मिशन एव्हरेस्ट : रुट ओपनिंगची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्याने चैतन्य

उमेश झिरपे
सोमवार, 15 मे 2017

मोसमात सर्वप्रथम हे काम करणाऱ्या शेर्पांना म्हणूनच सलाम करावा लागतो. आम्ही गिरीप्रेमीच्या पुण्यातील अनेक कार्यक्रमांसाठी पीक प्रमोशनचे संस्थापक वॉंगचू शेर्पा, शेर्पा सरदार कामी यांच्यापासून अनेक शेर्पांना आमंत्रित केले. त्यांना हा सन्मान दिल्याबद्दल शेर्पा आम्हाला आपुलकीने वागवतात. भारतीय गिर्यारोहक इथेच वेगळे ठरतात.

यंदाच्या एव्हरेस्ट मोसमातील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. रुट ओपनिंगचे करणाऱ्या टीमने समिट केले आहे. याचा अर्थ त्यांनी एव्हरेस्टवर पाऊल टाकले आहे. त्याबरोबरच रुट ओपनिंगची अनन्यसाधारण महत्त्वाची प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. आता यंदा विक्रमी संख्येने दाखल झालेल्या गिर्यारोहकांचे एव्हरेस्टवीर बनण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल. ही टीम सर्वाधिक धोका पत्करत असते. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल. 
खुंबू आईसफॉलमधून रुट ओपन करणारे शेर्पा असूदेत किंवा कॅंप टू पासून पुढे हे काम करणारी टीम असूदेत ते फार शिताफीने हे काम करतात. मुख्य म्हणजे ते सोपा मार्ग शोधतात असे मी म्हणणार नाही, तसे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे ठरेल. नेमकेपणाने सांगायचे झाल्यास कमीत कमी धोका असणारा रूट ओपन करण्यावर त्यांचा भर असतो. तिबेटच्या बाजूने म्हणजे चीनमार्गे चढाई करणे तुलनेने सोपे असते. कारण त्या मार्गावर कॅंप दोन पर्यंत याक जाऊ शकतो. नेपाळमार्गे मात्र तसे नसते. खुंबू हिमनदी पार करणे हेच फार मोठे आव्हान असते. तेथून कॅंप 1, पुढे कॅंप 2 असे क्रमाक्रमाने उंचीबरोबर धोके वाढत जातात. पुढे तर डेथ झोनच असतो. 

तर अशा मार्गावर दर मोसमाला रुट सारखाच असेल असे चित्र प्रामुख्याने गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलले आहे. मी पहिल्या लेखात म्हटले होते त्याप्रमाणे खुंबू आईसफॉल पार करताना एक तास जास्त लागतो. एक लक्षात घ्या या एका तासाचा संदर्भ आणि संबंध एव्हरेस्टशी आहे. हे जगातील सर्वाधिक उंचीचे ठिकाण आहे. मुळात एव्हरेस्ट बेस कॅंप हाच जगातील सर्वाधिक उंचीचा ट्रेक आहे. तेथून एव्हरेस्टच्या दिशेने पाऊल टाकणे विलक्षण खडतर असते. खुंबूमध्ये तर पावलागणिक धोका असतो. काही लॅडर उभ्या लावलेल्या असतात, तर काही लॅडर हिमभेगा पार करण्यासाठी फिक्‍स केलेल्या असतात. तुम्ही रोप लावून चढाई करीत असला तरी प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. 

मोसमात सर्वप्रथम हे काम करणाऱ्या शेर्पांना म्हणूनच सलाम करावा लागतो. आम्ही गिरीप्रेमीच्या पुण्यातील अनेक कार्यक्रमांसाठी पीक प्रमोशनचे संस्थापक वॉंगचू शेर्पा, शेर्पा सरदार कामी यांच्यापासून अनेक शेर्पांना आमंत्रित केले. त्यांना हा सन्मान दिल्याबद्दल शेर्पा आम्हाला आपुलकीने वागवतात. भारतीय गिर्यारोहक इथेच वेगळे ठरतात. अनेक युरोपीय-अमेरिकन गिर्यारोहकांचे आणि शेर्पांचे नाते आर्थिक बाबींपुरते मर्यादित असते. अर्थात त्याच जोडीला अनेक युरोपीय आणि अमेरिकन इथे प्रचंड समाजसेवा करतात. निधीसंकलन सुद्धा करतात याचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करेन. हे विवेचन करताना कदाचित दोन टोके दिसतात. भारतीय गिर्यारोहक शेर्पाला दोस्त मानतो. शेर्पांना सुद्धा सक्षम आणि तत्त्वनिष्ठ असे भारतीय गिर्यारोहक आवडतात. फक्त भारतीय गिर्यारोहकांनी आणलेले लाडू दाखविले तर मात्र शेर्पांना पळता भुई थोडी होते. याचे कारण हे लाडू इतक्‍या उंचीवर आल्यानंतर गोठून जाऊन त्यांचा जणू काही दगड बनतो. असो...हा विनोदाचा नव्हे तर अभ्यासाचा विषय असल्याचे आम्हाला गेल्या अर्ध्या दशकाच्या कालावधीत जाणवले आहे. 

