‘तू क्‍या है?’ (सूरज उदगीरकर)

‘तू क्‍या है?’ (सूरज उदगीरकर)

प्रत्येक तरुण रोज एकदा तरी आरशात पाहताना स्वतःला एक यशस्वी व्यक्ती म्हणून कल्पना करून पाहतो. कोणी त्या आरशात स्वतःला एक यशस्वी अभिनेता म्हणून पाहतो, कोणी उद्योजक म्हणून, कोणी इंजिनिअर, तर कोणी डॉक्‍टर म्हणून पाहतो. ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्यांच्यासाठी हा आरसा म्हणजे एक प्रकारचा दरवाजा असतो, त्यांना स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा. ‘माझ्यातदेखील काहीतरी आहे,’ असा दिलासा देणारा. ‘पिचर्स’ हादेखील असाच एक आरसा आहे!...

प्र  त्येक तरुण रोज एकदा तरी आरशात पाहताना स्वतःला एक यशस्वी व्यक्ती म्हणून कल्पना करून पाहतो. कोणी त्या आरशात स्वतःला एक यशस्वी अभिनेता म्हणून पाहतो, कोणी उद्योजक म्हणून, कोणी इंजिनिअर, तर कोणी डॉक्‍टर म्हणून पाहतो. थोडक्‍यात प्रत्येकाची स्वतःसाठी काही स्वप्नं असतात, काही माईलस्टोन असतात. प्रत्येक जण त्या स्वप्नांच्या मागं धावत असतो; पण सर्वांची स्वप्नं पूर्ण होतातच असं नाही. काही जण मागं पडतात, काही थांबतात. काही जण मात्र इरेला पेटून स्वप्नं प्रत्यक्षात उतरवतात. मात्र, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्यांच्यासाठी हा आरसा म्हणजे एक प्रकारचा दरवाजा असतो, त्यांना स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा. ‘माझ्यातदेखील काहीतरी आहे! हो...हे माझ्या बाबतीतसुद्धा होऊ शकेल,’ असा दिलासा देणारा. आत्मविश्वास धगधगत ठेवणारा! ‘पिचर्स’ हादेखील असाच एक आरसा आहे! या आरशात आजचा तरुण स्वतःला सहज पाहू शकतो.
***

कॉर्पोरेट जगात फंडिंग मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांसमोर कल्पना सादर करण्याला आयडिया ‘पिच करणं’ म्हणतात. एखादी आयडिया ‘पिच’ करून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी राजी केलं, की ते त्या कल्पनेमध्ये- पर्यायानं व्यवसायात गुंतवणूक करतात.

ही कहाणी अशाच ‘पिचर्स’ची. एका नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर काम करणाऱ्या नवीन बन्सलच्या डोक्‍यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक ‘मिलिअन डॉलर आयडिया’ आहे; पण तो वाट पाहतोय, की कोणी तरी त्याला ‘फंडिंग’ देईल आणि मग तो कंपनी उभी करेल. कहाणी सुरू होते एका बारमध्ये. नोकरी करत रटाळ आयुष्य घालवणाऱ्या नवीनमध्ये त्याचा सीनिअर ‘तू क्‍या है? तू बिअर है...तेरा काम है बहना..और उसके लिए तुझे बॉटलसे बाहर निकलना होगा,’ असं म्हणत आत्मविश्वास फुंकतो...‘तू क्‍या है?’वर नवीनमधला युवा पेट घेतो आणि गोष्ट अक्षरशः ‘वाहू लागते...’

मात्र, ही गोष्ट केवळ नवीनची नाही. नवीनप्रमाणंच जितेंद्र माहेश्वरी ऊर्फ जितू, योगेंद्रकुमार पांडे ऊर्फ योगी आणि सौरभ मंडल हे त्याचे मित्रदेखील निरनिराळ्या ठिकाणी उत्तम कमाई देणाऱ्या नोकऱ्या करत आहेत; पण तेदेखील आयुष्यात समाधानी नाहीत. काहीतरी मोठं करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न आहे.
जितू एक ‘कोडर’ आहे. ‘एम्प्लॉयी ऑफ द इअर’ आहे. अत्यंत हुशार, अभ्यासू आणि मृदुभाषी. वडिलांना भिऊन असणारा, त्यांची प्रत्येक आज्ञा पाळणारा, प्रत्येक गोष्ट बायकोचं मत ध्यानात घेऊन करणारा... पण एक वेळ अशी येते, की जितूला ‘अजून दहा वर्षांनी आपण कुठं असू?’ हा प्रश्न पडतो आणि जितू वडिलांचं मत झुगारून नवीनसोबत सामील होतो.
योगी वयानं इतर तिघांपेक्षा मोठा. आपली कामं कोणाकडून कशी करून घ्यायची, ते चांगलं ठाऊक असणारा. टीम लीडर असणाऱ्या, स्वभावानं आक्रमक आणि साध्यासाध्या वाक्‍यातसुद्धा शिवीगाळ करणाऱ्या योगीचा नवीनवर स्वतःहून जास्त विश्वास आहे. त्यामुळं नवीननं कल्पना सांगण्याआधीच योगी त्याच्या सदैव सोबत आहे!
सरतेशेवटी सौरभ मंडल. अत्यंत भोळाभाबडा आणि काहीसा बावळट सौरभ नवीनच्या काहीच कामाचा नाही. कारण नवीन, योगी आणि जितू इंजिनिअर आहेत आणि सौरभ एमबीए. मात्र, ‘दिल चाहता है’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ वगैरे पाहून आपलेही असेच मित्र असावेत, अशा भाबड्या विश्वात रमणाऱ्या सौरभला काहीही करून नवीनसोबत काम करायचं आहे.

