कॉफीच्या कपातली करामत (संदीप वासलेकर)

कॉफीच्या कपातली करामत (संदीप वासलेकर)

कॉफी हाउसचं प्रस्थ भारतात आता वाढलं असलं, तरी जगभरात या एरवी साधारण वाटणाऱ्या वास्तूमध्ये इतिहास घडल्याचं दिसतं. रोममधलं ग्रीक कॅफे, व्हिएन्ना इथलं कॅफे सेंट्रल, बुडापेस्टमधलं हंगेरीया कॅफे, तर कोलकता इथलं कॉलेज स्ट्रीट कॉफी हाउस अशा काही कॅफेंमध्ये राजकीय, साहित्यिक क्रांतीची बीजं रोवली गेली. प्रत्येक समाजात वैचारिक प्रवाहांना मार्ग मिळण्यासाठी काही साधनांची, काही संस्थांची गरज असते. गेली अनेक वर्षं, विशेषतः एकोणिसाव्या-विसाव्या शतकात, ही गरज कोलकता, व्हिएन्ना, बुडापेस्ट, पॅरिस, रोम इथल्या कॉफी हाउसनी भागवली.  

सु  मारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी कोलकता सोडल्यास भारतातल्या बहुसंख्य शहरांत ‘कॉफी हाउस’ नावाचा प्रकार नव्हता. एखाद्या खानावळीत अथवा रेस्तराँमध्ये गेल्यावर चहा किंवा कॉफी घ्यायची अथवा आवडेल ते खायचं आणि बिल भरून बाहेर पडायचं अशी पद्धत होती. केवळ एक कॉफीचा कप घेऊन तासन्‌ तास मित्रांबरोबर गप्पा मारत बसणं शक्‍य नव्हतं.

गेल्या काही वर्षांत इंग्रजी नावं असलेल्या कॉफी हाउसच्या विविध शृंखला देशातल्या शहरांत पसरल्या. आता बऱ्याच युवकांसाठी कॉफी हाउस हा आयुष्याचा एक घटक झाला आहे. मुंबईतल्या बॉलिवूडशी संबंधित भागांत तर अनेक चित्रपट लेखक, संगीतकार आणि अभिनेते होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले युवक कॉफी हाउसमध्ये संध्याकाळभर घोटाळतात. कधी कधी एकटा लेखक फक्त एक कप घेऊन पटकथा अथवा संवाद लिहण्यात मग्न झालेला दिसतो.

मात्र, कॉफी हाउस या साधारण कॉफीच्या वास्तूत जागतिक इतिहास घडला, असं कळलं, तर आपल्याला आश्‍चर्य वाटेल. पॅरिसमध्ये इसवीसन १६८६मध्ये कॅफे प्रोकोपे या कॉफी हाउसची स्थापना झाली. इथं रुसो आणि व्हाल्तेअर हे प्रसिद्ध लेखक जात असत. त्यांनी फ्रान्समध्ये वैचारिक क्रांती केली. फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक रॉब्सपीअर, डांटन आणि बाकी प्रभृती या प्रोकोपेमध्ये बसून आपले डावपेच आखत होते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ, लेखक, उद्योजक आणि अमेरिका या देशाचे सहसंस्थापक बेंजामिन फ्रॅंकलिन यांची अमेरिकेनं फ्रान्समध्ये राजदूत म्हणून नेमणूक केली होती. ते कायम कॅफे प्रोकोपेमध्ये बसत असत आणि अमेरिका-फ्रान्स संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करत.

कॅफे प्रोकोपेनंतर शंभर वर्षांनी रोममध्ये ग्रीक कॅफे उभारण्यात आलं. इथं सुप्रसिद्ध लेखक इब्सेन, हांस ख्रिश्‍चन अँडरसन, गोथे जाऊन कॉफी घेत आणि साहित्यावर चर्चा करत. इतकंच काय, तर अनेक स्त्रियांबरोबर प्रेमप्रकरणं करून इतिहासात एक विचित्र स्थान मिळवणारा लेखक कॅसानोव्हा हा कायम ग्रीक कॅफेमध्ये बसलेला असे. रोमच्या या कॅफेनं युरोपातल्या साहित्यात क्रांती करण्यासाठी खूप हातभार लावला आहे.
युरोप आणि आशिया खंडातल्या अनेक शहरांत कॉफीच्या कपानं राजकारणात, विज्ञानात, साहित्यात मोठ्या करामती घडवून आणल्या आहेत. या सर्वांमध्ये व्हिएन्ना इथलं कॅफे सेंट्रल, तर कलकत्ता इथलं कॉलेज स्ट्रीट कॉफी हाउस हे अनुक्रमे जगात आणि भारतात अग्रगण्य समजले जातात.

