ganesh festival
ganesh festival

"टिळक का रंगारी?' : भेदाची ही विषवल्ली उखडून टाका

गेली दोन तीन वर्षे गणेशोत्सव जवळ आला कि सुरू होणारी चर्चा म्हणजे गणेशोत्सवाचे आद्य जनक भाऊ रंगारी कि लोकमान्य टिळक ?

फक्त सार्वजनिक गणेशोत्सव हा मुद्दा घेऊन या विषयावर विचार केला तर भाऊ रंगारी यांचे योगदान नाकारण्यात अर्थ नाही. अर्थात त्यांचे योगदान कोणी नाकारतही नाही; पण तरीही काही संघटना आणि विशिष्ट विचारसरणीकडून या विषयाला पुढे आणण्यामागे अनेक कंगोरे आहेत. गेल्या काही वर्षात पुण्यात घडलेल्या विविध घटना पाहिल्या तर त्यामागील सुसूत्रता आपल्या लक्षात येईल. त्या घटना म्हणजे दादोजी कोंडदेवांचा पुतळा, कृष्णाजी कुलकर्णी, बाबासाहेब पुरंदरे, रा.ग. गडकरी आणि आता टिळक रंगारी विवाद. ( पुढील क्रमांक कोणाचा ?)

या सगळ्या घटना एका विशिष्ट समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन खटले चालविल्यासारखे वाटावे, अशा स्वरूपाच्या आहेत. या घटना पाहून कॅथोलिक चर्चेने अधिकृत कागदपत्रात संपूर्ण ज्यु समाजाला येशु ख्रिस्ताचे मारेकरी ज्या प्रकारे ठरवले त्या घटनांशी साम्य वाटते. हे सगळे करताना तर्क आणि सद्‌सद्विवेकबुद्धी यांच्याशी मात्र संबंधितांची पूर्ण फारकत झालेली आहे. उदाहरण लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या बद्दल उभा करण्यात आलेला वादविवाद पाहिला; तरी सगळे आपल्या सहज लक्षात येते.

तत्कालीन कागदपत्रे पाहिली असता भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्यांचे संबंध अत्यंत उत्तम होते. राष्ट्रवाद आणि देशभक्ती त्यांच्या नसानसांत ठासून भरलेली होती. त्यामुळे तरी त्या काळातील कुठल्याही नेत्यांचे आपापसात किरकोळ वाद असतील तरी त्यामुळे कोणत्याही प्रकारे स्वातंत्र्य चळवळीला धक्का पोहचेल असे कृत्य न करण्याचे भान या सगळ्या मंडळींना होते. अशा थोर व्यक्तींना शंभर वर्षानंतर एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे करणाऱ्यांचे व कालपर्यंत गणपतीच न मानणाऱ्यांचे हेतू निश्‍चितच संशयास्पद आहेत.

या विषयावर पुढे जाण्याआधी "कधीकधी कृती महत्त्वाची नसून ती कृती कोण आणि कुठल्या हेतूने करतं आहे त्याला अत्यंत महत्व असते,' हे अत्यंत साधे सूत्र लक्षात ठेवायचे आहे.

एखादी वस्तू खायला परवडत नाही म्हणून त्या वस्तू सरकारी कायदे मोडून जगात अनेक ठिकाणी अनेक लोक जरूर खातात परंतु "महात्मा गांधी' नावाचा एक समाजमान्य व्यक्ती फक्त चिमूटभर मीठ उचलतो आणि ते चिमुटभर मीठ ब्रिटिश साम्राज्याला हादरा देते. भारतात अस्पृश्‍यता पाळली जाण्याच्या काळात अस्पृश्‍य समाजातील कुणीतरी विहिरी, तळ्यातील पाणी नक्कीच प्यायले असेल पण बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव एक उदात्त विचार मनात ठेवून महाडच्या तळ्यातील घोटभर पाणी पितो तेव्हा ते पाणी "चवदार" म्हणून आजही ओळखले जाते.

आता यानुसारच गणेशोत्सव साजरा करणे ही क्रांतिकारक घटना नाही. त्या उत्सवाच्या माध्यमातून जनसंग्रह करुन; त्या जनसंग्रहाचा वापर राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्य चळवळीच्या प्रसारासाठी करण्याचा विचार क्रांतिकारक होता हे लक्षात घेतले पाहिजे.

तत्कालीन घटना बघता लोकमान्य टिळक हे कन्याकुमारी ते कराचीपर्यंत भारतीय जनतेचे एकमुखी लोकप्रिय नेतृत्व होते यात शंका नाही. त्यांनी केसरीमध्ये लिहिलेला एक अग्रलेख इंग्रज सरकारला इंग्लंड पर्यंत हादरे देत असे. त्यांच्या प्रत्येक कृती वर इंग्रज सरकार बारकाईने नजर ठेऊन होते. अर्थातच त्यामागे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे लोकमान्य करत असलेले नेतृत्व, हेच एकमेव कारण होते.

