माझ्या भावालां का पटवलं? (उत्तम कांबळे)

uttam kambale writes about school girls dialogues
uttam kambale writes about school girls dialogues

जेमतेम १०-१२ वर्षांच्या त्या दोन मुलींचा तो संवाद ऐकून मी अस्वस्थ होऊन गेलो. दहाव्या-बाराव्या वर्षी यांना प्रेम कसं कळायला लागतं... ? आणि जे ‘कळलेलं’ असतं, ते खरोखर ‘प्रेम’च असतं का? ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थही माहीत नसण्याच्या या वयात प्रेमाच्या आजच्या ‘परिभाषे’तून त्या दोघींमध्ये काही संवाद सुरू होता. अस्वस्थतेपोटीच मी शिक्षकमित्राला फोन केला. त्यानंतर माझी अस्वस्थता आणखीच वाढवली. त्यानं जे सांगितलं, ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. 

संध्याकाळी फिरायला जाताना शाळेसमोर एका मोठ्या दगडावर बसून बसची किंवा एखाद्या छोट्या-मोठ्या ठरलेल्या वाहनाची वाट पाहणारे विद्यार्थी मी रोजच पाहतोय...कधी कधी मी तिथं चहाच्या टपरीवर रेंगाळत चहा घेतो. निघून जातो. त्या दिवशी असाच टपरीवर थांबलो होतो. शाळेची बेल वाजली आणि वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात त्याप्रमाणं विद्यार्थी बाहेर पडले. आपापल्या मुलांना घेण्यासाठी पालकांची बाहेर अशी गर्दी झाली, की विचारायला नको! कुणी पालक फोरव्हीलर, कुणी टूव्हीलर, तर कुणी पायीच आलेले होते. सायकली गायब झाल्या असल्या, तरी एक-दोन पालक सायकल घेऊन आपल्या मुलांना नेण्यासाठी आलेले असतात. शाळेचा वॉचमन ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भूमिकेत जातो. शाळेनं दिलेला किंवा स्वतःच शिवून घेतलेला गणवेश घालून शिटी वाजवतो. काठी आपटतो. ट्रॅफिक कंट्रोल करत चिडतो. ‘एवढी शहाणी माणसं; पण यांना कळत कसं नाही,’ असं एक वाक्‍य उपरोधानं बोलून जातो. ज्या शहाण्यांच्या कानावर हे वाक्‍य पडतं, त्यांना काहीच वाटत नाही. कारण, ते रोजचंच असतं. ज्यांना हे वाक्‍य ऐकू जात नाही, ते दिसंल त्या दिशेनं आपलं वाहन मुंगीच्या गतीनं घुसवत असतात. रोज एक चक्रव्यूह तयार होतो. आजचे...उद्याचे हे ‘अभिमन्यू’ रोज शाळा सुरू होताना आणि ती सुटताना हा चक्रव्यूह पार पाडतात. बाहेर आले की हुश्‍शऽऽ करतात. ‘सुटलो बाबा एकदाचे,’ अशी भावना त्यांच्या 
चेहऱ्यावर असते. 
...तर या चक्रव्यूहातून बाहेर पडलेल्या तीन-चार मुली दगडावर येऊन बसल्या होत्या. त्यांना घेऊन जाणारा टेम्पो-कम-टॅक्‍सी कोणत्याही क्षणी पोचणार होती. कुणी केसावरून हात फिरवला, कुणी चेहऱ्यावरून रुमाल, तर कुणी सॅकमध्ये ठेवलेली आणि तळ गाठलेली पाण्याची बाटली बाहेर काढली. उरलंसुरलं पाणी संपवलं. या तीन मुलींपैकी एक अधिक उंचीची, एक मध्यम, तर तिसरी कमी उंचीची होती. पाचवी-सहावीच्या वर्गात असाव्यात त्या. दगडावर बसलेली ती उंच मुलगी उठून उभी राहिली. मध्यम उंचीच्या मुलीवर नजर रोखत म्हणाली : 
‘‘हे बघ स्मिता, आपण दोघी मैत्रिणी आहोत की नाही?’’
स्मिता : ‘‘होय, आहोतच की!’’
ती : ‘‘आपण एकमेकींवर प्रेम करतो की नाही?’’
स्मिता : ‘‘होय.’’
ती : ‘‘आपण अशीच मैत्री ठेवणार आहोत की नाही?’’
स्मिता : ‘‘होय.’’
या दोघींचं बोलणं आता शेजारची छोटीही ऐकू लागली. अशी मध्येच प्रश्‍नोत्तरं का सुरू झाली, हे तिच्या लक्षात आलं नसावं.
ही सगळ्यात उंच मुलगी आपली नजर स्मितावर आणखी खोलवर रोखत म्हणाली : ‘‘आता एक थेट विचारू का?’’
स्मिता : ‘‘होय.’’
ती :  ‘‘माझ्या भावाला तू पटवायला नाही पाहिजे होतं. स्मिते, अगं आपण एवढ्या जिवाच्या मैत्रिणी...सांग का पटवलंस माझ्या भावाला?’’
प्रश्‍न ऐकून दोघीही चक्रावल्या; पण स्वतःला सावरत स्मिता म्हणाली : ‘‘मी त्याला पटवलंय, असं तुला कुणी सांगितलं? त्यानंच मला पटवलंय.’’
ती : ‘‘काय पण सांगू नको. माझा भाऊ तसा नाहीय. सातवीत गेलाय. सीरिअस आहे तो. तूच भानगड केली असशील.’’
स्मिता : ‘‘हे बघ राणी, त्यालाच सगळं विचार...मला तर बाई तो मागं लागला की खूप टेन्शन यायचं...’’
ती : ‘‘अगं, तू रिस्पॉन्स कशाला देतेस?’
स्मिता : ‘‘काय करणार? मैत्रिणीचा भाऊ पडला तो...किती मागं लागतो...घरावर चकरा मारतो. फोन करतो...एसएमएस करतो...हार्ट पाठवतो...तुला वाईट वाटू नये म्हणून मी पटले आणि त्यानंच पटवलं. आपली मैत्री नसती ना तर दिला असता शॉक...’’
ती : ‘‘अगं घरात कळायला लागलंय...खूप वाढवा होणार आहे. माझे आई-वडील तुझ्या घरी भेटायला येणार आहेत.’’
स्मिता : ‘‘बाई गं...पण तुझ्या भावामुळंच हे झालंय.’’
ती : ‘‘पण आता सोडून दे ना!’’
स्मिता : ‘‘हो, ट्राय करते.’’
ती बोलण्यासाठी पुन्हा तोंड उघडणार तेवढ्यात हॉर्न वाजवत त्यांची गाडी आली. या तिघीही पटापट गाडीत चढल्या. बाकी पोरंही ‘काका, काका चला... वेळ लावत जाऊ नका,’ असं म्हणत गाडीत चढली. गाडी निघाली.

