खिळवून ठेवणारी गुंफण (स्वागत पाटणकर)

खिळवून ठेवणारी गुंफण (स्वागत पाटणकर)

पूर्वी मनोरंजन म्हटलं, की प्रादेशिक, बॉलिवूड किंवा हॉलिवूड हे असे काही ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध असायचे; पण गेल्या काही वर्षांत विशेषतः नेटफ्लिक्‍स, ॲमेझॉन प्राइम वगैरे आल्यापासून आपल्या प्रेक्षकांच्या ‘कक्षा’ रुंदावल्या आहेत. ऑस्ट्रेलियापासून कोलंबियापर्यंत अगदी जगभरातल्या कुठल्याही कलाकृती आता आपल्याला बघण्यासाठी सहज उपलब्ध होतात. वेगळ्या विषयावरच्या कथा, फ्रेश चेहरे याचबरोबर आपल्याला त्या देशाचा भूगोल, तिथलं राहणीमान, राजकीय स्थिती, लोकांची प्रवृत्ती, तिकडची संस्कृती समजते. एक प्रकारे वेगळा अनुभवच असतो आपल्यासाठी. असाच एक वेगळा अनुभव देणारी; ज्या देशाबद्दल आपण बातम्यांतूनच वाचलं असेल किंवा फार फार तर नकाशावरच पाहिलं असेल, अशा इस्राईलमध्ये घडणारी एक थरारक गोष्ट आपल्यासमोर मांडणारी मालिका म्हणजे  ‘फाउदा’ (FAUDA).

लेखक लियोर राझ आणि अवी इसचारोफ यांनी साधारण २०१०मध्ये लिहायला घेतलेली ही मालिका, तब्बल पाच वर्षांनी २०१५ मध्ये इस्रायली लोकांसमोर आली. रिॲलिटी - गेम्स शोज बघण्यामध्ये जास्त रस असणाऱ्या इस्राईलमध्ये सुरवातीला ‘फाउदा’ला थंड प्रतिसाद होता; पण काहीशा संथ सुरवातीनंतर मात्र संपूर्ण इस्राईलमध्ये धुमाकूळ घालत सर्वसामान्य प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सगळ्यांमध्ये ‘फाउदा’ लोकप्रिय झाली. इस्रायली टेलिव्हिजनवरची ती आत्तापर्यंतची सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरली. उत्तम कलाकृतीना जगासमोर आणणाऱ्या नेटफ्लिक्‍सनं या मालिकेचं प्रक्षेपण सुरू केलं आणि त्याच वर्षी बारा एपिसोड्‌स असलेला ‘फाउदा’चा पहिला सीझन न्यूयॉर्क टाइम्सकडून ‘सर्वोत्तम इंटरनॅशनल मालिका’ म्हणून गौरवण्यात आला. मालिकेला मिळत असलेला प्रतिसाद बघून नेटफ्लिक्‍सनं ‘फाउदा’चा दुसरा सीझन आणायची घोषणा केली आणि एक वर्षानंतर ‘फाउदा सीझन-२’ गेल्या महिन्यात नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित झाला. वाढलेल्या अपेक्षांना पूर्ण करत महिन्याभरात तो ‘ट्रेंडिंग लिस्ट’मध्ये दाखल झाला.

