दो आंखें... हजारो हाथ!

दो आंखें... हजारो हाथ!
दो आंखें... हजारो हाथ!

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर सिमी गरेवाल यांनी घेतलेल्या मुलाखतींचा शो खूप गाजला होता. राजकीय नेते, उद्योगपती, अभिनेते, खेळाडू अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांशी संवाद साधणारा हा शो चर्चेत राहिला, तो या सेलिब्रेटींच्या व्यक्तिमत्वाचे दडलेले कप्पे-कंगोरे अलगद उलगडण्याच्या सिमी गरेवाल यांच्या खास शैलीमुळे... याच "शो'मधली एक क्‍लिप क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने परवा म्हणजे सोमवारी सकाळी ट्विटसोबत शेअर केली. त्यानंतर अनेकांनी ती रिट्‌विट केली, तर काहींनी स्वतंत्रपणे पोस्ट केली. व्हॉटसऍपवरही ती फॉरवर्ड झाली. ही क्‍लिप होती जयललिता यांच्या मुलाखतीची...

दोन एपिसोडच्या या मुलाखतीतून अभिनेत्री वा मुरब्बी राजकारणी महिलेपेक्षाही जयललिता नावाच्या एका संयमी अन्‌ संवेदनशील "स्त्री'च्या मनाचा पट अलवार उलगडला होता. विशेष म्हणजे, जेमतेम दोन मिनिटांच्या या क्‍लिपमधील एका प्रश्‍नाच्या उत्तरात जयललितांनी व्ही. शांताराम यांच्या "दो आंखें बारह हाथ'मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम' ही प्रार्थना हेच आपलं सर्वात आवडतं गाणं असल्याचं सांगितलं होतं. हा सिनेमा "पल्लंदू वझगा' नावाने तमिळीतही तयार झाला. "दो आंखें...'मध्ये व्ही. शांतारामांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्यात "एमजेआर' अर्थात एम. जे. रामचंद्रन यांनी उभी केली होती. पण, जयललितांना आवडणारं गाणं होतं हिंदीतलं, वसंत देसाईंनी संगीत दिलेलं नि लता मंगेशकरांनी गायलेलं..! एरवी प्रचंड अहंमन्य अशी प्रतिमा तयार झालेल्या जयललितांचं एक "स्त्री' म्हणून अन्‌ त्यापेक्षाही सहृदयी माणूस म्हणून जगापासून दडलेलं व्यक्तिमत्व अशा खूप कमी प्रसंगांतून पुढं आलं...

नोटाबंदी अन्‌ त्यातून निर्माण झालेल्या राजकीय, सामाजिक अन्‌ आर्थिक अस्थिरतेचा आठही दिशांनी हेलकावणारा लंबक संसद सुरू झाल्याने गेल्या आठवडाभरापासून दिल्लीवर स्थिरावला होता. टीका-टिप्पणी, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप अन्‌ एकूणच या विषयावरील चर्वितचर्वणाने माध्यमे नि समाजमाध्यमे पुरती व्यापली होती. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक घटनाही तिथं फारशा टिकल्या नाहीत. पण, जयललितांना रविवारी सायंकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून चर्चेचा लंबक नि माध्यमांचा केंद्रबिंदू चेन्नईकडं सरकला. जयललितांच्या प्रकृतीची माहिती, अपोलो हॉस्पिटलच्या मेडिकल बुलेटिन्सबरोबरच काळजी व्यक्त करणाऱ्या नि प्रार्थना करणाऱ्या पोस्ट ट्‌विटर, फेसबुक, व्हाटस्‌ अँपवरुन वेगाने शेअर होऊ लागल्या. चेन्नईतल्या रस्त्यांवरचं वातावरण अन्‌ तमिळनाडूप्रमाणंच देश-विदेशातही अम्मांच्या स्थितीबाबत सुरू झालेली चर्चा नि त्यातून प्रसवू लागलेल्या अफवांनी सोशल मीडिया ढवळून निघाला. ट्‌विटरवर रविवारच्या रात्रीपासूनच #jayalalithaa, #JayaHealth, #PrayersforAmma हे हॅशटॅग ट्रेन्डिंग करीत होते. जयललितांच्या दीर्घायुरोग्यासाठी जगभरातून ट्‌विट होऊ लागले. त्यामुळं सोमवार दुपारपर्यंत #PrayersforAmma हा टॅग नॅशनल ट्रेंडमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला. एकीकडे कुणा एकट्याकडं नियंत्रण नसलेला सोशल मीडिया जयललितांची प्रकृती आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी संयमी प्रतिक्रिया नोंदवत असताना दुसरीकडे मात्र थेट व्यक्ती वा संस्थांकडून नियंत्रण केल्या जाणाऱ्या काही वृत्तवाहिन्यांनी अफवांच्या बाजारात आपलं दुकान चालवण्याचाही प्रयत्न केला. सायंकाळी दक्षिणेतल्या काही वृत्तवाहिन्यांनी कसलाही अधिकृत दुजोरा नसताना अम्मांच्या निधनाची बातमी चालवली अन्‌ सोशल मीडिया त्यावरही तुटून पडला. संबंधित चॅनलच्या नावामागेच RIP लावलेला हॅशटॅगही काही काळ जोरात चालला...