कसेबसे हे चौघं एकत्र येऊन काम सुरू करतात आणि सुरू होतो एक पैसा वसूल मनोरंजनाचा प्रवास. नवीनची स्टार्टअप सुरू करण्यासाठीची जिद्द आणि त्यासाठी केलेले त्याग, योगीचे जुगाड आणि बॉसगिरी, जितूची स्वतःची स्टार्टअप करण्याची इच्छा आणि त्यासाठी असणाऱ्या वडिलांच्या विरोधामुळं होणारी ओढाताण आणि सौरभचा भाबडा बावळटपणा या सर्वांतून कथा पुढं सरकते, तसतसे प्रेक्षकांना अनेक प्रेरणादायी आणि स्वतःची तुलना करता येतील, असे प्रसंग पाहायला मिळतात. फंडिंगसाठी या चौकडीला अनेक तडजोडी कराव्या लागतात. कधी जवळच्या माणसांपासून दूर जावं लागतं, कधी एकमेकांतच खटके उडतात... ‘पिचर्स’ना ‘फंडिंग’ मिळतं की नाही, का त्यांची स्वप्नंदेखील आरशातच अडकून राहतात, हे ही वेब सिरीज सांगते.
***

हल्ली अनेक प्रॉडक्‍शन हाऊसेस अनेक प्रकारच्या वेब सिरीज बनवत आहेत; पण त्यांतलं सर्वांत प्रसिद्ध नाव म्हणजे ‘द व्हायरल फिव्हर’ म्हणजेच ‘टीव्हीएफ.’ फराह खानच्या ‘ओम शांती ओम’चा सहायक दिग्दर्शक असणाऱ्या अरुणभकुमारनं सुरू केलेलं ‘टीव्हीएफ’ भारतातलं सर्वांत लोकप्रिय ऑनलाइन चॅनेल आहे. ‘टीव्हीएफ’च्या अनेक वेब सिरीज लोकप्रिय आहेत; पण तरुणांना सर्वांत जास्त आवडून गेलेल्या ‘पिचर्स’ने वेगळीच उंची गाठली आहे.

‘पिचर्स’ पोट दुखेपर्यंत हसवते, डोळ्याच्या कडा नकळत ओलावून टाकते, कधी नखं कुरतडायला भाग पाडते. एकूण पाच भाग असणारी ही सिरीज मनोरंजनाबरोबरच नवी उमेदही देऊन जाते. यशस्वी होण्यासाठी धडपड करणारा प्रत्येक तरुण स्वतःला नवीन बन्सलमध्ये पाहू शकतो. आज अनेकांना स्वप्नांच्या मागं धावताना अडचणींना तोंड द्यावं लागतं. अशा वेळी गरज असते ती प्रेरणेची, सकारात्मक संदेशाची. ‘पिचर्स’ अतिशय हलक्‍याफुलक्‍या, रंजक आणि गंमतिशीर पद्धतीनं प्रेरणा देऊन जाते.
अभिनय, दिग्दर्शन आणि कथा या तिन्ही बाबतींत ‘पिचर्स’ दणदणीत आहे. नवीन कस्तुरीया (नवीन बन्सल), जितेंद्रकुमार (जितू), अभय महाजन (सौरभ मंडल) आणि दस्तुरखुद्द अरुणभकुमार(योगी) अभिनयात कुठंही कच खात नाहीत. अभय हा तर ‘पिचर्स’चा आत्मा. बावळटपणा करणारा, मैत्रीसाठी काहीही करू पाहणारा भोळसट सौरभ अभयनं ताकदीनं साकारलाय. मराठमोळ्या अभयचा ‘गच्ची’ हा मराठी चित्रपट नुकताच येऊन गेलाय. बिस्वपती सरकारनं लिहिलेली ही भन्नाट गोष्ट अमित गोलानीनं उत्कृष्टरित्या दिग्दर्शित केलीय. सर्वांनी आणि खासकरून तरुणांनी आवर्जून पहावी अशी ही सिरीज आरसा बनून प्रत्येक प्रेक्षकाला एक प्रश्न नक्की विचारते ः ‘तू क्‍या है?’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com