त्या मुलींच्या संवादानं मी खूपच अस्वस्थ झालो होतो. १०-१२ वर्षांच्या पोरी; पण ‘पटवा-पटवी’वर अगदी बिनधास्त बोलत होत्या. अलीकडंच ‘काही अल्पवयीन मुला-मुलींचा प्रेमप्रकरणातून खून’ अशा बातम्या वाचल्या होत्या. चालता चालताच मी माझ्या एका शिक्षकमित्राला फोन केला. त्याला हे दृश्‍य सांगितलं. तो म्हणाला : ‘‘हे काहीच नाही. किरकोळ आहे. ‘डोकं दुखतं’, ‘पोट दुखतं’ म्हणून मध्येच काही पोरी आणि पोरं वर्गाबाहेर पडतात. बागेत जाऊन मिठ्या मारून बसतात. अनेकदा आम्ही पकडलंय. एकमेकांना चिठ्ठ्या-चपाट्या लिहितात. त्यांच्या मोबाईलमध्ये नको त्या पोझमध्ये फोटो दिसतात. अनेकदा हे फोटो पाहून आम्ही त्यांना डिलिट करायला लावले. एक पोरगी आपल्या ओठांचा, डोळ्यांचा सेल्फी काढायची. तो वर्गात व्हायरल करायची. अनेकदा तर यांच्या बॅगेत नको नको ते सापडतं. अगदी नको त्या गोळ्यांपासून सगळं...बाप रे बाप...’’ 
मी म्हणालो : ‘‘हे असं का घडतंय बालवयात आणि याला जबाबदार कोण?’’
शिक्षक : ‘‘कोण म्हणजे? आई-वडील. त्यांना कुठं ठाऊक असतं, की मुलं बाहेर काय करतात? आणि समजलं तरी ते काहीही करू शकत नाहीत. आम्हालाच सांगतात : ‘लक्ष ठेवा.’ पण वर्गाबाहेर आम्ही तरी कसं लक्ष ठेवणार... ? वर्गात तरी काय करणार? शिकवणार की यांच्या डोळ्यांचा अभ्यास करणार...? त्यातही कायदा आहे, मारता येत नाही...रागावता येत नाही...’’
शिक्षकानं सांगितलेला प्रकार ऐकून तर आणखीच अस्वस्थ वाटायला लागलं. फोन बंद करून चालू लागलो. मुलांनी भरलेली गाडी मला क्रॉस करून गेली. त्या मुली अजून काय चर्चा करत असतील...दहाव्या-बाराव्या वर्षी यांना प्रेम कसं कळायला लागतं...? प्रेमाऐवजी ‘पटवलं’ हा शब्द त्यांनी किती सहजपणे वापरला होता. आता आध्यात्मातले लोक याला ‘कलियुग’ समजतील...अध्यात्माबाहेरचे ‘नवयुग’ समजतील...युग कोणतंही असो, हा उद्याचा नवा समाज कुठं जाईल आणि काय घेऊन जाईल काही कळत नाहीय...काळ आणि काळातल्या पिढीला घडवण्यासाठीची आपल्या हातातली हातोडी आणि छन्नी कशी गायब झाली, काही कळत नाहीय...की दिली 
आपणच फेकून...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com