं लक्ष विचलित करायला भरपूर बडबड केली. आजच्या जमान्यातले खेळाडू ‘अरे’ला ‘का रे’ करणारे असल्यानं त्याला तशाच पद्धतीनं उत्तरं भारतीय खेळाडूंनी दिली. तुला सांगून खोटं वाटेल; पण भारतीय कर्णधार विराट कोहलीला सतत टोचून बोलून आणि वादग्रस्त प्रश्‍न विचारण्याची ऑस्ट्रेलियन पत्रकारांची व्यूहरचना होती. या व्यूहरचनेमध्ये ऑस्ट्रेलियन संघ सामील होता, हे मी खात्रीलायकरीत्या सांगू शकतो. मालिका संपल्यावर दोन पंचांमध्ये चालू असलेलं संभाषण मी ऐकलं आहे. दोनही अनुभवी पंच एकमेकांना म्हणत होते, की विराट कोहलीला लक्ष्य बनवून ऑस्ट्रेलियन माध्यमांनी आपल्या संघाच्या अपयशावरून लोकांचं लक्ष दुसरीकडं नेण्याचा प्रयत्न केला. ख्रिस ब्रॉड यांनी जी चूक केली, त्यानं मोठं नाट्य घडलं असतं; पण रिची रिचर्डसन यांनी मोठ्या मुत्सद्देगिरीनं परिस्थिती हाताळली, म्हणून संभाव्य धोका टळला. अगदी शेवटच्या पत्रकार परिषदेत क्रिकेटवर चर्चा चालू असताना ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या वेबसाइटसाठी काम करणाऱ्या पत्रकारानं मुद्दामहून विराट कोहलीला दोन संघांमधल्या संबंधांवरून खोचक प्रश्‍न विचारला. त्याला विराट कोहलीनं सडेतोड उत्तर दिलं. राजा यावरून हे स्पष्ट होतं, की संघ व्यवस्थापनाकडून ऑस्ट्रेलियन माध्यमातल्या पत्रकारांचा वापर केला गेला. आत्ताच्या घडीला बीसीसीआय कारभारात बऱ्याच घडामोडी होत आहेत म्हणून- नाही तर काही ऑसी पत्रकारांचं अधिस्वीकृती ओळखपत्र रद्द केलं गेलं असतं- मग यांना समजलं असतं,’’ वेताळ पोटतिडकीनं बोलत होता.

‘‘नको राग-राग करूस वेताळा आणि तुझ्या क्रिकेट आनंदाचा विचका करूस. झालं गेलं गंगेला मिळालं. भारतीय संघानं १३ पैकी १० सामने जिंकून कमाल केली. आपण त्या चांगल्या कामगिरीचा आनंद घेऊयात,’’ विक्रमादित्यानं पहिल्यांदाच वेताळाची समजूत काढली.

‘‘आनंदात विरजण घालायला मी वेडा आहे की काय...मला अभिमान आहे भारतीय संघातल्या खेळाडूंचा आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीचा. एकाच मोसमात ऐंशीपेक्षा जास्त विकेट काढण्याचा अश्‍विनचा धडाका, रवींद्र जडेजाचं खरा अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला येणं, उमेश यादवनं केलेली सातत्यपूर्ण गोलंदाजी, कुलदीप यादवचा झालेला उदय, अजिंक्‍य रहाणेनं संघाचं नेतृत्व करताना दाखवलेली संयमी आक्रमकता आणि चेतेश्‍वर पुजाराच्या खेळ्या...सगळ्यांनीच मला खूप आनंद दिला आहे; पण राजा, आता मागं वळून दृश्‍य तर बघ...आपण मैदानावरून बर्फाच्छादित पर्वतरांगा बघितल्या...आता हिमालयावरून धरमशालाचं मैदान काय सुंदर दिसतं बघ तरी,’’ वेताळानं विक्रमादित्याला गुगली टाकला.

पर्वतावरून दिसणारं दृश्‍य बघायला विक्रमादित्य वळला आणि दोन्ही हात लांब करून, ‘‘आहाहा काय दृश्‍यं आहे नाही...विलोभनीय,’’ असं म्हणाला खरा; पण दोन्ही हात लांब केल्यावर त्याची वेताळावरची पकड सुटली. तीच संधी साधून वेताळ उडून लांबच्या सूचिपर्णी झाडावर जाऊन उलटा लटकू लागला.

‘‘राजा, मला आता आयपीएल स्पर्धेतले झटपट क्रिकेटचे सामने बघायचे आहेत... आता मी तुझ्या तावडीत येणार नाही,’’ दात विचकत हसत वेताळ म्हणाला.
वेताळ परत एकदा आपल्या तावडीतून सुटल्यानं वैतागलेला विक्रमादित्य राजा हात चोळत आणि पाय आपटत जंगलाच्या दिशेनं चालू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com