गमतीची गोष्ट म्हणजे जगाच्या दोन विभिन्न भागातले हे दोन कॅफे एकाच वर्षी, इसवीसन १८७६मध्ये उघडण्यात आले. कोलकता इथलं कॉफी हाऊस ब्रिटिशांच्या काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही क्रांतिकारक विचारांचं अड्डा बनलं. पश्‍चिम बंगालमध्ये अनेक वर्षे साम्यवादी पक्षांची बाजू भक्कम राहिली. सध्याही साम्यवादी विचारसरणी असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचं राज्य आहे. संपूर्ण भारतात पूर्वी काँग्रेस, तर आता भारतीय जनता पक्ष यांचं राज्य असताना पश्‍चिम बंगालमध्ये कायम डाव्या विचारसरणीचा प्रभाव राहिला, याला कॉलेज स्ट्रीटवरचं कॉफी हाउस खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे.

कॉलेज स्ट्रीट कॉफी हाउसनं भारतीय साहित्य आणि कलेची वृद्धी करण्यातही मोठा हातभार लावला आहे. सत्यजित रे, मृणाल सेन, अपर्णा सेन, ऋत्विक घटक, मलय रॉय चौधरी ही मंडळी कायम इथल्या चौकोनी टेबलांवर बसत आणि समकालीन विचारवंतांशी देवाणघेवाण करत असत.

कोलकता इथलं कॉफी हाउस एका विचारधारेचं पाळणाघर आहे, तर १८७६मध्येच स्थापन झालेले व्हिएन्ना इथलं कॅफे सेंट्रल हे विविध राजकीय प्रवाहांचं घरकुल म्हणून गेली १४० वर्षं प्रसिद्ध आहे. व्हिएन्ना ही ऑस्ट्रिया (ऑस्ट्रेलिया नव्हे) या छोट्या देशाची राजधानी. पहिल्या महायुद्धाआधी सुमारे सातशे-आठशे वर्षं युरोपमध्ये ऑस्ट्रिया-हंगेरी महासत्तेचं राज्य होते. आपल्याला ब्रिटनचं साम्राज्य माहीत आहे. इंग्रजांनी भारतासहित इतर देशांत वसाहती बांधल्या; पण त्यांचे मायखंड असलेल्या युरोपामध्ये त्यांना फार मोठं स्थान नव्हतं. तिथं ऑस्ट्रिया-हंगेरीचं संयुक्त साम्राज्य होतं. त्यामुळं अनेक शतकं ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट यांचा प्रभाव युरोपच्या जीवनशैलीवर पडला होता.

अशा या व्हिएन्नामध्ये कॅफे सेंट्रल हे विचारांचं आदानप्रदान करणारं मध्यवर्ती केंद्र. तेथे १९१३मध्ये कामगार नेते व्हिक्‍टर ॲडलर आणि ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री काऊंट लिओपोल्ड बर्शटोल्ड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ॲडलर मंत्रीसाहेबांना म्हणाले ः ‘‘तुम्ही मोठं युद्ध करू नका. तसं केलं, तर रशियात लाल क्रांती होईल.’’ मंत्रीसाहेब रागानं म्हणाले ः ‘‘क्रांती कोण करेल? ते कोपऱ्यावरच्या टेबलावर कॉफी पीत बसणारे महाशय करतील का?’’
अखेरीस तेच झालं. ते कोपऱ्यावरच्या टेबलावर कॉफी पीत बसणारे महाशय होते लिओ ट्रॉटस्की. त्यांच्याच विचारांमुळं रशियात लाल क्रांती झाली. कॅफे सेंट्रलमध्ये दुसरे एक गृहस्थ वारंवार येत असत. त्याचं नाव लेनिन. तिथं लेनिन आणि ट्रॉटस्की एकत्र बसून कॉफीचे घुटके घेत. त्या दोघांच्या कॉफीच्या कपात संपूर्ण जगाच्या इतिहासावर परिणाम करण्याची क्षमता होती.

