आपण काय करू शकतो? (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 15 जानेवारी 2017

‘मी समाजबांधणीसाठी आणि देशहितासाठी काय करू शकते अथवा करू शकतो,’ असा प्रश्‍न अनेकांना पडतो. सकारात्मक काम करण्यासाठी केवळ चांगली इच्छा असणं पुरेसं नाही, त्यासाठी चांगलं तंत्र पाहिजे आणि सातत्यही पाहिजे. वैयक्तिक स्तरावर काम करण्यापेक्षा सामूहिक प्रयत्न केले, तर ते काम जास्त परिणामकारक होऊ शकतं. दुसरं म्हणजे शहर किंवा जिल्हा पातळीवर शासनाची मदत घेतली, तर खोल परिणाम होऊ शकतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे.

‘मी समाजबांधणीसाठी आणि देशहितासाठी काय करू शकते अथवा करू शकतो,’ असा प्रश्‍न अनेकांना पडतो. सकारात्मक काम करण्यासाठी केवळ चांगली इच्छा असणं पुरेसं नाही, त्यासाठी चांगलं तंत्र पाहिजे आणि सातत्यही पाहिजे. वैयक्तिक स्तरावर काम करण्यापेक्षा सामूहिक प्रयत्न केले, तर ते काम जास्त परिणामकारक होऊ शकतं. दुसरं म्हणजे शहर किंवा जिल्हा पातळीवर शासनाची मदत घेतली, तर खोल परिणाम होऊ शकतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे.

‘सप्तरंग’च्या अनेक वाचकांनी- विशेषतः युवा वाचकांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनीही ‘मी समाजबांधणीसाठी आणि देशहितासाठी काय करू शकते अथवा करू शकतो,’ हा प्रश्‍न मागील काही वर्षांत अनेकदा विचारला. प्रश्‍न विचारणारे शेकडोंमध्ये असल्यानं प्रत्येकाला वैयक्तिक उत्तर देणं शक्‍य नाही. म्हणून मी काही वेळा या सदरातून या प्रश्‍नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आता नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळं पुन्हा एकदा या प्रश्‍नाकडं वळणं योग्य होईल.
आपण जेव्हा सकारात्मक काही करण्याचा विचार करतो, तेव्हा तो राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरच्या मुद्द्यांशी संबंधित असतो, किंवा वैयक्तिक पातळीवर सामाजिक कार्याचा असतो, परिणामी अनेकदा पदरी निराशा पडते. भारतासारख्या मोठ्या देशात, किंबहुना कुठंही एका व्यक्तीच्या प्रयत्नांवर मर्यादाच येते. योग्य कर भरणं, कायद्याचं पालन करणं, सदसद्विवेकबुद्धीला अनुसरून कोणत्याही मोहात न पडता मतदान करणं, अशा गोष्टी बहुसंख्य प्रामाणिक नागरिक करतात. काही उत्साही नागरिक राष्ट्रीय नेत्यांना पत्र पाठवून चांगले उपक्रम सुचवतात आणि स्वतःही सहभागी होण्याची तयारी दाखवतात; पण तरी प्रत्येकाला आपण किती परिणाम करू शकतो, याबद्दल शंका वाटते.

परिणामी आपण सामाजिक कार्याचा मार्ग शोधतो. आपल्यातले काही जण सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत होतात. काही जण वैयक्तिक पातळीवर शक्‍य होईल ते करतात; परंतु आपण जे करतो ते राष्ट्राचं नवनिर्माण करण्याच्या दृष्टीनं खूप कमी आहे, अशी भावना अनेकदा मनात येते.
अशा परिस्थितीत आपण परिणामकारक असं सकारात्मक काय काम करू शकतो? यासाठी दोन गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे आपण एक व्यक्ती म्हणून जे काही करू शकतो, त्यापेक्षा अनेक जणांनी एकत्र येऊन प्रयत्न केले, तर ते काम जास्त परिणामकारक होऊ शकतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरून मदत घेण्यापेक्षा शहर किंवा जिल्हा पातळीवर शासनाच्या सहभागानं काही काम केलं, तर खोल परिणाम होऊ शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. कित्येक शहरांत स्थानिक प्रशासन भ्रष्ट असतं, नागरिकांकडे दुर्लक्ष करतं, असा अनुभव आहे. तरीही स्थानिक प्रशासनाचा सक्रिय सहभाग साध्य करण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार केला पाहिजे. काही ठिकाणी स्थानिक प्रशासन लोकाभिमुख असतं. प्रशासकीय अधिकारी स्वतःच पुढाकार घेऊन नागरिकांना बरोबर घेऊन कार्य करण्याच्या योजना मांडतात. अशा प्रयत्नांना प्रतिसाद दिला, तर आपला वेळ आणि श्रमशक्ती यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. थोडक्‍यात, वैयक्तिक पातळीवर केलेल्या प्रयत्नांपेक्षा समाजातले गट किंवा घटक आणि स्थानिक प्रशासन यांच्या संगमातून आपण प्रयत्न केले, तर स्पष्ट बदल दिसू शकतात.