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जयललिता यांचं निधन झाल्याची "बातमी' आली, त्या क्षणापासून ते त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईपर्यंत अन्‌ नंतरही उशिरापर्यंत फेसबुक, ट्‌विटरच्या वॉल त्यांच्या आठवणींमध्ये जणू भिजत राहिल्या. ट्‌विटरवर #RIPAmma, #RIPJayalalitha हे टॅग वापरुन नेटिझन्सनी अम्मांना श्रद्धांजली वाहिली. पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेल्या ठिकाणाची माहिती देणारे ट्विट  #RajajiHall या टॅगने केले जात होते. केवळ राजकारण आणि सिनेसृष्टीतीलच नव्हे, तर समाजाच्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी अम्मांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून उद्योगपती रतन टाटांपर्यंत अनेक मान्यवर होते. पण, देशातील नेटिझन्सबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या भारतीयांनी सोशल मीडियात व्यक्त केलेल्या भावना खरं तर जास्त मोलाच्या ठराव्या. जयललितांवर निधनामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या, त्यांच्या निस्सीम चाहत्यांच्या भावनांचा बांध फुटणे स्वाभाविकच होते. मात्र, ज्यांचा कधी जयललितांशी दुरान्वयानेही संबंध आला नसेल, अशा असंख्य सामान्य लोकांनी व्यक्त केलेली हळहळ एका नेत्याच्या सार्वजनिक आयुष्यातली "खरी कमाई' मानली पाहिजे...

वास्तविक काही वर्षांपूर्वीपर्यंत जयललितांना भारतीय राजकारणातल्या एकछत्री, एकतंत्री, एककल्ली अन्‌ काहीशा हुकूमशाही मनोवृत्तीच्या कारभाराचं प्रतीक मानलं जायचं. पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मंत्री त्यांच्यापुढं नतमस्तक व्हायचे. कारण नेतृत्वाच्या अफाट ताकदीमुळं त्यांच्या नजरेत एकप्रकारची जरब आणली होती. त्या डोळ्यांना डोळे भिडवण्याची ताकद भल्याभल्यांमध्ये नसायची. राजकीय विरोधकांचा वेळीच "बंदोबस्त'करण्यापासून ते अगदी करुणानिधींना मध्यरात्री अटक करण्यापर्यंत अनेक धाडसं त्यांनी केली. त्यातून त्यांची निरंकुश सत्ता निर्माण झाली नि त्यांच्याकडील प्रचंड संपत्तीच्या सुरस कहाण्याही बाहेर येऊ लागल्या. साड्यांची संख्या, चपलांचे जोड यांपासून ते दागदागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा होऊ लागली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, काही सिद्धही झाले. बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात त्यांना कारावासही झाला. पण, व्यक्तिगत अन्‌ राजकीय आयुष्यात अनेक खडतर प्रसंग, चढउतार अनुभवलेल्या जयललितांनी निर्दोष सिद्ध झाल्यावर पुन्हा उभारी घेतली नि तमिळनाडूची सत्ता एकहाती मिळवली. पण, आता त्यांच्यात बराच बदल झाल्याचं दिसत होतं. भ्रष्टाचाराचे आरोप, त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन झालेला पायउतार, त्यानंतरचा काही दिवसांचा कारावास आणि राजकीय जीवनातल्या एकूणच पडझडीमुळे या दोन वर्षांत जयललिता नावाच्या "पॉलिटिकल क्वीन'चा जणू कोट्यवधी तमिळींची "अम्मा' म्हणून पुनर्जन्म झाला होता. 2016 च्या विधानसभा निवडणुकीनंतर केवळ तमिळनाडूलाच नव्हे, तर देशालाही याचा प्रत्यय येऊ लागला. 2001 मध्ये दोन लाख संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यापासून अनेक कठोर निर्णय घेत लोकांच्या रोषाला कारणीभूत ठरलेल्या जयललिता गोरगरीबांना मोफत धान्य देऊन अन्‌ राज्यभरात स्वस्त अन्न पुरवणारी कॅन्टीन सुरू करुन याच लोकांसाठी ललामभूत ठरल्या. तमिळनाडूतल्या महिला बचत गटांना या कॅन्टीनच्या रुपाने नवसंजीवनी मिळाली. लाखो रिकाम्या हातांना काम नि तळहातावर कष्टाचे दाम मिळू लागले...