कॅफे सेंट्रलमध्ये सिगमंड फ्रॉईड हे मानसशास्त्रज्ञ मित्रांबरोबर अड्डा करून बसलेले असत. त्यांच्याबरोबर अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ जमलेले असत. तिथं काही वेळा ॲडॉल्फ हिटलर नावाचा एक तरुण अधूनमधून चक्कर मारत असे. तो नंतर व्हिएन्ना सोडून जर्मनीला स्थायिक झाला आणि विसाव्या शतकाचा खलनायक बनला.
विसाव्या शतकाच्या सुरवातीला व्हिएन्ना आणि बुडापेस्ट इथल्या बौद्धिक वर्तुळात स्पर्धा होती आणि त्याचं केंद्रस्थान व्हिएन्नात कॅफे सेंट्रल होतं, तर बुडापेस्टमध्ये हंगेरीया कॅफे होतं. भारतात हंगेरीतल्या साहित्याविषयी फारशी माहिती नाही. शंभर वर्षांपूर्वी हंगेरीत फेरेंक मोलनार नावाचा साहित्यिक होऊन गेला. त्यानं त्या कॉफी हाउसमध्ये बसून ‘पॉल स्ट्रीटची पोर’ ही कादंबरी मूळ हंगेरी भाषेत लिहिली. ती जगप्रसिद्ध झाली. नंतर आपल्याला माहीत नसलेली; पण हंगेरीतल्या रस्त्यांवर प्रत्येकाच्या ओठांवर असलेली नावं सॅंडार मराई, गेझा गारदोनयी, ग्युला इलिस आणि इतर अनेक साहित्यिक कॉफी हाउसमध्ये लहानाचे मोठे झाले.

काही वर्षांपूर्वी बुडापेस्टमधल्या हंगेरीया कॉफी हाऊसचं ‘न्यूयॉर्क कॅफे’ असं नामांतर करण्यात आलं. हे जगातलं सर्वात सुंदर असं कॉफी हाऊस समजलं जातं. त्याचं छत प्रचंड उंचीवर आहे आणि एखाद्या राजवाड्यासारखं अंतर्गत नक्षीकाम करण्यात आलं आहे. प्रत्येक टेबलावर एका लेखकाची माहिती देण्यात आली आहे. आता बदलत्या काळानुसार तिथं लेखक येत नाहीत, तर उद्योजक, तंत्रज्ञ आणि काही शास्त्रज्ञ दुपारी कॉफी पिताना दिसतात.

अर्थात कॉफी हाऊस हे साधन झालं. तिथं क्रांतीचे पाळणे हलवायचे, का साहित्य आणि कला या गोष्टी वृद्धिंगत करायच्या हे समाजावर अवलंबून आहे. प्रत्येक समाजात वैचारिक प्रवाहांना मार्ग मिळण्यासाठी काही साधनांची, काही संस्थांची गरज असते. गेली अनेक वर्षं, विशेषतः एकोणिसाव्या-विसाव्या शतकात, ही गरज कोलकता, व्हिएन्ना, बुडापेस्ट, पॅरिस, रोम इथल्या कॉफी हाऊसनी भागवली. आपण जेव्हा एखादी कॉफी प्यायला एखाद्या कॅफेमध्ये जातो, तेव्हा त्या कॉफीच्या कपाचा एवढा प्रचंड, जगाला हादरवणारा इतिहास आहे याची आपल्याला कल्पना नसते. पुढच्या वेळेस जाल आणि कॉफीचे घुटके घ्याल, तेव्हा या इतिहासाची तुम्हाला क्षणभर जाणीव व्हावी आणि थोडं अंतर्मुख होऊन समाज, साहित्य, कला या विषयांवर विचार करण्याची इच्छा व्हावी, म्हणून मी हा लेख लिहिण्याचा प्रयास केला इतकंच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com