फाउदा म्हणजेच अरेबिक भाषेत ‘गुंता- गोंधळ.’ अगदी नावाप्रमाणंच कथेमध्ये प्रचंड गुंतागुंत आहे. कथेबद्दल जास्त सविस्तर सांगता येणार नाही आणि सांगणं उचितही ठरणार नाही. चाकूहल्ला / बॉम्बहल्ल्याबद्दल मोबाईलवर येणाऱ्या वॉर्निंग्ज, रस्त्यावर चालताना दिसणारा जोरात जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग, बॉम्बहल्ला आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबद्दलच्या घोषणा अशा गोष्टी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असणारं इस्राईल आणि अमेरिका, ब्रिटनसारख्या अनेक देशांकडून अतिरेकी संघटना म्हणून घोषित झालेली हमस (इस्लामिक रसिस्टन्स मूव्हमेंट) संघटना यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका जन्म घेते. मालिकेचा नायक ‘डॉरोन’ हा इस्रायली स्पेशल फोर्समधून निवृत्त झाला आहे, निवृत्त होण्याआधी तो आणि त्याच्या टीमनं अबू अहमद या हमसच्या प्रमुखाला मारलेलं असतं; परंतु १८ महिन्यांनंतर अबू अहमद जिवंत असल्याची माहिती स्पेशल फोर्स आणि डॉरोनला समजते. आपलं पूर्वीच मिशन पूर्ण करण्यासाठी बायकोच्या मनाविरुद्ध जाऊन तो पुन्हा स्पेशल फोर्स जॉइन करतो आणि सुरू होते ‘फाउदा सीझन- १’ची गोष्ट, अबू अहमदला पकडताना काय काय प्लॅन्स केले जातात; काही यशस्वी होतात- काही काही फसतात- त्यातून नवीन अडचणी निर्माण होतात याचं एकदम रिॲलिस्टिक दर्शन आपल्याला घडतं.

या मालिकेची सर्वांत मोठी शक्ती म्हणजे गोष्ट आणि सादरीकरणामधला सच्चेपणा. नाट्यमय वळणं आहेत, सस्पेन्स आहे, ॲक्‍शन आहे; पण त्यात कुठंही फिल्मीपणा वाटत नाही...सगळं एकदम रिअल वाटतं. कुठंही कृत्रिम सुरू आहे असं जाणवत नाही आणि त्यामुळंच आपल्यालासुद्धा ही मालिका बघताना इस्राईलमध्ये बसून ते टेन्शन अनुभवल्यासारखं वाटतं.     

‘अतिरेकी बनलेले पॅलेस्टिनियन नागरिक’ विरुद्ध ’इस्रायली अंडरकव्हर’... नाण्याच्या या दोन्ही बाजूंना लेखकांनी पूर्णपणे न्याय दिला आहे. हिरो म्हणजे चांगला आणि व्हिलन म्हणजे सगळं वाईट हा टिपिकल मामला इथं नाही. समाजासाठी हिरो असणारे स्पेशल फोर्सचे शिलेदार वेळप्रसंगी कसे नियम तोडून वाईटात वाईट, अमानवी वागू शकतात किंवा पॅलेस्टिनिअन अतिरेकी- जे व्हिलन असूनही त्यांच्या देशाबद्दल- कुटुंबाबद्दल प्रेमात बुडालेले आहेत, भावनिक आहेत हे दाखवल्यामुळं मालिका अजूनच प्रभावी बनते. तसे हे स्पेशल फोर्स आणि अतिरेकी दोघेही एकमेकांना गुन्हेगार समजतात आणि स्वतःला दुसऱ्याच्या गुन्ह्यांमुळं झालेला बळी. हीच गैरसमजूत पिढ्यानपिढ्या वाढत जाते, पर्यायानं संघर्ष नेहमीच वाढत जातो आणि एकदम टोकाला गेलेला असतो. दोन्ही बाजूंचा हा विरोधाभास दाखवून ‘फाउदा’ सत्य परिथिती एकदम परिणामकारकपणे आपल्यासमोर ठेवते.  

प्रेक्षकांना हा सगळा खरा अनुभव मिळण्याचं प्रमुख कारण म्हणजे लियोर राझ आणि अवि इसचारोफ यांनी केलेला एकदम वास्तवदर्शी लिखाण. लियोर राझच्या हा स्वतः इस्रायली स्पेशल फोर्समध्ये काम करत होता. त्याला स्वतःला आलेल्या अनुभवांवर त्यानं ही गोष्ट लिहायला घेतली, पत्रकार अवी त्याच्या जोडीला आला आणि त्यातूनच ‘फाऊदा’च्या गोष्टीचा जन्म झाला. लियोर त्याच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये हेच सांगतो, की त्याला सैन्यात आलेले अनुभव आई-बाबा, मित्रमंडळी यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी म्हणून गोष्ट लिहायला घेतली आणि बघताबघता त्याची मोठी कलाकृती बनली. कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता स्वानुभवावर लिखाण केलं असल्यामुळे मालिकेचा पाया एकदम भक्कम सच्चेपणावर तयार झाला आणि अर्थातच ह्याचा फायदा मालिका आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांना झालाय. 