मी मुंबईत वर्सोवा किनारपट्टीजवळ राहतो. भारतातल्या इतर अनेक शहरी किनारपट्टींप्रमाणं वर्सोवालादेखील कचरा आणि घाण जमा होते आणि तिथं चालणंही कठीण होतं. सुमारे दीड वर्षापूर्वी अफरोझ शेख या ३३ वर्षं वयाच्या वकिलानं आपल्या हरिवंश माथूर या ८४ वर्षांच्या, निवृत्त झालेल्या शेजाऱ्यांबरोबर किनारपट्टी स्वच्छ करण्याचा चंग बांधला. एका रविवारी दोघंच गेले आणि स्वतःच्या हातानं दिवसभर कचरा उचलून बाजूला काढून आले. नंतर त्यांनी सोशल मीडियावरून आवाहन करून अनेक शेजाऱ्यांना या प्रयत्नात ओढलं. काही आठवड्यांत केवळ वर्सोवाच नव्हे, तर मुंबईच्या इतर भागांतूनही नागरिक येऊन स्वयंस्फूर्तीनं किनारपट्टी साफ करण्याच्या प्रयत्नास लागले. दरम्यान, हरिवंश माथूर यांचं कर्करोगानं निधन झालं.

त्यानंतर अफरोझ शेखनं मुंबई महापालिकेला आपला उपक्रम समजावून सांगितला आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य मागितलं. नंतर नागरिक आणि महापालिका या दोघांच्या समन्वयानं हे कार्य सुरू झालं. म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी काम करतात, त्यांच्याबरोबर सेवाभावी नागरिकही काम करतात आणि या कामावर नागरिकच देखरेख करतात - महानगरपालिकेचे अधिकारी नव्हे. अलीकडं महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड या सरकारी संस्थेनंदेखील या उपक्रमात सामील व्हायचं ठरवलं आहे. परिणामी कचरा किनारपट्टीवर यायच्या आधीच समुद्रातून काढून टाकणं शक्‍य होईल. गेल्या वर्षात (२०१६) नागरिक आणि महापालिकेचं प्रशासन यांच्या सहकार्यानं सुमारे तीस लाख किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यात विशेषकरून प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या यांचं प्रमाण जास्त होतं.

अफरोझ शेख यांनी कोणतीही संघटना बांधली नाही, त्यांनी केवळ सेवाभावी नागरिकांना एकत्र येण्यास प्रेरणा दिली आणि संयोजन केलं. या अभियानात कोणी अध्यक्ष नाही, कोणी सचिव नाही, तर कोणी प्रतिनिधी नाही. तसेच, अभियानाचं स्थानिक शासनाबरोबर सहकार्य आहे. म्हणूनच ५०-५५ रविवारी सुमारे तीस लाख टन कचरा निपटून टाकता आला.

वर्सोवा किनारपट्टीची स्वच्छता हा भारतातल्या समुद्रकिनारी असलेल्या अनेक शहरांचा प्रतिनिधिक प्रश्‍न आहे. वर्सोवाप्रमाणेच इतर ठिकाणीदेखील नागरिक आणि नागरी प्रशासन यांच्या सहकार्यातून हा प्रश्‍न सुटू शकतो. हाच मार्ग वापरून रस्ते, चौक आणि इतर सार्वजनिक जागाही स्वच्छ होऊ शकतात.

सातारा जिल्ह्यातदेखील सेवाभावी नागरिक आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्यानं जिल्ह्यातली तळी आणि कोरड्या जागांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढवण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले आहेत. त्या लोकांनीदेखील कोणतीही संघटना बांधली नाही. तिथं अध्यक्ष, सचिव वगैरे प्रकार नाहीत. ते स्थानिक खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासन यांची सक्रिय मदत घेतात.

केवळ चार वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी २०१३मध्ये ‘सकाळ’नं साताऱ्याच्या नागरिकांना श्रमदान करून ‘अजिंक्‍यतारा’ किल्ल्याचा परिसर स्वच्छ करण्याचं आवाहन केलं होतं. मुंबईतल्या वर्सोवाप्रमाणेच तिथंही प्लॅस्टिकच्या बाटल्या, कचरा आणि घाण पसरली होती. पण उपक्रम सुरू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांतच ‘सकाळ’च्या आवाहनानुसार वीस हजार लोकांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान केलं आणि त्यानंतर ती परंपरा सुरू राहिली.  

या लेखात दिलेली दोन उदाहरणं ‘आपण काय करू शकतो’ याचा चांगला फॉर्म्युला सुचवतात. पहिली पायरी - आपल्याला जिथं परिवर्तन घडवून आणायचं आहे, तिथं कुणाचीही वाट न पाहता दोन-तीन मित्रांबरोबर कार्य सुरू करणं. दुसरी पायरी - स्थानिक वर्तमानपत्रं, सोशल मीडिया, प्रत्यक्ष गाठीभेटी हे मार्ग वापरून इतर अनेक सेवाभावी नागरिकांना अभियानाशी जोडण्यास प्रेरित करणं. त्यासाठी रस्त्यावर फलक लावण्याची गरज नाही, किंवा संघटना बांधून अध्यक्ष होण्याची आवश्‍यकता नाही. तिसरी पायरी - स्थानिक प्रशासनाला आपलं काम दाखवून सक्रिय सहकार्य प्रस्थापित करणं. शक्‍य झालं तर आमदार, खासदारांच्या विकासनिधीतून सामग्री उपलब्ध करणं. अंतिम पायरी - आपण हाती घेतलेलं काम यशाचा मोह आणि अपयशाची निराशा यांचा विचार न करता सातत्यानं चालू ठेवणं आणि शक्‍य होईल तेवढं इतर शहरांत आणि गावांत पसरवणं. स्थानिक परिस्थितीनुसार थोडाफार फरक करून हा फॉर्म्युला वापरला, तर खूप काही करता येईल. सकारात्मक कार्य करण्यासाठी केवळ चांगली इच्छा असणं पुरेसं नाही, चांगलं तंत्र पाहिजे आणि सातत्यही पाहिजे.

Web Title: sundeep waslekar's saptarang article