ब्राह्मण समाजात पुरोगामी विचाराचा प्रसार वेगाने

सोमवार, 18 सप्टेंबर 2017

काय करता येईल ?... 
आंतरजातीय विवाह हा जातीयता गाडण्यासाठीचा रामबाण उपाय असल्याचे मानले जाते. हिंदुत्ववाद्यांच्या गळ्यातले ताईत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही त्याचा पुरस्कार केला आहे. दोन जातींमध्ये विवाह झाला तर केवळ दोन कुटुंबे एकत्र येत नाहीत, तर दोन जाती-दोन परंपरा-दोन संस्कृती एकत्र येतात. त्यांच्या मुलांना वडलांची जात मिळत असली तरी सांस्कृतिकरित्या ते दोन जातींचे होतात. हीच परंपरा पुढे गेली, की एक जात उरत नाही. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये कोणत्या जातींमध्ये किती आंतरजातीय विवाह झाले, याची आकडेवारी तपासली पाहिजे. ज्या जातींमध्ये हे प्रमाण वाढत असेल त्या जाती काळानुरूप, पुरोगामी विचारांशी सुसंगत वागत असल्याचे लक्षात येईल.

अतिवेगवान असा बदल आणि प्रगती हीच ज्याची खूण बनली आहे. अशा एकविसाव्या शतकात मध्ययुगीन सोवळ्या-ओवळ्याच्या खुळचट कल्पनांचे मेधा खोले यांनी तोडलेले तारे कोणालाही म्हणजे अगदी ब्राह्मण समाजालाही निषेधार्ह वाटले, हे खरे तर सांगायची गरज नाही, मात्र प्रश्‍न हा आहे की त्यानिमित्ताने समाजातील जातीयवाद नाहिसा होण्यासाठी समाजाकडून झडझडून प्रयत्न होणार आहेत का नाहीत? जातींच्या भिंती पाडण्यासाठी आवश्‍यक असलेल्या रोटी-बेटींच्या होऊ घातलेल्या व्यवहारांबाबत सर्वच समाजांनी सहृदयता दाखवावी आणि जातीय जाणिवा बोथट करत त्यांना आंतरजातीय विवाहांसाठी प्रवृत्त करावे... जातीयता नष्ट करण्यासाठीचा रामबाण उपाय असलेल्या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन द्यायला हवे... 

एक गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे खोले म्हणजे संपूर्ण ब्राह्मण समाज नव्हे. त्यामुळे त्यांच्या संपूर्णपणे कालबाह्य अन चुकीच्या कृतींबद्दल त्या सगळ्या समाजालाच जबाबदार धरता येणार नाही. इतिहासात प्रदीर्घ काळ हा समाज सनातनी, स्पृश्‍य-अस्पृश्‍यासारख्या कल्पना पाळणारा, शोषण करणारा असा होता, हे सर्वांना माहिती आहे, मात्र समाजसुधारणेच्या गेल्या दीडशे वर्षांच्या काळापासून ते आताच्या झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणाच्या काळापर्यंतच्या टप्प्यात या समाजातील जातीयतेची पुटे हळूहळू गळून पडत असलेली दिसून येतात. (खोलेंच्या रूपाने शिल्लक असलेले या पुटांचा एखादा पापुद्रा आपले प्रातिनिधीक अस्तित्त्व दाखवतोही.) समाजसुधारणेच्या टप्प्यातील अनेक सुधारकांमध्ये ब्राह्मण समाजातील नेते हिरीरीने आघाडीवर होते. त्यानंतर शहरीकरणामध्ये सार्वजनिक वाहतुकीपासून ते हॉटेलमधील खाण्यापर्यंत आणि खुल्या झालेल्या मंदिरप्रवेशापासून ते सहशिक्षणापर्यंतच्या बदलांमध्ये शिवाशिवीसारख्या चुकीच्या रूढी नकळत मागे पडत गेल्या.

ब्राह्मण समाजात पुरोगामी विचाराचा प्रसार तुलनेने वेगाने झाला. तसे होण्यामागे काही कारणे असल्याचे दिसून येते. एक तर पिढ्यानपिढ्या शिक्षणाची मिरास, परंपरा असलेला हा समाज. त्यामुळे या समाजाला पाश्‍चात्य शिक्षणातील समानता आणि खुलेपणाच्या तत्त्वांची शिकवण साहजिकच इतर समाजांपेक्षा आधी मिळाली. अर्थात समानता, खुलेपणा स्वीकारण्यामागे ब्राह्मण समाजाचा स्वार्थही होता. "साडेतीन टक्‍क्‍यांचा समाज' अशी हेटाळणी त्या समाजाची झाली तरी ती तो समाज सुधारण्याची इष्टापत्तीच ठरली. वाढणाऱ्या समाजाचे पोट परंपरेने चालत आलेल्या पौरोहित्याच्या कामातून भरणे अवघड असल्याचे लक्षात आल्यावर इतर समाज परंपरेने करीत असलेली कामेही तो करू लागला, मग अमुक मिठाईवाले, खाऊवाले तमुक, अमुक भेळवडा, तमुक पेंटर, अमुक लोणीविके यामागोमाग अगदी "सहस्रबुद्धे चिकन सेंटर'सारख्या पाट्याही झळकू लागल्या.