लियोर आणि अवीच्या लेखनाला दिग्दर्शक असफ आणि रोतेम शामीर यांनी पूर्णपणे न्याय दिलाय. मालिकेवरची पकड कुठंही ढिली होणार नाही याची पूर्ण त्यांनी खबरदारी घेतलीय. पहिल्या एपिसोडच्या पहिल्या मिनिटात प्रेक्षक गोष्टीमध्ये गुंतला जातो आणि एपिसोडगणिक गुंता वाढतच जातो. प्रत्येक एपिसोड हा कुठल्या तरी गूढ, रहस्यमय वळणावर थांबतो आणि प्रेक्षकाला पुढचा एपिसोड बघायला भाग पाडतो. अतिशय चाणाक्ष बुद्धीनं केलेल्या दिग्दर्शनाला साथ मिळते ती सिनेमॅटोग्राफीची. अचूक लोकेशन्स, चित्रीकरण यांमुळे गोष्ट एकदम जिवंतपणे आपल्यासमोर येते आणि प्रत्यक्ष इस्राईलमध्येच असलेला फील आपल्याला येतो. संपूर्ण टीमनं ही मालिका रिॲलिस्टिक होण्यासाठी अगदी लहानसहान गोष्टींवर; पण लक्षपूर्वक काम केलंय. त्याचंच एक छोटं उदाहरण म्हणजे शक्‍यतो अशा ॲक्‍शन थ्रिलर गोष्टींमध्ये हिरो कसा स्पेशल आहे, हे प्रेक्षकांवर ठसवण्यासाठी एका स्पेशल ॲक्‍शन सीनमधून हिरोचं आपल्यासमोर ‘इंट्रोडक्‍शन’ होतं; परंतु इथं मात्र डोरोन म्हणजे मालिकेचा हिरो झाडाला पाणी घालत, पोरांना खेळवत आपल्यासमोर पहिल्यांदा एंट्री घेतो... अशाच प्रसंगांतून वास्तवाचं चित्रण दिसतं आणि ते मनोरंजक ठरतं. तेवढंच कौतुक सर्व कलाकारांचं. हमस अतिरेकी, त्यांचे कुटुंबीय, स्पेशल फोर्स टीम अशा सगळ्या व्यक्तिरेखांमधले कलाकार लेखकाला नक्की काय सांगायचंय हे बरोबर सादर करून आपापली पात्रं तेवढ्याच ताकदीनं आपल्यासमोर आणतात. 

प्रेक्षकांना आपल्या देशाच्या आणि मनातल्या विचारांच्या सीमा ओलांडून त्या पलीकडं घडत असलेल्या खऱ्या गोष्टी बघण्याची संधी ‘फाउदा’ आपल्याला देते. ‘‘आता आम्हाला पॅलेस्टिनियन सर्वसामान्य नागरिकांबद्दल सहानुभूती वाटते, त्यांचं दुःख आम्ही अजून चांगल्या प्रकारे समजू शकतो....’’ इतक्‍या वर्षांनंतर इस्रायली नागरिकांकडून अशी प्रतिक्रिया ऐकून या मालिकेचं यश किती मोठं आहे, याचा अंदाज आपल्याला येतो...

आपणसुद्धा जगाच्या या भागात घडणारा, आपल्यासाठी असलेल्या नवीन चेहऱ्याचा, एकदम फ्रेश वेगवान आणि वेगळी मांडणी असलेला उत्कंठावर्धक गुंता नक्कीच बघायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com