तर आता आपण पुन्हा एव्हरेस्ट रुट ओपन करणाऱ्या टीमकडे वळूयात. मी बेस कॅंपवर एको एव्हरेस्ट मोहिमेच्या टेंटमध्ये जाऊन तेथील व्यवस्थापक डॉ. निमा शेर्पा यांची भेट घेतली. त्यांना 14 शेर्पांची सविस्तर माहिती मागितली. या शेर्पांना हाय अल्टिट्यूड शेर्पा असे संबोधले जाते. शेर्पांमध्ये सुद्धा प्रकार आहेत. बेस कॅंपपर्यंत जाणारे, कॅंप 1 पर्यंत लोड फेरी करणारे, कॅंप 2 वर मुक्काम करून कुकिंग करू शकणारे, अशा क्रमाने शेर्पांचे कौशल्य, क्षमता आणि दमसास वाढत जातो. तसे त्यांचे प्रकार सुद्धा बदलतात. 

डॉ. निमा यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी एक वाजून 15 मिनिटांनी यंदाच्या मोसमातील समिट पूर्ण झाले. या हाय अल्टिट्यूड शेर्पांची नावे अशी ः पेमा त्शेरिंग शेर्पा, पेम चिरी शेर्पा, लाक्‍पा गेलू शेर्पा, सोनम जांग्बू शेर्पा, पासांग शेर्पा, चिम्मी ल्हेनडूक गुरुंग, डेंडी शेर्पा, ताशी शेर्पा, जायबू भोते. त्यांना साथ देण्यासाठी कृष्णा थापा, निर्मल पुर्जा आणि धन्नी राय असे तिघे होते. या सर्वांचा खास नामोल्लेख करण्यावर माझा कटाक्ष अशासाठी आहे की शेर्पांना लाइफलाइन असे संबोधले जाते. त्यांच्याशिवाय आणि मुख्य म्हणजे पोर्टर आणि गाइड यांच्याशिवाय सुद्धा गिर्यारोहक माऊंटनमध्ये जगण्याची सोडाच नुसते जाण्याची सुद्धा अपेक्षा करू शकत नाही. तशी करू सुद्धा नये, कारण लाईफलाईनशिवाय कोणत्याच क्षेत्रात जगता येत नाही. 

आता आमच्या मोहिमेकडे वळूयात. आम्ही 17 तारखेला मध्यरात्री समिट अटेम्प्टला जायचे ठरवितोय. 18 तारखेच्या रात्री आम्ही कॅंप 2 वर असू. त्यानंतर 19 तारखेला कॅंप 3, 20 तारखेला साउथ कोल असे नियोजन आहे. त्यादिवशी रात्री. समिट अटेंम्प्ट करण्याचा आमचा प्रयत्न राहील. 21 तारखेला एव्हरेस्टवर पाऊल टाकून जगातील सर्वोच्च उंचीवर नतमस्तक होण्याची मनिषा आहे. यंदा गिर्यारोहक विक्रमी संख्येने आले आहेत. पुढील दोन दिवसांत 150-200 गिर्यारोहकांचे समिट होण्याची अपेक्षा आहे. 
दरम्यान, सोमवारी बेस कॅंपवर बर्फवृष्टी झाली. एरवी बर्फवृष्टी होते तेव्हा सगळे जण टेंटमध्ये आखडून बसलेले असतात. आज मात्र तसे चित्र नव्हते, कारण एव्हरेस्ट रुट ओपन झाल्यामुळे इथे चैतन्य निर्माण झाले आहे. 
(क्रमशः)