कोणत्याही गोष्टीवर एकांगी प्रतिक्रिया न देता माध्यमांनी संयत भूमिका घेतली पाहिजे, असं आपण नेहमी म्हणतो. पण, व्यक्त होण्याची घाई झालेली समाज माध्यमे तर याबाबतीत बदनामच झाली आहेत. जयललितांना उपचारासाठी दाखल केल्यापासून ते त्यांचे निधन आणि अंत्यसंस्कारापर्यंत प्रत्येक क्षणी व्यक्त होताना समाज माध्यमांनी जे तारतम्य दाखवलं, ते उल्लेखनीय नक्कीच आहे. सोशल मीडिया मुक्त असला, तरी बऱ्याच वेळा तो मोकाट होतो. जयललितांविषयी बदनामीकारक वा नकारात्मक भाष्य करणाऱ्या पोस्ट टाळल्या गेल्या, हे जास्त महत्वाचं. अलीकडच्या काळात जयललितांची बदललेली प्रतिमा, हे त्यामागचं खरं कारण आहे. राजकारणी लोक "जाण'तेपणानं वागू लागले की लोकही समाज"भान' सोडत नाहीत, याचंच हे उदाहरण...

तसं पाहिलं तर आपल्याकडेच नव्हे, तर जगभरात अनेक उच्चपदस्थ राजकीय नेत्यांवर हुकूमशाही वृत्ती, सत्तेचा अनिर्बंध वापर आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले, होत राहिले. पण, सगळ्याच नेत्यांच्या वाट्याला हयात असताना, अखेरच्या क्षणी अन्‌ मृत्यूपश्‍चातही लोकांचं एवढं अपार प्रेम येतंच असं नाही. सिमी गरेवाल यांनी सतरा वर्षांपूर्वी घेतलेली "ती' मुलाखत खरं तर कठोर मनाच्या, पोलादी ताकद बाळगणाऱ्या राजकारणातल्या "डॅशिंग लीडर'ची होती. स्वतः गरेवाल यांनाही मुलाखतीआधी जयललितांच्या अहंमन्य स्वभावाची धास्ती होती. पण, या "लेडी'मध्ये दडलेली एक सामान्य "स्त्री' मुलाखतीतून काहीशी बाहेर डोकावली अन्‌ राजकारणाच्या लढाईत पुन्हा हरवली, अगदी "फिअरलेस' बनली! जवळपास पंधरा वर्ष त्यांनी हा राजकीय संघर्ष सुरू ठेवला. आणि या संघर्षातच एक वेळ अशी आणली की अहंमन्यतेचे पोलादी कवच नकळत गळून पडले नि त्या मुलाखतीतून डोकावलेली, काहीशी संवेदनशील स्त्री "अम्मा' बनून तमिळींच्या आयुष्याचा आधार बनली. ही कहाणी दक्षिणेकडील व्यक्तिस्तोम वा भाबड्या भक्तीचा अतिरेक म्हणून दुर्लक्षित करता येईलही. पण, कधी काळी रुपेरी पडद्यावरुन एका अभिनेत्रीच्या ज्या डोळ्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली, त्यांनीच पुढे राजकीय नेतृत्वाची जरबही दाखवली अन्‌ अखेर गोरगरीबांची अम्मा बनताना ते करुणेने ओथंबलेही... या दोन डोळ्यांनी व्यक्तिगत, राजकीय, सामाजिक आयुष्यातील अनेक गोष्टी साध्य केल्या. पण, ते कायमचे बंद होत असताना लक्षात राहिले, ते "आई'चे डोळे... त्यांनी हजारो हातांना काम, त्यावर कष्टाचा दाम अन्‌ पोटाला दोन वेळचा घास दिला... कारण मृत्यूनंतर कीर्तीशिवाय उरतं तरी काय..? सद्‌वर्तनाने अपकीर्ती काहीशी पुसली गेली अन्‌ त्यावर कुणाच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे दोन थेंब पडले, तर झाकोळलेल्या नावावरही कीर्तीचा वर्ख आपोआप चढतो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com