‘आपल्या मनात प्रश्‍न का येतात?’ (संदीप वासलेकर)

‘आपल्या मनात प्रश्‍न का येतात?’ (संदीप वासलेकर)

काही शतकांच्या गुलामगिरीमुळं आपण अजूनही प्रश्‍न विचारण्यापेक्षा उत्तर देणं जास्त महत्त्वाचं समजतो. शाळेत उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला शाबासकी मिळते, तर प्रश्‍न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा होते. उद्योग-व्यवसायात उत्तर देणाऱ्या कामगाराला बढती मिळते, तर प्रश्‍न विचारणाऱ्या कामगाराची प्रगती खुंटते. राजकारणात उत्तर देणारे नेते मंत्री होतात, तर प्रश्‍न विचारणारे साधे कार्यकर्तेच राहतात.

काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या लायन्स क्‍लबच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार व मी एकत्र होतो. तिथं सुमारे ६००-७०० उद्योजक, व्यावसायिक व विद्यार्थी होते. ‘आम्ही तिघांनी त्यांच्याशी संवाद साधावा,’ असा आग्रह त्यांनी केला.

निरनिराळ्या क्षेत्रांतले प्रतिनिधी विकास व तंत्रज्ञान यासंबंधी प्रश्‍न विचारत होते; तेवढ्यात एक आठ-१० वर्षांची चिमुकली मुलगी गर्दीतून वाट काढत पुढं आली. ती म्हणाली ः ‘‘मलाही तुम्हा तिघांना एक प्रश्‍न विचारायचा आहे.’’
आम्ही कुतूहलानं तिला व्यासपीठावर बोलावून प्रश्‍न विचारायला सांगितला. तिनं विचारलं ः ‘‘माझा प्रश्‍न हाच आहे, की आपल्या मनात प्रश्‍न का निर्माण होतात?’’ पवार व मी आम्हा तिघांनाही नेहमीच विविध लोक भेटत असतात व प्रश्‍न विचारत असतात; परंतु त्या संध्याकाळी त्या चिमुकलीचा तो प्रश्‍न ऐकून आम्ही तिघंही काही क्षण स्तंभित झालो.

तिचा प्रश्‍न सामाजिक-आर्थिक-राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. मला एकदा विमानप्रवासात एक परदेशी प्रवासी भेटला. त्याला एक गमतीदार छंद होता. तो खूप प्रवास करतो. विविध देशांतले सहप्रवासी त्याला भेटतात.
त्यांना तो एक प्रश्‍न विचारतो, ‘तुमचा देश सोडून उर्वरित जगाबद्दल तुमच्या मनात कोणता प्रश्‍न येतो?’
असाच एकदा रशियाच्या सहप्रवाशाला त्यानं हा प्रश्‍न विचारला, त्यावर त्या सहप्रवाशाने उलट प्रश्‍न करत विचारलं ः ‘देश म्हणजे काय? आमच्याकडं गेल्या १५-२० वर्षांत या शब्दाचा अर्थ बदलल्यानं आम्ही गोंधळून गेलो आहोत.’ अमेरिकेच्या सहप्रवाशानं विचारलं ः ‘उर्वरित जग म्हणजे काय? ‘अमेरिका हेच विश्व आहे,’ असं आम्ही मानतो’ चिनी प्रवाशानं विचारलं ः ‘प्रश्‍न मनात येणं म्हणजे काय? आमच्या मनात प्रश्‍नच येत नाही. सरकार सांगतं, ते प्रश्‍न आम्ही विचारतो.’
आपल्या भारतात आठ-१० वर्षांच्या मुलीपासून ते निवृत्त झालेल्या वरिष्ठ नागरिकांच्या मनात प्रश्‍न येत असतात म्हणूनच देशात चैतन्य आहे. आपल्याकडं गरिबीपासून भ्रष्टाचारापर्यंत आणि जातीयवादापासून ते दहशतवादापर्यंत अनेक समस्या आहेत; परंतु देशातल्या सगळ्या नागरिकांच्या मनात प्रश्‍न येऊ शकतील, अशी मुभा आपल्याला राज्यघटनेनं, सामाजिक चौकटीनं व राष्ट्रीय संस्कृतीनं दिली आहे आणि या कारणामुळं भारताचं भविष्य आशादायी आहे.

एकेकाळी आपल्या पूर्वजांच्या मनात प्रश्‍न आले म्हणून खगोलशास्त्रापासून बीजगणितापर्यंत व काव्यापासून योगाभ्यासापर्यंत अनेक क्षेत्रांत भारत विश्वगुरू झाला होता. जेव्हा मूठभर मोगल, ब्रिटिश व इतर परकीय शक्ती एवढ्या मोठ्या भारत देशावर राज्य कशा करू शकतात, हा प्रश्‍नच राजे-महाराजांच्या व समाजातल्या धुरिणांच्या मनात आला नाही, तेव्हा भारत गुलाम झाला. आपल्या मनात प्रश्‍न येणं जेव्हा राजकीय, सामाजिक अथवा इतर कोणत्याही कारणांनी अशक्‍य होईल, तेव्हा देशाचा आत्मा मृत होईल.