समाजाची लोकसंख्या कमी असल्याने समाजात मुलग्यांना चांगल्या मुली आणि मुलींना कर्तृत्ववान मुलगे मिळणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे बेटी व्यवहाराची शतकानुशतकांची कर्मठ बंधने आपोआप सैल होऊ लागली. त्यात समाजाच्या उदारमतवादाबरोबरच किंवा त्यापेक्षा काकणभर अधिकच गरज म्हणजे स्वार्थ होता. अर्थात स्वार्थासाठी का होईना, पण ब्राह्मण समाज इतरांपेक्षा अधिक लवकर आणि अधिक प्रमाणात जातीयवादापासून दूर होऊ लागला, सहिष्णु बनू लागला, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. (या समाजाबाबत इतक्‍या मोकळेपणाने असे लिहिता येते आहे आणि कोणाची विरोधी मते असली तरी त्यांच्याकडून ती चर्चेच्या चौकटीतच मांडली जाण्याची शक्‍यता अधिक वाटते, हाही या सहिष्णुतेचा पुरावा म्हणायला हवा.) आयटीसारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी परदेशात स्थायिक होणाऱ्यांमध्ये या समाजाच्या मुला-मुलींचे प्रमाणही लक्षणीय असल्याने आपोआपच जागतिक खुलेपणाची दृृष्टीही त्या समाजात येत गेल्याचे दिसते. 

... त्यामुळेच मेधा खोले यांच्या अपवादात्मक, व्यक्तिगत प्रतिक्रियेमुळे संपूर्ण ब्राह्मण समाजालाच पुन्हा मध्ययुगीन जातीयतेचा आरोप लावत त्या काळात कोंडणे चुकीचे वाटते. 

खोले प्रकरणामुळे जातीयतेची समस्या पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. अर्थात जेव्हाजेव्हा थोड्या-थोड्या काळाने काही अवचित घटना होतात, काही मुद्दाम घडवून आणल्या जातात तर काही प्रतिक्रियाही मुद्दाम दिल्या जातात तेव्हातेव्हा जातीय जाणिवा टोकदार होतात, एरवी मिळून-मिसळून राहणारे संघर्षाच्या पवित्र्यात उभे राहतात. त्यातून काही हितसंबंधितांना स्वतःची पोळी पिकणे आवश्‍यक वाटते. अशा वेळी वेगवेगळ्या समाजातल्या जातींनी विवेकाने जातीयतेला मूठमाती देण्यासाठी पुढे येण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. 

काय करता येईल ?... 
आंतरजातीय विवाह हा जातीयता गाडण्यासाठीचा रामबाण उपाय असल्याचे मानले जाते. हिंदुत्ववाद्यांच्या गळ्यातले ताईत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही त्याचा पुरस्कार केला आहे. दोन जातींमध्ये विवाह झाला तर केवळ दोन कुटुंबे एकत्र येत नाहीत, तर दोन जाती-दोन परंपरा-दोन संस्कृती एकत्र येतात. त्यांच्या मुलांना वडलांची जात मिळत असली तरी सांस्कृतिकरित्या ते दोन जातींचे होतात. हीच परंपरा पुढे गेली, की एक जात उरत नाही. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये कोणत्या जातींमध्ये किती आंतरजातीय विवाह झाले, याची आकडेवारी तपासली पाहिजे. ज्या जातींमध्ये हे प्रमाण वाढत असेल त्या जाती काळानुरूप, पुरोगामी विचारांशी सुसंगत वागत असल्याचे लक्षात येईल. अर्थात ज्या जातींमध्ये हे प्रमाण कमी आहे, त्या जातींवर उगाचच टीका करणे, त्यांना प्रतिगामित्वाची दूषणे देणे चुकीचे ठरेल. आतापर्यंतच्या रूढी, मनात विचार असूनही ते प्रत्यक्षात उतरवण्यात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी यांमुळे त्यांना आंतरजातीय विवाहांपासून दूर राहणे भाग पडले असेल. मात्र आता तरी जाणीवपूर्वक आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाहांना चालना देण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. कथित सवर्ण असलेल्या दोन जातींमधील विवाहांपासून सुरवात करून कथित सवर्ण आणि कथित मागास यांच्या विवाहांना प्रोत्साहन देणे योग्य ठरेल. 

गेल्या काही दशकांत सुरू झालेल्या आंतरजातीय विवाहांच्या या प्रक्रियेला आपण जाणीवपूर्वक गती देऊ शकलो, तर जातिपातींत विभागला गेलेला आणि त्यामुळे खरी प्रगती करण्यात अडथळे येत असलेला भारतवर्षांतला समाज एक होईल. परिणामी साने गुरूजींना पडलेले "बलसागर भारत होवो...'चे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पडलेले समानतेची तत्त्वे पाळणाऱ्या देशाचे स्वप्न सत्यात येईल.