अशा परिस्थिती मध्ये लोकमान्य टिळकांसारखे वजनदार सामाजिक व राजकीय नेतृत्व "लोकांची एकी व्हावी, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी,' हा सद्‌हेतू मनाशी बाळगून सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करते, तेव्हा आपोआपच त्यांचे अनुयायी आणि सामान्य लोक प्रचंड संख्येने त्यामध्ये हिरीरीने सहभागी झाले. टिळकांची प्रेरणा व मार्गदर्शनामुळे मुंबई व पुण्यात लोकांनी बहुसंख्येने पुढाकार घेत गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली म्हणून त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हटले जाते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

पण प्रत्येक बाबतीत व्यक्तीचे आडनाव आणि जात शोधणाऱ्यांना लोकमान्य टिळकांचे वावडे असणार, यात नवल ते काय? भाऊसाहेब रंगारी व लोकमान्य टिळक यांच्याबद्दल प्रत्येक मंडळातील कार्यकर्त्यांना आदर आहे आणि राहिल. परंतु हा विषय इतक्‍या सहजपणे सुटला तरी या विषयात काड्या घालणारी मंडळी असाच आणखी निरर्थक वाद निर्माण करतील यात शंका नाही. चर्चा आणि वादविवाद करणे, हे निकोप समाजव्यवस्थेचे लक्षण आहे. जगात कित्येक देशांत विविध गोष्टींवर चर्चा आणि वादविवाद सुरू असतात. पण चर्चा आणि वादविवाद यामधून सकारात्मक आणि समाजाला उपयुक्त अशा गोष्टी बाहेर पडाव्यात, याचे भान मात्र असणे अत्यावश्‍यक आहे.

गेल्या काही वर्षात आपल्या महाराष्ट्रात घडणाऱ्या विविध घटना आणि वादविवाद पाहता आपला समाज नक्की कोणत्या दिशेने मार्गक्रमण आहे याची भीती वाटते. मुठभर असलेल्या समाजाला लक्ष्य करुन कधी पुतळा, कधी पुस्तक, कधी नाटक तर कधी कोण आद्य किंवा शेवटचा यावरुन चिखलफेक करणे, इथपासून शंभर वर्षांपूर्वीच्या नाटकातील सोयीस्कर वाक्‍ये उचलून अमुक तमुकचा पुतळा फोडणाऱ्याला पाच लाख रूपये बक्षीस जाहीर करण्यापर्यंत एकच अहमहिका लागली आहे.

या सगळ्या चर्चा आणि वादविवाद इतक्‍या हास्यापद दिशेने चालल्या आहेत कि उद्या कुणीतरी सोम्यागोम्या उठून गांधीजींच्या आधी माझ्या आजोबांनी इंग्रजांच पोतं भरून मीठ खाल्ले आहे, म्हणुन त्यांची मीठाच्या सत्याग्रहाचे जनक म्हणून नोंद करा, असा वादविवाद उभा करेल काय अशीही शंका आता वाटते. आपल्या या भावनिक मुर्खपणाचा वापर खुबीने करत आजवर कित्येक संघटना आणि नेते मोठे झाले. त्यांच्या राजकीय साठमारीत कित्येक कार्यकर्ते आणि सामान्य बळी गेले आणि यापुढेही जातील. याचे कारण म्हणजे विवेकबुद्धी आणि तर्क यांच्याशी आपली झालेली फारकत. आपल्या तर्क आणि बुद्धीला नेमके झाले आहे तरी काय? अस्मिता, जातीयता व भावनांच्या कैफात आपण कुठे वहावत चाललो आहे ? त्या कैफात आपण नेमके कुठल्या विचारसरणीला सहन करत आहोत ?

आपण असेच गप्प राहिलो तर जात व अस्मितेची साखरपेरणी करत आपापसात भेदाभेद करायला शिकवणारी ही विषवल्ली एक दिवस आपला संपुर्ण समाज व आपली मनं पोखरल्याशिवाय राहणार नाही. आज अमुक समाजाला आरोपी ठरवणारे स्वयंघोषित नेते उद्या त्यांच्या फायद्यासाठी दुसऱ्यर्ला आरोपी ठरवण्यास मागेपुढे बघणार नाहीत. हे सगळं थांबवण्यासाठी आपणच पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जातीयता, वर्ण, वेष, खानपान यावरून केल्या जाणाऱ्या राजकारणाला, भेदभावाला व हिंसक घटनांना आमचा पाठिंबा नाही हे एकमुखाने सांगण्याची आवश्‍यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com