कधी कधी अती-उत्साही लोकांना असं वाटतं की, त्यांच्या आवडत्या राजकीय नेत्यांचं मूल्यमापन करणारे प्रश्‍नच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येऊ नयेत. कधी कधी अती-हुशार अधिकाऱ्यांना असं वाटतं की, त्यांच्या धोरणांसंबंधी प्रश्‍नच कुणाच्याही मनात येऊ नयेत. कधी कधी काही गुरूंवर अतिशय प्रेम करणाऱ्या अनुयायांना वाटतं की, त्यांच्या श्रद्धास्थानी असलेल्या महनीय व्यक्तींच्या मालमत्तेबद्दल लोकांच्या मनात प्रश्‍न येऊ नयेत. सुदैवानं इतरांच्या मनात प्रश्‍नच येऊ नयेत, असं वाटणारे महाभाग कमी आहेत म्हणून भारताच्या जिवात प्राण आहे.
जेव्हा एखाद्या समाजात मनात प्रश्‍न येण्याच्या प्रक्रियेवरच प्रतिबंध येतो, तेव्हा तिथं काय होतं, त्याची अनेक उदाहरणं इतिहासात वाचायला मिळतात.

काही शतकं युरोप खंडात धर्माचं राज्य होतं. त्या वेळी लोकांनी विचार काय करावा व कोणते प्रश्‍न त्यांच्या मनात यायला हवेत, हे धर्मगुरू ठरवत असत. विश्वाच्या उत्क्रांतीबद्दल, सूर्य, तारे, पृथ्वी यांच्या संबंधांबद्दल, प्रार्थना या कल्पनेबद्दल, जीवनातल्या अनेक मूलभूत निरीक्षणांबद्दल मनात प्रश्‍न येणं गुन्हा होता. जी व्यक्ती हा गुन्हा करत असे व यासंबंधी प्रश्‍न इतरांना प्रश्‍न विचारण्याचं धाडस करत असे, त्या व्यक्तीला चौकात आणून एका क्रुसावर चढवून जिवंत जाळण्यात येत असे.
हा क्रूर प्रकार युरोपमध्ये सुमारे ७०० वर्षं सुरू होता व त्यात किमान ५० हजार लोकांची तरी हत्या करण्यात आली. १५ व्या शतकानंतर जेव्हा त्याला विरोध होऊ लागला व गॅलिलिओ, कोपर्निकस, चार्ल्स डार्विन आदी विद्वान व्यक्तींनी मूलभूत प्रश्‍न विचारायला सुरवात केली, तेव्हा आधुनिक विज्ञानाचा उगम झाला.

सध्याच्या जगात उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान यांच्यासारखे असे अनेक देश आहेत, जिथं आठ-१० वर्षांच्या चिमुकलीपासून प्रौढ व वृद्धांपर्यंत कुणाच्याही मनात प्रश्‍नच येत नाहीत. येत्या काही वर्षांत अमेरिकेतही, अनेक मुद्द्यांवर प्रश्‍नच मनात येऊ नयेत, अशी परिस्थिती कदाचित जाणूनबुजून निर्माण करण्यात येईल. असं जर खरंच झालं, तर हळूहळू अमेरिकेच्या अस्ताला सुरवात होईल व अमेरिकेतले कल्पक लोक इतर देशात स्थलांतर करतील. सीरियामध्ये तेच झालं. आफ्रिका खंडातल्या अनेक देशांतही त्यापूर्वी असंच झालं. त्याचा परिणाम काय झाला, हे आपण पाहतच आहोत.
ज्या आठ-१० वर्षांच्या मुलीनं लायन्स क्‍लबच्या कार्यक्रमात आम्हाला प्रश्‍न विचारला, तिचं नाव अनुष्का होतं. ‘अनुष्का’ म्हणजे प्रकाशाचा किरण. सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्‍न येतील व ते प्रश्‍न निर्भयपणे मांडले जातील अशी सामाजिक व्यवस्था जर भारतातल्या शिक्षकांनी, पालकांनी व नेत्यांनी अबाधित ठेवली, तर देशभर ‘अनुष्का’ म्हणजे प्रकाशाचे किरण पसरतील. एक नवं चैतन्य पसरेल व त्यातूनच नव्या भारताची निर्मिती होईल.

काही शतकांच्या गुलामगिरीमुळं आपण अजूनही प्रश्‍न विचारण्यापेक्षा उत्तर देणं जास्त महत्त्वाचं समजतो. शाळेत उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला शाबासकी मिळते, तर प्रश्‍न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा होते. उद्योग-व्यवसायात उत्तर देणाऱ्या कामगाराला बढती मिळते, तर प्रश्‍न विचारणाऱ्या कामगाराची प्रगती खुंटते. राजकारणात उत्तर देणारे नेते मंत्री होतात, तर प्रश्‍न विचारणारे साधे कार्यकर्तेच राहतात.

हा देश घडला तो स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, पंडित नेहरू, भाभा, बाबा आमटे अशा अनेक महापुरुषांच्या मनात प्रश्‍न आले म्हणून. ज्यांनी प्रश्‍न विचारले त्यांना उत्तरंही शोधता आली. ज्यांनी केवळ उत्तरं देण्याचं कौशल्य प्राप्त केलं, त्यांना देशापुढचे प्रश्‍नच खरे समजले नाहीत.
लायन्स क्‍लबच्या कार्यक्रमात शेवटच्या पाच मिनिटांत चिमुरड्या अनुष्कानं ‘अनेक अनुष्कांची भारताला अपेक्षा करणं शक्‍य आहे,’ ही आशा दाखवली; त्यामुळं ती संध्याकाळ अनेक वर्षं माझ्या स्मरणात राहील, हे निश्‍चितच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com